वादे वादे जायते तत्वबोधम्हणजेच वादसंवादातून, चर्चेतून ज्ञानव्यवहार पुढे जातो या बुद्धवचनावर मार्क्सवाद फुले आंबेडकरवाद्यांचा अमिट विश्वास आहे. आणि त्यानुसार ते व्यवहार करण्याचाही प्रयत्न करतात. कॉ. शरद पाटील त्यांच्या वैचारिक मांडणीवर कितीही खालच्या पातळीवर जाऊन जरी टीका केली तरी तेसत्यशोधक मार्क्सवादीमध्ये प्रसिद्ध करीत असत. कॉ. पाटलांचा हा कित्ता त्यांचे अनुयायी आपल्या व्यवहारात उतरविण्याचा प्रयत्न करीत असतात. आपल्या विरोधी मतांना कोणताही पूर्वग्रह ठेवता अथवा त्यावर संपादकीय कात्री चालविता छापण्याची भूमिका मार्क्सवाद फुले आंबेडकरवादाचे अनुयायी घेतात. शिबीर असो कि चर्चासत्र ते त्यांच्या मांडणीवरील टीका सकारात्मकपणे घेतात. ते कोणत्याही महामानवाला दैवत आणि त्यांच्या विचारांना पोथी मानत नाहीत. याचा अर्थ ते त्यांना दुय्यम लेखतात असे नाही. परंतु, बऱ्याच वेळेला विशिष्ट तत्वज्ञान वा विचारसरणीचे अनुयायी ते अनुसरीत असलेल्या व्यक्तीच्या विचारांवर करण्यात आलेली टीका वा चिकित्सा सहन करू शकत नाही. त्यांच्या ह्या भक्तीनिष्ठ पोथीनिष्ठेमुळे संवादाच्या वा चिकित्सेच्या शक्यता रोखल्या जातात. ही प्रस्तावना करण्याचे कारण म्हणजे लाल निशाणच्या मे, २०२२ च्या अंकात कॉ. भीमराव बनसोड यांचामार्क्स यांचे बटाट्याचे पोतेहा लेख होय.

सत्यशोधक शेतकरी सभा, श्रमिक शेतकरी  संघटना आणि अखिल भारतीय किसान महासभा यांच्या संयुक्त भागीदारीतून श्रीरामपूर येथे दि. ६ व ७ एप्रिल २०२२ रोजी दोन दिवशीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यात सध्याच्या राजकीय परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढची आव्हाने, शेतकरी प्रश्नाचे स्वरूप, त्याचे ऐतिहासिक स्वरूप आणि भारतीय समाजवास्तव व शेतकरी प्रश्नाचा संबंध यावर चर्चा करणे अपेक्षित होते. जेणेकरून शेतकरी प्रश्नासंबंधी काही एक प्रमाणात सामाईक समज तयार होऊन आगामी काळातील उभा करावयाच्या शेतकरी आंदोलनाला मदत होईल. या चर्चासत्रांमध्ये शेतकऱ्यांसंबंधी मार्क्सने बटाट्याचे पोते संबोधल्याचे विधान करण्यात आले त्याला आक्षेप घेणारे टिपण कॉ. भीमराव बनसोड यांनी  याच नियतकालिकाच्या जून २०२२ च्या अंकात लिहिले आहे. त्याचा प्रतिवाद करण्यासाठी हे टीपण लिहित आहे.

