पँथर चळवळीत सहभागी झालेले, मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात तुरूंगवास भोगलेले, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या शोषणाविरोधात अविरतपणे संघर्ष करणारे कम्युनिस्ट नेते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी केंद्रीय कमिटी सदस्य, कॉम्रेड कुमार शिराळकर यांचे काल ( ऑक्टोबर ) रात्री नाशिक येथे दु:खद निधन झाले. त्यांचे व्यक्तीमत्त्व उलगडणारा लेख ज्येष्ठ कादंबरीकार व कार्यकर्ते दिनानाथ मनोहर यांनी आठवर्षापूर्वी मनोविकास प्रकाशनच्या दिवाळी अंकात लिहिला होता. त्यांनी कॉ. कुमार यांच्या निधनानंतर फेसबुकवर टाकला होता. मासिक सत्यशोधकच्या वाचकांसाठी याठिकाणी देत आहोत.

  • संपादक

कुमारची आणि माझी प्रथम भेट झाली ती सोमनाथला. आता तर मला तो घटनाक्रम स्पष्ट आठवतही नाही. बहुधा ६९ – ७० मध्ये बाबा आमटे मुंबईत गेले होते, तेथे त्यांना कुमार भेटायला आला. त्यावेळी त्यानं सोमनाथला काही दिवस राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती बातमी बाबा सोमनाथला बाबांनी आम्हाला सांगितली. बहुधा आम्हाला आणखीर एक साथीदार लाभावा ह्या इच्छेने किंवा चांगली नोकरी सोडून इथं येऊ इच्छिणारा हा कोण इंजिनियर आहे हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेने असेल, मी त्याला पत्र लिहिलं, आणि त्यानं मला उत्तर पाठवलं. नंतर आमची सोमनाथला भेट झाली. तेव्हापासून आमचा संवाद, गेली चार तपे, चालू आहे. काही वेळा त्यात व्यत्यय आले, काहीवेळा काही काळापुरते आम्ही एकमेकाच्या रेंजच्या बाहेरही गेलो. पण कडाक्याचं भांडण कधी झालं नाही. आणि आमच्यातील संवाद टिकून राहिला. ह्याबद्दल श्रेय कुणाला ह्या मुद्यावर तुलनाच करायची तर, माझ्यापेक्षा कुमारलाच ह्याचे श्रेय द्यावे लागेल. हा माणूस आपल्याशी हातचं राखून बोलतो, सावधानतेने बोलतो, मोकळा होत नाही, असं वाटायचं. ह्या वाटण्याला कारण त्यावेळचं राजकीय, सामाजिक वातावरण होतंच पण त्याचा काहीसा स्वयंभू स्वभाव हेही कारण होतं. gartenmöbel design
bettwäsche tom und jerry
planeta sport muske patike novi pazar
giorgio armani sport
adidas beckenbauer trening
bomber jakke burgunder
гуми 18 цола
esprit round sunglasses
liemenes mergaitems
windows wont connect to iphone usb

