कॅरन हॉर्नाय (सन १८८५ – १९५२)

कॅरन हॉर्नाय या जर्मन मानसशास्त्रज्ञ असून सुरुवातीस बर्लिन व नंतर अमेरिका ही त्यांची कर्मभूमी होती. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर मनोविकृतिशास्त्राच्या त्या विशेषज्ञ झाल्या. फ्रॉईड यांच्या मनोविश्लेषणातून बाहेर पडून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख जोपासली. त्यांचा समावेश नव-मनोविश्लेषणवादी मनोविश्लेषकांत केला जातो. स्त्री व पुरुषांची भिन्न लैंगिक मानसिकता ही जैविक घटकांमुळे निर्माण झाली नसून सामाजिक घटकांचा मोठा परिणाम तिच्यावर होत असतो. त्यामुळे स्त्री-मानसिकतेचा अभ्यास करताना सामाजिक-सांस्कृतिक परिप्रेक्ष्यातून तो केला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. या मताचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी स्त्रीवादी मानसशास्त्राची स्थापना केली. स्त्रीवादी मनोविश्लेषण, स्त्रीवादी मानसोपचार अशा स्त्रीकेंद्रित प्रवाहांची रुजुवातही त्यांनी मानसशास्त्रात केली.gartenmöbel design
bettwäsche tom und jerry
planeta sport muske patike novi pazar
giorgio armani sport
adidas beckenbauer trening
bomber jakke burgunder
гуми 18 цола
esprit round sunglasses
liemenes mergaitems
windows wont connect to iphone usb

सामाजिक-सांस्कृतिक घटक – स्त्रियांच्या लैंगिक मानसिकतेची मांडणी करताना मानसिकतेवर होणारा सामाजिक घटकांचा प्रभाव फ्रॉईड यांनी दुर्लक्षित केला होता. तो अधोरेखित करण्याचे कार्य हॉर्नाय यांनी केले. आपल्या मानसिकतेची जडणघडण ही एका पोकळीत व संदर्भाशिवाय होत नसते. आजूबाजूच्या वातावरणाचा मानसिकतेवर फार मोठा परिणाम होत असतो. उदाहरणार्थ, एखाद्या स्त्रीने एखादा निर्णय घेतला असेल तर फक्त तिचे वैयक्तिक घटक या निर्णयास कारणीभूत नसतात. तर ती ज्या समाजात राहते व ज्या संस्कृतीत वाढते त्यातील अनेक घटकही या निर्णयास जबाबदार असतात. हे संदर्भ लक्षात न घेता तिच्या मानसिकतेबद्दल निष्कर्ष काढले तर ते चुकीचे ठरण्याचा संभव असतो. मानसिकतेस जबाबदार असलेले सामाजिक-सांस्कृतिक परिमाण दुर्लक्षित करून चालणार नाहीत, हे मत त्यांनी आग्रहाने मांडले. सन १९२२ ते १९३५ या काळात हॉर्नाय यांनी चौदा निबंध लिहिले. त्यातही सामाजिक घटक (उदाहरणार्थ, शिक्षण किंवा लिंगभूमिका) हे या स्त्रीच्या लैंगिक मानसिकतेवर बराच मोठा परिणाम करत असतात, या मताचे त्यांनी पुष्टीकरण केले आहे (Cohen २००१).

स्त्री- लैंगिकतेतील विविधता – फ्रॉईड यांच्या मनोविश्लेषणाचा मोठा दबदबा मानसशास्त्रज्ञांवर असताना व इतर स्त्री मनोविश्लेषक स्त्री – लैंगिकतेसंबंधीची फ्रॉईड यांची मांडणी मुकाटपणे स्वीकारत असताना हॉर्नाय यांनी मात्र फ्रॉईड यांना आव्हान देण्याचे धारिष्ट्य दाखविले. असे धारिष्ट्य दाखविणाऱ्या त्या पहिल्या स्त्री – मानसशास्त्रज्ञ होत्या. स्त्री-लैंगिकतेची एक नवीन ओळख त्यांनी जगासमोर आणली. स्त्रीचे एखादे वर्तन किंवा भावना या रूढ संकेतांपेक्षा वेगळ्या असल्या तर तिला समस्या आहे किंवा ती रुग्ण आहे अथवा तिच्यात दोष आहे असा होत नाही. स्त्री- लैंगिकतेत इतके वैविध्य आहे की ते वर्तन विविधतेचा एक प्रकार म्हणून स्वीकारले पाहिजे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. प्रत्येक स्त्रीची लैंगिक अभिव्यक्ती ही वेगळी असते. या विविधतेचे स्वागत केले पाहिजे. वेगळ्या अभिव्यक्तीला न नाकारता तिचाही समावेश सर्वसामान्य वर्तनात केला पाहिजे. हॉर्नाय यांनी या मताचा केवळ पुरस्कारच केला नाही तर या विषयावर चर्चा घडवून आणल्या. तसेच इतर स्त्रियांना बोलण्यासही प्रवृत्त केले.

