परवा एक मैत्रीण कावून म्हणाली, “आजकाल तरुण लोकांना काहीही मान्य करायला कसं काय जमतं बुवा? एरवी बघाल तर प्रत्येक जण अत्यंत पुरोगामी क्रांतिकारी बाता मारत असतो आणि वेळ आली की काय करणार, घरातले मानत नाहीत असलं थातुरमातुर सांगून खुशाल जातीतल्या वर-वधूंशी आगीला फेरेबिरे घालून लग्नही करून टाकतात!” मला हसूच आलं. असली जनताच बहुसंख्य असणार ना स्थितिशील समाजात. बदलाची गोष्ट करणारेही त्याच समाजाचा भाग. फेमिनिझम, कम्युनिझम कॉलेजात, मीटिंगमध्ये, चहाच्या टपरीवर ठीक आहे पण घरात ?

मी कॉलेजात असताना फडकेनामक तरुण प्राध्यापक नुकतीच इंग्लंडहून एम.ए. करून परतली होती. आम्हाला स्त्रीवाद शिकवायची. टिपिकल इंग्लिश माध्यमातलं शिक्षण, घरातही मराठी बोलणं वगैरे नाही. त्यामुळे ‘नेटिव्ह कल्चर’ची काही माहिती नव्हती. त्यामुळे सगळी पुस्तकं स्त्रीवादी विचार इत्यादी युरोपीय, अमेरिकन. आम्हीही लहान. भारतीय स्त्रीवाद, संत कवयित्री, दलित-मुस्लिम स्त्रीवादी विचार फारसे माहीत नाहीत. त्यामुळे फडकेबाईंचे फॅन. मग त्यांनी लग्न ठरवलं. आम्हाला निमंत्रणही दिलं. वैदिक पद्धतीचं लग्न. आम्हाला धक्का बसला. फेरे? कन्यादान ?

त्या म्हणाल्या. “छे, छे, कन्यादान नाही काही. स्वयंवरवाले मंत्र पढणार. काय करणार ? त्याच्या आई-वडिलांना हवंय ना!”

आम्ही त्रस्त. स्वयंवर म्हणजे तुमचा चिन्मय सोडून इतरही येणार आहेत का? आणि आता त्यांना वैदिक लग्न हवंय. उद्या ‘नातूच हवाय, मुलीचा गर्भ पाडा बुवा’ म्हणाले सासू-सासरे तर काय उत्तर आपलं ?

त्या काळात या अनुभवाने पार निराश झालो होतो आम्ही मैत्रिणी पण अनुभवाने समजलो की ब्राह्मणी फेमिनिझम हा एक स्पेशल ब्रॅण्ड आहे. ज्यात उच्च विचार आणि त्याला असंगत आचार असं मिश्रण चालतं. महात्मा फुले यालाच तर ‘ब्राह्मणी कावा’ म्हणतात. फुले विचारतात, हा ब्रह्म, याला चार चेहरे कसे? तो इकडे एक बोलतो, तिकडे दुसरं बोलतो. म्हणून तो चार तोंडी ब्रह्म! एकीकडे कमालीची वैचारिक शूचिता आणि दुसरीकडे पराकोटीचं गैरवर्तन हे ब्राह्मणी आचरणाचे, राज्यकारभाराचे अंग होय. कठोर शिवाशीव पाळणाऱ्या आणि महारांना कमरेला झाडू लावून फिरायला लावणाऱ्या पेशवाईत महार, कुणबी नाटकशाळा बेसुमार होत्या. त्यांचे मुख्य ग्राहक ब्राह्मण पुरुष होते..

दुर्दैवाने हे ‘ब्राह्मण्य’ महाराष्ट्रात आतापर्यंत सुरू आहे. १९७० मध्ये कम्युनिस्ट चळवळीत बरेच तरुण सामील झाले. परंतु, जात सोडणे अशक्य! संघटनेतल्या मित्रांना घरी बोलावताना “ए, माझ्या घरात बोलू नका हां तुम्ही दलित, मुसलमान आहात ते” असं सांगितलं जाई. यात ना मित्रांचा अपमान जाणवत असे ना विचारसरणीशी फारकत.

पुढे दलित पँथर आलं. मग मराठवाडा विद्यापीठाला डॉ. आंबेडकरांचे नाव द्यावे असा ठराव विधानसभेत मंजूर झाला. त्याला विरोध करायला मराठवाडाभर दलित विरोधी अत्याचाराचे लोण पसरले आणि मग बुजून असलेले दलित कार्यकर्ते निडर बनले.

अशाच एका आक्रमक पँथरला कोणी तरी विचारलं, “काय रे, मग आम्हाला जेवायला कधी बोलावतोस घरी ?”

