सिग्मंड फ्रॉईड (१८५६-१९३९)

विसाव्या शतकावर प्रभाव पाडणाऱ्या विचारवंतांमध्ये सिग्मंड फ्रॉइड यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ऑस्ट्रियात जन्मलेले फ्रॉईड हे मेंदूतज्ज्ञ व मज्जाविकृतिशास्त्रातील विशेषज्ञ होते. स्त्रीला आलेल्या लैंगिक अनुभवांची व्याप्ती केवळ त्या अनुभवांपुरतीच मर्यादित नसून तिच्या समग्र मानसिकतेवर प्रभाव टाकण्याएवढी मोठी असते, असे त्यांचे मत होते. त्यांच्याकडे उपचारांसाठी येणाऱ्या अनेक मनोरुग्ण स्त्रियांचा अभ्यास करून त्यांनी हे निष्कर्ष काढले होते.. व्हिएन्नामध्ये त्यांनी जेव्हा स्वतःच्या कारकिर्दीला सुरुवात केली, तेव्हा लैंगिकतेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोण फारसा प्रगत नव्हता. विशेषतः स्त्रियांच्या लैंगिक अभिव्यक्तीवर बंधने होती. लैंगिक स्वातंत्र्यास फारशी अनुकूलता नव्हती. योनिशुचिता, लैंगिक नीतिनियम याबाबतचे निर्बंध कडक होते. मानसिक समस्या म्हणजे मेंदूतला बिघाड असा समज सरसकट होता. फ्रॉईड यांच्याकडे उपचाराला येणाऱ्या स्त्रियांवर अशा वातावरणाचा पगडा होता.

त्यांचे एक सहकारी ब्रुअर हे एका स्त्री-रुग्णावर उपचार करीत असताना तिच्या मनोव्यापारांचे जवळून निरीक्षण करण्याची संधी फ्रॉईड यांना प्राप्त झाली. स्त्रियांच्या लैंगिक मानसिकतेचा अभ्यास करण्याची प्रेरणा त्यांना या केसमधून मिळाली. या स्त्रीची केस पुढे ॲना ओ या नावाने गाजली (Breuer Freud १८९५). वडिलांवर निरतिशय प्रेम असणाऱ्या ॲना ओ या २१ वर्षीय स्त्रीचे वडील गंभीर आजारी पडले. त्यांची शुश्रूषा करीत असताना तिला काही लक्षणांनी गाठले. तिच्या लक्षणांवरून तिला वातोन्माद (हिस्टेरिया) झाला असावा, असे निदान ब्रुअर यांनी केले. पुढे तिचे वडील वारल्यानंतर तिची लक्षणे अधिकच तीव्र झाली. ब्रुअर यांनी तिच्यावर संमोहनाचा वापर केला व मोकळेपणाने बोलण्यास उत्तेजन दिले.

दमन व लैंगिक मानसिकता – ॲना ओच्या केसचा अभ्यास करीत असताना फ्रॉईड यांनी असा निष्कर्ष काढला की, तिच्या मनाच्या तळाशी वडिलांबाबत पराकोटीचा रोष दडून बसला होता. सामाजिक नीतिनियमांमध्ये तो रोष बसत नसल्यामुळे ही भावना मोकळेपणाने मान्य करणे तिला जड जात होते. ही भावना आपल्या जाणिवेतून, स्मृतीतून घालवून टाकण्याचा म्हणजेच तिचे दमन करण्याचा तिचा सतत प्रयत्न चालू होता. दडपलेल्या भावनांचा भार जेव्हा असह्य झाला तेव्हा तिच्यात वातोन्मादाची लक्षणे दिसू लागली.

‘दमन केलेल्या भावना व वासना या मनोविकाराला जन्म देतात’, हा फ्रॉईड यांचा मनोविश्लेषणाचा पायाभूत सिद्धांत या केसचा अभ्यास करताना जन्माला आला. जर रुग्णास मोकळेपणाने बोलण्यास प्रोत्साहन दिले, तर या दडपलेल्या भावनांस वाट मिळते. त्यांचा निचरा झाल्यामुळे मनावरचे ओझे कमी होते व रुग्णास बरे वाटते, अशी मांडणी फ्रॉईड यांनी या सिद्धांतात केली.