मार्क्सच्या लिखाणाचा विपर्यास

कॉ. बनसोड यांनी आपल्या टिपणामध्ये मार्क्सच्या लिखाणाचा, त्यांच्या विधानांचा संदर्भ सोडून विपर्यास केला जातो असे प्रतिपादन केले आहे. यासाठी त्यांनी मार्क्सच्या खाजगी मालमत्ता व धर्मासंबंधीच्या लिखाणाचा दाखला दिला आहे. याबरोबरच त्यांनी “सत्ता ही बंदुकीच्या नळीतून उगम पावते” ह्या माओच्या विधानाचा केला जाणारा विपर्यासही उद्धृत केला आहे. याच संदर्भात ते म्हणतात की, “या वाक्यांप्रमाणेच आता नव्याने प्रा. उमेश बगाडे यांच्यामार्फत माझ्या लक्षात आलेले आणखी एक वाक्य म्हणजे ‘मार्क्स यांनी शेतकरी वर्गाला बटाट्याचे पोते म्हंटले आहे’ हे होय”. चर्चासत्रात सहभागी झालेल्या तीनही संघटना समविचारी असल्या तरी त्या एकाच विचारांच्या  नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या भूमिकांमध्ये भिन्नता असणार ही सामान्य बाब होती. त्यामुळे त्यांच्याकडून मांडल्या जाणाऱ्या मुद्द्यांमध्ये, महामानवांच्या विचारांच्या चिकित्सेच्या अनुषंगाने मतभिन्नता राहणार हे स्वाभाविक होते. तेथे महामानवांच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या चिकित्सेला विपर्यास कसे म्हणता येईल असा प्राथमिक प्रश्न मला बनसोडांच्या भूमिकेनंतर पडला आहे. विचारांची चिकित्सा वा विधायक टीका, समीक्षा आणि विपर्यास या दोन भिन्न बाबी आहेत. बनसोड म्हणतात त्याप्रमाणे मार्क्सच्या खाजगी मालमत्तेच्या, धर्मासंबंधीच्या विधानांचा विपर्यास करण्यात आला आहे. हा विपर्यास भांडवलशाहीच्या प्रवक्त्यांकडून जाणीवपूर्वक करण्यात येऊन त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करण्यात आला. सामान्य लोक ह्या विपर्यासाला बळी पडत असले तरी त्यास भांडवलशाहीधार्जिण्या शक्ती जबाबदार आहेत हे विसरून चालता कामा नये. मार्क्स किंवा माओच काय सर्वच व्यवस्थाविरोधी विचारकांच्या विचारांचा विपर्यास करण्यात येतो. फुले-आंबेडकरही त्यास अपवाद नाहीत. उजव्या शक्ती त्यांचा मुस्लीमविरोधी अजेंडा पुढे रेटण्यासाठी आंबेडकरांनी “थॉटस ऑन पाकिस्तान” या ग्रंथात मांडलेल्या विचारांचा विपर्यास करून वापर करतात हे सर्वश्रुत आहे. एवढेच काय राज ठाकरेनी त्यांची परप्रांतीयांविरोधीची भूमिका योग्य साबित करण्यासाठी  आंबेडकरांच्या ‘भाषिक राज्या’संबंधीच्या भूमिकेचा विपर्यास अनेक सभांमधून केलेला सर्वश्रुत आहे. महामानवांच्या विचारांच्या अशा विपर्यासामध्ये व्यवस्थासमर्थक शक्तींचे संकुचित हितसंबंध असतात. व्यवस्थासमर्थक शक्तींची प्रचारयंत्रणा प्रचंड शक्तिशाली असते, त्यामुळे सामान्य जनताच काय बऱ्याच वेळेला पुरोगामी चळवळीतील कार्यकर्तेही त्यास बळी पडतात. ह्या विपर्यासाचा सामना करण्यासाठी महामानवांच्या विचारांचा अखंड व व्यापक प्रमाणात जागर करून प्रबोधनाच्या महाप्रवाहात सर्वांना सामील करणे आवश्यक ठरते.