कुमार सोमनाथला आल्यानंतर काही दिवसांनीच बाबा आमटे परत भिवंडीला काही कार्यक्रमासाठी गेले होते. तेथे त्यांना नव्यानं स्थापीत झालेल्या सर्वसाधारणपणे नक्सलवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्क्सीस्ट लेनिनीस्ट पक्षाशी संबंध असलेली एक विदेशी तरूणी भेटली आणि बाबांना तिनं सांगितलं, “माय बॉईज आर वर्कींग देअर इन सोमनाथ.” तोपर्यन्त कुमार, मी, अजीत आणि तेथे आलेल्या पोरांमध्ये ‘आम्ही’ अशी एक ओळख आकारात यायला लागली होती. त्यामुळे आपल्याला माय बॉईज म्हणणारी ही कोण शहाणी, अशी माझी प्रतिक्रिया होती. ह्या बॉईजमध्ये तिला कोण कोण अभिप्रेत होतं हे कळणं सहजशक्य नव्हतं. खरं तर त्यावेळी माझ्या कुवतीनूसार भारतीय क्रांतीच्या संदर्भात आमची आपसात चर्चाही झाली होती. त्यात कुमार मुख्यत: युक्रांदच्या डाव्या बाजूला आहे, परंतु नक्सलवादी विचारांचा नाही हे लक्षात आलं होतं. तरीही तेथे आलेल्यामध्ये नवीन कुमार तेथे आला होता, शिवाय तो मुंबईहून तेथे आला होता, त्यामुळे त्या बॉईजमधील एक तो असावा असं वाटणं सहाजित होतं. काही दिवसांनी आम्ही दोघंही मुंबईला ही तरुणी ज्या गटाशी संबंधीत होती, अशा गटाच्या एका व्यक्तीला भेटलो, आणि त्यावेळी कुमारनी जी मतं मांडली त्यातून त्याचा ह्या मंडळीशी छुपा वा उघड कुठलाच संबंध नाहीये, अशी माझी खात्री झाली.

सोमनाथला चोवीस तास आम्ही बरोबर होतो, महारोगी पेशंटस् सोबत भाताच्या बांध्यांमध्ये गुडघा गुडघा गाऱ्यात उतरून काम करत होतो, जंगलात भटकायला जात होतो, रात्री शेतात राखणीला जाऊन माचीवर झोपत होतो, बाबांशी गप्पा तर रोजच होत होत्या. संध्याकाळी चकाट्या पिटत बसत होतो. ह्या सहवासात मी कळत, न कळत हे बघत होतो, की हा माणूस स्वत:च्या भूतकाळात अटकणारा नाही, मला कारलं आवडत नाही, मला रोज सकाळी आंघोळ केल्याशिवाय चालत नाही, अशा आपल्या सवंयीचे आपण गुलाम असल्याबद्दल तो कौतुकानं सांगत नाही. आपण एका जातीचे आहोत असं वाटायला लागलं, पटायला लागलं. अगदी चोवीस तास आम्ही तिघंच सोबत होतो, आणि अनोळखी अशा भमरागड क्षेत्रात भटकंती करत होतो तेव्हा खरं जवळून पहाता आलं परस्परांना. ह्या पैदल टूरमध्ये, पाऊलवाटा कुठे पोचतात हे माहीत नाही, माडीया, गोंडांची भाषा येत नाही, आपल्या पाठीवर महिन्याचं राशन, ज्याचं ओझं रोज कमीकमी होतयं ह्याचं वाढतं दु:ख अनुभवावं लागतंय, अशा वेळीही आपली विनोदी बुद्धी शाबूत राखणारा दोस्त भरवशाचा आहे असं मनाला पटलं. आपलेपणाचं नातं उभ्या आडव्या धाग्यांनी विणलं जाऊ लागलं. आणि पुढे शहाद्याच्या श्रमिक चळवळीतही, मी त्याच्यापेक्षा वयानं आणि एकूण जगाचा, जगण्याचा अनुभव जास्त असूनही चळवळीत त्याचं दादापण मी मान्य करून टाकलं.  