लैंगिक भावनेवर सामाजिक निर्बंध जास्तीत जास्त असल्यामुळे दडपलेल्या भावनांत लैंगिक भावनांचे प्रमाण फार मोठे असते. स्त्रियांच्या बाबतीत तर हे निर्बंध अजूनच कडक असल्यामुळे स्त्रियांच्या मनोविकारांचे प्रमुख कारण त्यांच्या लैंगिक भावनांचा कोंडमारा हे असते. प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत हा कोंडमारा कमीअधिक प्रमाणात होत असतो व तो किती झाला आहे, यावरून तिची लैंगिक मानसिकता ठरत असते, असे निष्कर्ष फ्रॉईड यांनी मांडले (Edinger १९६३).

बालपणीचा लैंगिक छळ- कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर फ्रॉईड यांच्याकडे येणाऱ्या मनोरुग्णांत स्त्रियांचे प्रमाण बरेच जास्त होते. कुठल्याही दडपणाशिवाय व निर्बंधाशिवाय त्यांना बोलण्यास फ्रॉईड उत्तेजन देत. यासाठी त्यांनी मुक्त साहचर्य (free association) ही मनोविश्लेषण पद्धत शोधून काढली होती. या पद्धतीचा वापर केला असता अनेक स्त्रिया त्यांना बालपणी सहन कराव्या लागलेल्या लैंगिक छळाचे वर्णन करीत. अशा छळाचा खोल मानसिक परिणाम त्यांच्यावर होत असावा, असे फ्रॉईड यांना वाटू लागले. त्यावरून स्त्रियांच्या बाबतीत बालपणी झालेल्या लैंगिक छळांच्या स्मृतीचे दमन व मनोविकार यांच्यात जवळचा संबंध असावा असा निष्कर्ष त्यांनी काढला.

पुढील काही वर्षांत याचा खोलात जाऊन अभ्यास करताना फ्रॉईड यांना लक्षात आले की, या स्त्रिया वर्णन करत असलेला बालपणी झालेला लैंगिक छळ हा प्रत्यक्षात घडला नसून त्यांनी तो कल्पनेने रंगवला असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे नंतरच्या काळात त्यांनी अगोदरचा निष्कर्ष रद्दबातल केला. स्त्रियांना होणाऱ्या मनोविकारांचा संबंध हा प्रत्यक्ष घटनांपेक्षा त्यांनी मनात रंगवलेल्या लैंगिक कल्पनाचित्रांशी असावा असा नवीन निष्कर्ष त्यांनी काढला. लैंगिकतेच्या बाबतीत स्त्रियांचा इतका प्रचंड कोंडमारा होत असला पाहिजे की, अशी कल्पनाचित्रे रंगवण्याची त्यांना गरज भासत असावी असे फ्रॉईड यांचे निरीक्षण होते. तसेच स्त्रिया लैंगिक छळात वडिलांचे नाव प्रामुख्याने का घेत असाव्यात, हाही प्रश्न त्यांना भेडसावत होता. त्याचे उत्तर शोधताना त्यांनी एका नवीन सिद्धांताला जन्म दिला. यास त्यांनी इडिपस गंडाचा सिद्धांत असे संबोधले. फ्रॉईड यांच्या लिखाणातील हा सिद्धांत सर्वात वादग्रस्त ठरला असला तरी त्यातून येते. ते स्त्रियांच्या लैंगिक मानसिकतेबद्दल कसा विचार करीत होते हे प्रत्ययास

लैंगिक मानसिकतेची सुरुवात – फ्रॉईड यांनी व्यक्तिमत्त्व विकासाची अशी मांडणी केली होती की, जन्मापासून ते युवावस्थेपर्यंत आपला व्यक्तिमत्त्व विकास वेगवेगळ्या टप्प्यांतून होत असतो. या प्रत्येक टप्प्यावर आपली जीवन-ऊर्जा शरीराच्या विशिष्ट अवयवांवर केंद्रित होते. हे अवयव त्या विशिष्ट टप्प्यातील सुखोत्तेजक क्षेत्रे (erogenous zones) असतात व ती सुखनिर्मितीचे कार्य करीत असतात. या सिद्धांतानुसार ३ ते ६ वयामधील सुखोत्तेजक क्षेत्र हे जननेंद्रिय असते. जननेंद्रियांना स्पर्श केल्यावर सुखनिर्मिती होत असते. या वयात स्वतःच्या व इतरांच्या शरीराविषयीची जागरूकता वाढते. तसेच स्त्री-पुरुषांच्या भिन्न जननेंद्रियांचीही जाणीव होते. स्त्रीची लैंगिक मानसिकता या वयापासून विकसित होते. या वयात लैंगिकतेसंबंधी आलेल्या बऱ्यावाईट अनुभवांचा तिच्या लैंगिक मानसिकतेवर खोल प्रभाव पडतो. या वयात काठीने घोडा खेळणे, डॉक्टर-रुग्ण खेळात अनावृत होणे, जननेंद्रियांशी चाळा करणे, जननेंद्रियांना स्पर्श होईल असे खेळ खेळणे अशा क्रियांत मुली रमतात. या टप्प्यात जननेंद्रियांच्या सुखनिर्मितीची गरज योग्य रीतीने भागली गेली तर स्त्रीची लैंगिक मानसिकता निरोगी होते. मात्र ही गरज अतिरिक्त अथवा अपुरी भागली गेली तर प्रौढ वयात भीती, मत्सर अशा भावना तिच्या मनात घर करून बसतात.

