नुकतेच इराणमध्ये ‘morality पोलिसांच्या मारहाणीत  मेहसा अमिनी या बाविस वर्षीय  तरुणीच्या मृत्यूने मन पिळवटूण गेले तर त्याचवेळेस मेहसा अमिनीच्या मृत्यूचा निषेध करत हजारो शेकडो स्त्रिया केवळ इराणमध्येच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये रस्त्यावर उतरुन ज्या स्वरूपाचा निषेध नोंदवत होत्या ते   मन भारावून टाकणारे  होते.  इराण मधील नियमानुसार  मेहसा अमिनी या तरुणीने ‘योग्य’   प्रकारे हिजाब घातला नव्हता  त्यामुळे इराणमधील पोलिसांनी   तिला ताब्यात घेतले  आणि  Reeducate म्हणजे तथाकथित ‘शहाणपणाची समज’  देताना  झालेल्या मारहाणीत तीला   आपला जीव गमवावा लागला.  वास्तविक इराणमध्ये स्त्रियांवरील  विविध निर्बंध आणि अत्याचाराविरोधात सातत्याने सुरु असलेल्या विरोधाचा बांध  मेहसा  अमिनी प्रकारणाने  फुटला आणि शेकडो हजारो स्त्रिया   खुलेपणाने आपले  केस कापत, हिजाब पेटवून देत  पितृसत्तात्मक निर्बंधाची राखरांगोळी करत होत्या. एवढेच नाही तर   हवेसोबत झुलणाऱ्या केसांचा  उंच झेंडा पितृसत्तेच्या छातीत धडकी भरवत होता.  वास्तविक केस कापणे, हिजाब पेटवणे,  खुल्या केसांचा झेंडा फडकवणे या प्रतिकात्मक कृती असल्या तरी खूप महत्वपूर्ण आहेत कारण स्त्रियांच्या  शोषण,  दास्यत्व आणि दुय्यमत्वाची मुळं या प्रतिकसंहितेत रुतलेली  आहेत.

पितृसत्ताक  समाजात स्त्रियांचा देह, त्यांचा पोशाख, त्यांचे अलंकार, त्यांचे स्वभावगुण, रंग,  त्यांचे नामाभिधान  इत्यादी मधून  समाजातील स्त्रियांच्या शोषण, दास्यत्व,  दुय्यमत्व आणि अन्यायाला  वैध आणि स्वाभाविक  ठरवत संयुक्तिक मानले जाते. 

पितृसत्ताक  प्रतिकांचा विरोध आणि नवीन समतावादी  प्रतिकांचा पुरस्कार हा स्त्री चळवळीचा महत्वपूर्ण  कृतिकार्यक्रम राहिलेला आहे.   पितृसत्ताक  समाजव्यवस्थेत  डोळे, मान खाली घालून  नम्रपणे हात जोडलेल्या   स्त्रीचे  प्रतिक स्वागतासाठी वापरले जाते तर  या  उलट मुठ आवळलेली,  मान, डोळे व  चेहरा उंच करून आकाशाकडे बघणा-या बंडखोर आणि मुक्त  स्त्रीचे प्रतिक  स्त्रीचळवळीने स्वीकारले. स्त्री देहाचे वस्तुकरण करत पुरुषी उपभोगासाठी   चित्रपट, साहित्यामधून  स्त्रीदेहाच्या नग्नतेचे  प्रदर्शन मांडले जाते तर दुसरीकड़े यांची आदर्श स्त्रीप्रतिमा मात्र नखशिखान्त संपूर्ण पोषाखातील  लाजेचा अलंकार ल्यालेली सुंदरा असते.  मात्र भारतीय सैन्याच्या लैंगिक अनन्वित अत्याचार आणि मनोरमा या स्त्रीवरील बलात्कार आणि हत्येचा  निषेध   करत 2004 मध्ये  मणिपुरमधील स्त्रियांनी ‘Indian army , come on rape us too’ ( भारतीय सैनिकांनो या  आमच्यावर सुद्धा बलात्कार करा)   म्हणत नग्न निषेधमार्च काढला तेंव्हा   या पुरुषी  बेगडी नीतिमत्तेच्या ठिक-या ठिक-या उडून पडतात.