त्या घटनेला आता ४५ वर्षे झाली आहेत. परंतु अजूनही कुमार ही काय व्यक्ती आहे हे मला सांगता येणार नाही. तो मला कळलाय असं मी म्हणणार नाही. ह्याचा अर्थ त्याचं जगणं बेभरवशाचं आहे असं बिलकूल नाही. त्याच्या जगण्याला एक वैचारिक खुंटा आहे हे निर्विवाद खरं आहे. कोणत्या गोष्टी तो करणार नाही, कोणत्या गोष्टी त्याला पसंत पडणार नाहीत, ह्याचाबद्दल नव्वद टक्के योग्य ठरेल असा अंदाज बांधणं अशक्य आहे, असं बिलकूल नाही. पण तरीही सामान्यपणे सामान्य माणसं जसा विचार करतील तसा तो करत नाही, तसा वागत नाही, त्याच्या प्रिऑरिटीज् वेगळ्या असतात. पण हे लक्षात यायलाही हे संबंध बरेच दीर्घकालीन आणि जवळचे व्हावे लागले. त्याला कारण त्याच्या स्वभावातील आखीव, रेखीव बोलकेपणा किंवा अबोलपणा. शहाद्याला स्वत:ला क्रांतीकारक समजणारी आम्ही मंडळी आपसात गप्पा मारताना आपल्या भूतकाळाबद्दल, आपल्या कुटुंबियाबद्दल, आपल्या बालपणाबद्दल, आपल्या मैत्रिणींबद्दल थोडक्यात ‘मी’पणाबद्दल बोलायला आणि जाणून घ्यायला उत्सुक असायचो. कुमार स्वत:बद्दल, स्वत:च्या बालपणाबद्दल, नातेवाईकांबद्दल क्वचितच बोलत असे. गंमत म्हणजे तेव्हा आमच्यात, आपल्या कुटुंबियांशी, आई, वडील, भावंडांंशी सर्वात संबंध ठेवणारा तोच होता, असं मला आठवतंय. मला तर मित्रांचीही वैयक्तिक माहिती जाणून घ्यायची फारशी उत्सुकता नसायची, व्यक्तिगत प्रश्न विचारण्याचं मला त्याकाळी आवडायचंही नाही. कुमारच्या आईवडलांची आणि बहिणींची माहिती मला विजय कान्हेरेकडून प्रथम कळली. ह्याचा अर्थ कुणी विचारलं तर तो माहिती द्यायला टाळायचा असं नाही. पण मार्क्सवादावरील पुस्तकं, इपीडब्लू मधील लेख, डाव्या विचाराच्या लेखकांचे ललित लेखन ह्याविषयात तो कसा मोकळेपणी उमलून बोलायचा. वैयक्तिक विषय निघाला, की तो मिटायचा. म्हणजे खाडकन् दरवाजा बंद नाही करून घ्यायचा, तर अल्लद पाकळ्या मिटून घेणाऱ्या फुलासारखा, की लाजाळूच्या पानांसारखा. अशा ह्या माणसाला कुठल्या कॅटेगरीत टाकावं हे मला अजूनही उमजलेलं नाही, एका अर्थानं कुमार हे रसायन मला अजूनही एक गूढ आहे, असं म्हणावं लागेल. 

आता काही दिवसांपूर्वीचीच घटना. हल्ली तो नासिकहून निघणाऱ्या लोकसंपर्क दैनिकाशी संबंधित आहे, म्हणजे लोकसंपर्क सुरू करण्याचा निर्णय घेणाऱ्या, आणि त्या कामाची जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतलीय अशा मंडळीतील तो एक आहे. त्या बाबतीत मोबाईलवर बोलताना, त्यानं सहजच तो दहा तारखेला नंदुरबारला येतोय , असं सांगितलं. मग आलास की भेटूया. लोकपर्यायच्या स्वरूपाबद्दल बोलूया, असं मी त्याला सुचवलं. तसं निश्चित कधी, किती वेळ असं काही ठरलं नाही, तशी गरजही नव्हती. पण भेटायचं असं मात्र ठरलं. आठ तारखेला मी परत त्याच्याशी बोललो, म्हणालो, “कुमार अरे येताना माझ्या विद्न्यानकथा संग्रहाची प्रीन्ट कॉपी पुण्याला आहे ती घेऊन येशील का?” त्यानं ताबडतोब होकार दिला, परंतु “माझं दहा तारखेचं येणं कॅन्सल झालंय, मी बाराला धुळ्याला येतोच. तेव्हा येतो नंदुरबारला घरी.” असं त्यानं सांगितलं. त्याप्रमाणे बारा तारखेला सकाळी तो हजर झाला, प्रीन्ट कॉपी माझ्या ताब्यात दिली, तास दीड तास आम्ही गप्पा मारल्या. त्यानंतर तो निघाला. तो आता नंदुरबारमधील पार्टीच्या कार्यालयावर किंवा अक्कलकुंवा, तळोदा येथे कुठे तरी जाणार असेल, हे गृहीत धरून तो निघाला तेव्हा मी त्याला “बसस्टॅन्डवर जाणार का?” असं विचारलं. 

