मार्क्सवाद-फुले आंबेडकरवादाशी बांधील राहून गेली तीन दशके महाराष्ट्राच्या प्रबोधन , राजकारण आणि जनचळवळींच्या आंदोलनात अग्रेसर राहिलेल्या माफुआं को-ऑर्डीनेशन कमिटी ह्या चळवळीने राजकीय पक्षाची स्थापना करुन ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. नवी मुंबई येथे राज्य अधिवेशन घेवून या अधिवेशनात माफुआं समन्वय समितीचे विसर्जन करुन सत्यशोधक डेमोक्रॅटीक पार्टीची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे पहिले सेक्रेटरी म्हणून माफुआं चळवळीतील लढाऊ कार्यकर्ते कॉ. सिद्धार्थ जगदेव यांची निवड करण्यात आली आहे.

२८,२९ जानेवारी रोजी माफुआं को-ऑर्डीनेशन कमिटीचे दोन दिवशीय राज्य अधिवेशन कोपरखैराणे,नवी मुंबई येथे स्त्री मुक्ती संघटनेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्यशोधक डेमोक्रॅटीक पार्टीची स्थापना करण्यात आली. श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय नेते डॉ.भारत पाटणकर, माफुआं तत्त्वज्ञानाचे भाष्यकार डॉ.उमेश बगाडे, सत्यशोधक बहिजन आघाडीचे अध्यक्ष सचिन बगाडे, सत्यशोधक महिला संघटनेच्या नेत्या कॉ.सुप्रिया गायकवाड आणि माफुआं को-ऑर्डीनेशन कमिटीचे सेक्रेटरी कॉ. किशोर जाधव यांच्या हस्ते पक्षाचा ध्वज व नावाचे अनावरण करुन पक्ष स्थापनेची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी    गडचिरोली, नांदेड, नागपूर, जळगांव, बुलढाणा, नाशिक, धुळे, औरंगाबाद, पुणे, मुंबई,  अमरावती आणि सिंधुदुर्ग आदी १२ जिल्ह्यांतून १३० प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित होते.

प्रारंभी पक्ष प्रतिनिधींच्या व प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत पक्षाचा ध्वज फडकावून अधिवेशनाला प्ररंभ करण्यात आला. त्यानंतर कॉ. किशोर जाधव यांनी प्रास्तविक केले. ते म्हणाले, मार्क्सवाद फुले आंबेडकरवाद या क्रांतीकारी तत्त्वज्ञानाशी बांधील राहून गेली तीन दशके महाराष्ट्रातील असंख्य तरुण कार्यक्रत्यांनी जातवर्गस्त्रीदास्यांताचा ध्येय्यवाद जोपासत माफुआं को-ऑर्डीनेशन कमिटीशी जोडून घेत लढत राहिले, लढत आहेत. काहींनी पूर्णवेळ,काहींनी अर्धवेळ कार्यकर्ता म्हणून माफुआंचा क्रांतीकारी विचार जनमाणसांत पोहचविण्यासाठी असामान्य त्याग केला आहे. ही त्यागाची परंपरा माफुआं चळवळीत मोठी आहे.माफुआंची वैचारिक बांधीलकी मानत महाराष्ट्रातल्या असंख्य बुद्धीजींनीही या जनसंघर्षात त्याग केला आहे. माफुआं को-ऑर्डीनेशन ही जरी राजकीय हस्तक्षेप करणारी चळवळ होती तरी त्याला पक्ष रचनेचा आकृतीबंध नव्हता. त्यामुळे असंख्य राजकीय,बुद्धीजीवी कार्यकर्तांची ऊर्जा सुनियोजितपणे क्रांतीकारी राजकारणासाठी संघटीत करण्यात सातत्याने मर्यादा जाणवत होत्या. क्रांतीकारी राजकारणासाठी पक्षासारखे दुसरे साधन नाही म्हणून कमिटी विसर्जित करुन पक्षाची स्थापना करुन धाडसी पाऊल टाकत आहोत. माफुआं या क्रांतीकारी तत्त्वज्ञानाशी बांधिलकी मानून काम करणारे असंख्य कार्यकर्ते माहराष्ट्रात विखुरलेले आहेत. त्यांच्या कृतीशील बळावर आपला पक्ष निश्चितच जनमाणसाची पकड घेईल या विश्वासातून हे पाऊल टाकत आहोत.

