गेले महिनाभर महाराष्ट्रातील जनता एका राजकीय बंडाचा अनुभव घेत आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीतील एक पक्ष असलेल्या शिवसेनेत मोठे बंड झाले आहे. शिवसेनेत यापूर्वीही बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतही बंडे झालीत. पण आताचे हे बंड शिवसेनेच्या इतिहासातील अभूतपूर्व असे बंड आहे. या ऐतिहासिक बंडाची संहिता लिहिली आहे शिवसेनेचे जेष्ठ नेते व ठाणे गडकोटाचे सेनापती एकनाथ शिंदे यांनी. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखानंतरचे वजनदार नेते होते. विधान परीषद निवडणूकीच्या रणधुमाळीत एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारीत ४० आमदारांना घेवून आधी सुरत नि मग गुहावटीला मुक्काम करत बंडाचा झेंडा बुलंद केला. अर्थात या बंडाच्या नाटकाचा निर्माता आणि दिग्दर्शक भाजप होता हे बंडाची चाहुल लागताच स्पष्ट झाले होते. या बंडाची तीव्रताच इतकी होती की, ही शिवसेनेतील फूट न ठरता पक्षच ताब्यात घेण्याचे राजकारण केले जात आहे. या बंडाचा पहिला परिणाम आघाडी सरकारवर होणे अटळ होते. आघाडी सरकार अल्पमतात येवून ते कोसळले. कारण पक्षांतरबंदाचाही कायदा लागू होणार नाही अशा घाऊकपणे शिवसेनेचे आमदार शिंदे गटात सामिल झाले. आता तर खासदाराचा मोठा गटही शिवसेनेतून फुटला आहे. म्हणजे महिना उलटला तरी शिवसेनेतली फूट सुरुच आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ही फूट रोखण्यात सपशेल अपयश आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला पाडलेले भगदाड भाजपला पुढील काळातल्या राजकारणासाठी विशेषत: मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या दृष्टीने इतके फायदेशीर आहे की त्या फायद्यासाठी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने बंडाचे फळ म्हणून एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली गेली व फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदी सध्या तरी समाधान मानावे लागले आहे.

एकनाथ शिंदे यांनी आता पक्षावरच दावा सांगितला आहे. शिवसेना अंतर्गत सुरु असलेल्या या राजकिय धुमश्चक्रीत सर्वसामान्य शिवसैनिक भांबावून गेला आहे. “शिवसेना कोणाची?” या उपस्थित झालेल्या प्रश्नाने तो पुरता भेदरुन गेला आहे. पक्षसंघटनेचा ताबा कोणाचा हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. दुसरीकडे हा प्रश्न निवडणूक आयोगाच्या दरबारातही पोहचला आहे. शिवसेनेच्या अस्तित्वाचीच लढाई सुरु  आहे. या लढाईत एकनाथ शिंदे एकाकीपणे लढणार नाहीत तर भाजप पूर्ण क्षमतेने या लढाईत उतरला आहे. दुस-या बाजूला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाकी पडले आहेत.

एकनाथ शिंदेचे बंड आणि हिंदुत्व

एकनाथ शिंदे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा त्याग करुन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाशी आघाडी करीत मुख्यमंत्री बनले. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी केलेली तडजोड शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाच्या विपरित आहे म्हणून हिंदुत्वासाठी बंडाचे निशाण रोवल्याचे सांगितले आहे. अर्थात महाराष्ट्रातील जनता राजकीय संस्कृतीविषयी इतकी निरक्षर राहिलेली नाही. खरं तर हे एकनाथ शिंदे यांनाही माहित आहे पण भाजप बरोबर जायचे त्यासाठी यापेक्षा वेगळे कारण असूच शकत नव्हते. शिंदे आणि त्यांचे साथीदार काहीही सांगोत महाराष्ट्रातील ही राजकिय उलथापालथ ईडीचा चमत्कार आहे हे लपून राहिलेले नाही.

