आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम विदुषी डॉ.गेल ऑम्वेट यांच्या ‘सीकिंग बेगमपुरा’ या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद मधुश्री पब्लिकेशनने नुकताच प्रकाशित केला आहे. ‘बेगमपुरा’च्या शोधात” या नावाने  हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. डाव्या चळवळीतील कार्यकर्ते व अभ्यासक प्रमोद मुजुमदार यांनी मूळ इंग्रजी ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला आहे.

डॉ. गेल ऑम्वेट ह्या मूळच्या अमेरिकेच्या. १९७८ पासून त्या भारतात राहत होत्या आणि त्यांनी भारतीय नागरिकत्व स्विकारले होते.महात्मा फुले,आंबेडकरवाद आणि मार्क्सवाद तसेच डाव्या पुरोगामी चळवळीच्या त्या अभ्यासक होत्या. त्यांनी भारतातील दलित,ओबीसी समाजातील नागरिकांच्या सामाजिक- सांस्कृतिक इतिहासाविषयी प्रदीर्घ अभ्यास आणि संशोधन केले.

“एका व्यापक अर्थाने मी असे म्हणेन, की भारताचा पुनर्शोध घेण्याची आवश्यकता नाही. आवश्यकता आहे ती दलित बहुजन नेत्यांच्या आणि विचारवंतांच्या संकल्पनेतला, त्यांनी यापूर्वीच ‘शोधलेला’ भारत समजून घेण्याची. रामराज्य आणि हिंदू राष्ट्र याला पर्याय फुलेंच्या मांडणीतील ‘बळीराज्य ‘, रविदासांचे‘बेगमपुरा’, पेरियार यांचे द्रविडस्थान, तमीळनाडूतील साक्य बौद्धांचे ‘बौद्ध प्रजासत्ताक’ हाच असू शकतो.”

                              डॉ.गेल ऑम्वेट, प्रस्तावनेतून

डॉ.गेल ऑम्वेट यांनी जे मोलाचे ग्रंथलेखन केले त्यापैकी  ‘सिकिंग बेगमपुरा’ हा डॉ. गेल ऑम्वेट यांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. संत रविदास ते डॉ बाबासाहेब आंबेडकर या जातीमुक्तीच्या परंपरेने शोषणमुक्त समाजाचे स्वप्न पाहिले. भारतीय कल्पीतादर्श-युटोपिया !. या कल्पीतादर्शचा वेध या ग्रंथात त्यांनी घेतला आहे. ‘मुक्त झालेला मी चांभार’ असा स्वत:चा उल्लेख करणा-या भक्ती परंपरेतील विद्रोही संत रविदास(1450-1520) यांनी भारतीय कल्पीतादर्श समाजाचे पहिले चित्र ‘बेगमपुरा’ या गीतातून मांडले. बेगमपुरा- एक आधुनिक जातिविहीन,वर्गविहीन,करमुक्त आणि दु:खमुक्त शहर! ब्राम्हणी कलियुगाच्या दु:स्वप्नाच्या थेट विपरित असा हा कल्पीतादर्श.

डॉ.गेल ऑम्वेट यांनी प्राच्यविद्या अभ्यासक,राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी अशा सर्वांच्या प्रेरणा नाकारत पाच शतकांच्या कालखंडातील दडपलेल्या समाजातील द्रष्ट्या विचारवंताच्या भूमिकेला एका जागतिक दृष्टाकोनाच्या परिप्रेक्षात मांडण्याचे मौलिक काम या ग्रंथाद्वारे केले आहे.

बेगमपुराच्या शोधात
जातीविरोधी विचारवंतांची सामाजिक दृष्टी

डॉ.गेल ऑम्वेट

मराठी अनुवाद- प्रमोद मुजुमदार
प्रकाशक- मधुश्री पब्लिकेशन
वेबसाईट – www.madhushreepublication.com
पृष्ठे- ३४०

किंमत – रु. ३५०