“नाही आता धुळे रोडवरील चौकात जातो, तेथे धुळ्याची बस थांबते ना,” असं म्हणून तो रस्त्याला लागलाही. तो बराच पुढे गेल्यावर त्याच्या बोलण्याचा अर्थ माझ्या लक्षात आला, आणि मी स्तिमितच झालो. त्याचा अर्थ असा होता की, त्याचं त्यादिवशी नंदुरबारला काहीही काम नव्हतं. तो धुळ्याला काही कामानिमित्त आला होता. धुळ्यापासून पुढे नंदुरबारपर्यन्त तो केवळ मला प्रीन्ट आऊट देण्यासाठी आला होता. त्या कथासंग्रहाची सॉफ्ट कॉपी माझ्या कॉम्प्युटरवर आहे, त्या प्रीन्ट आऊट कॉपीची मला अर्जन्ट गरज नाहीये, मी पुण्याला आल्यावर ती प्रीन्ट आऊट  मला देऊ शकत होता, कोरीयरनं पाठवू शकत होता, तुला अर्जटली हवी आहे का? असं विचारू शकत होता,  हे सर्व सोपे पर्याय त्याच्यासमोर होते. पण हा माणसानं हे सोपे ( म्हणूनच माझ्या दृष्टीने रॅशनल असलेले ) पर्याय सोडून केवळ प्रिन्टआऊट पोचवण्याकरता, धुळे ते नंदुरबार येऊन परत जाण्याचं ठरवलं होतं. कित्येक क्षण मी त्याच्या दूर जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात राहिलो. कॉम्रेड कुमार शिराळकर हा माणूस आपल्याला कळलेला नाही, एवढेच मी स्वत:ला परत एकदा सांगितले आणि मी रूटीन कामाला लागलो.

पण खरं तर हा लेख लिहायचाय तो कुमार ह्या मला न कळलेल्या माणसावर लिहायचा नाहीये. एका िवशिष्ट फ्रेममध्ये त्याची छबी उतरवायचीय. एक कलंदर माणूस – कुमार शिराळकर असं म्हणजे अशा अर्थाचं टायटल असणार आहे लेखाचं. कुमार कलंदर जीवन जगलाय का? क्षणभरही न घोटाळता मी आणि त्याचे जवळचे मित्र, नाही असंच उत्तर देतील. पण त्याला ओखळणाऱ्यातील अनेकांना तो कलंदर वाटेल हेही खरं आहे. तो इतरांपेक्षा वेगळा दिसतो, वागतो, आपल्याला अपेक्षित असा जगत नाही, म्हणून त्याला कलंदर म्हणायचं का? सामान्यपणे ज्यांना कामानिमित्त वेगवेगळ्या गावांना जावे लागते, ते आपला टूर प्लॅन बनवतात. अगदी प्लॅन जरी बनवला नाही तरी, पुढच्या मुक्कामाच्या गावी जाण्यासाठी सोयीची बस किती वाजता आहे? दुपारचं जेवण कुठे घ्यायचं? रात्री झोपण्याची व्यवस्था कुणाकडे करता येईल? आणि सुप्रभातीचे कार्यक्रम कुठे उरकता येतील? ह्याचा विचार तरी भटकंती करणारी माणसं करतात. कुमार ह्या बाबतीत एकदम निष्काळजी आहे. तरीही तो कलंदर आहे असं मी म्हणणार नाही. तो जे कपडे घालतो त्याविषयीही तो असाच बेफिकीर असतो. आता बेफिकीरी हा कलंदर व्यक्तीचा एक गुणविशेष असतो, ह्यात काहीच शंका नाही. पण तो सता सर्वच बाबतीत बेफिकीर नाहीये. 