विचारांच्या विपर्यासाचा धोका मान्य करूनही एक बाब अधोरेखित करणे गरजेचे आहे व ती म्हणजे विपर्यास आणि विचारांची विधायक समीक्षा यांची गल्लत करता कामा नये. बऱ्याच वेळेला अशी समीक्षा आपणास आवडणारी किंवा पटणारी नसते. पण, ह्या समीक्षेशी आपण सहमत नसलो तरी ती त्या विचारांना पुढे घेऊन जाणारी, त्यास अधिक समृद्ध करणारीच असते हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अशी समीक्षा केवळ त्या विचारांना समृद्ध करत नाही ती व्यवस्था परिवर्तक चळवळींना सहाय्यभूत ठरते. व्यवस्था परिवर्तक चळवळ तेंव्हाच गतिमान होऊ शकते जेंव्हा ती समाजवास्तवाचे सम्यक व योग्य आकलन करेल. या सम्यक आकलनाच्या बळावरच त्यातले अंतर्विरोध स्पष्ट केले जाऊन त्याच्या सोडवणुकीच्या पर्यायांची उभारणी केली जाऊ शकते.  परंतु, बऱ्याच वेळेला आपण अनुसरत असलेल्या तत्वज्ञान वा विचारसरणीचे समर्थन करण्याचा आग्रह अभिनिवेशात परिवर्तीत होतो आणि समीक्षा,असहमती आणि विपर्यास यात फरक करण्याचा विवेक आपण गमावून बसतो. नवीन वा तरुण कार्यकर्त्यांकडून असा विवेक बऱ्याच वेळेला राखला जात नाही. पण याठिकाणी कॉ. बनसोडांसारख्या बुजुर्ग अभ्यासक नेत्यांकडून असा विवेक राखला गेला नाही हे पाहून काहीसे आश्चर्य वाटते आहे. बनसोड म्हणत आहेत कि, बगाडे यांच्यामार्फत त्यांना ‘मार्क्स शेतकऱ्यांना बटाट्याचे पोते म्हणतो’ हे विधान नव्याने लक्षात आले. म्हणजे जणू काही आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत बनसोड यांनी हे विधान पहिल्यांदाच ऐकले आहे. बगाडे यांच्या आधी अनेक जणांनी मार्क्स यांच्या ह्या विधानांचा उल्लेख केलेला आहे. त्यात अनेक मार्क्सवादी अभ्यासकांचा देखील समावेश असल्याचे दिसून येते. असे असताना बनसोड यांनी नव्याने ऐकल्याचे म्हणणे नवलाईचे आहे.

आता बगाडे यांनी काय प्रतिपादन केले हे पाहू या. पण त्याआधी खुद्द मार्क्स काय म्हणतो ते पाहू, “लहान जमीनधारक शेतकरी समुदाय  हा अशा घटकांमधून बनलेला आहे की जे घटक समान परिस्थितीमध्ये जगत असतात परंतु त्यांचे परस्परांशी बहुविध संबंध प्रस्थापित झालेले नसतात त्यांची उत्पादन पद्धती त्यांना एकमेकांच्या संपर्कामध्ये आणण्याऐवजी त्यांना अलग ठेवते. फ्रांसमधली दळणवळणाची वाईट साधने आणि शेतकऱ्यांची गरिबी यामुळे हा अलगपणा वाढतो. त्यांचे उत्पादनाचे क्षेत्र असते लहानशी जमीन, तिच्या कसणुकीमध्ये श्रम-विभागणीला वाव नाही म्हणून त्यांच्या जीवनामध्ये विकासातील विविधता नाही, कौशल्याचे निरनिराळे प्रकार नाहीत, सामाजिक संबंधांचे वैपुल्य नाही. प्रत्येक शेतकरी कुटुंब हे जवळजवळ स्वयंपूर्ण असते, त्याला लागणाऱ्या वस्तू या मोठ्या प्रमाणात तो स्वतः तयार करीत असल्यामुळे ते कुटुंब त्यांच्या जीवनाची साधनसामुग्री समाजाबरोबरच्या संपर्काऐवजी निसर्गाबरोबरच्या देवाण-घेवाणीतून मिळविते. एक लहानसे क्षेत्र, एक शेतकरी आणि त्याचे कुटुंब, त्याच्या शेजारी दुसरे लहानसे क्षेत्र दुसरा शेतकरी आणि त्याचे कुटुंब. अशी पाच-पन्नास कुटुंबे मिळून एक खेडे बनते आणि पाच-पन्नास खेड्यांचा मिळून एक विभाग (डिपार्टमेंट) बनतो. जसे पोत्यात बटाटे भरले कि ते बटाट्याचे पोते होते तसा फ्रेंच राष्ट्रामधील बहुसंख्य जनसमुदाय हा अशा प्रकारच्या तुल्यबळ परिमाणांच्या केवळ बेरजेने बनला आहे. लक्षावधी कुटुंबे एका आर्थिक परिस्थितीमध्ये जगतात. तिच्यामुळे त्यांची जीवनपद्धती, त्यांचे हितसंबंध, त्यांची संस्कृती वेगळी होऊन ते इतर वर्गापासून वेगळे पडतात आणि ती त्यांना त्या वर्गाच्या विरोधामध्ये उभे करते यामुळे.तेच एक वर्ग बनतात. या लहान जमीनधारक शेतकऱ्यांमधले परस्परसंबंध फक्त स्थानिक स्वरूपाचे असतात, त्यांच्या हितसंबंधांच्या एकजिनसीपणातून, वेगळा समाजघटक, समान राष्ट्रीयत्वाचा बंध किंवा राजकीय संघटना अस्तित्वात येत नाही म्हणून त्यांचा एक वर्ग बनलेला नसतो. परिणामी त्यांच्यामध्ये स्वतःच्या नावे, विधिमंडळाच्या माध्यमातून किंवा आपली परिषद भरवून आपले वर्गीय हितसंबंध स्थापित करण्याइतकी कुवत नसते. ते स्वतःचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत, त्यांचे प्रतिनिधित्व इतरांमार्फत केले जावे लागते. जो त्यांचे प्रतिनिधित्व करतो तो त्यांचा मालक, त्यांच्यावर अधिकार गाजवणारा, हाती अनियंत्रित सत्ता असणारा असा असतो आणि म्हणून तो इतरांपासून त्यांचे संरक्षण करणारा, त्यांच्यासाठी आभाळातून पाऊस आणि सूर्यप्रकाश आणणारा असाच असावा लागतो. त्यामुळे लहान जमीनधारक शेतकऱ्यांचा राजकीय प्रभाव समाजाला स्वतःच्या हुकमतीखाली ठेवणाऱ्या शासनसत्तेच्याद्वारा व्यक्त होतो (मार्क्स १९८३:१०७-०८).   