कपडे किंवा पोशाख हे स्त्री चळवळीतील महत्वपूर्ण प्रतिक राहिलेले आहेत. स्त्री चळवळीच्या पहिल्या लाटेत म्हणजे  सफ़रेजेट अथवा  मतदानाधिकाराच्या आंदोलनात स्त्रियांना सायकल चालवण्याचा अधिकार प्राप्त करणे ही महत्वाची मागणी स्त्रिया करत होत्या  मात्र समाजाकडून त्याला तीव्र विरोध केला गेला.  तत्कालीन स्त्रियांचा पोषाख सायकल चालवण्यायोग्य नव्हता कारण त्या पोषाखाच्या विस्तीर्ण  घेरामुळे अपघात होण्याच्या शक्यता होत्या आणि  म्हणून स्त्रियांनी ‘ब्लुम’र्स हा साईकल चालवण्यास योग्य पोषाख स्वीकारला आणि पुढे तोच  पोषाख बंधमुक्तता आणि स्त्रियांसाठीच्या नवनवीन संधीचे प्रतिक बनला. स्त्रियांसाठी महत्वपूर्ण मानले गेलेले दुसरे वस्त्र म्हणजे स्त्रियांचे अंतर्वस्त्र  अथवा ब्रा.   1969 साली ‘मिस अमेरिकन’ स्पर्धेचा तसेच पितृसत्ताक सौंदर्यनिकषांचा विरोध म्हणून  शेकडो स्त्रियांनी त्यांची अंतर्वस्त्रे  ‘Freedom Trash Can’ म्हणजे कचरापेटीमध्ये फेकून दिली. याच घटनेला  आज  ‘ब्रा- बर्निंग’ चळवळ म्हणून ओळखले जाते.

भारतीय समाजात पुरुषांची पगड़ी हे पुरुषांच्या मान, मरातब आणि सन्मानाचे प्रतिक मानले जाते तर स्त्रीचा  डोक्यावरचा पदर म्हणजे  तिच्या नम्रता, शालिनतेचे  प्रतिक मानले जाते.   तसेच स्त्रियांचे वस्त्र साड़ीचोळी, बांगड्या वगैरे सारखे अलंकार बायकी निष्क्रियता आणि दुय्यमत्वाचे प्रतिक मानले जाते.  आणि म्हणून  आपले सामर्थ्य आणि सक्रियता दर्शवण्यासाठी ‘गप्प, शांत बसायला मी काय हातात बांगड्या भरल्या आहेत का?’ म्हटले जाते अथवा एखाद्या अकार्यक्षम मंत्री  अथवा अधिका-याला त्याची  निष्क्रियता दाखवून देवून  त्याला लज्जित करायचे  असेल तर साडी- चोळीचा आहेर दिला जातो किंवा त्यांच्या अंगावर बांगड्या फेकल्या जातात.   केवळ स्त्रियांचे वस्त्र आणि अलंकार नाही तर  आदम आणि ईव, मेनका- विश्वमित्र इ. उदाहरणे देवून स्त्रीचा स्वभावगुण हा  मूलत: अनाकलनीय, धूर्त व  कावेबाज असून  पुरुषांना त्यांच्या सन्मार्गावरुन विचलित करणारा मानले जाते  तर स्त्री देह हाच  मुळात अपवित्र व विटाळक्षम  मानून सर्व महान व्यक्तिचा  जन्म हा कसा स्त्री गर्भातून न होता काही तरी नैसर्गिक अथवा दैवी  चमत्कारातून झाला आहे यासाठीचे तर्क उभे केले जातात.  संत तुकारामाची बायको,कैकेई व अशी अनेक उदाहरणे उभी करून पुरुष हे अध्यात्म, अमूर्तता आणि विवेकाचे प्रतिक तर स्त्रिया या स्वार्थ, लोभीपणा, भौतिक सुखोपभोग व अविवेकाचे प्रतिक मानल्या  जातात आणि त्यातूनच पुढे  त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे व प्रसंगी त्यासाठी हिंसेचा वापर करणे कसे यथायोग्य आहे हे बिंबविले जाते.   स्त्री  म्हणजे स्वत:ला  लैंगिक इच्छा नसणारी, केवळ पुरुषांच्या  लैंगिक उपभोगाची वस्तू  आणि मातृत्वाची नैसर्गिक  अंतःप्रेरणा असणारी त्याच वेळेस एकमेकींविषयी कायम शत्रुत्व, असुया असणारी ही प्रतिमा नाकारत  जहाल स्त्रीवाद्यांनी  स्त्रियांमधील भगिनीभावाला दृश्यता  देत,   मातृत्वाच्या  कोंदणाच्या  पलिकडे  स्त्रियांना देखील  लैंगिक इच्छा  असतात याची मांडणी करत लैंगिकता, मातृत्व, प्रेम, लग्न, भगिनीभाव,  यासंबंधीची  नवीन प्रतिमाने उभी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दलित अस्पृश्य स्त्रियांना नीटनेटके राहण्याचा, लोखंड, कथिलाचे दागिने न घालण्याचा महिला परिषदामधून दिलेला  सल्ला हा जातीने लादलेली हिनत्वाची प्रतिमा खंडित करुन स्वसन्मान प्रस्थापनेच्या  प्रयत्नाचाच   भाग म्हणता येईल.