भाजपने अनेक राज्यातील बिगर भाजपाची सरकारे पाडली आहेत. उत्तराखंड, कर्नाटक,मध्यप्रदेश,गोवा,मणिपूर आदी राज्यातील कॉंग्रेसची सरकारे पाडली. त्यासाठी ईडी,सीबीआय आदी संस्थांचा वापर केला. महाराष्ट्रातही हाच प्रयोग केला गेल्याचे सर्वच राजकिय विश्लेषक नि:संकोच मान्य करीत आहेत. ईडीचा ससेमिरा लावून विरोधी सरकारातील आमदार अंकीत करुन सरकार अस्थिर सकरण्याचा लोकशाहीविरोधी राजकारण करण्यात कॉंग्रेसपेक्षा भाजप दोन पावले पुढे गेली आहे. एकनाथ शिंदे गटात सामिल झालेले जवळपास सर्व आमदारांना ईडीच्या रडावर येण्याची भीती वाटल्यानेच शिंदेंचे बंड यशस्वी होताना दिसते आहे.

एकनाथ शिंदेचे बंड यशस्वी करण्यात भाजप का यशस्वी झाला ?

महाराष्ट्राच्या राजकिय मैदानात भाजप हा शिवसेनेचा नैसर्गिक मित्र मानला जातो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी भाजपला जैविक मित्रच मानले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात महाराष्ट्रात भाजपला राजकिय जनाधारही मर्यादीत होता. युती म्हणजे शिवसेना-भाजप हे समीकरण कायम झालेले. बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत शिवसेनेचा राजकिय जनाधार हा भाजपपेक्षा अधिक होता. भाजपलाही या मर्यादा मान्य होत्या. त्यामुळे युतीचे सर्वेसर्वा  हे शिवसेनाप्रमुखच कायम राहिले. भाजपला तो अवकाश कधीच मिळाला नाही. या राजकिय इतिहासाचा सूड घेणे भाजपच्या वैचारिक जातकुळीला अनुरुप होते. बाळासाहेब ठाकरे यांचे २०१२ साली निधन झाल्यानंतर २०१४ साली महाराष्ट्र विधानसभेची झालेली निवडणूक भाजपने शिवसनेवर सूड उगवत लढवली. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतरच्या पहिल्याच निवडणूकीत भाजपने युती फोडली. शिवसेनेला स्वतंत्र लढावे लागले. २०१९ च्या पहिल्या सत्ताकाळात भाजपने अक्षरश: शिवसेनेची फरफट केली. या सत्ताकाळात शिवसेनेची इतकी फरफट भाजपने केली की सत्तेत राहूनही शिवसेनेने एका अर्थाने प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावली.

याचा स्पष्ट अर्थ होता की शिवसेना वाढणे अथवा तिचा असलेला जनाधार टिकून राहणे भाजपच्या विस्तारासाठी सोईचे नव्हते. म्हणूनच शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर भाजप थोरल्या मित्राच्या भूमिकेत शिरली तर शिवसेनेला धाकल्या भावाच्या भूमिकेत ढकलले. अर्थात मवाळ असले तरी संघटन शक्तीच्या क्षमता असलेल्या उद्धव ठाकरे यांनी भाजपची ही बदलली रणनीती चाणाक्षपणे हेरली होती. म्हणूनच त्यांनी कणा ताठ ठेवत २०१४ ची निवडणूक स्वतंत्रपणे लढली.