मार्क्सचे शेतकरीवर्गाविषयीचे विवेचन हे फ्रान्स वा युरोपीय परिस्थितीवर आधारलेले होते. भारतीय संदर्भात ते जसेच्या तसे स्वीकारता येत नाही. आजही जवळपास ६८ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. त्यातील ५४ टक्के थेट शेतीवर उपजीविकेसाठी अवलंबून आहेत तर बाकीचे १४ टक्केही अप्रत्यक्षपणे शेतीवरच निर्भर असलेले दिसून येतात (रेड्डी & मिश्रा २०११: ११). त्यामुळे भारतात आजही ग्रामीण भागाचे, शेतीचे महत्वाचे स्थान आहे असे म्हणता येते. स्वातंत्र्यपूर्व काळात तर हे महत्व कित्येक पटीने अधिक होते. त्याकाळात बलुतेदारीवर आधारलेल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये बलुतेदार जाती ह्या शेतकरी जातींवर अवलंबून होत्या. संख्येने विपुलता असल्याने तसेच उत्पादन साधनावर (जमीन) मालकी असल्याने त्यांच्या ठायी समुदाय सत्ता वसत होती. ही एकसंघीयता त्यांना शोषण व जुलुमाचा प्रतिकार करताना कामाला येत होती. ब्रिटीशपूर्व काळात पाटलाच्या नेतृत्वाखाली शेतकरी जातींनी केंद्रीय सत्तेच्या विरोधात विद्रोह केलेले किंवा विद्रोह शक्य नसेल तर स्थलांतर केलेली उदाहरणे सापडतात. शेतकरी वर्गाचा मोठा हिस्सा हा सामंती जातींनी बनलेला होता. त्या राजकीयदृष्ट्या वर्चस्वशाली होत्या. परकीय सत्ता भारतात प्रस्थापित झाल्यानंतरही सत्तेचे दुय्यम भागीदार सामंती जाती आणि पुरोहित जाती राहिल्या; किंबहुना परकीय सत्ता पुरोहित आणि सामंती जातींना सत्तेत वाटा देऊनच टिकू शकल्या असे इतिहास सांगतो (पाटील १९९३: २३६). मार्क्स शेतकऱ्यांपाशी समूह्भान नसते किंवा त्यांच्यात एकसंघीयता नसते असे त्याच्या वरील प्रतिपादनात मांडतो. पण वरील संक्षिप्त विवेचनावरून मार्क्सचे शेतकऱ्यांविषयीचे विवेचन भारताला जसेच्यातसे लागू करणे शक्य नसल्याचे सिद्ध होते.

