महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने किंवा इतर कारणामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात विविध विषयावर व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात .त्यामध्ये काही भाषणे खरोखरच खूप अभ्यासपूर्ण असतात. ते भाषण संपल्यानंतर उपस्थित श्रोते टाळ्या वाजून वक्त्याचे कौतुक करतात त्याला धन्यवाद देतात. त्या भाषणाचा आपल्या मनावर थोड्याच कालावधीसाठी  प्रभाव राहतो. नंतर आपण ते सारे विसरूनही जातो. वक्ता बोलण्याच्या ओघा मध्ये खूप सारे दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण संदर्भ देत असतो. आपण सगळेच काही टिपणे काढत नाहीत आणि काढले तरी ते आपल्या संग्रही राहतीलच याची काही शक्यता नाही. त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याला संदर्भ हवे असतात, तेव्हा मात्र ते मिळवण्यात खूप अडचणी येतात. म्हणून अशी जी काही मोजकी अभ्यासपूर्ण भाषणे आहेत ती पुस्तक रूपाने येणे फार गरजेचे आहे .अशीच महत्त्वपूर्ण तीन भाषणे प्रा.सचिन गरुड यांनी दिलेली आहेत ती आंबेडकर पर्वारंभाची शताब्दी: तीन भाषणे. या नावाने पुस्तकरूपात मावळाई प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहेत. हे पुस्तक जरी त्यांनी दिलेल्या भाषणावर आधारित असले ,तरी त्याला लेखाचे स्वरूप देण्यात आलेले आहे .

सदर पुस्तकामध्ये एकूण ३ भाषणे आणि ९ परिशिष्टे आहेत.    मूकनायक चा संघर्ष या पहिल्या प्रकरणांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले होते त्याची सविस्तर माहिती यात वाचायला मिळते .त्याच बरोबर मूकनायक सोबत समकालीन कोणकोणती वृत्तपत्रे होती याचाही आढावा या प्रकरणात घेण्यात आला आहे. वृत्तपत्र या विषयावर जे लोक संशोधन करतात त्यांच्यासाठी हे प्रकरण फारच उपयुक्त माहिती देते. मूकनायक च्या अग्रलेखातून बाबासाहेब नेमकी काय भूमिका मांडत होते याचे थोडक्यात पण: महत्त्वपूर्ण विश्लेषण वाचायला मिळते. आपल्या सर्वांना माहिती आहे की, वृत्तपत्र चालविण्यासाठी जाहिराती मिळणे फार आवश्यक असते. पण, बाबासाहेबांचे धोरण होते की ,आपल्या तत्त्वाच्या विरोधी असणाऱ्या जाहिरातींचा स्वीकार करायचा नाही .त्यामुळे मूकनायक ला अत्यंत कमी जाहिराती मिळत होत्या म्हणून हे वृत्तपत्र चालवणे कसे अडचणीचे जात होते, बाबासाहेबांना आर्थिक अडचणी सोबत इतरही बाबतीत मूकनायक चालविताना किती मोठा संघर्ष करावा लागत होता, याचा उल्लेख पुस्तकात आलेला आहे. मूकनायक या वृत्तपत्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे खूप उपयुक्त प्रकरण आहे .

दुसरे प्रकरण हे बहिष्कृत हितकारणी सभा प्रारंभिक टप्प्याचे अवलोकन. यामध्ये सदर सभेबाबत माहिती वाचायला मिळते एडवोकेट बी. सी. कांबळे, य. दि .फडके यांनी बहिष्कृत हितकारणी सभेच्या तारखेबाबत जी वेगवेगळी मते मांडली आहेत त्याचा उल्लेख पुस्तकात दिलेला आहे .  Educate Agitate and Organise याचे मराठीत  नक्की भाषांतर काय होते तेसुद्धा नमूद केलेले आहे. बहिष्कृत हितकारणी सभा कसा लढा देत होती ,त्याचे कार्य कशा पद्धतीने चालत होते .याचा सविस्तर आढावा या प्रकरणांमध्ये घेण्यात आला आहे.

या पुस्तकातील तिसरे प्रकरण म्हणजे माणगाव परिषदेचे स्मरण आणि वर्तमान. हे प्रकरण मला जास्त आवडले कारण भूतकाळ सांगत असताना आपल्याला वर्तमानाचे भान असणे फार आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि त्या संबंधित इतर ऐतिहासिक व्यक्ती यांच्या यापूर्वी प्रकाशित झालेल्या चरित्रांचा पुस्तकांमध्ये माणगाव परिषदेचा अत्यंत त्रोटक उल्लेख पाहायला मिळतो, असे लेखक लिहितात .या पुस्तकात सदर माणगाव परिषदेचा उल्लेख आत्तापर्यंत कोणी आणि कुठे केलेला आहे, त्याच बरोबर माणगाव परिषदेच्या तारखेबाबत जी काही मतमतांतरे आहेत, ती सुद्धा पुस्तकात वाचायला मिळतात.  राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मतारखेचा कसा घोळ झाला, तेसुद्धा पुस्तकात मांडलेले आहे .लेखकाने सर्व माहिती डोळसपणे लिहिलेली आहे. कोणीतरी एखादी तारीख नमूद केली आणि तीच त्यांनी आंधळेपणाने स्वीकारली ,असे अजिबात पूर्ण पुस्तकात कुठेही झालेले दिसत नाही ही खरी संशोधन वृत्ती आहे ,असे मी समजतो.

