आंबेडकरी प्रेरणेच्या वाङमयविश्वात एक नवा कथासंग्रह अलिकडेच दाखल झालाय. ‘इस्तव’ हा सुनिल हेतकर यांचा पहिलाच कथासंग्रह हेतकर्स प्रकाशनाच्यावतीने प्रकाशित करण्यात आला आहे. कथा, कादंबरी लेखनाकडे आंबेडकरवादी लेखक फारसे वळत नसल्याच्या काळात कवी असलेल्या सुनिल हेतकर यांनी कथेच्या प्रांतात आश्वासकरित्या पाऊल टाकलेले आहे. समकालीन समाजमनाच्या ठाव घेणारे आशयद्रव त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिव्यक्तीतून या कथामध्ये उतरले आहे.

‘इस्तव’ या संग्रहात सुनिल हेतकर यांच्या १० कथांचा समावेश आहे. डॉ. प्रकाश खरात यांची दीर्घ प्रस्तावना असलेल्या कथासंग्रहाला कवी डॉ. महेश केळुसकर यांचा ब्लर्ब आहे.

‘इस्तव’ या कथासंग्रहाध्ये विविध आशय विषय आहेत.अनेक व्यक्तीरेखांचे,भाषाअभिव्यक्तीचे,जीवनसंघर्षाचे जगणे आहे.जीवनातील सामाजिक जाणिवा आहेत.वैचारिक मूल्यांचे अप्रतिम दर्शन आहे.सुनिल हेतकर यांची कथा नव्या समाज रचनेची व नव्या मानवी मनाची जडणघडण करणारी महत्त्वाची कथा ठरली आहे. आंबेडकरी कथेला समृद्ध करणारी जशी ही कथा आहे त्याचप्रमाणे मराठी कथेतील नव्या सामाजिक जीवनाचे दर्शन घडविणारे तिचे कथारुप आहे.आशय,विषय,अभिव्यक्ती,कोकणा मालवणी बोलीशिवाय मिश्रीत भाषेतील शब्दाचे नाविन्य हे या कथेचे नवेपण आहे.

– डॉ. प्रकाश खरात ( प्रस्तावनेतून )

आंबेडकरी समाजातील नवा तरुण वर्ग केवळ जुन्या चक्रव्यूहात न अडकता राजकिय,सामाजिक,आर्थिक, प्रशासनिक व्यवस्थांमध्ये सहभागी होवून ‘अत्त दीप भव’ आणि नीती विनयाचे तत्त्वज्ञान कृतीशील करीत आहे, याचे सम्यक दर्शन सुनिल हेतकर यांच्या दशकथा ‘इस्तव’ या संग्रहात घडते.

– महेश केळुसकर

सुनिल हेतकर हे मराठी वाङमयविश्वात  आंबेडकरी विचारांची प्रेरणा घेवून कविता लेखन करणारे प्रतिथयश कवी म्हणून परिचित आहेत. टेळका( २००१) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यांचे ‘थेरीगाथा-स्त्रीमुक्ती,समाज आणि तत्त्वज्ञान’, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा बुद्ध-धम्मविषयक दृष्टीकोन व २२ प्रतिज्ञा’ आदी वैचारिक लेखनही प्रकाशित झाले आहे. आपल्या कवितेतून आंबेडकरी प्रेरणेच्या कवितेच्या आशयाचा पैस विस्तारणा-या सुनिल हेतकर यांची कथाही गद्य वाङमयात मोलाची भर टाकेल अशा दमदार कथांचा ‘इस्तव’ हा संग्रह आहे.

 तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील हेत गावचे सुनिल हेतकर हे सध्या नवी मुंबई येथे कोकण रेल्वेमध्ये ज्युनि. इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

इस्तव
(कथासंग्रह )
सुनिल हेतकर
प्रकाशन- हेतकर्स पब्लिकेशन
पृष्ठे – १७३
किंमत – रु.३००