१९  मे २०२२  रोजी वर्तमानपत्रात फ्रंट पेजवर ‘अनिष्ट प्रथांविरुद्ध राज्यात वज्रमूठ’ ही बातमी वाचली. त्यामध्ये ‘विधवांबद्दलच्या प्रथा संपवण्याचा सरकारचा निर्णय’ असे लिहिले होते, तेव्हा मनात हा विचार आला की, आपण कोणत्या शतकामध्ये जगत आहोत..? जिथे महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा व विज्ञानवादी आणि प्रगतिशील समाज म्हणून वाटचाल करत असताना अजूनही पतीच्या निधनानंतर कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढणे अशा कुप्रथांचे पालन केले जाते.

पूर्व इतिहास :-

भारतीय इतिहासाचा  स्त्रीप्रश्नासंदर्भात आकलन करून घेताना सती प्रथेचा  अभ्यास महत्त्वाचा ठरतो. महामहोपाध्याय पां. वा. काणे यांच्या मते ‘सती म्हणजे विधवांनी आपल्या स्वतःचे केलेले बलिदान होय’. स्वतःच्या सत्तेला पूरक समाजमन घडवण्यासाठी राजसत्ता आणि धर्मसत्ता यांचा हितसंबंध जोपासण्याचा  प्रयत्न करीत असते. त्यातून रूढी, प्रथा परंपरा तयार केल्या जातात व गौरवाने जतनही केल्या जातात. त्यापैकी सतीची चाल ही एक होय. इ.स. १८२९ च्या  सतीबंदीच्या  कायद्यानंतर विधवेला चितेच्या ज्वालांपासून वाचविले गेले असले, तरी तिला विधवा अवस्थेत हाल अपेष्ठांनी अपमान  भोगत जन्मभर अतिशय खडतर आयुष्य जगावे लागे. तिच्या डोक्याचे मुंडण केले जाई. अत्यंत दु:खी आणि कष्टी असे तिचे जीवन कुटुंबप्रमुख पुरुषाच्या लहरीवर अवलंबून असे.  भारतीय इतिहासातील स्त्री प्रश्नांमध्ये एकोणिसाव्या शतकात विधवांचा प्रश्न हा केंद्रीभूत मुद्दा राहिलेला दिसतो. बाल-जरठ विवाह, बालविवाह, रोगराई, साथीचे रोग, वृद्धापकाळाने पती मृत्यू पावल्यास पत्नीला सक्तीचे वैधव्य भोगावे लागत असे.

 विधवा स्त्री: कौटुंबिक व सामाजिक स्थिती:-

 पती व पत्नी यांचे वैवाहिक जीवन हे त्यांच्यापैकी एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे संपुष्टात येते. ‘ज्या स्त्रीचा पती निधन पावला आहे व तिचे पुन्हा लग्न झाले नाही अशी स्त्री म्हणजे विधवा होय’.  असे भारतीय समाजात मानले जाते.

विधवा स्त्रीचे जीवन हे तिच्या पतीच्या मृत्यूनंतर विशिष्ट नीतिनियमांनी नियंत्रित केले जाते. पारंपारिक समाजात मानवी हक्कांपेक्षा धार्मिक व नैतिक मूल्य अधिक महत्त्वाची ठरतात.  कुटुंब ते आप्तसंबंधी जात व  अधिक व्यापक समुदायाअंतर्गत विधवेचे वैयक्तिक आयुष्य काटेकोर रूढी व बंधने यांनी बंदिस्त होते, याचे  श्री बेहरामजी मलबारी ‘असमंत वैधव्य’ या टिपणात अडचणीत सापडलेल्या विधवांनी कसे जीवे मारले जाते या मुद्द्यावर भर दिला आहे. एका अर्थी विधवांचे आयुष्य सतीबंदी मुळे वाचले तरी,  जात आणि रूढी परंपरा यामुळे त्यांचे लचके तोडले जात असत याकडे मलबारी यांनी सरकारचे लक्ष वेधले होते. कुटुंबांतर्गत विधवा स्त्रीस कष्टमय, खडतर ,उपेक्षित, अपमानित जीवन जगण्यास भाग पाडले जाते. विधवेचे भल्या पहाटे दर्शन अपशकुनी मानले जाई. संन्यस्त वृत्तीने राहणे, एकत्र कुटुंबातील सर्वांच्या खस्ता खाणे, पोटभर अन्नावरही सत्ता नसणे,घरात कशावरही सत्ता न चालणे , इतरांच्या केवळ दयाबुद्धीवर अवलंबून जे मिळेल त्यात समाधान मानणे, तरुणपणी विधवेपण आल्यास ती घरातील वा बाहेरील वासनेची बळी पडली जात असे ,त्यातून राहणारी गर्भधारणा त्याचे तिला कौटुंबिक व सामाजिक परिणाम सहन करावे लागत असे .  हे अत्यंत कष्टप्रद भोग तिच्या वाट्याला येत असत.  विधवेने उंची वस्त्र व दागिने अलंकार न घालणे, मंगल प्रसंगात पुढे न येणे, कुटुंबातील कोणत्याही शुभ कार्यात सहभाग न होणे, स्वतःच्या पोटच्या मुला- मुलींच्या मंगल कार्यात सहभागी न होता डोळे भरून  देखील पाहता न येणे इत्यादी कुटुंबांतर्गत सर्व बाजूंनी कोंडमारा करणारी परिस्थिती विधवेच्या  वाट्याला येत होती.