लेखकाने माणगाव परिषदेचा तपशीलवार स्त्रोत म्हणून १० एप्रिल १९२० चा मूकनायक चा अंक ६ वा. ग्राह्य धरला आहे. त्यात सविस्तर माहिती दिलेली आहे, असे ते म्हणतात .म्हणून सदर पुस्तकामध्ये परिशिष्ट ४ मध्ये तो अंक दिलेला आहे. हे आपल्या वाचकांसाठी खूप सोयीचे झाले आहे. कारण वर संदर्भ आल्यामुळे आपण मूकनायक च्या अंकाचा शोध घ्यायला सुरुवात केली असती तो जर वेळेवर मिळाला नसता किंवा उपलब्ध झाला नसता ,तर आपली गैरसोय झाली असती: पण अंकच पुस्तकात दिल्यामुळे खूपच सोयीचे झाले आहे त्यासाठी लेखकाला धन्यवाद दिले पाहिजेत.

या पुस्तकातील परिशिष्ट ९ मध्ये एक नवीन माहिती पहिल्यांदा माझ्यातरी वाचण्यात आली आहे या परिशिष्टा मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांचे जे फोटो दिलेले आहेत ते फेक आहेत ,असा दावा लेखकाने केलेला आहे. लेखक म्हणतात, माणगाव परिषदेमध्ये फोटो काढण्यात आले नव्हते. अद्याप तसे तत्कालीन कोणतेही ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर असा एकत्रित जोडीने काढलेला फोटो अजून तरी मिळालेला नाही. दोन वेगवेगळे फोटो एकत्र करून दोघेही एकाच फोटोत एकत्र उभे आहेत ,असा आभास फोटोशॉप आर्टिस्टने निर्माण केला आहे. इतिहासाचा आशय जरी योग्य घेऊन फोटो तयार केले असतील, तरी ते कल्पित असून विवक्षित तारखेला तयार केले आहेत हे सांगणे जरा संयुक्तिक ठरेल. अन्यथा हे फेक फोटो हे फेक व्हिज्यूअल हिस्ट्री निर्माण करू शकतात, असे लेखकाचे म्हणणे आहे. याबाबत प्रत्येकाचे वेगवेगळे मत असू शकते. यावर अजून विचारविनिमय व्हायला पाहिजे 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि  राजर्षी शाहू महाराज यांचे कसे जिव्हाळ्याचे संबंध होते, यावरही लेखकाने लिहिलेले आहे. माणगाव परिषदेतील शाहू महाराजांनी जे भाषण केले होते त्यातील काही ठळक मुद्द्यांचा ऊहापोह लेखकाने पुस्तकात केलेला आहे, ते वाचून शाहू महाराजांची वैचारिक उंची आपल्याला लगेच जाणवते. काही अभ्यासक (?) माणगाव परिषदेला महार जातीची परिषद असे संबोधून वस्तुस्थितीचा विपर्यास करीत आहेत. ही परिषद केवळ महार या एका जातीची परिषद नव्हती. मूकनायक च्या वृत्तात किंवा तत्कालीन उपलब्ध कोणत्याही कागदपत्रात ती एक जातीय परिषद होती, असा साधा उल्लेख ही मिळत नाही. या परिषदेचा उल्लेख बहिष्कृत वर्गाची परिषद म्हणूनच केला जातो. हा बहिष्कृत वर्ग म्हणजे सर्व अस्पृश्य जाती समूहांचा संवर्ग. बाबासाहेबांना एका जातीत अडकवू पाहतात त्यांनी किमान हे वरील संदर्भ वाचून पडताळून बोलावे ही अपेक्षा.बहिष्कृत या शब्दाचा व्यापक अर्थ पुस्तकात दिलेला आहे .थोडक्यात म्हणजे माणगाव परिषदेचा सविस्तर आढावा या प्रकरणांमध्ये घेण्यात आलेला आहे.

 परिशिष्ट ३ मध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची कार्यकारिणी आणि उद्दिष्टे दिलेली आहेत. परिशिष्ट ६ मध्ये राजर्षी शाहू महाराज आणि बाबासाहेब यांच्या सहकाऱ्यांचे दुर्मिळ चित्र आहेत. सदर पुस्तक हे लेखकाने खूप संशोधन करून तयार केलेले आहे. त्यामुळे या पुस्तकाला संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे. सर्वांच्या संग्रही हे पुस्तक असावे असेच मी सुचवेल.

 

पुस्तकाचे नाव: आंबेडकर पर्वारंभाची शताब्दी: तीन भाषणे.
सचिन गरुड.
प्रकाशक :मावळाई प्रकाशन शिरूर ,पुणे.
पाने: 204 .
किंमत: 250 रुपये मात्र