इडिपस गंड लिंगओळख होते. मुलास मातेबद्दल व मुलीस पित्याबद्दल लैंगिक आकर्षण वय वर्षे ३ ते ६ या वयोगटातील मुलामुलींस स्वतःची लिंगओळख होते. मुलास मातेबद्दल व मुलीस पित्याबद्दल लैंगिक आकर्षण वाटते. त्यांची मर्जी संपादन करण्यात समानलिंगी पालकांचा अडथळा वाटून भावनेमुळे मुलास वाटते. त्यांची मर्जी संपादन करण्यात समानलिंगी पालकांचा अडथळा त्यांच्याबद्दल चढाओढीची भावना त्यांना वाटते. यास फ्रॉईड इडिपस गंड असे संबोधतात. स्वतःचे जननेंद्रिय हे विशेष आहे व आपले वडील शक्तिशाली असल्यामुळे ते आपल्यापासून ते हिरावून नेतील, या चिंता (Castration anxiety) वाटते. आपल्याला मुलासारखे जननेंद्रिय नसल्यामुळे ती कमरतता आहे, असे वाटून पुरुषी जननेंद्रियाबद्दल मुलीस मत्सर वाटतो. यास शिश्न-मत्सर (Penis-envy) असे फ्रॉईड म्हणतात. स्त्रीचा इडिपस गंड हा पुरुषापेक्षा जास्त तीव्र असतो व त्याचा परिणाम न्यूनगंडात, असुरक्षितता वाटण्यात होतो.

द्वि-उत्कर्षबिंदू- स्त्रीला अत्युच्च कामसुख कसे मिळते यासंबंधीही फ्रॉड यांनी जो सिद्धांत मांडला त्यास द्वि-उत्कर्षबिंदू सिद्धांत असे म्हणतात. स्त्रिया दोन प्रकारे कामसुखाचा उत्कर्षबिंदू (orgasm) अनुभवतात. त्यातील एक प्रकार म्हणजे योनीच्या उद्दिपनाने येणारा उत्कर्षबिंदू (Vaginal orgasm) व दुसरा प्रकार म्हणजे शिश्निकेच्या मर्दनामुळे येणारा उत्कर्षबिंदू (Clitoral orgasm). फ्रॉईड यांचे प्रतिपादन असे होते की, कोवळ्या वयात किंवा पौगंडावस्थेत मुली शिश्निकेचा उत्कर्षबिंदू अनुभवतात. परंतु असे कामसुख हे अपरिपक्क कामसुख असते. तारुण्यावस्थेत परिपक्वता आल्यावर समागमाद्वारे त्या योनी-उत्कर्षबिंदू गाठतात, यातून मिळणारे कामसुख हे अत्युच्च असते. जर एखाद्या स्त्रीची जीवन-ऊर्जा शिनिकेतच बंदिस्त झाली असेल तर व्यक्तिमत्त्व विकासाचा पुढील टप्पा गाठला तरी योनी-उद्दिपनाऐवजी शिश्निकेच्या उद्दिपनाने ती कामसुख मिळवते. लैंगिक प्रतिसाद न देणे किंवा कामसंबंधांत थंड असणे अशा समस्या तिला येऊ शकतात. द्वि -उत्कर्षबिंदू सिद्धांत सांगतो की, योनी-उद्दिपनाने मिळणारा उत्कर्षबिंदू हा शिश्निकेच्या उत्कर्षबिंदूपेक्षा श्रेष्ठ प्रतीचा असतो. म्हणजेच स्त्रिया अत्युच्च कामसुख हे योनीतील उद्दिपनानेच मिळवू शकतात (Irvine २००५).