सामाजिक परिस्थितीमध्ये त्यांना धर्मशास्त्राच्या आधाराने  समाजहीन म्हणून लेखले होते. ब्राह्मणशाहीने विधवांना ‘गुरुचरित्रा’ सारख्या ग्रंथातून आचारणासंबधी घालून दिलेले कडक नियम पाळावे लागत असत.  सक्तीचे  केशवपन, सकेशा विधवांना अपवित्र मानणे, सोवळ्या  विधवांना कांदा- लसूण वर्ज्य करावा लागे, उपासतापास एकभुक्त राहणे, दर महिन्याला न्हाव्याकडून  केशवपन करून घेणे, शिक्षण नसल्याने स्वतंत्रपणे अर्थार्जन करण्याची व स्वतंत्रपणे राहण्याची तिला  मोकळीक मिळत नसे.  गर्भपात व भृणहत्या या सारख्या शारीरिक वेदना सहन कराव्या लागत असत.

 समाजसुधारकांचे विधवा प्रश्नासंबंधी चे कार्य:-

 एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर मात्र विधवांची कारुण्यमय  गंभीर परिस्थिती, त्यांच्या संख्येतील वाढ, तारुण्यसुलभ भावना या मुळे होणारे अनैतिक गुन्हे इत्यादी बाबींमुळे समाजातील सुशिक्षितांना व सुधारकांना त्यात सुधारणा करण्याची निकड भासली. पुनर्विवाहाचा विचार हा विधवा विषयी ची पहिली प्रतिक्रिया होती .विधवा विवाहाचा कायदा व त्यासंबंधीची चळवळ सुरू झाली. मृणालिनी शहा यांनी सुधारकांच्या महत्त्वाच्या चार बाबी नमूद केल्या आहेत .

१ . विधवा पुनर्विवाहाचा वेदसंमत कायदा मंजूर करून घेणे.

२. विधवांमध्ये शिक्षणाचा प्रसार करून त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे.

३ .केशवपनाची चाल बंद करणे.

४ .हिंदू विधवांना वारसा हक्क जास्त प्रमाणात मिळवून देणे .

श्री बेहरामजी मलबारीच्या यांच्या  टिपणाला जोतीराव फुले यांनी प्रतिक्रिया देताना  मध्यम आणि कनिष्ठ जातीतील स्त्रियां संबंधीचे प्रश्न विचारात घेतल्याचे दिसते. मुलीचे विवाहाचे वय मलबारींच्या  बिलामध्ये बारा वर्षे होते तर फुले यांनी मध्यम मार्ग काढून ते अकरा वर्षे करण्यात यावे असे म्हंटले होते. भ्रूणहत्या, गुलामी व इतर अनेक दुष्ट प्रथा ज्याप्रमाणे मोडून काढल्या त्या  प्रमाणेच बालविवाहाची व विधवा पुनर्विवाहाची  सवलत असावी अशी मागणी बापूजी हरी शिंदे करतात. जोतीराव फुले यांच्या  प्रमाणे ताराबाई शिंदे यांनी विधवांच्या प्रश्नावर आपली मते व्यक्त केली .