२०१९ ची विधानसभेची निवडणूक शिवसेनेने युती करुन लढवली त्यामागे भाजपच अधिक आग्रही राहिला. ॲटीइन्कंबन्सी चा फटका बसू नये या भीतीने युती करुन भाजपला ही निवडणूक लढवावी लागली. अर्थात या निवडणूकीत भाजपला १०६ जागा मिळाल्या. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर भाजपने चलाखीने सेनेला दुय्यम स्थानावर ढकलले. महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच विचारधारेचे दोन पक्ष एकाच कोअर व्होटबॅंकेसाठी असणे भाजपच्या विस्तारवादी राजकारणासाठी अधिक अडचणीचे होते. आज हिंदू व्होटबॅंकचे भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष दावेदार आहेत. भाजपला शिवसेनेची ही दावेदारी संपुष्टात आणायची आहे. केवळ दावेदारीच नाही तर प्रसंगी शिवसेना पक्षच संपला तर ते भाजपला हवेच आहे. उद्धव ठाकरे यांना हा दोन पक्षांच्या विस्तारवादाबाबतीतला पेच आणि भाजपचे चलाख राजकारण समजून चुकले होते. प्रबोधकारांच्या उदारवादी हिंदुत्वाची लाईन घेत उद्धव ठाकरे भाजपच्या स्यूडो हिंदुत्वाचा मुकाबला करु पाहत होते. उद्धव ठाकरे यांची चूक होती ती हीच.

शिवसनेने स्यूड्यो हिंदुत्वाचा टिळा लावून महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:चीच गोची केली.

शिवसेनेची स्थापना हिंदुत्वाच्या मुद्दयावर झाली नव्हती हे लक्षात घ्यायला हवे. साडेपाच दशकापूर्वी स्थापन झालेल्या शिवसेनेचा मुख्य अजेंडा हा मराठी माणूस आणि त्याची अस्मिता ! प्रादेशिक अस्मितेला कुरवाळणारा शिवसेना हा महाराष्ट्रातला पहिला राजकिय पक्ष होता. हा अजेंडा शिवसेनेला मुंबईच्या सांस्कृतिक संघर्षाने दिला होता. मात्र मुंबईने दिलेला हा अजेंडा महाराष्ट्रव्यापी राजकारणासाठी वापरण्याचे कसब बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवले. अर्थात मुंबईत कम्युनिस्टांचे वर्चस्व मोडीत काढण्याच्या नादात शिवसेनेने मराठी माणसाच्या अस्तित्वावरच घाला घातला हा ही काळा इतिहास आहेच. अन्यथा गिरणी कामगार एवढ्या लवकर आणि इतक्या प्रमाणात देशोधडीला लादला नसता. ८२ च्या संपात शिवसेनेने जी भूमिका घेतली त्याने मुंबईतील गिरणी कामगारांना भळभलती जखम देवून गेली. शिवसेनेने त्यानंतरच्या कालखंडात मराठी अस्मितेचे राजकारण जरुर केले पण गिरणी कामगारांना दगाफटका केल्याच्या आत्मश्लाघेतून मराठी माणूस दिर्घकाळ शिवसेनेला तगवेल याचा विश्वास हरवून बसली. त्याचा परिणाम शिवसेना हिंदुत्वाकडे सरकवणे अपरिहार्य बनले. मराठी अस्मिता आणि हिंदुत्व यांची मोट बांधून शिवसेनेचे पुढचे राजकारण आगेकूच करीत राहिले. शिवसेनेची दुसरी चूक भाजपला महाराष्ट्रात विस्तारण्याचा अवकाश देवून केली. एकाच व्होट बॅंकेवर दोन पक्षांना सत्तेचे राजकारण करता येणार नाही याचे भान शिवसेनेला राहिले नाही. दुसरीकडे भाजपने शिवसनेच्या आश्रयाने हिंदू व्होट बॅंकेत शिरकाव करुन ती ताब्यात घेण्याचा दुरदर्शी विचार करीत लांब पल्ल्याचे राजकारण करण्याची नीती अवलंबिली.

पक्षीय रचना हेच शिवसनेचे खरे बलस्थान होते.

शिवसेनेचे पक्ष संघटन प्रस्थापित पक्षांच्या सरंजामी चौकटीला छेद देणारे राहिले आहे. शिवसनेने शाखाप्रमुखाला पक्षरचनेत मध्ययवर्तित्व बहाल करीत तळाच्या केडरला नेतृत्वाचा अवकाश दिला. बहुस्तरीय सत्ताकेंद्रांत शिवसैनिक सहजपणे प्रवेशकर्ता झाला. कॉंग्रेसच्या पारंपारिक राजकारणात परिघावर राहिलेल्या मधल्या जाती शिवसेनेकडे वेगाने सरकल्या.कॉंग्रेसने सरंजामी संस्थानिक राजकारणाची जोपासलेली संस्कृती शिवसेनेने मोडीत काढली होती.