स्त्रियांची समलैंगिकता – जैविक व मानसिक घटकांमुळे स्त्रिया समलैंगिकतेचा स्वीकार करतात असे मत फ्रॉईड यांनी मांडले. सन १९०५ ते १९२२ या दरम्यान त्यांनी या विषयावर काही निबंध लिहिले. त्यात ते म्हणतात की, प्रत्येक मनुष्यास समलिंगी व विरुद्धलिंगी आकर्षण वाटू शकते. त्यापैकी स्वीकार व्यक्ती करेल हे मुख्यतः जैविक घटकांवर अवलंबून असते. बाह्य अवयवांवर शस्त्रक्रिया करून किंवा जननेंद्रियाचे रोपण करून समलैंगिकता बदलता कुठल्या लैंगिकतेचा येणार नाही, असे त्यांना वाटत होते. स्वतःच्या तरुण मुलीच्या समलैंगिकतेत बदल व्हावा म्हणून एक पालक तिला उपचारासाठी फ्रॉईडकडे घेऊन आले होते. त्या केसचा ऊहापोह करताना व्यक्तीचा समलैंगिकतेकडे कल असेल तर तो बदलणे फार कठीण आहे, असे मत त्यांनी १९२० साली लिहिलेल्या एका शोधनिबंधात व्यक्त केले आहे (Freud १९९९).

१९३५मध्ये मुलाच्या समलैंगिकतेवर उपचार करण्याची विनंती करणाऱ्या एका मातेला त्यांनी लिहिलेले पत्र विख्यात आहे. त्यात ते तिला विचारतात, ‘तुम्ही समलैंगिकता हा शब्द उच्चारण्यासही कचरत आहात. समलैंगिकतेचे काही फायदे नसले तरी त्यात लाज वाटण्यासारखे किंवा कमी वाटण्यासारखे काय आहे ? तो काही आजार नाही. लैंगिकतेच्या विविध अभिव्यक्तींपैकी तो एक आविष्कार आहे. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अनेक सन्माननीय व्यक्ती समलैंगिक आहेत. समलैंगिकतेला गुन्हा मानणे क्रूरता आहे’ (Freud १९३५ : ७८६-७८७).

समलैंगिकतेला विकृती न समजता तिला लैंगिकतेचा एक आविष्कार म्हणून मान्यता दिली पाहिजे, हे फ्रॉईड यांचे मत ते काळाच्या पुढे होते याचा प्रत्यय देते.

टीका – स्त्री लैंगिकतेबद्दल व तदनुरूप तिच्या घडणाऱ्या मानसिकतेबद्दल फ्रॉईड यांनी जे विचार मांडले त्याबद्दल त्यांच्या जीवनकाळात त्यांना बरीच टीका व अनेक आरोप सहन करावे लागले. त्यावर इतके वादंग माजले की, त्यांच्या मृत्यूला अनेक वर्षे उलटल्यानंतरही ते थांबले नाहीत. फ्रॉईड यांनी पुरुषप्रधान मानसिकतेतून स्त्रीच्या लैंगिकतेचा शोध घेतल्यामुळे त्यांचे निष्कर्ष हे पूर्वग्रहदूषित आहेत, हा त्यांच्यावरचा मुख्य आरोप आहे. ‘स्त्रिया नेहमी बदलांना विरोध करतात. निष्क्रियतेने बदल स्वीकारतात. त्यात स्वतःची भर घालत नाहीत. ‘ असे एका लेखात फ्रॉईड यांनी मांडलेले स्त्रियांबद्दलचे मत त्यांच्या जुनाट विचारसरणीची साक्ष देते(Freud १९२५ : २४८-२५८). स्त्रीच्या मानसिकतेचा विचार करताना रोगट मानसिकतेवर भर दिल्यामुळे स्त्री-मानसिकतेच्या सकारात्मक पैलूंवर भर देण्याऐवजी तुटलेल्या, विदीर्ण झालेल्या, स्त्रीच्या नकारात्मक मानसिकतेचे चित्र त्यांनी उभे केले.