तो इंजिनियर आहे, काही काळ त्यानं एका राष्ट्रीय पातळीवरील इंडस्ट्रीमध्ये नोकरीही केलीय. व्यवस्थित नोकरी केली असती, त्याची ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती, कामातील तल्लीनता, नक्कीच तो आधिकारपदावर पोचू शकला असता. सुखाचं, संसारी माणसाचं जीवन जगू शकला असता. तसं जगणं त्यानं केवळ नाकारले नाही, तर लाभलेलं सोडून दिले. हे सर्व कलंदरच माणूस करू शकतो ना? पण तरीही मी त्याला कलंदर माणूस म्हणणार नाही.

तो सामान्यच माणूस आहे. सामान्यासारखा जगणारा. सामान्य माणसाप्रमाणेच सामान्य जीवन जगणारा. आपल्या सारखाच जिंदगीका सफर करणारा.. आपल्यासारखाच प्रवाहपतीत. तसे तर आपण सर्वच प्रवाहपतीत आहोत..पण त्यातही प्रकार आहेत.. 

१) सामान्यपणे आपण बहुसंख्य लोक प्रवाहाबरोबर वहात जाणं मान्य करतो, 

२) आपल्यातील काही जणांना केवळ प्रवाहाबरोबर वहाण्यात समाधान नसतं, ते जास्त वेगानं पोहून इतरांपेक्षा जास्त पुढे जाण्यासाठी धडपडतात, प्रवाहाबरोबरच पण पुढे.. सर्वात पुढे 

३) काही थोड्यांचा प्रवाहाबरोबर वहात जाण्यालाच तत्वत: विरोध असतो, ते प्रवाहाच्या उलट दिशेनं पोहण्याच्ी धडपड करत, खाली जात राहातात, परत वर जातात आणि 

४) काहीजण असे असतात, ज्यांना किनाऱ्यावर कुठे पोचायचं आहे हे माहीत असतं, मग ते कधी प्रवाहाबरोबर हात मारीत, कधी काहीच न करता, कधी प्रवाहाच्या उलट पोहत किनाऱ्याकडे त्यांच्या इच्छित स्थळी सरकत राहातात आणि 

५) काहीजण इतरांसारख्या सगळ्याच गोष्टी करतात, उलटं पोहता पोहता, लहर आली म्हणून अंग ढिलं सोडून ते प्रवाहात वहाण्याचा अनुभव घेतात, लहर आली वेग वाढविण्याचाही प्रयत्न करतात, कधी किनाऱा जवळ दिसला, किनाऱ्याकडे जाण्याचा सर्वशक्ती एकवटून प्रयत्न करतात, आणि किनाऱ्याजवळ आल्यावर मागंही फिरतात. मनाची लहर फिरली की काहीही करायचं, आणि जे काहीही करायचं ते जीव ओतून करायचं. 

१ ते ४ प्रकारांना मी काही नावं देणार नाही. पाचवा प्रकारच्या प्रवाहपतीतांना मी कलंदर म्हणेन. कॉमरेड कुमार शिराळकर कुठल्या गटात बसतो. मला वाटतं ते नं. ४ गटातील आहे. त्यानं किनाऱ्याला कुठे लागायचं आहे हे ठरवलं आहे. ह्या किनाऱ्यावर त्याच्या स्वप्नातील प्रदेश असायला हवा असं त्याच्या विश्वास आहे. आपण प्रवाहासोबत चाललोय, की उलट्या दिशेनं हात मारतोय, कशा पद्धतीनं जगतोय, कसे वागतोय, कुठल्या स्टाईलने पोहतोय हा ह्या गटातील माणसांच्या दृष्ट्ीने गौण प्रश्न आहे. तसं पाहिलं तर त्याची प्रत्यक्ष जीवनशैली पाहिली तर ह्या चौथ्या प्रकारातील प्रवाहपतीत आणि कलंदर प्रवाहपतीत ह्यांच्या जगण्याच्या शैलीत साम्य वाटेल. पण ते साम्य भासमय आहे, हे लक्षात घ्यायला हवं. 