स्वतंत्र विचार – स्त्री – लैंगिकतेबद्दलचे हॉर्नाय यांचे विचार स्वतंत्र होते व ते कुठल्याही अडसरांशिवाय मांडण्याचे धाडसही त्यांच्यात होते. स्वतःच्या लिखाणात समाजाच्या तथाकथित लैंगिक नीतिमत्तेबद्दल त्यांनी खुलेपणाने प्रश्न विचारले आहेत. विवाहसंस्था, एकल जोडीदार, प्रौढ स्त्रियांची मानसिकता असे बहुविध विषय त्यांनी लिखाणातून हाताळले आहेत. रोजनिशीत स्वतःची लैंगिक कल्पनाचित्रेही मोकळेपणाने मांडली आहेत (Quinn १९८७). त्या किती प्रगत विचारांच्या होत्या व कुठल्याही दडपणाशिवाय लिहिण्याचे कसब त्यांच्यात होते, याची साक्ष ती कल्पनाचित्रे देतात.

हॉर्नाय यांनी ज्या काळात बर्लिनमध्ये स्वतःची कारकिर्द चालू केली तेव्हा सामाजिक मानसिकतेत स्थित्यंतर घडत होते. स्त्रियांना शिक्षणाचे दरवाजे उघडले गेले होते. उच्च शिक्षण घेण्यास त्यांची मानसिकता अनुकूल झाली होती. सामाजिक जीवनात स्त्रिया रस घेऊ लागल्या होत्या. पत्नी व माता या भूमिकांपेक्षा वेगळ्या भूमिका आपण बजावू शकतो, याची जाणीव होऊ लागली होती. लैंगिक अभिव्यक्ती ही बौद्धिक व सामाजिक वर्तुळात सर्वमान्य झाली होती. लैंगिक स्वातंत्र्य, समलैंगिकता, उभयलैंगिकता याबद्दलची स्वीकारार्हता हळूहळू वाढत चालली होती. गर्भपातास विरोध किंवा गर्भनिरोधकांची उणीव अशा आधुनिक वातावरणाशी काही विसंगती दिसत असल्या तरी बहुतांशी घटकांत ‘‘आधुनिक मुक्त स्त्री’ कडे बर्लिनमधल्या स्त्रियांची वाटचाल चालू झाली होती. हॉर्नाय यांना स्वतंत्र विचार जोपासण्यास त्यामुळे उत्तेजन मिळत होते.

स्त्रियांची कृतिशीलता – स्त्रियांच्या लैंगिकतेबद्दल हॉर्नाय यांचे फ्रॉईड यांच्याशी तीव्र मतभेद होते. फ्रॉईड यांची मांडणी ही ‘लैंगिकतेत स्त्री निष्क्रिय आहे’ असे चित्र उभे करते. ही मांडणी कामव्यवहारांत स्त्री कृतिशील नसते व पुरुषांची वासना शमन करणे अशा दुय्यम भूमिकेचा पुरस्कार करते, असे फ्रॉईड यांचे म्हणणे होते. स्त्रीच्या लैंगिकतेची ही मांडणी सदोष आहे व पुरुषप्रधान मानसिकतेतून स्त्रीचा विचार केल्यामुळे अशी मांडणी केली आहे, असे हॉर्नाय म्हणत. स्त्रीच्या लैंगिक मानसिकतेचा अभ्यास करण्यासाठी पुरुषी मानसिकतेचा चष्मा उतरवावा लागेल व कुठल्याही पूर्वग्रहांशिवाय तिच्या मानसिकतेचा निखळ अभ्यास करावा लागेल, हे मत त्यांनी वारंवार मांडले.

