हे वर्ष एका चळवळीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. ती चळवळ आहे दलित पॅंथर. भारतातील समाज परिवर्तनाच्या  चळवळीत ” दलित पँथर ” या संघटनेच्या स्थापनेचे व त्यांनी केलेल्या क्रांतिकारी चळवळीचे मोठे महत्त्व आहे. आंबेडकरोत्तर कालखंडातील ती मोठी चळवळ होती. याच चळवळीतून नवे तरुण नेतृत्व, साहित्यिक उदयास आले. नव्या रुपात जात- वर्ग संघर्षाचा विचार पुढे आला. आंबेडकरी विचारांची सांस्कृतिक घुसळण झाली. त्याचे पडसाद देश पातळीवर उमटले.

भारतातील गुजरात, कर्नाटक,तामिळनाडु व अन्य हिंदी भाषिक राज्यांमध्येही संघटना उभ्या राहिल्या,नवे साहित्यिक घडले. दलित साहित्याचा इंग्रजीसह अन्य भाषात अनुवाद झाला. दलित पँथरच्या भूमिकेचा ”  जाहिरनामा ” महत्त्वाचा होता, त्यात सरंजामी, भांडवली सत्ताधा-यांच्या विरोधात, साम्राज्यवादाच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतली होती. तसेच जगभरातील व देशातील सर्व शोषित, कष्टकरी जनतेच्या प्रश्नांवर झगडणा-या डाव्या, पुरोगामी चळवळीसोबत भ्रातृभावाचे नाते असावे अशी प्रागतिक चळवळीला पूरक मांडणी केली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वर्णभेदांचा धिक्कार केला होता. पॅंथर ने फुले-आंबेडकरी विचारां सोबतच, अमेरिकेतील ” ब्लॅक पँथर ” या लढाऊ संघटनेच्या डाव्या विचारातूनही वैचारिक प्रेरणा घेतली होती. दलित पँथरने जात- वर्गीय शोषणाचा मुद्दा प्रथम ठळकपणे पुढे आणला हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

‘दलित पॅंथर चळवळ’ एक मूल्यगर्भ जाणिव घेवून देशाच्या सामाजिक जीवनात घडलेली एक ठळक आणि लक्षणीय घटना होती. ही चळवळ अल्पजीवी असली तरी तिच्यात परिवर्तनवादी ऊर्जा ठासून भरलेली होती. त्याचे प्रत्यंतर आजही येते.

अशा ह्या चळवळीतील घटना,प्रसंग,संदर्भ मांडताना त्यातील सत्याशी आणि तथ्यांशी छेडछाड होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागते. नव्हे ती घेणे आवश्यकच आहे. हितसंबंधी प्रवृत्तीतून अशा प्रकारचा धोका अधिक संभवतो. आणि मला अशा प्रकारची छेडछाड,सत्याचा अपलाप,अर्धसत्य,एकारलेपण असे काही दोष ‘दलित पॅंथर’चा कालपट मांडणा-या लिखाणात दिसून आले. इतिहासलेखनात ह्या असल्या प्रकाराला अजिबात स्थान नसते. दलित पॅंथरवर अनेकांनी लेखन केलेले आहे. सगळेच लेखन हे असे दुषित आहे असे मला म्हणावयाचे नाही. पण मला त्यातही खूप त्रूटी आढळून आल्या. त्या हेतुपुरस्सर राहिल्या असेही मला म्हणावयाचे नाही.

हा सर्वंकष विचार करुन आणि ह्या चळवळीशी संबंधित असलेला एक लेखक- कार्यकर्ता म्हणून चळवळीचा वस्तुनिष्ठ आलेख नव्या पिढीसमोर मांडावा हा देखील उद्देश ह्या लेखनामागे आहे. माझे हे पुस्तक मी चळवळीतील सामाजिक कर्तव्याचा भाग समजतो.

 -अर्जुन डांगळे

भारताच्या क्रांतीकारी चळवळीत महत्त्वाचे योगदान देणा-या दलित पॅंथरच्या स्थापनेपासूनच्या इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करणारा महत्त्वाचा ग्रंथ अलिकडेच प्रकाशित झाला आहे. ‘दलित पॅंथर : अधोरेखित सत्य’ या नावाचा हा ग्रंथ लिहिला आहे आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते अर्जुन डांगळे यांनी. अर्जुन डांगळे हे दलित पॅंथरचे सहसंस्थापकही राहिले आहेत. लोकवाङमय हृहाने या ग्रंथाचे ऑक्टोंबरमध्ये प्रकाशन केले आहे. ३८० पृष्ठसंख्या असणा-या या ग्रंथात २० प्रकरणे व २० परिशिष्टे आहेत. ग्रंथाची किंमत ६०० रु. असून खालील पत्त्यांवर ऑनलाईन खरेदी करता येईल.

www.lokvangmaybooks.com / www.amazon.in