१ . पुनर्विवाह न  केल्यामुळे स्त्रियांचे शोषण होते .

२ . वैधव्याचे असह्य दुःख भोगावे लागते.

३ .त्यामुळे अनर्थ होतात .

विधवा स्त्रीच्या अनर्थाची कल्पनेबद्दल त्या म्हणतात की,‘मनोनिग्रह करून मनुष्य वस्तीत राहून स्त्री- धर्म रक्षण होणेच नाही. निसर्गत: हा असलेल्या वासना दमनाणे  क्षमणार्या  नसतात हा मनुष्य धर्म आहे.’

पुनर्विवाहास बंदी , गर्भपात, बाल हत्येचे  वाढते प्रमाण यास  ब्राह्मणी धर्मग्रंथ कारणीभूत होते असे जोतीराव फुले म्हणतात.  विधवा स्त्रिया या भट-ब्राह्मणांच्या बदमस्ती मुळे बळी पडल्या जात असे. त्यांनी गर्भपात वगैरे अघोर कर्म करू नयेत म्हणून त्यास गुप्तपणे बाळंत होण्याकरिता फुलेंनी आपल्या घरी सोय केली व इ.स. १८६०मध्ये सावित्रीबाईंच्या मदतीने ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ उघडले. मुकुंदराव पाटील हे आपल्या ‘मी माझी नव्हेच’ (१९३३ ), ‘राष्ट्रीय तारुण्य’(१९२९), चंद्रलोकीची  विलक्षण रूढी अथवा दादासाहेबांची फजिती, ‘मिरची वंदना’(१९३९), ‘ढ्ढाशास्त्री परान्ने,(१९२७), ‘पियानी वेडी’(१९३२ ), दिनमित्र मधील  ‘आसुडाचे फटके’ या सदरात म्हणतात, ‘हा ठराव  अर्धा चांगला आहे, अर्धा वाईट आहे. अर्धा चांगला म्हणण्याचे कारण, पुरुषांनी पुनर्विवाह करू नये असे ठरले नाही.’ पुढे मुकुंदराव पाटील  भटशास्त्रीचे   म्हणणे देतात. भटशास्त्री म्हणतात ‘स्त्रियांचा पुनर्विवाह बंद केल्याने संसारात काटकसर कशी करावी ते आपणास वेगळे शिकावे लागत नाही. शिवाय विधवेचे पाऊल वाकडे  नीट न पडले तर ब्रह्मचर्य व्रत पाळल्याने पुण्य लागते तेच पाऊल वाकडे पडले तर शीला साठी मुलाला मारण्याचा महा मनोनिग्रह संपादल्या  चे खडतर  वृत्त पदरी पडते’ त्यातून जैन पंथातील स्त्रियांच्या  पुनर्विवाहाची  चर्चा करून मुकुंदराव पाटील भिलवडीस  जैन सभा भरून उपाध्यायवर आसुडाचे फटके ओढतात. स्त्री जीवनाकडे पाहण्याचा मुकुंदराव पाटील यांचा दृष्टिकोन क्रांतिकारी होता. पंढरपूर येथे विधवा स्त्रियांसाठी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ ही संस्था काढली. सत्यशोधक चळवळीमुळे महाराष्ट्रात पुनर्विवाह चे प्रमाण वाढू लागले. नायगाव मध्ये १९१३  मध्ये सात पुनर्विवाह, अहमदनगरमध्ये १९१३  मध्ये दोन पुनर्विवाह, सासवडमध्ये  १९१४ तीन पुनर्विवाह, भीमथडी आणि इंदापुर मध्ये शेळगावमध्ये ७ पुनर्विवाह , वरकुटे येथे एक पुनर्विवाह,लोणी -इंदापूर येथे एक पुनर्विवाह लावल्या चे सत्यशोधक समाज रिपोर्ट सांगतो.

