प्रमोद मुजुमदार हे डाव्या चळवळीतले अभ्यासक आणि कार्यकर्ते आहेत. अलिकडच्या काळात धार्मिक असहिष्णूतेच्या पार्श्वभूमीवर ते सलोखा चळवळीतही सक्रीय आहेत.परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना अभ्यास साधने म्हणून ते महत्त्वाच्या ग्रंथांचा मराठीत अनुवादही करीत आहेत.आरोग्याचा बाजार,सलोख्याचे प्रदेश,निद्रीस्त निखारे, उम्मे कुलसूम आदी मह्त्वाचे अनुवादही त्यांनी केले आहेत. त्यांचे हे सर्वच अनुवाद बहुचर्चित राहिले आहेत.

त्यांचे ‘हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा- दि मेकिंग ऑफ हिंदू इंडिया‘ हे परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे पुस्तक अलिकडेच प्रकाशित झाले आहे. लोकवाङमय प्रकाशन संस्थेने ते प्रकाशित केले आहे.

खरं तर ‘गीता प्रेस ॲण्ड दि मेकिंग ऑफ इंडिया’ या अक्षय मुकुल यांच्या इंग्रजी ग्रंथाची ही संक्षिप्त आवृत्ती आहे. अक्षय मुकुल यांचा मूळ इंग्रजी ग्रंथ हा ५३९ पानांचा आहे. एवढा मोठा ग्रंथ मराठीत आणणे मोठा प्रकल्प असल्याने प्रमोद मुजुमदार यांनी कार्यकर्त्यांच्या अभ्यासासाठीचा महत्त्वाचा दस्तावेज म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र मांडणीने मुळ इंग्रजी ग्रंथातला तपशीलाला बाधा न पोहचवत मराठी वाचकांपर्यंत आणला आहे. प्रमोद मुजुमदार यांनी हे परिवर्तनवादी चळवळींसाठी महत्तवाचे काम केले आहे.

आपला असा समज आहे की,देशातील हिंदुत्ववादी विचारप्रवाहाचे आद्य प्रवर्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. परंतु त्याआधीही हिंदू महासबा आणि गीता प्रेस यांच्या माध्यमातून हिंदुत्ववादी विचारप्रवाह रास्वसंघाच्या आधीपासून सक्रिय होता. अक्षय मुकुल यांनी गीता प्रेसबाबत संशोधन करुन जे पुढे आणले ते म्हणजे गीता प्रेसने देशातील हिंदुत्वाला एकसंध मूर्तरुप देणयात कळीची भूमिका बजावली आहे. गीता प्रेस आणि कल्याण मासिक १९२३ ते १९२६ या काळात सुरु झाले. त्यानंतर सुमारे १०० वर्षे गीता प्रेसने हिंदुत्ववादी विचारप्रवाहाच्या बांधणीसाठी चिकाटीने काम केले. आज जे हिदुत्व संक्रीर्ण राष्ट्रवादाची भाषा बोलत संबंध देशालाच मगरमिटीत घेताना दिसत आहे त्याची भूमी गीता प्रेसने तयार केली असल्याचे अक्षय मुकुल यांनी आपल्या संशोधित इंग्रजी ग्रंथात पुढे आणले आहे. गीता प्रेसच्या सर्व कागदपत्रांचा बारकाईने अभ्यास करीत जवळपास चार वर्षे मेहनत घेवून हा ग्रंथ केला आहे.

हा संबंध ग्रंथच मराठीत येणे आवश्यक आहे. तरीही प्रमोद मुजुमदार यांनी या ग्रंथाचे महत्त्व लक्षात घेवून त्याचा तपशील आणि आशय आपल्या स्वतंत्र मांडणीने चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठी मराठीत आणून  अतिशय मोलाचे काम केले आहे.

हे पुस्तक येण्याआधी या पुस्तकातील सामग्री  ‘प्रबुद्ध भारत’ या पाक्षिकात लेखमालेच्या रुपात प्रकाशित झाली आहे. मुजुमदार यांनी प्रस्तावनेत स्पष्ट खुलासा केला आहे की, “हे पुस्तक म्हणजे अक्षय मुकुल यांच्या इंग्रजी ग्ंथाचे संक्षिप्तीकरण नाही तर मूळ इंग्रजी ग्रंथाच्या तपशीलात कोणाही बदल होणार नाही याची खबरदारी घेत त्या तपशीलाचा आजच्या संदर्भात अर्थ लावून केलेली स्वंतत्र मांडणी म्हणजे ‘हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा- दि मेकिंग ऑफ हिंदू इंडिया‘ हे पुस्तक.”

‘हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा- दि मेकिंग ऑफ हिंदू इंडिया‘
लेखक- प्रमोद मुजुमदार
प्रकाशक- लोकवाङमय गृह
पृष्ठे- २३१
किंमत- रु.३००