मोठ्या खंडानंतर क्रांतीसिंह नाना पाटील अकादमी आणि क्रांतीज्योती प्रकाशनने दोन महत्त्वाच्या पुस्तके प्रकाशित केली आहेत. जयंत लेले यांचे डॉ.आंबेडकरांच्या धर्मांतराची फलश्रूती व रणजित परदेशी यांचे समता आणि मार्क्सवाद-फुले आंबेडकरवाद अशा दोन पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले आहे.

नवी मुंबई, कोपरखैराणे येथे संपन्न झालेल्या सत्यशोधक डेमोक्रॅटीक पार्टीच्या राज्य अधिवेशनात या दोन्ही पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. अधिवेशनाच्या समारोप सत्रात ( २९ जानेवारी) डॉ.उमेश बगाडे, माफुआं को-ऑर्डीनेशन कमिटीचे सचिव कॉ. किशोर जाधव, पक्षाचे सचिव कॉ. सिद्धार्थ जगदेव व कॉ. स्वाती तेली यांच्या हस्ते या दोन्ही पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ.उमेश बगाडे म्हणाले, क्रांतीसिंह नाना पाटील अकादमीने महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्रात महत्त्वाचा हस्तक्षेप केला आहे आजही करीत आहे. परिवर्तनवादी चर्चाविश्व अधिक सघन करण्यासाठी अकादमी व क्रांतीज्योती प्रकाशनने पुन्हा क्रियाशील होणे हे आश्वासक आहे. अकादमीने अशी वैचारिक साधने घडवणे चळवळीसाठी महत्त्वाचे आहे.

जेष्ठ माफुआंवादी विचारवंत प्रा. रणजित परदेशी यांचे प्रकाशित झालेले पुस्तक अभ्यासक कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचे आहे. आजच्या भारतीय समाजातील प्रमुख उत्पादनसंबंध कोणते आहेत? कोणत्या वर्गजाती वा जातीतील कोणते वर्ग सर्वात अधिक शोषित आहेत? आजच्या जातीय वर्गीय व्यवस्थेत कोणत्या वर्गजाती शोषणाची भूमिका बजावीत आहेत? भारतीय धर्म, इतिहास, संस्कृती आदींच्या विश्लेषणाचे क्रांतिकारी हत्यार कोणती अन्वेषणपद्धती असेल ? जातिव्यवस्थाअंताचे क्रांतिकारी संघटन आणि क्रांतिकारी तत्त्वज्ञान यांचे स्वरूप कोणते असेल ? या प्रश्नांचा मागोवा घेत ही पुस्तिका मार्क्सवाद-फुले- आंबेडकरवादाचे योगदान स्पष्ट करते

अकादमीद्वारे आजपर्यंत साठपेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित असून त्यांद्वारे जात, वर्ग आणि स्त्रीदास्याच्या बदलत्यासंदर्भांचे नवे चिकित्सक आकलन वाचकांपर्यंत पोहचवले आहे. जयंत लेले यांची ‘डॉ. आंबेडकर यांच्या धर्मांतराची फलश्रुती’ ही पुस्तिका त्याच प्रक्रियेतील पुढील पुस्तिका होय.

जयंत लेले यांनी १९९० साली फो कुआंग शान आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेमध्ये इंग्रजी निबंध सादर केला होता. या निबंधाचा मराठी अनुवाद अभय कांता यांनी ‘डॉ. आंबेडकर यांच्या धर्मांतराची फलश्रुती’ या नावाने केला असून हा अनुवाद ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या नियतकालिकात ( अंक : दि. १६ ते ३१ मार्च २०१६) यापूर्वी प्रकाशित झालेला आहे. त्या लेखाची ही स्वतंत्र पुस्तिका आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धर्मांतराविषयी आजवर विविधांगी लेखन प्रकाशित झाले आहे. त्यामधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मातरामागील भूमिकेचा आणि फलतीचा वेध घेण्यात आला आहे. प्रस्तुत पुस्तिकेतील जयंत लेले यांची मांडणी देखील यादृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतराची फलश्रुती समजून घेण्यासाठी वाचकांना निश्चितच या पुस्तिकेचा उपयोग होऊ शकेल, असा विश्वास वाटतो.

मोठ्या थांब्यानंतर पुन्हा एकदा अकादमी व क्रांतीज्योती प्रकाशन पुस्तक प्रकाशनात सक्रिय

महाराष्ट्राच्या वैचारिकतेला जातवर्गस्त्रीदास्यतक दिशा देण्याच्या ध्येयवादाने क्रांतिसिंह नाना पाटील अकादमी मागील २५ वर्षांपासून कार्यरत आहे. आत्मनिर्भर आणि शोषणमुक्त असा समता बंधुतेवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी अकादमीने क्रियाशील सहभागावर भर दिला आहे. आजवर अकादमीने प्रकाशन व प्रबोधनाच्या क्षेत्रात लक्षणीय योगदान दिले. अनेक चर्चासत्र, परिषदा व उपक्रम दिले. आजपर्यंत अकादमीद्वारा ६० पेक्षा अधिक पुस्तिका प्रकाशित करण्यात आल्या. या पुस्तिकांमधून अकादमीने जात, वर्ग, स्त्रीदास्याच्या बदलत्या संदर्भाचे नवे चिंतन दिले आहे. कॉ. शरद पाटील, रावसाहेब कसबे, रणजित परदेशी, सरोज कांबळे, वंदना सोनाळकर इ. विचारवंत व अभ्यासकांच्या लेखनाचा यामध्ये सहभाग आहे.