डॉ. उमेश बगाडे म्हणाले, मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद हे या देशातील जातवर्गस्त्रीदास्य अंताचे क्रांतीकारी तत्त्वज्ञान आहे. पण केवळ तत्त्वज्ञान क्रांतीकारी असून क्रांती होत नसते. त्यासाठी क्रांतीकारी पक्षाची गरज असते. क्रांतीकारी तत्त्वज्ञानाच्या आधारावर क्रांतासाठी जनसंघर्ष उभा करण्याचे एकमेव साधन हा पक्षच असतो. भारतातील कोणताच पक्ष जात,वर्ग आणि पितृसत्तेच्या निर्मुलनासाठी बांधील राहिलेला नाही. काही पक्ष केवळ वर्ग नष्ट करण्याची भाषा करीत आहे. काही पक्ष जाती नष्ट करण्याची भाषा करीत आहेत. भारतातील जाती,वर्ग आणि पितृसत्तेची गुंतागुंत समजू घेण्याच सर्वच पक्ष अपयशी ठरले आहेत. किंबहुना त्यांना ते समजूनच घ्यायचे नाही असे चित्र आहे. त्यामुळे कोणताच प्रस्थापित  पक्ष या देशात लोकशाही क्रांती करु शकणार नाही. सत्यशोधक डेमोक्रॅटीक पार्टी हा नव्याने स्थापन होत असलेला आपल्या पक्ष जातवर्गस्त्रीदास्य अंताशी बांधील राहणारा व तिच्या गुंतागुतीच्या राजकारणाची उकल करणारे क्रांतीकारी तत्त्वज्ञान असणारा भारतातील एकमेव पक्ष आहे.

डॉ.भारत पाटणकर म्हणाले, माफुआं चळवळीच्या कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करुन आजच्या काळातील धाडसी पण महत्त्वाचे पाऊल आहे. पक्ष स्थापनेच्या या महत्त्वाच्या कृतीला ज्या संख्येने तरुणाची उपस्थिती व त्यांचा उत्साह दिसतो आहे ते पाहता या पक्षाला चांगले भवितव्य आहे किंबहुना उपस्थित तरुण हेच तुमच्या रातकीय चळवळीचे भवितव्य आहे आणि ते आश्वासक आहे. आजचा काळ अदिक गंभीर राजकारणाचा काल आहे शिवाय समविचारी चळवळींच्या भ्रातृभावाची गरज अनिवार्य बनली आहे तरीही किमान समान कार्यक्रमावर चळवळींनी आज एकत्र यायला हवे मात्र असे चित्र आज दिसत नाही. सत्यशोधक डेमोक्रॅटीक पक्षाने एकला चलोरेची भूमिका न घेता जिथे जिथे संवाद विकसित करणे शक्य आहे तिथे तिथे संवादी राहिले पाहिजे. अनेक चळवळींचा ध्येयवाद एक आहे.पण कार्यक्रम पत्रिकेमध्ये जरुर भिन्नता आहे. मात्र संवादाच्या जागा शोधून भ्रातृबाव वाढीस लागायला हवा.

सचिन बगाडे म्हणाले, मी माफुआं चळवळीचा काही काळ भाग राहिलो आहे. त्यामुळे माफुआं विचारांची चळवळ राजकीय पक्षाच्या चौकटीत विकसित करण्याची ही घटना मलाही आनंद देणारी आहे. आज जीवनाच्या सर्वच आघाड्यावर सामान्य माणसाला हतबलता आली आहे. जातीय विषमतेने पिडलेला वर्ग अजुन स्थीर जगण्याच्या अवस्थेत आलेल्या नाही. अशा सर्वहारा समुहांचे जनतळ क्रांतीकारी राजकारण करायला सज्ज झालेल्या पक्षाला खुले आहेत. विशिष्ट जातीच्या किंवा जातसमुहांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर लढणा-या चळवळींवर जातीसंघटना म्हणून शिक्के मारले जात असल्याचा हा काळ आहे. त्या पेचालाही भिडावे लागेल.

सुप्रिया गायकवाड म्हणाल्या, स्त्री प्रश्नाचे अचूक आकलन करणारे माफुआं तत्त्वज्ञान आपल्या पक्षाचे तत्त्वज्ञान आहे. ही आपली ताकद आहे. येत्या काळात स्त्री प्रश्नाशी समग्रपणे भिडण्याचे काम सत्यशोधक डेमोक्रॅटीक पार्टी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पक्षाच्या अधिवेशनाच्या दोन दिवसात समकालीन प्रश्नांची चर्चा करण्यात आली. दुस-या दिवशीच्या समारोप सत्रात पक्षाच्या सत्यशोधक शिक्षक सभा, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, सत्यशोधक महिला संघटना,क्रांतीसिंह नाना पाटील अकादमी, सांस्कृतिक आघाडी आदी  जनआघाड्यांच्या कार्यकारिण्या घोषीत करण्यात आल्या. त्यानंतर शेतीप्रश्न, शिक्षण, महागाई, बेरोजगारी आदी मुद्द्यांवर राजकीय ठराव पारित करुन अधिवेशनाची सांगता करण्यात आली.