१.झुंजणे जीवाचे

झुंजणे जीवाचे
घायाळून पुन्हा पुन्हा
पडणे…उठणे…
उजळून पुन्हा पुन्हा

ओल काळजाची
घेई दुनिया सोसून
मायेचा खजिना
मेघ टाकतो भरून

डौलात भूवरी
धुलीकण पडलेला
झुळूक वाऱ्याने 
देह नभभर झाला

येणे जाणे राही
घर करूनी मनात
काटे फूल सम
नच राग न लोभात

फेकूनी दिलेला
द्वेष तिरस्कार दूर
ओसंडून वाहे
हर्ष ममतेचा पूर

========

२. जगताना

जगताना जीवनाची
अशी लाही लाही
दिवसाचे पीस नवे
डसायला पाही

तप्त वात जाळणारा
असह्य काहिली
टेकायला जराशी न
छाया उरलेली

बदलले ऋतुमान
नसे ध्यानीमनी
माती चिखलाचा काला
धुंद अनवाणी

गगन पांढरेफट्ट
घामाचेच लोट
घडीघडी अडवते
काट्यातली वाट

भार बदलाचा वाढे
संस्कार दबले
भरघोस पीकपाणी
पक्षी हरवले

मिटलेली चिवचिव
भकास अंगण
शिल्लकीत जगायला
स्वार्थांध जीवन

रिळ पुढे चाललेली
दृश्य जूने मिटे
देहातली नस हळू
एकएक तुटे

========

  • सुखेनैव

गल्ली वस्ती पेठ गाव नि शहर
विकते जहर अमृताचे

नसे कुणा वेळ कुणासाठी द्याया
डंख मारावया रिकामेच

दुखले खुपले जाता सांगायला
अहं जपलेला आड येई

ज्याचे त्याला खूप कळते वळते
वृद्धत्वही रिते बालापुढे

उरली न कुणा गरज कुणाची
लाही अंतरीची अंतरात

जो तो आपल्याशी रडतो हसतो
भिंतीत जगतो सुखेनैव

======

४. कशी अचानक

कशी अचानक पडली गं भूल
दिसले न शूळ गुह्यातले

बारोमास फुले वसंत बहार
ऊन थंडगार चांदण्यांचे 

घेण्यास भरारी नवनवे पंख
काट्यातले डंख सुखदायी

झोकलेला जीव डोहामध्ये खोल
सुगंधीत ओल उन्मादक

एकरूप अशा पडलेल्या गाठी
भिजलेली मिठी आसवात

इथे तिथे इथे ऋतुचे आर्जव
छळती आठव घडीघडी

उतरली धुंदी विस्कटल्या गाठी
खूणावते साठी तारुण्यात

गंध दाहिदिशा झुळूकीत गेला
उरला पाचोळा भटकाया

===============

कवी परभणी येथे स्टेट बॅंक ऑफ इंडिया मध्ये  शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. सध्या ते निवृत्त आहेत.