आता बगाडेंच्या प्रतिपादनाकडे वाळू. संशयाला जागा राहू नये म्हणून त्याचे म्हणणे जसेच्या तसे उद्धृत करणे अधिक सोयीचे ठरेल. बगाडे यांचे हे भाषण युट्यूबवर उपलब्ध असल्याने जिज्ञासू ते ऐकू शकतात. हे भाषण “सत्यशोधक किसान” या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. बगाडे आपल्या भाषणात म्हणतात, “मार्क्सने शेतकऱ्यांना बटाट्याचे पोते असे म्हंटले. फ्रान्समध्ये जी क्रांती फसली तिच्या अपयशाची मीमांसा करण्याच्या संदर्भात त्याने हे म्हंटले. मार्क्सच्या मते फ्रान्समधील मध्यमवर्ग वा बुर्झ्वाजींनी आणि शेतकऱ्यांनी ह्या क्रांतीला साथ न देणे हे या क्रांती फसण्यामागचे मुख्य कारण होते. ह्या आकलनामुळे त्याने विवेचन केले कि शेतकरी हा एकाकी वा एकटा असतो. त्यांच्यामध्ये एकसंघीयता नाही. त्याच्यामध्ये समूहभान नाही. काळाच्या ओघात मार्क्सचे हे विधान मार्क्सवादी तत्वज्ञानाचे एक सूत्र बनले. हे सूत्र बनण्याचा तोटा असा झाला की कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाल्यानंतर शेतकी संघर्ष उभा करण्यासाठी खूप दिरंगाई करण्यात आली. भारतात कम्युनिस्ट पक्षावर जेव्हा बंदी घालण्यात आली तेंव्हा १९२९ मध्ये “पीपल्स अँन्ड वर्कर्स पार्टी” स्थापन करण्यात आली. याच काळात डॉ. आंबेडकरांनी खोतीविरूद्धाचा लढा सुरु केला. ह्या लढ्यामध्ये कम्युनिस्टांनी उतरावे असे आवाहन डॉ. आंबेडकरांनी केले. मात्र त्यास प्रतिसाद न देता कम्युनिस्टांनी १९३६ नंतर त्यांनी किसान सभा बांधायला सुरुवात केली. ह्या आंदोलनामध्ये (खोतीच्या) समुदायभावना काम करते होती. मार्क्सचे शेतकरी हे बटाट्याचे पोते असल्याचे आकलन भारतासंबंधी नाही. त्यामुळे मार्क्सचे म्हणणे सर्व ठिकाणी लागू होते असे म्हणने चूक आहे. भारतात शेतकरी सातत्त्याने जात-जमातीच्या समुदाय भावनेमध्ये उभा आहे. इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर विग्रह निर्माण झाला तेव्हा ते जात-जमातीय संघर्षामध्ये उभे राहिलेले दिसून येतात. अगदी महादेव कोळी असतील किंवा भिल्ल असतील त्यांनी आपापल्या जमातीय चौकटीत संघर्ष केलेला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जातीय परीघामध्ये संघर्ष केलेला आहे. १८७५ मध्ये महाराष्ट्रात जे शेतकऱ्यांचे बंड घडून आले त्यामध्ये शेतकऱ्यांची जातीची एकसंघीयतेची भावना काम करत होती” (खाली संदर्भामध्ये डॉ. बगाडे यांच्या भाषणाची लिंक आणि ते ज्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे त्याचा संदर्भ दिला आहे). आपल्या प्रतिपादनामध्ये डॉ. बगाडे मार्क्सचे शेतकऱ्यांसंबंधीचे विधान मूलतःच चुकले असे म्हणतच नाहीत; तर ते भारताच्या संदर्भात नसल्याचे आणि त्याच्या विधानाचे सार्वत्रिकीकरण करणे चूकीचे असल्याचे म्हणत असल्याचे स्पष्ट होते. मार्क्सचे शेतकऱ्यांविषयीचे विवेचन जसेच्या तसे स्वीकारता येत नसल्याचे वर दाखविलेच आहे.  पण त्याच्याशी किंवा बगाडे यांच्या विधानाशी पूर्ण सहमत होण्याचा कोणाचाही आग्रह नाही. कॉ. बनसोड किंवा ज्याला कुणाला डॉ. बगाडेंच्या विश्लेषणाशी मतभेद आहेत ते त्याच्याशी असहमती व्यक्त करू शकतात, त्यांच्या विवेचनातील अपूर्णता दाखवून देऊ शकतात. पण आपल्या विवेचनात डॉ. बगाडेंनी मार्क्सचे वचन संदर्भ सोडून चुकीच्या पद्धतीने वापरले आहे किंवा मार्क्सच्या विधानाचा विपर्यास केला आहे हे वरील उद्धरणावरून कसे सिद्ध होते हे कॉ. बनसोडांनी दाखवून देणे क्रमप्राप्त होते. पण त्यांनी तसे केलेले नाही. आणि बगाडेंच्या वरील उद्धरणावरून ते कसे सिद्ध होते हे माझ्यासारख्या अल्पमतीस समजत नाही.   