स्त्रियांच्या मानसिकतेवर लैंगिकतेखेरीज इतर अनेक घटकांचाही मोठा प्रभाव पडत असतो. फ्रॉईड यांच्या मांडणीमध्ये मात्र ‘लैंगिकता’ हा एकमेव घटक स्त्री – मानसिकतेवर परिणाम करतो असे दिसते. ते वास्तव नाही. स्त्री-मानसिकतेचा विचार करताना लैंगिक घटकांची व्याप्ती त्यांनी अवाजवी वाढवली आहे. त्यांनी नमूद केलेला इडिपस गंड व पुरुष जननेंद्रियाबद्दल स्त्रीला वाटणारा मत्सर या संकल्पनांवर तर अनेक टीकाकार व स्त्रीवादी अभ्यासकांनी टीकेची झोड उठवली. ही फ्रॉईड यांची कल्पनानिर्मिती आहे व पुरुष जननेंद्रियाबद्दल अशा भावना स्त्रियांना वाटत नाहीत, फ्रॉईड म्हणतात त्या वयात तर पुरुषाचे जननेंद्रिय स्त्रीच्या खिजगणतीतही नसते, असेही प्रतिपादन अनेकांनी केले. स्त्रीला पुरुषाशिवायही स्वतंत्र ‘ओळख’ असते. ती पुरुषांशी येणाऱ्या लैंगिक अनुभवांशी किंवा पुरुष जननेंद्रियाशी संलग्न करण्यामधून, तसेच त्यांना अवास्तव महत्त्व देण्यातून फ्रॉईड यांनी पुरुषी मानसिकतेचे दर्शन घडविले आहे, अशी टीका त्यांच्यावर झाली. याबरोबरीने फ्रॉईड यांना स्त्री-मानसिकतेची अपुरी जाण असल्याचे प्रत्ययाला येते, असेही काही टीकाकार म्हणतात. त्यांच्या द्वि-उत्कर्षबिंदू सिद्धांतास पुष्टी देणारा वस्तुनिष्ठ पुरावा मिळाला नाही. त्यामुळे हा सिद्धांतही टीकेच्या लक्ष्यस्थानी सापडला.

फ्रॉईड यांचे सिद्धांत वादग्रस्त ठरले असले तरी त्यांचे या विषयातील योगदान महत्त्वाचे आहे. ज्या काळात त्यांनी हा अभ्यास केला, त्या काळात स्त्रीला लैंगिक इच्छा व भावना असतात, याची जाणीवही समाजाला नव्हती. अशा काळात स्त्रीला लैंगिक गरजा असतात व त्यांचे तुष्टीकरण झाले नाही तर तिच्यावर काय परिणाम होऊ शकतो, हे मांडण्याचे धारिष्ट्य त्यांनी दाखविले. द्वि-उत्कर्षबिंदूवर जरी टीका झाली असली तरी स्त्रिया उत्कर्षबिंदू कसा अनुभवत असाव्यात, याबाबतचा त्यांनी केलेला स्वतंत्र विचार व स्त्रिया शिनिकेचा उत्कर्षबिंदू अनुभबू शकतात, हे त्यांचे निरीक्षण यामुळे अनेक संशोधकांना त्यावर पुढील संशोधन करण्यास चालना मिळाली. समलैंगिकता हा आजार आहे किंवा ती विकृती आहे असा समज त्याकाळी सर्वत्र प्रचलित असताना फ्रॉईड यांनी समलैंगिकतेबद्दल मांडलेली मते निश्चितच दखलपात्र आहेत. फ्रॉईड यांनी स्त्री-लैंगिकतेबद्दल व तिच्या मानसिकतेबद्दल काढलेले निष्कर्ष अजूनही निर्णायकरित्या खोडून काढता आलेले नाहीत. त्यांच्यावरची उलटसुलट चर्चा चालूच आहे. हे निष्कर्ष कितपत सयुक्तिक आहेत हे काळच ठरवेल.

सन १९३३ च्या एका निबंधात ते म्हणतात, ‘मला जसे कळले तसे मी मांडले. ते अपुरे आहे, विस्कळीत आहे. फारसे स्वीकारार्ह नाही, हे मला माहीत आहे. स्त्री-लैंगिकतेबद्दल व तिच्या मानसिकतेबद्दल तुम्हांला अजून जाणून घ्यायचे असेल तर मी स्त्रियांना असे आवाहन करीन की तुमच्या अनुभवांचा शोध तुम्ही स्वतः घ्या किंवा तुमच्या भावनांना शब्दरूप देण्यासाठी कवितेकडे वळा अथवा तुमच्या मानसिकतेचे सखोल दर्शन देणारे विज्ञान विकसित होण्याची वाट पाहा’

( Cherry २०२०).

अंजली जोशी या ‘ मी अल्बर्ट एलिस ‘ या लोकप्रिय पुस्तकाच्या लेखिका असून मनोवैज्ञानिक समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत.