कॉ.अण्णा सावंत यांचे आत्मकथन

फुलटायमर’ हे कॉ. अण्णा सावंत यांच्या आत्मकथनाचे पुस्तक अलिकडेच लोकवाङमय गृहाने प्रकाशित केले आहे. अण्णा सावंत हे जालना जिल्ह्यातील डाव्या चळवळीचे लढाऊ नेतृत्व. मूळचे लातूरचे असणारे कॉ. सावंत हे पक्षाच्या आदेशाने कामगार संघटनेच्या कामासाठी जालन्यात आले नि मग जालनाच त्यांची कर्मभूमी बनली.

डावा विचार घेवून त्यांनी जालन्यात विद्यार्थी , कामगार आणि शेतक-यांच्या चळवळी संघटीत केल्या. चळवळ उभी करताना करावा लागलेला संघर्ष, त्यातले अनुभव, व्यक्ती आणि समुह पातळीवर उभे राहिलेले ताणतणाव या सर्वांना भिडत त्यांनी जालन्यात लाल बावट्याचे काम केले त्याचा दस्तावेज म्हणजे कॉ. सावंत यांचे हे आत्मकथन आहे. जवळपास साडेतीन दशकांचा लाल बावटा हाती घेवून केलेल्या संघर्षाचे वस्तुनिष्ठ कथन या आत्मकथनात आहे. एका अर्थाने जालनातील एका क्रांतीकारी चळवळीचे आत्मकथन आहे.

कामगार हा समाजाचाच एक अविभाज्य भाग आहे. समाजामध्ये ज्या अंधश्रद्धा,रुढी,परंपरा,जातीवाद,धर्मांधता इ. दुष्ट प्रवृत्ती असतात, त्या कामगारांमध्येसुद्धा असतात. कामगार चळवळ फक्त आर्थिक परिवर्तनासाठी नसून ती व्यापक सामाजिक परिवर्तनासाठी असते.तेव्हा, हे परिवर्तन घडविण्यासाठी कामगारांमधील अपप्रवृत्तीविरुद्ध संघर्ष करणे हेही महत्त्वाचे असते.   त्यांच्या आर्थिक मागण्यांसाठी मोर्चे काढणे सोपे असते… पण कामगार हा माणूस आहे; त्याला सुसंस्कत माणूस घडविणे, समस्त परिवर्तनासाठी त्याची मानसिकता घडविणे,त्याच्यातील दुष्ट प्रवृत्तींशी लढताना कार्यकर्त्यांची खरी कसोटी लागत असते,मला यासाठी जो संघर्ष करावा लागला, जे भोगावे लागले, ते अनुभव माझ्या दृष्ठीने खूप महत्त्वाचे आहेत.ते समोर आणणे हा देखील या आत्मकथनाचा उद्देश आहे.

                                                                                  – मनोगतातून

समाजक्रांतीचे स्वप्न घेवून चळवळीत सक्रिय होणा-या तसेच होवू इच्छिणा-या तरुण कार्यकर्त्यांनी आवर्जून वाचावे असे हे आत्मकथन आहे. जेष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे.

फुलटायमर
कॉ.अण्णा सावंत
प्रकाशक – लोकवाङमय गृह
पृष्ठे- ३१०