आदिवासी आणि इंग्रजी

आपल्या टिपणात कॉ. बनसोड म्हणतात, “चर्चासत्रात उपस्थित असलेले कॉ. राजू जाधव यांनी याबद्धलचे माझे वक्तव्य संपल्यानंतर मार्क्सचे ‘शेतकरी हे बटाट्याचे पोते आहेत’ असे म्हंटले असल्याचा त्याबाबतचा इंग्रजीतील उतारा वाचून दाखविला. वास्तविक त्या चर्चासत्रात उपस्थित असलेले कार्यकर्ते हे शेतकरी संघटनेत किंवा तसेच आदिवासी विभागात काम करणारे कार्यकर्ते होते. त्यांना हा इंग्रजी उतारा कितपत समजला असेल याबद्दल शंकाच आहे. कारण उपस्थित आदिवासी कार्यकर्त्यांना त्यांची ‘मावची’ भाषा समजते. मराठी जरा मुश्किलीने समजते. इंग्रजी कितपत समजली असेल सांगता हे येत नाही”.  कॉ. बनसोडांनी प्रस्तुत टिपण चर्चासत्र झाल्यानंतर काही दिवसांनी लिहिले असल्याने चर्चासत्रात घडलेला घटनाक्रम ते विसरले असण्याची शक्यता आहे त्यातून माझ्या इंग्रजी उतारा वाचण्याविषयीचे विधान त्यांनी  केले असावे असे वाटते. म्हणून त्यांना आठवण करून देण्यासाठी चर्चासत्रात घडलेल्या घटनाक्रमाला  थोडासा उजाळा देतो.

