नुकत्याच नव्याने स्थापन झालेल्या सत्यशोधक डेमोक्रॅटीक पार्टीच्या सचिवपदी मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादी चळवळीत प्रदीर्घकाळ सक्रिय असलेले धुळे जिल्ह्यातील लढाऊ कार्यकर्ते कॉ. सिद्धार्थ जगदेव यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीने पक्षाचे ते पहिले सचिव बनले आहेत. विशेष संघटन कौशल्य असलेल्या जगदेव यांची पक्षाच्या सचिवपदी निवड झाल्याने महाराष्ट्रातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

गेल्या आठवड्यात मुंबई येथे सत्यशोधक चळवळीने नवी मुंबई येथील झालेल्या राज्य अधिवेशनात माफुआं को-ऑर्डीनेशन कमिटी बरखास्त करुन सत्यशोधक डेमोक्रॅटीक पक्षाची स्थापना केली आहे. जातवर्गस्त्रीदास्य अंताच्या लोकशाही क्रांतीचे ध्येय्य घेवून हा पक्ष मैदानात उतरला आहे. माफुआं तत्त्वज्ञानाशी बांधील असलेले असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्र विखुरलेले आहेत. या सर्वांना सक्रिय करुन त्यांना पक्षाशी जोडून घेवून पक्ष जनतेत घेवून जाण्याचे आव्हान पेलण्यासाठी सक्षम नेतृत्व म्हणून कॉ. जगदेव यांच्यावर पक्षाने विश्वास टाकला आहे.

आक्रमकता, आणि उत्तम संघटनकौशल्य ही कॉ. जगदेव यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये आहेत. कॉ. शरद पाटील यांच्या काळातच ते माफुआं तत्त्वज्ञानाच्या प्रभावत आले. अकरावीत असतानाच ते सत्यशोधक विद्यार्थी संघटनेत सक्रिय झाले. विज्ञान शाखेत पदव्यूत्त्र उच्च् शिक्षण घेतलेल्या जगदेव यांनी करियर करण्याचा मार्ग नाकारत ते विद्यार्थी संधटनचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र संघटक तसेच सचिवपदाचीही जबाबदारी काही काळ यशस्वीपणे सांभाळली आहे.

 विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व करताना अनेक आंदोलने यशस्वीपणे उभी केलीत. २००० साली काढण्यात आलेल्या शेती-शिक्षण-आरक्षण मोर्चा संघटीत करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. फेब्रु. २००० मध्ये शहादा येथे मुख्यमंत्री यांना रस्ता रोखो करून ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी ही मागणी घेवून आंदोलन उभे केले होते. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर नाशिक, अमरावती येथील प्रकल्प अधिका-यांना काळेही फासले होते.  १९९६साली नाशिक जिल्ह्यातील   आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती.त्यानिषेधार्थ प्रकल्प अधिकाऱ्यास काळे फासले.या आंदोलनात त्यांच्यासहीत ७५ कार्यकर्त्यांना अटकही झाली होती.

सत्यशोधक जनआंदोलनाच्या माध्यमातून ते अलिकडच्या काळात नागरी प्रश्नांवर धुळे जिल्ह्यात चळवळ संघटीत केली. धुळे शहर रामबाई,आंबेडकर नगर,भोईवाडा,रेल्वे स्टेशन अतिक्रमण धारकांच्या बाजूने संघर्ष उभा केला व अतिक्रमण उठवू दिले नाही. एन्रॉन विरोधात वेलदूर येथे संघटीत केलेल्या  आंदोलनात  अटक होवून  ९ दिवस शिक्षाही भोगली आहे.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सेक्रेटरी पदाची जबाबदारीही त्यांनी काही काळ सांभाळली आहे. धुळे येथे २००५ व २०१३ साली  विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांचा पुढाकार राहिला.

सत्यशोधक जनआंदोलनाच्या माध्यमातून नागरी प्रश्न तसेच कष्टक-यांच्या संघर्षात सक्रिय असलेल्या कॉ. जगदेव यांच्यावर पक्षाने सचिवपदाची जबाबदारी सोपवून त्यांच्या उत्तम संघटन कौशल्य व आक्रमक नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे.

आजची आव्हानात्मक बदललेली राजकीय संस्कृती पाहता पक्षउभारणीचे काम आव्हानात्मक असले तरी कॉ. जगदेव हे आव्हान सहज पेलवतील असा विश्वास महाराष्ठ्रभरातील कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळेच त्यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.