१९१७च्या जुलै मध्ये शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात विधवांच्या पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा संमत केला. हिंदूंच्या अनेक जातीत विधवांच्या पुनर्विवाहाच्या बाबतीत ‘इतर विवाह प्रमाणे योग्य विधी न  करण्याची पद्धती, असल्यामुळे ज्या अनेक अडचणी निर्माण होत होत्या त्या या कायद्यान्वये दूर करण्यात आल्या.  तसेच या कायद्यानुसार विवाहांची कायदेशीर नोंद करण्याची पद्धती सुरू केली गेली.  त्यामुळे विवाह विधी चा कायदेशीर पुरावा अस्तित्वात राहू शकल्याने स्त्रीवर्गावर होणाऱ्या संभाव्य अन्यायाचा प्रतिकार करण्याचे एक साधन त्यांना उपलब्ध करून दिले गेले. समाजाच्या स्वास्थ्यासाठी विधवा विवाहास कायदेशीर मान्यता असणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे, असे शाहू महाराजांचे  मत होते. स्त्री-शूद्रांना  गुलामीच्या खाईत लोटणारा त्यांचे सर्व मानवी हक्क हिरावून घेणाऱ्या समाजाची विषम रचना करणारा प्रतिनिधीक  ग्रंथ म्हणून ‘मनुस्मृती’चा उल्लेख करावा लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कालीन समाजात ‘मनुस्मृती’चे कायदे प्रचलित होते. ‘मनुस्मृती’ कालबाह्य झालेले नाहीत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बल्हारी या जातीच्या स्त्री-पुरुषांवर ‘मनुस्मृती’च्या समर्थकांनी  केलेल्या अन्याया द्वारे स्पष्ट केले. ब्राह्मणी धर्म पुरस्कृत ‘मनुस्मृती’ची चिकित्सा स्त्री प्रश्नाच्या अनुषंगाने करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री स्वातंत्र्याच्या विरोधकांचा ज्ञान व्यवहार उघड केला. धर्म आणि स्त्री संदर्भाच्या अंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात कि, स्त्रीच्या विवाहाचे वय विविध स्मृतीग्रंथात ऋतुप्राप्ती च्या आत करावी असे म्हटले आहे. विधवेचा विवाह त्याज्य  मानला गेला. तिचे केशवपन करून तिला विद्रूप केले जाऊ लागले तिच्या ज्ञानार्जनावर  बंधने आणली गेली.’ अशी धर्मशास्त्राची, श्रुती,स्मृतीची पार्श्वभूमी स्त्री प्रश्नाला असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री विषयक समस्यांची आणि त्यांच्या धार्मिक आधारांची पद्धतशीर चिकित्सा केली होती. त्यांच्यापूर्वी गोपाळबाबा वलंगकर आणि काही प्रमाणात याची चिकित्सा केली होती. हिंदू धर्मातील विधवा या सर्व बाजूने पीडित होत्या. गोपाळबाबा वलंगकर यांनी इ.स.१८९६ मध्ये याची चिकित्सा अखंडादी  काव्यातून केलेली दिसते .

विधवा विटंबना ऐकुनिया कानी| दया न ये मनी कठोराच्या ||१ ||

आया बहिणी  लेकी आणिक त्या सुना |अक्रोशिती जाणा धेनुपरी ||२ ||

खाटीकाच्या परी दुष्ट हा नापित |भाद्राया तिष्ठत डोकी त्यांची ||३ ||

संन्याशी गोसावी तीर्थक्षेत्री माधुर्य भक्तीचा |आचार दुष्टांचा वृदावनी ||५ ||

जातींतर्गत  विवाहाचा नियम जोपासण्यासाठी स्त्रीची दोन प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली.

१ . तिला तिच्या मृत पतीच्या चितेवर जाळून तिच्यामुळे निर्माण झालेला प्रश्न सोडवून.

२ . तिच्या (विधवा) उर्वरित जीवनात तिच्यावर वैधव्य लादणे.