प्रा. प्रतिमा परदेशी यांनी त्यांच्या विषयाचे विवेचन करताना डॉ. बगाडे यांनी मार्क्सने शेतकऱ्यांना  बटाट्याचे पोते म्हणाल्याचा विधानाचा संदर्भ दिला. चर्चासत्राला उशिरा पोहोचलेल्या कॉ. बनसोडांनी ‘मार्क्स शेतकऱ्यांना बटाट्याचे पोते म्हणालाच नाही’ असे आत्यंतिक अभिनिवेशाने प्रतिपादन केले. उभी हयात मार्क्सच्या विचाराशी अप्रतिहत निष्ठा बाळगणाऱ्या कॉम्रेडने इतके ठासून प्रतिपादन केल्यानंतर वक्त्यांच्या एकूण मांडणीच्या सत्यतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले. डॉ. बगाडे आपली मांडणी करून दुसरे सत्र झाल्यानंतर निघून गेले होते. भर सभागृहात त्यांच्या मांडणीतील तथ्यांवरच शंका घेतली गेली होती; पण त्यांच्यावर घेतल्या गेलेल्या आक्षेपाला उत्तर द्यावयाला डॉ. बगाडे उपस्थित नव्हते. विश्लेषणावर शंका घेणे वा त्यातील मर्यादा/दोष दाखवून दिल्यास त्यामध्ये फारसे काही वावगे नसते. कारण तो दृष्टिकोनाचा मुद्दा असतो. परंतु, विवेचनात वापरलेली तथ्येच चुकीची आहेत असे कोणीतरी विशेषतः एखाद्या सन्मान्य कॉम्रेडने तेही भर सभागृहात म्हणणे हे वक्त्याच्या मांडणीचा नैतिक आधार काढून घेण्यासारखे असते. त्यामुळे ती अतिशय गंभीर बाब ठरते. मला मार्क्सने ते विधान केल्याचे त्याच्या संदर्भासहित आठवत होते. तो संदर्भ मी कॉ. बनसोड यांना सभागृहात सांगितलाही; परंतु त्याक्षणी तो संदर्भ माझ्याकडे दाखविण्यासाठी नव्हता. मात्र  त्यावेळेस माझ्याकडे विख्यात मार्क्सवादी अभ्यासक निर्मलकुमार चंद्र यांचा “The Peasant Question from Marx to Lenin : The Russian Experience” हा लेख होता. त्यात त्यांनी मार्क्सने शेतकऱ्यांना बटाट्याचे पोते म्हणाल्याचा संदर्भ वापरला होता. त्यामुळे मी त्या इंग्रजी लेखातील तो संदर्भ कॉ. बनसोड यांना वाचून दाखविला. आदिवासी कॉम्रेडसना नाही. या वास्तवाचा विपर्यास कॉ. बनसोड यांनी जाणीवपूर्वकव दांभिकतेने केला आहे असे मी म्हणू शकतो, पण मी तसे म्हणणार नाही. आपल्याला इतराचा हवा तसा उपहास करता यावा वा एखाद्यास कसे जनतळ तसेच  आदिवासी कॉम्रेडसच्या भाषिक आकलनाच्या मर्यादा माहित नाहीत हे साबित करण्यासाठी कॉ. बनसोडांनी आदिवासी कॉम्रेडसच्या भाषिक आकलनक्षमतेवर प्रश्न उभे करून त्यांच्यासंबंधीच्या स्वतःच्या दृष्टी आणि आकलनाचे दर्शन घडविले आहे. आदिवासी कॉम्रेडसना कदाचित तो इंग्रजी संदर्भ समजलाही नसेल, पण तो समोर बसलेल्या इंग्रजीचे ज्ञान कच्चे असलेल्या बिगर-आदिवासी कार्यकर्त्यांनाही तो समजला असण्याची शक्यता कमीच राहते. मात्र  कॉ. बनसोड त्यावर भर न देता आदिवासी कॉम्रेडसच्या भाषिक आकलन क्षमतेवर बोट ठेऊन गरीब बापुड्यांसमोर राजू जाधव यांनी इंग्रजी उतारा वाचून त्यांच्यावर किती मोठा अन्याय केला असा वाचकांना भास करून देण्याचा प्रयत्न करत आहेत. आदिवासी कॉम्रेडसचा उल्लेख करून नैतिक अपराधगंड देण्याचा कॉ. बनसोड यांचा प्रयत्न उचित नाही एवढेच म्हणावेसे वाटते. तसेच, आदिवासी कॉम्रेडसना जरी तो इंग्रजी संदर्भ समजला नसला तरी समोर चाललेली चर्चा व त्यातील मुद्दे समजले नाहीत असे नाही. चळवळ भाषेचा अडसर बाजूला सारून ज्ञानव्यवहार समजून घेण्याची प्रेरणा निर्माण करते. म्हणूनच आदिवासी कॉम्रेडस सर्वाधिक शिस्तीने आणि तन्मयतेने कोणत्याही चर्चासत्रात, शिबिरात वा संमेलनात वक्त्यांची भाषणे ऐकत असतात हे चित्र बऱ्याच वेळेस दिसून येते. ते कॉ. बनसोडांनीही पाहिलेले असेल असे गृहीत धरतो.