शहादा चळवळीचे ते धामधुमीचे दिवस होते. शहादा, तळोदा तालुके पेटले होते. बेकायदेशीरपणे ज्या आदिवासींच्या जमीनी हडप केल्या गेल्या होत्या ते आदिवासी शेतकरी, ग्राम स्वराज्य समितीच्या, सर्व पक्षीय नेत्यांचा, आणि कुमारसारख्या कार्यकर्त्यांचा नैतिक पाठींबा मिळाल्याबरोबर, त्यांचा नेता अंबरसिंग सुरतवंती ह्याच्या नेतृत्वाखाली, जीवावर उदार होऊन मैदानात उतरले होते. त्या दिवशी ग्राम स्वराज्य समितीच्या कार्यालयात सकाळपासून हे वातावरण आपल्या खांद्यावर लेऊन खेड्यातून अनेक स्त्रीपुरूष आले होते. अंबरसिंग आतमध्ये पहाडपट्टीच्या लोकांना घेऊन गुफ्तगू करत बसला होता. मोड गावांतील ठोल्यांना (तरुणांना) पोलीसांनी पकडून नेले म्हणून त्या भागातील काहीजण आले होते. शहाणे गावची पावरा मंडळी वनखात्याच्या गार्डसनीच गावातील बकरा पळवल्याची तक्रार घेऊन आले होते. मोइद्याला आदल्या संध्याकाळी, पीक संरक्षण सोसायटीच्या बंदुका, लाठ्या, काठ्या घेतलेल्या वॉचमन्सच्या टोळीला गाववाल्यांनी कसं खदडून लावलं, ह्याचं रोमहर्षक वर्णन काही लोक ऐकवत होतं. आम्ही सगळेच कार्यकर्ते एक्साईट झाले होतो. आणि ह्या गोंधळातच कुमारभाऊ भिंतीला पाठ लावून मांडीवर पॅड ठेवून आपल्या मोठ्या सुवाच्य अक्षरात, आदिवासी शेतमजूरांच्या स्थितीवर म.टा.साठी किंवा लोकसत्तासाठी लेख लिहित होते. एकटाकी, खाडाखोड न करता, खाली कार्बन ठेवून. मी त्याला आदल्या रात्रीच्या रोमहर्षक प्रसंगाच्या चर्चेत खेचण्याचा प्रयत्न केला. शांतपणे त्यानं सांगितलं, ” दिन्या, हा लेख आजच पाठवायला हवा. वीस मिनिटात लेख संपवून मी जाईन त्यांच्याबरोबर पोलीस स्टेशनला्. मालदारांनी खोटा एफआय़आर दाखल करण्याआधी आपल्या लोकांनी तक्रार नोंदवलेली बरी.

आणिबाणीनंतर प्रत्यक्ष वास्तवात आणि भासमय वास्तवात बरेच राजकीय बदल झाले, संघटनेतील काहीजण पक्षात गेले, काहीजण दुसऱ्या डाव्या गटात. काहीजण बाहेर पडले. संघटनेचं रूप विशविशीत झालं.

