देशात मागील काही दिवसांपासून दलितांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतीदिनी शनिवारी (दि.२०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रॅली काढण्यात आली. यावेळी अत्याचाराच्या विविध घटनांचा निषेध करून आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली.

राजस्थान मधील जालोर या जिल्ह्यातील सुराणा या गावातील इंद्रकुमार मेघवाल या ९ वर्षीय दलित मुलाला पाण्याच्या माठाला शिवले म्हणून त्याला अमानुषपणे मारहाण करुन त्याची हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेश मधील श्रावस्ती या जिल्ह्यातील १३ वर्षीय मुलाने २५० रुपये फिस भरूनसुद्धा भरली नाही म्हणून शिक्षकाने त्याला क्रूरपणे मारहाण केली त्यातच त्याचा जीव गेला आणि राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील रायसर या गावातील १० जातीवादी लोकांनी मिळून एका दलित शिक्षिकेला (अनिता देवी, रायगर) दिवसा ढवळ्या रॉकेल टाकून पेटवले त्यात ती शिक्षिका ७० टक्के जळाली.

देशात दररोजच होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरोधात, इथल्या जातिव्यवस्थेच्या विरोधात, माणसाला मारून धर्म पोसणाऱ्या धर्मव्यवस्थेच्या विरोधात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी (दि.२०) अभिवादन रॅली काढली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील वाय कॉर्नरपासून रॅलीला सुरुवात झाली. पडत्या पावसातही कार्यकर्त्यांना रॅलीत सहभाग नोंदविला. यावेळी कार्यकर्त्यांना दलितांवरील वाढत्या घटनांचा निषेध करीत आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी केली.

याप्रसंगी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याला ९ वर्ष उलटूनही आरोपी मोकाट आहेत. त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशीही मागणी करण्यात आली.

आंदोलनात कॉ.सोनाली मस्के, माजी राज्याध्यक्ष कॉ. अमोल खरात, ॲड अविनाश सूर्यवंशी यांनी रॅलीला संबोधीत केले. यावेळी झालेल्या सभेचे  प्रास्ताविक श्रद्धा खरात यांनी केले तर कवी अविनाश सीताफुले यांनी कविता सादर केली. सूत्रसंचालन आकाश पवार तर आभार निशिकांत कांबळे यांनी मानले. रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष निशिकांत कांबळे, सुरेश सानप, श्रध्दा खरात, पूजा सोनकांबळे, गणेश बिरुटे,भगवान पाटील, नीलकांत कांबळे, सचिन खंडारे, जयेश पठाडे, अविनाश सिताफुले, स्वाती अदोडे, सविता मोरे, राम सूर्यवंशी, इनामदार अब्दुल, अजय घाते, लक्ष्मीकांत पांचाळ, आशपाक शेख, मनोज कांबळे, राम सहाणे, प्रवीण मस्के, सचिन गायकवाड यांनी परिश्रम घेतले. तर समविचारी संघटनचे एसएफआयचे नितीन वाहुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी प्रदेश सरचिटणीस सादिक शेख, एनएसयुआय विद्यार्थी काँग्रेसचे योगेश बहादुरे, भीमराव मोठे यांची उपस्थिती होती.