२४ वर्षांच्या मोठ्या कालखंडानंतर कॉंग्रेसला पुन्हा गांधी घराण्याबाहेरचे नेतृत्व मिळाले आहे. कर्नाटक राज्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आजच कॉंग्रेस अध्यपदाची सूत्रे स्विकारली. याच महिन्याच्या १७ तारीखला कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरुर या दिग्गजांमध्ये ही लढत होती. १९ ऑक्टोबरला मतमोजणी झाली. खर्गे यांनी एकतर्फी ही निवडणूक जिंकली.

२४ वर्षांनंतर गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती अध्यक्ष झाली आहे. यापूर्वी १९९७ मध्ये सीताराम केसरी यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. खरगे हे बाबू जगजीवन राम यांच्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष होणारे दुसरे दलित नेते आहेत. एस. निजलिंगप्पा यांच्यानंतर कर्नाटकमधून काँग्रेस अध्यक्ष होणारे ते दुसरे नेते आहेत.

८० वर्षे वय असलेले खर्गे कॉंग्रेसचे सर्वांत जेष्ठ नेते आहेत. गांधी घराण्याशी एकनिष्ठाही विवादीत आहे. संसदीय राजकारणाचा खर्गे यांच्याकडे मोठा अनुभव आहे. दलित जात वर्गातून आलेले  खरगे यांनी १९६९ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ९ वेळा आमदार, २ वेळा लोकसभा सदस्य, केंद्रीय मंत्री म्हणूनही काम केले. लोकसभेत ते काँग्रेसचे नेते राहिले. इतर पक्षांशी सुसंवाद राखत समन्वय साधण्याचे कसब खर्गे यांच्याकडे आहे.

१३७ वर्षाच्या कॉंग्रेसच्या पक्षसंघटनेचे अध्यक्षपद लाभलेल्या खर्गे यांच्या राजकीय जीवनातील ही महत्त्वाची घटना आहे. मात्र ज्या काळात ते पक्षाध्यक्षपदावर  विराजमान होत आहेत तो काळ कॉंग्रेस पक्षाच्या अस्तित्वाच्यादृष्टीने अटीतटीचा काळ आहे. २०१४ ज्या सार्वत्रिक निवडणूकीत दारुण पराभव झाल्यानंतर पक्षाच्या विविध राज्यांतील सत्तेला तर गळती लागलीच पण सर्वांत दारुण अवस्था पक्षपातळीवर निर्माण झाली आहे.

२०१४ च्या निवडणूकीनंतर कॉंग्रेसच्या ताब्यातील एक एक राज्य भाजपने ताब्यात घेतली. कॉंग्रेससारख्या प्रदीर्घ काळ सत्तेत राहिलेल्या नि स्वातंत्र्य चळवळीचा भव्य वारसा असलेल्या पक्षाकडे भारतीय संघराज्यातील केवळ राजस्थान आणि छत्तीसगड ही दोनच राज्ये उरली आहेत. बाकीच्या राज्यांत भाजप व प्रादेशिक पक्ष सत्तेवर आहेत. बाकीच्या राज्यात पक्ष सत्ते नसला तरी काही प्रमाणात कॉंग्रेसचा जनाधार आहे. काही राज्यांत तर सत्तेत येण्या इतपत कॉंग्रेसचा जनाधार टिकून आहे. मात्र हा जनाधार सत्तेत परतण्यासाठी पक्ष संघटनेचा जो सुकाणू लागतो त्याबाबतीत कॉंग्रेस अधिकाधिक खिळखिळी होत आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर कॉंग्रेसचे राज्या राज्यातील अनेक सरंजामदार नेते भाजपच्या छावणीत दाखल झाले. या बिकट परिस्थितीत पक्षाचे संघटन मजबूत करणे आणि सत्तेत परतण्याच्या शक्यता निर्माण करणे अशी अवघड आव्हाने खर्गे यांच्या समोर आहे. खर्गे यांचा अनुभव दांडगा असला तरी पक्ष बांधणीसाठी देशभर हिंडण्याचे वय खर्गे यांचे राहिले नाही. मात्र राहु गांधी यांची साथ आणि राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून पुन्हा एकदा कॉंग्रेसला अनुरुप माहौल तयार करीत आहे. या यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही आव्हाने पेलण्यासाठी खर्गे यांनी अधिक बळ मिळेल हे निश्चित.

खर्गे यांनी आजच पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्विकारताना पक्ष संघटनेत ५० टक्के पदांची जबाबदारी तरुणांकडे देण्यात येणार असल्याचे जाहिर केले आहे. खर्गे यांचा निर्णय राहुल ब्रिगेडला मजबूतीकडे नेणारा आहे. खर्गे हे कॉंग्रेसचे जुणे जाणते नेते असले तरी कॉंग्रेसच्या जुन्या स्वयंभू संस्थानिकांना चुचकारण्या वेळ दवडू नये. कॉंग्रेसच्या अनेक जुन्या नेत्यांनी पक्ष संघटना बळकट करणे किंवा पक्षासाठी राबण्याऐवजी आपला सुभा सांभाळण्यासाठी पक्षाला वापरुन घेतले. सत्ता बदलली तसे ते भाजपच्या वळचणीला गेले. एका अर्थाने ते बरेच झाले.

कॉंग्रेस सर्व स्तरावरुन कमकुवत होत असतानाही पक्षसंघटनेत शह-काटशहाची संस्कृती मात्र मजबूतपणे कार्यरत आहे. त्यालाही लगाम घालण्याचे कसब खर्गे यांना दाखवावे लागेल.

खर्गे यांच्या नेतृत्वाची कसोटी पाहणा-या ९ राज्यांच्या निवडणूका होवू घातल्या आङेत त्यापैकी हिमाचल व गुजरात निवडणुका लादलीच होवू घातल्या आहेत.

गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष जरी बनला तरी तो रबर स्टॅपराहूनच काम करतो ही कॉंग्रेच्या गैर गांधी अध्यक्षीय परंपरा आहे. या परंपरा खर्गे कशी तोडतात हे ही पाहणे औत्सुक्याचे राहण्यार आहे. खर्गे यांच्यासमोरची आव्हाने सोपी नाहीत. त्यांना कसे सामोरे जातात हा काळच ठरवेल.