 स्त्रियांचे केवळ वर्तमानच नाही तर स्त्रियांच्या इतिहासाला देखील नकारात्मक प्रतिकांची जंत्री ठरवले गेले आहे. स्त्रीसत्ताक गणराज्ये आणि त्यांच्या निर्ऋति, हरिती, हायपेशिया सारख्या गणराण्या, गणमातांना नरकाच्या  व अशुभाच्या देवता ठरवून व त्यांच्या ज्ञान,  करतब व  कर्तृत्वाला नेणिवेच्या अंधकारात  ढकलले   गेले.

स्त्रीदास्य आणि स्त्री दुय्यमत्वाची पितृसत्ताक  खेळी ही बहुदा प्रतिकांच्या सांस्कृतिक अस्त्रांच्या माध्यमातून  प्रभावीपणे खेळली जाते. त्यामुळे स्त्रियांनी स्वत: इतक्या बेमालुमपणे  या दास्यत्वचा स्वीकार केलेला असतो की  त्या स्वतःच  याच्या संरक्षक म्हणून उभ्या राहतात आणि म्हणून या प्रतिकांच्या सांस्कृतिक राजकारणाचा बिमोड करणे अवघड ठरते. या सांस्कृतिक राजकारणाचेच फलित म्हणून स्त्रियांना संपत्ती, घटस्फोट, दत्तक अधिकाराचा समान अधिकार देणाऱ्या कायद्याला 1956 मध्ये खुद्द स्त्रियांकडून विरोध केला गेला, अनेक धार्मिक जातीय  दंगलीमध्ये विरोधी गटातील स्त्रियांवर बलात्कार करण्यासाठी स्वत: स्त्रिया त्यांच्या पुरुषांना प्रेरित करत असल्याचे दिसून आले, त्यासोबत सतीप्रथा, हिजाब  समर्थनार्थ खुद्द स्त्रियाच जेंव्हा  आंदोलनात  उतरतात तेंव्हा ही सांस्कृतिक अधिपत्याच्या  प्रतिकांची खेळी कशी  यशस्वीपणे काम करते  याचे दर्शन होते. आणि म्हणूनच इराणमधील हिजाब विरोधी आंदोलनात स्त्रियांचे आपल्या दास्यत्वाच्या प्रतिकांचा त्याग करून  आपल्या सन्मानाची,  मुक्तिची, प्रतिके उभी करणे  निश्चितच आपल्याला उभारी देणारे व आत्मपरीक्षण करायला भाग पाडते.  कारण आज लोकशाहीमध्ये   निवडीचा  अधिकार  (freedom of choice) उपलब्ध झालेला असताना आपल्या दास्यत्वाचे योग्य आकलन नसेल तर हेच अस्त्र शोषकांचे हितसंबंध जोपासण्यासाठी  शोषितच  उपलब्ध करून देण्याचा धोका असतो. आणि म्हणूनच इरणमधील स्त्रियांचा निवडीचा अधिकार आणि हुकूमशाहीला विरोध  हे विवेकी हस्तक्षेपाचे रास्त उदाहरण ठरते. या पार्श्वभूमीवर   स्त्रियांना दुय्यम  व इतर ठरवून त्यांच्या अस्तित्व व योगदानाला दुर्लक्षित करणाऱ्या प्रतिकाचे खंडन करत स्त्रियांच्या सन्मान  आणि कर्तृत्वाला  दृश्यतेची झळाळी देणाऱ्या प्रतिकांचा पुनर्शोध घेत  त्यांच्या  पुनर्स्थापनेचे आव्हान हाती घेणे म्हणूनच गरजेचे ठरते.

लेखिका ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकर  मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे सहाय्य्क प्राध्यापक म्हणून अध्यापन करीत आहेत.                  

ईमेल- nirmalajadhav@gmail.com