गर्भाशय मत्सर फ्रॉईड यांनी मांडलेल्या शिश्न-मत्सर या संकल्पनेवर त्यांनी कडाडून टीका केली. फ्रॉईड यांच्यामते शिश्न-मत्सर हा स्त्रीच्या विशिष्ट शरीररचनेमुळे झालेला अपरिहार्य परिणाम आहे. हा परिणाम अपरिहार्य नसून यामध्येही सामाजिक घटक महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन हॉर्नाय यांनी केले. व्यक्तिमत्त्व विकासाच्या एका विशिष्ट टप्प्यावर मत्सर वाटणे हे स्वाभाविक असेल तर फक्त तो स्त्रियांनाच का वाटेल? तो पुरुषांनाही वाटू शकतो. उलट स्त्रीकडे असणारे पुनरुत्पादनाचे अवयव पुरुषाकडे नसल्यामुळे त्याला स्त्रीचा मत्सर वाटणे अधिक साहजिक आहे. नवीन जीव गर्भाशयात वाढविणे व त्यास जन्म देणे या प्रक्रियांचा आनंद स्त्रीप्रमाणे पुरुष घेऊ शकत नसल्यामुळे त्याला स्त्रीबद्दल मत्सर वाटतो. या मत्सराचे विरेचन पुरुष व्यापार, राजकारण, सामाजिक जीवन यात जास्त वेळ व्यतीत करून घालवतो, अशी मांडणी करून त्यास गर्भाशय-मत्सर असे हॉर्नाय यांनी संबोधले (Horney 1942). या मत्सराचे विरेचन योग्य झाले नाही तर पुरुषाच्याही मानसिकतेवर दुष्परिणाम होऊ शकतो. स्त्रीला वाटणाऱ्या शिश्न – मत्सरापेक्षा पुरुषाला वाटणारा गर्भाशय-मत्सर व त्याचा दुष्परिणाम जास्त तीव्र असतो असे त्यांना वाटत होते. हा मत्सर म्हणजेच पुरुष असण्याचा गंड आहे. पुरुषी लिंगभूमिका बजावण्याचे दडपण पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषावर जास्त असते. त्यामुळे हा गंड त्यांना अधिक तीव्रतेने दाबून ठेवावा लागतो. अर्थात शिश्न-मत्सर असो किंवा गर्भाशय-मत्सर असो, दोन्हींमध्ये सामाजिक घटक महत्त्वाची भूमिका बजावतात व या घटकांच्या आंतरसंबंधांचे परिणाम मानसिकतेवर होत असतात, हे त्यांनी मांडले.

टीका – हॉर्नाय यांची गर्भाशय-मत्सराची ही मांडणी फ्रॉईड यांच्या मांडणीला प्रतिवाद म्हणून आली आहे. ती अस्सल नाही, अशी टीका त्यांच्यावर झाली. तसेच हॉर्नाय यांनी हिरिरीने मांडलेली ही मते म्हणजे त्यांना वाटत असणाऱ्या शिश्न-मत्सराचे अप्रगट रूप आहे व त्यांनी स्वतःच्या मानसिकतेचे नीट अवलोकन केले पाहिजे, अशी टीका फ्रॉईड यांनीही हॉर्नाय यांच्यावर अप्रत्यक्षपणे केली(Cherry 2020). हॉर्नाय यांची मांडणी कितीही आधुनिक असली तरी गर्भाशय-मत्सराच्या संकल्पनेद्वारे त्यांनी स्त्रीच्या मातृत्व भूमिकेला प्राधान्य देऊन तिचा विचार पारंपरिक चौकटीतून केला आहे असेही टीकाकार म्हणतात. स्त्री मानसिकतेबाबतची हॉर्नाय यांची मते कितीही पुरोगामी असली तरी त्या मतांना पुराव्याची जोड नसल्यामुळे ती सैद्धांतिक पातळीवरच राहिली.

असे असले तरी, स्त्रीच्या लैंगिक मानसिकतेचा विचार करताना हॉर्नाय यांचे योगदान विसरता येणार नाही. मानसिकतेचा शोध ही एक निरंतर प्रक्रिया असते. चूक किंवा बरोबर अशा तराजूत ती तोलण्यापेक्षा त्या प्रक्रियेच्या प्रवासाचे मूल्य जास्त असते. कॅरन हॉर्नाय यांनी एका ठिकाणी काढलेले उद्गार याची साक्ष देतात. त्या म्हणतात, ‘आत्मशोधाची प्रक्रिया फार वेदनादायी असते. पण त्याच वेळी ती चैतन्यदायीही असते. त्यातून कुणाचीच सुटका होत नाही’ ( Quinn 1987).