विपर्यास आणि अभिनिवेशी पोथीनिष्ठा 

डॉ. बगाडे, प्रा. परदेशी किंवा राजू जाधव यांनी कोणीही मार्क्सच्या विधानाचा विपर्यास केलेला नाही. समाजवास्तवाच्या विश्लेषणासाठी, क्रांतिकारी पक्ष-संघटनांच्या व्यवहाराचे चिकित्सक मूल्यमापन करण्यासाठी संदर्भ देणे आवश्यक असते. पण आपल्या अभिनिवेशी पोथीनिष्ठेपायी कॉ. बनसोडांना तो मार्क्सवादावरचा नकारात्मक हल्ला वाटला. उशिरा चार्चासत्राला आलो पण युट्यूबवर मी बगाडेंचे व्याख्यान ऐकले असे ते स्वतःच सांगतात. काही संशय वा शंका असतील तर त्या पुन्हा ऐकून त्याचे निरसन करण्याची संधी युट्यूबवरील भाषण ऐकताना असते. खरे म्हणजे एकदा ऐकले तरी कोणालाही बगाडेंनी मार्क्सच्या विधानाचा विपर्यास केलेला नाही हे कळून येते. कॉ. बनसोडांना मार्क्सचा तो संदर्भ माहित नव्हता हा इतरांचा दोष नव्हता. तो दाखवून दिला तर मग त्यांनी बगाडेंनी तो संदर्भ सोडून वापरला असल्याचा हेका चर्चासत्रात धरला. पण त्यांचे तेथेही समाधान झाले नाही. तोच हेका त्यांनी ह्या टिपणामध्येही धरला आहे. आणि आम्हा सर्वांना त्यांनी सत्यापलाप, विपर्यास वा संदर्भ सोडून विधाने वापरणाऱ्या प्रतीगामींच्या जोडीला बसवले आहे. आपल्या टीपणाच्या शेवटी कॉ. बनसोडांनी बगाडेंना “मार्क्सच्या बटाट्याच्या पोत्याची नव्हे तर स्वतःच्या बटाट्याच्या पोत्याच्या अर्थाची तपासणी करणे आवश्यक असल्याचा” तुच्छताभावी सल्ला दिला आहे. कॉ. बनसोडांना मला असला कोणताही सल्ला द्यावयाचा नाही कारण ते ज्ञान, वय, अनुभव या सर्वांनी माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. पण या टिपणाच्या निमित्ताने मी त्यांना नम्रपणे एक गोष्ट मात्र सुचवू इच्छितो आणि ते म्हणजे अभिनिवेशी पोथीनिष्ठा ही खुल्या ज्ञानव्यवहाराला, विधायक नकारकरण करून प्रस्थापित सिद्धांताच्या विकसनाच्या शक्यतांना अवरोधक ठरते. त्यामुळे जमले तर अभिनिवेशी पोथीनिष्ठा बाजूला सारून मार्क्स वाचता आला तर बघा.   

संदर्भ

डॉ. उमेश बगाडे यांच्या भाषण उपलब्ध असलेले युट्यूब चॅनल – सत्यशोधक किसान 

लिंक –  https://youtu.be/wdp7U9RGpxY

पाटील शरद (१९९३) मार्क्सवाद फुले आंबेडकरवाद, सुगावा प्रकाशन, पुणे

मार्क्स, कार्ल (१९८३) लुई बोनापार्तची १८ वी ब्रुमेअर, प्रागतिक प्रकाशन, पुणे.

रेड्डी, नरसिम्हा & श्रीजित मिश्रा (२०११) अग्रेरीयन क्रायसिस इन इंडिया, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, नवी दिल्ली.

———————————————————————————————–

लेखक मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादाचे अभ्यासक असून सत्यशोधक चळवळीतील सक्रिय कार्यक्रते आहेत.