फुले-आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते,विचारवंत गौतमीपुत्र कांबळे हे स्वत:ची एक निश्चित वैचारिक आणि वाङ्मयीन भूमिका घेऊन जगणारे आणि लिहिणारे लेख़क म्हणून परिचित आहेत. त्यांचे जयंती हे कथनात्मक वैचारिक पुस्तक १४ एप्रिल रोजी प्रकाशित आजले आहे. कोल्हापूरच्या एक्स्प्रेस हाऊसिंगने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. जयंती’ हे दुसरे पुस्तक आहे.

याअगोदर २००४ साली परिव्राजक हा कथासंग्रह प्रकाशित झाला होता. या संग्रहाची मराठी साहित्यविश्वात जोरदार चर्चाही झाली. गौतमीपुत्र कांबळे यांनी परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करताना प्रत्यक्षात आलेले अनुभव, निर्माण झालेल्या समस्या, दु:खाने घेरलेली माणसे समजून घेण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना आपल्याला पक्क भान असलेली विचारप्रणाली, तत्त्वज्ञान परिव्राजक या कथांमधील कथांच्या रुपांतून वाचकांसमोर आणण्यात ते यशस्वी झाले आहेत.सत्यानंतर परिव्राजकने प्रभावित झालेले वाचक कांबळे यांच्या लेखनाच्या प्रतिक्षेत होते. जवळपास १७ वर्षांनी गौतमीपुत्र कांबळे यांनी जयंती पुस्तकाच्यारुपाने वाचकांची प्रदीर्घकाळची प्रतिक्षा संपवलेली आहे.

या पुस्तकासाठी चे ब्लर्ब अकिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहीले आहे.

त्यांनी पुस्तकाची पाठराखण करताना लिहिले आहे,

गौतमीपुत्र कांबळे यांचे ‘जयंती’ हे पुस्तक म्हणजे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दर दहा वर्षांच्या अंतराने बदलत गेलेल्या जयंती महोत्सवाच्या स्वरुपावरील एक भेदक एक्सरे रिपोर्ट आहे. धम्मक्रांती म्हणजे कार्ल मार्क्सपेक्षा अधिक निर्दोष असं जग बदलण्याचं क्रांतीकारी धम्म तत्त्वज्ञान! त्यातला आशय पुढील काळात कसा धुसर होत गेला आणि एका प्रतिक्रांतीला कसा जन्म देता झाला यासंबंधी अत्यंत प्रामाणिक आणि तटस्थपणे या पुस्तकातून कांबळे यांनी उपहासात्मक मार्मिक भाष्य केले आहे.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर धम्माला विधी व परंपराग्रस्त धर्माचे स्वरुप कसे प्राप्त होत गेले हे दाखवून दिले आहे.तसेच उजव्या व डाव्या दोन्ही स्वरुपाच्या पोथीनिष्ठ विचारांची धम्मक्रांतीशी नेत्यांनी तत्त्वहीन सांगड घालत केलेल्या तडजोडीमुळे बाबासाहेबांना मानणारा समाज कसा भरकटत चालला आहे याचे भेदक दर्शन पहिल्या चार ‘जयंती’मधून लेखकाने घडवले आहे. तर पाचवी ‘जयंती’ एक लोभस स्वप्न आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातली धम्मक्रांती आणि त्याद्वारे समताधिष्ठीत समाज घडवण्याचे स्वप्न धम्मनगर या नव्याने वसवलेल्या गावात कसे साकार झाले याची रोचक कहाणी आहे.

मराठी साहित्याच्या ललित लेखनाच्या सा-या रुढ चौकटी मोडून एक नवा साहित्य प्रकार ज्याला मी कथेची रंजकता आणि लेखाची वैचारिकता असलेला कथालेख म्हणेन असा नवा साहित्यप्रकार  गौतमीपुत्र कांबळे यांनी दिला आहे.

जयंती
लेखक- गौतमीपुत्र कांबळे
प्रकाशक- एक्स्प्रेस हाऊसिंग प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठसंख्या- १७२
किंमत- रु. २५०