शिवसेनेचा सामान्य शिवसैनिक आणि पक्षसंघटनेवर बाळासाहेब ठाकरेंची मजबूत पकड शिवसनेचे संघटन अभेद्य ठेवण्यात प्रारंभीच्या काळात शिवसेना यशस्वी ठरली. एक काळ असाही होता शिवसनेचा कोणीही नेता शिवसनेनेतून फुटून जाण्याचा स्वप्नातही विचार करु शकत नव्हता. मात्र पुढे शिवसेनेलाही पक्षांतर्गत बंडखोरीला सामोरे जावे लागले आहे.

शिवसेनेतही बंडखोरीचा परंपरा

शिवसेनेकडे असलेली लढाऊ शिवसैनिकांची फौज आणि शिवसेनाप्रमुखांची पक्षसंघटनेवर असलेली मजबूत पकड यामुळे शिवसेनेत कधीच बंडखोरी होणार नाही असे सुरुवातीच्या काळात जरुर वाटत होते.पण शिवसेनेलाही बंडखोरीचे हाडरे बसले आहेत. खुद्द बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीतच चार बंडखो-या पाहाव्या लागल्या आहेत.

शिवसेनेतही बंडखोरी होवी शकते आणि तेही बाळासाहेब ठाकरे यांची पक्षावर मजबूत पकड असताना हे दाखवून दिले ते छगन भुजबळ यांनी. शिवसेनेला बंडखोरीचा पहिला हादरा देणारे छगन भुजबळ हे पहिले शिवसेना नेते होते. १९९१ साली भुजबळ शिवसेनेतू बाहेर पडत कॉंग्रेसवासी झाले. शिवसेनेचे दुसरे कट्टर नेते गणेश नाईक यांनी १९९ साली शिवसेना सोडत राष्ट्रवादीचे झाले.

भुजबळ यांच्यानंतर शिवसेनेला ज्या मोठ्या बंडाशी सामना करावा लागला ते बंड होते नारायण राणेंचे. राणेंच्या बंडाने शिवसेनेला फार मोठे नुकसान झाले नसले तरी त्यांचे बंड शिवसेनेच्या जिव्हारी लागणारे होते. नारायण राणे हे कट्टर शिवसैनिक तर होतेच शिवाय बाळासाहेब ठाकरेंचे ते विश्वासू शिलेदार होते. त्या विश्वासानेच त्यांनी राणे यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. पण राणे यांनी २००५ साली बंडाचे निशाण फडकावले. राणे यांनी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करीत त्यांनी शिवसेना सोडली.

पण शिवसेनेच्या इतिहासात सर्वांत गाजले बंड ते राज ठाकरे यांचे. ठाकरे घराण्यातून बंडखोरी होणे हे शिवसेनेवर जबरदस्त आघात करणारे होते. २००३ साली उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष बनल्याने नाराज असलेल्या राज ठाकरे यांनी अखेर २००६ साली शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र ‘ म्हटले. राज ठाकरे यांची बंडखोरी उद्धव टाकरेंच्या नेतृत्वाची आणि संघटन कौशल्याची कसोटी पाहणारी होती. राज ठाकरे हे आक्रमक स्वभावाचे तर उद्धव मवाळ. शिवसेनेचा ही आक्रमक पक्षसंघटना होती. या संघटनेच्या नेतृत्वस्थानी आक्रमक राज फीट बसतात असा सर्वच राजकिय तज्ञांचा होरा राहिला. अखेर राज शिवसेनेतूनच बाहेर पडले. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष काढला. मात्र दोन्ही पक्षांची व्होटबॅंक सारखीच राहिल्याने राज ठाकरेंचीच कोंडी झाली.