तो गुरकावला, “मागून खायची सवय कधी जाणार रे तुम्हा भटा बामणांची ? वर मला आशीर्वाद देशील काय ढेकर देऊन ? मटणाला पैसे मी घालणार, मसाला वाटायला माझी आई घाम गाळणार आणि तू मग म्हाराच्या घरी जेवलो म्हणून स्वतःची पाठ थोपटणार?”

‘त्या काळात आम्ही दलित वस्तीवर जाऊन त्यांच्या पंक्तीला बसून जेवलो असं सांगणारे अजूनही भेटतात पण आमच्या घरी दलित येऊन जेवले अशी उदाहरणं दुर्मिळ.

स्त्री आणि शूद्र समान अशी मीमांसा केली गेली आहे पण सर्व स्त्रिया एकाच पातळीवरच्या शूद्र असतात का? जातिव्यवस्थेने सर्वांत अधिक छळ ब्राह्मण स्त्रीचा केला. केशवपन, लैंगिक अत्याचार, जाचक वैधव्य यामुळे गांजलेल्या ब्राह्मण स्त्रिया मोठ्या प्रमाणात आत्महत्येकडे ढकलल्या जात पण जसा काळ बदलला तसे स्त्रीमुक्ती, स्त्री शिक्षणाचे फायदे ब्राह्मण स्त्रियांना प्रथम मिळाले. आज उच्चवर्णीय स्त्रिया सर्व प्रकारच्या उच्च पदावर स्थानापन्न आहेत. आता त्या शूद्र राहिलेल्या नाहीत. उलट उच्च जातीचे फायदे मिळत असल्यामुळे जातीनिहाय शोषणात सहभागी आहेत. मंडलविरोधी आंदोलनामध्ये, दलित स्त्रियांच्या नग्न धिंडीमध्ये, गुजरातच्या दंगलीत मुस्लिम स्त्रियांच्या चिरफाडीमध्ये उच्चवर्णीय स्त्रिया आपल्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत.

ब्राह्मणी फेमिनिझम मग फक्त मध्यमवर्गीय बायकांचे प्रश्न चर्चिण्यापुरता मर्यादित राहिला आहे. बहुसंख्य कष्टकरी स्त्रियांचे प्रश्न मग केवळ तोंडी लावण्यापुरते फेमिनिस्ट विचारांत येतात. इतर स्त्रीवादी विचार दलित, बहुजन, मुस्लिम, ख्रिश्चन या विचारप्रवाहाला शह देत असतात. कधी कवितांमधून

‘पाणी वाढ गं माय,

पाणी वाढ गं माय

अशी साद घालून लाजवतात. कधी महिला आरक्षण जातीनिहाय आरक्षणाशिवाय शक्य नाही असा आग्रह धरतात पण याचा फार परिणाम झालेला दिसत नाही. अभिजनांचा फेमिनिझम एकेरी बनून राहतो आणि मग दुतोंडीही.

पुण्याची एक तरुण मैत्रीण स्वतःच्या लग्नाचं आमंत्रणपत्र छापायला निघाली. बघितलं तर त्यावर गणपती!

मी म्हटलं, “काय गं हे?”

तर म्हणाली, “पीस ऑफ आर्ट!”

“कमाल आहे, अगं मग खजुराहोच्या मूर्ती किती छान आहेत. लग्नाचा आणि गणपतीचा काय संबंध ?”

अजून एक स्त्रीवादी मैत्रीण एकदा रीसर्च करायला निघाली. चळवळीत पूर्णवेळ काम करणारे कार्यकर्ते आपल्या घरी, बायकांशी कसे वागतात यावर पेपर लिहिते म्हणाली.

पहिल्याच कार्यकर्त्याची बायको जहाल निघाली. म्हणाली, “वा गं माझा नवरा सकाळी उन्हात फिरतो क्रांती करायला. एकदा सकाळी भाकर खाऊन गेला की पुन्हा कुठे खातो, जेवतो पत्ता नाही आणि तू त्याची शहानिशा करणार काय? तुझा नवरा परदेशी कंपनीत काम करतो, सूट घालतो अन् गुलुगुलू बोलतो म्हणून त्याची स्त्रीवादी चिकित्सा करायची गरज नाही, व्हय? मी दिवसभर नोकरी करून वर घर अन् पोरं सांभाळते कोणाच्या मदतीशिवाय.. अन् तू आपली पोरं घरी कामवालीकडे सोडून हे पेपर लिहीत फिरते, ते पण माझ्या नवऱ्यावर ?”

बामणी फेमिनिजममध्ये मशगूल असणारांनी आता अशा सणसणीत उत्तरांना तयार राहावे.

( ‘भटकभवानी’ या समीना दलवाई यांच्या अलिकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकातून साभार )

लेखिका अब्राम्हणी स्त्रीवादाच्या मुक्त चिंतक आहेत.