 अशा प्रकारे जादा (वरकड) स्त्रीची भारतीय धर्मसंस्थेने वासलात लावली असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सती आणि वैधव्या बाबतचे म्हणणे आहे. जाती निर्मितीसाठी स्त्री पुरुषांच्या संख्येतील   तफावत नाहीशी केली जाते आणि त्यासाठी सतीप्रथा, वैधव्य लादणे ,विधूरावर ब्रह्मचर्य लादणे, लग्न योग्य नसलेल्या अल्पवयीन मुलीशी विधुराचे लग्न लावणे हे मार्ग अवलंबिले जातात. हे  उपाय स्त्रियांवर अन्याय करणारे आहेत. स्त्रियांच्या लैंगिक शोषणातून अशाप्रकारे जाती टिकवून ठेवल्या गेल्या ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे .म्हणजेच स्त्रियांवर विविध बंधने लादून जातीची बंदिस्तता  टिकवून ठेवण्यात आली. या अर्थाने स्त्रिया या                  जाती संस्थेच्या प्रवेशद्वार असल्याचे सिद्धांकन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून स्पष्ट होत जाते. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस स्त्रियांच्या कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक ,शारीरिक अशा सर्व प्रश्नांवर फुले, ताराबाई शिंदे, यांच्या सह पंडिता रमाबाई ,मुक्ता साळवे ,फातिमा शेख, आनंदीबाई जोशी महर्षी कर्वे, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर अशी सर्व समाजसुधारक स्त्री-पुरुष समानतेचा विचार करत होते आणि ते समाजात रुजविण्यासाठी काठोकाठ प्रयत्न  करत होते. त्याला सामाजिक दृष्टीने चांगला प्रतिसाद मिळत होता.  त्यामुळेच आजच्या स्थितीमध्ये स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात उंचावलेल्या दिसून येतात. पण जेव्हा कोल्हापुरातील हेरवाड गावाने(ता.शिरोळ) विधवा प्रथा बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. असे वर्तमानपत्रात वाचण्यात आले. इ.स. १८८०  मध्ये सुरू झालेल्या मराठी संगीत नाटकांमध्ये स्त्रीभूमिका करण्याचे काम पुरुषांवर जाणीवपूर्वक सोपवले गेले एवढेच काय या नाटकांना स्त्रियांनी स्वतंत्रपणे बसण्यासाठी सोय केली जात असे. आपल्या प्राचीन साहित्यातही स्वर्ग या कल्पनेत स्त्रीला  नर्तिकेचे  काम दिले आहे .स्त्रीचा आवाज आजन्म  सुरेल राहू शकतो आणि पुरुषाचा आवाज पौगंडावस्थेत  येताच फुटतो  पण स्त्रीला नर्तन आणि पुरुषाला मात्र गंधर्वपद  ही आपली सांस्कृतिक मानसिकता होती. ही कोंडी फुटणे अवघड आणि दुरापास्त वाटावी अशा स्थितीत हिराबाई बडोदेकर यांनी इ.स. १९२२  मध्ये पहिल्यांदा जाहीर मैफलीत गायन केले आणि ही कोंडी फुटली. त्यानंतरच्या काळात झालेले सामाजिक बदल अधिक वेगाने घडून आले.  लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी सुरू केलेल्या स्त्री मासिकाच्या संपादिका शांताबाई किर्लोस्कर यांनी पुण्यात विधवा महिलांचाही समावेश असलेले हळदी कुंकू आयोजित करून समानतेला बळकटी देण्याचा प्रयत्न केला. हे इसवी सन अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात व  एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस  घडत होते तर चालू शतक  मानवतावादी, वैज्ञानिक दृष्टिकोन,  समता एकात्मता बंधू-भगिनींचा असा पुरोगामी व आधुनिकतेचा समाज न बनता तो  परत कोणत्या बुरसटलेल्या मताने ,विचाराने चालत आहे आपल्या सर्वांसाठी हा प्रतिगामी विचार अधिक धोकादायक आहे हे समजून घेऊन मानवता हाच मानवाचा खरा धर्म आहे. समाजातील चालीरीती कडे नव्या दृष्टीने पाहण्याची क्षमता निर्माण करून असल्या कालबाह्य प्रथा बंद पाडण्यासाठी विवेकी पुरुषांनी पुढाकार घ्यायला हवा तेव्हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जात राहील.  याची सुरुवात हेरवाड या गावाने केली व  हे एक पाऊल पुढे टाकले आहे ही अतिशय कौतुकाची बाब आहे.  या पुढची लढाई समाज म्हणून सगळ्यांना मिळून लढावयाची  आहे.

(लेखिका अब्राह्मणी स्त्रीवादाच्या अभ्यासक असून सत्यशोधक महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आहेत.)