राज ठाकरेंची बंडखोरी शिवसेनेसाठी घातक वाटत असली तरी उद्धव ठाकरे यांनी ही परिस्थिती कुशलतेने हाताळली. पक्षात फारशी पडझड होवू दिली नाही. त्यानंतरच्या निवडणूकीत पक्षाला यश मिळवून दिले. मुंबई महापालिकेवरची सत्ताही टिकवण्यात ते यशस्वी ठरलेत. एका अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवनेला समर्थ नेतृत्व देण्यात उद्धव ठाकरे कमालीचे यशस्वी ठरले. त्यांनी दोन नंबरचा पक्ष असला तरी भाजपबरोबर फरपट जायला नकार दिला. उद्धव यांच्या मवाळ नेतृत्वाचा बाणेदारपणाच भाजपला आव्हान वाटत राहिले.

शिवसेनेची भाजपेतर पक्षांशी युती करण्याची परंपरा

शिवसेनेने २०१९ च्या निवडणूकीनंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांशी युती करीत महाविकास आघाडीत सामिल झाली. कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर युती करुन शिवसेनेने हिंदुत्वाला सोडचिठ्ठी दिली असल्याचा कांगावा शिंदे गट करीत आहे. पण शिवसेनेच्या इतिहासात  कॉंग्रेसबरोबरची युती ही काही पहिल्याच केलेली नाही. याआधीही असा युत्या शिवसेनेने केलेल्या आहेत हा इतिहास आहे.

१९६८ मध्ये मुंबई महापालिका निवडणूकीत शिवसेनेने प्रजासमाजवादी पक्षाबरोबर युती करीत  ४२ जागा जिंकल्या होत्या. ही युती केवळ दोनच वर्षे टिकली. काही मुद्द्यांवर सहमत होऊ न शकल्याने शिवसेना पक्षाची पहिली युती तुटली.त्यानंतर शिवसेना पक्षाने १९७२ साली रिपब्लिकन पक्ष (रा.सु. गवई गट) सोबत युती केली. विशेष म्हणजे शिवसेनेने त्या वेळी केवळ रिपब्लिकन पक्षच नव्हे तर, चक्क मुस्लिम लीग या पक्षासोबतही युती केली होती. पण, ही युती सुद्धा मुंबई महापालिका निवडणुकीपूरतीच मर्यादित होती. मुंबई महापालिकेत शिवसेनेची कॉग्रेसबरोबर तीन वर्षे युती होती. १९७४ मध्ये शिवसेना पक्षाचा महापौर होता. पण, अल्पमतात असल्याने आणि संख्याबळाचे गणित जमविण्यासाठी शिवेसनेने काँग्रेस पक्षासोबतही युती केली होती. ही युती १९७६ ते १९७८ अशी तीन वर्षे टिकली.

पण शिंदेंनी उद्धव ठाकरेवर हिंदुत्वाचा त्याग करीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षांशी आघाडी केल्याचा आरोप करुन पक्ष सोडला आहे. यावेळचे शिंदे गटाचे बंड केवळ सत्तांतर करुन थांबलेले नाही तर शिवसेना कोणाची? या प्रश्नाच्या निर्णायकीवर येवून पोहचले आहे. सर्वोच्च न्यायालय कदाचित या प्रश्नाची सोडवणूक घटनापीठाकडे सोपवेल. त्याचा निर्णय जो होईल तो होईल. पण विधीमंडळ संख्याबळाचा विचार करता आजतरी शिंदे गट पक्षावर दावा सांगण्याचे बळ घेवून उभा आहे. मुद्दा आहे या निर्णायकीला उद्धव कसे सामोरे जातात हे पाहणे महत्त्वाचे आहे. पक्षातून नेते गेले तरी पक्ष सामान्य कार्यकर्त्यावर टिकून असतो. तोच पक्षाचा जनाधार बांधत असतो. उद्धवची सामान्य शिवसैनिक हीच खरी ताकद आहे. ‘शिवसेना कोणाची?’ याचे उत्तर आपल्या बाजूने मिळवण्याची खरी कसोटी या दोघांची आहे.

लेखक सत्यशोधक चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्ते असून सत्यशोधक जनआंदोलनाचे नेते आहेत.