गेल्या वर्षी मी पुण्याला होतो, त्याचवेळी कुमारही पुण्यात होता. आमचं भेटण्याचं ठरलं. त्यापूर्वीचे त्याच्या आय़ुष्यातील काही काळ फार ताणतणावात गेले होते. वडील गेले, नंतर बहिणीचा आजार वाढला, तीही गेली. हॉस्पीटलमध्ये असलेल्या मेहुण्याची सुशुर््र्रर्षा करण्याची जबाबदारी त्यानं निभावली. त्या काळात कौटुंबिक अडचणींंमुळे पक्षाच्या कामाला आपण पुरेसा वेळ व उर्जा देऊ शकत नाही, हे लक्षात अाल्यावर त्यानं आपल्याला जबाबदारीतून काही काळ मुक्त करावं असं सांगून कौटुंबिक जबाबदाऱ्यांत जास्तीतजास्त वेळ दिला. पण ह्यात अनपेक्षिक काही नव्हतं. चळवळीचं काम कुमार जितक्या तळमळीनं, निष्ठेनं करतो तितकीच तो आपल्या कुटुंबाचीही काळजी घेतो, हे त्याच्या सर्वच मित्रांना माहीत होतं. कुटुंबाशी असलेल्या आपल्या नात्यात त्यानं कधीही अंतर येऊ दिली नव्हतं. अर्थात अर्थ नातेवाईकांच्या अपेक्षा असतात म्हणून त्यानं आपल्या तत्वाला न पटणाऱ्या गोष्टी केल्या असतील हीही शक्यता नाही. हे मला इथं मुद्दामून अधोरेखित करावसं वाटलं, कारण आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षेकरता जी उर्जा आणि वेळ द्याया लागतो, त्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळल्यामुळे मर्यादा येत असतील तर आपल्या जवळच्या आप्तांना दूर लोटणारी तथकथित यशस्वी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. 

कुमार एका मार्क्सवादी विचार मानतो, मार्क्सवादी विचारांच्या चौकटीत ह्या देशात साम्यवादी व्यवस्थेकडे जाणारी समाजवादी राजवट यावी म्हणून कार्यरत असलेल्या पक्षाचा तो निष्ठावान कार्यकर्ता आहे. त्या पक्षाची शिस्त म्हणून , किंवा एक राजकीय नैतकिता म्हणून असेल, आमच्यात कधी मार्क्सवादी पक्षासंघटनेच्या संदर्भात कधी चर्चा होत नाही.  त्यामुळे वरील पक्षाकार्याशी माझी विधानं ही माझ्या निरीक्षणातून आकारात आलेली आहेत. ती शंभर टक्के बरोबर असतीलच असं नाही. पण मला एक निश्चित माहीत आहे की, कुमारची पहिली आणि अखेरची निष्ठा ही जगातील तमाम आज ज्या माणसांना सुरक्षित, सन्मानित आणि सुखी जीवन नाकारलं गेलं आहे त्यांच्यासाठी आहे.  आणि  त्यासाठी त्यानं जी जीवनशैैली स्विकारली आहे, ती स्वयंअनुशासनाची आहे.

लेख संपवण्याच्या आधी, मी अखेर ह्या कलंदर शब्दाचा मान्यताप्राप्त खरा अर्थ आहे तरी काय? हे बघायचं म्हणून मराठी शब्दरत्नाकर ह्या शब्दार्थकोशात बघितलं. तेथे कलंदर शब्दाचा अर्थ–योगी, छांदिष्ट इ. दिला आहे. कॉम्रेड कुमार शिराळकरला कलंदर म्हणायचेच असेल तर छांदिष्ट असं निश्चितच म्हणता येणार नाही, योगी म्हणता येईल. पण हा योगी, स्वत:च्या मुक्तीसाठी नव्हे तर समष्टीच्या मुक्तीसाठी आपल्या मर्यादित उर्जेचा जास्तीतजास्त उपयोग करण्याचा प्रयत्न करतोय. ह्या अर्थानंच केवळ कॉम्रेड कुमार शिराळकर ह्याला कलंदर म्हणता येईल. 

——————————————————————————————–

लेखक पुणेस्थित असून ते ज्येष्ठ कादंवरीकार व कार्यकर्ते आहेत.