जगातील कुठलाही समाज संथगतीने नवा बदल स्वीकारत असतो. परंपरागत दृष्टिकोनाशी तो सहजासहजी फारकत घेत नाही. त्यामध्ये शोषकांची संबंध दडलेली असतात. आपण कोणावर तरी अन्याय करतो, माणूस म्हणून समतेचा न्याय त्यांना देत नाही ही बाबही बऱ्याचदा शोषकांना लक्षात येत नाही. उलट हा निसर्गाचा नियम आहे असा त्यांचा गैरसमज झालेला असतो. परंतु शोषितांना जेव्हा दृष्टी प्राप्त होते ते जेव्हा बंड करून प्रस्थापित न्याय मूल्यांची राखरांगोळी करतात तेव्हा, “विरंगी मी, विमुक्त मी” सारख्या कादंबऱ्यांचा जन्म होतो.  

मानवी इतिहासात सगळ्यात मोठा शोषित घटक कोणता असेल तर ती स्त्री आहे. जगातील बहुतांश धर्मग्रंथ पुरुषांनी लिहिले असल्याने त्यांच्या हितसंबंधांची काळजी मोठ्या प्रमाणात घेतली गेली आहे. स्त्रियांना सर्वच क्षेत्रात दुय्यम समजले गेले आहे. स्वतःला प्रगतिशील, पुरोगामी, विज्ञानवादी समजली जाणारी अमेरिकाही यास अपवाद नाही. राज्यव्यवस्था, धर्मव्यवस्था, न्यायव्यवस्था, अर्थव्यवस्थांमध्ये जेथे स्त्रियांना समतेचा अधिकार नाही तिथे लैंगिक सारख्या विषयाला त्यांना न्याय मिळणे म्हणजे नवीन ग्रहावर वस्ती करण्यासारखी आहे. आजच्या काळातही स्वतःला आधुनिक प्रगत समजल्या जाणाऱ्या, समतेची भाषा करणाऱ्या पुरुषांना स्त्रियांना लैंगिक न्याय म्हणजे काय? ही संकल्पनाच माहिती नाही. ‘स्त्रियांच्या लैंगिक सुखासाठी पुरुषांची गरज नाही तर ती आपले कामसुख हस्तमैथुन द्वारे उत्तम रित्या प्राप्त करून घेऊ शकते’ ही कल्पना अद्याप पूर्णपणे अमेरिकेच्या गळी उतरली नाही तेथे भारताचा विचार करणे हास्यास्पद आहे. पण हे धाडस अमेरिकेतील एका स्त्रीने आपल्या कृतिशील प्रयोगातून जगाला विचार करायला भाग पाडले.

जगात ही क्रांती होत असताना आपण मात्र “स्त्री कल मत आना” सारख्या चित्रपटांना आपण डोक्यावर घेतो. यावरून आपली प्रगती लक्षात येते. अर्थात प्रतिभावंत, प्रतिभाशाली नव्या विषयांच्या शोधात नेहमीच असतात. त्यांचे विचार समकालीन समाज स्विकारीत नसला तरी भविष्यात त्यांच्या नव्या शोधांची कल्पना स्विकारावी लागते. हा नवा विचार प्रथमच मराठी भाषेत मांडण्याचे धाडस ज्येष्ठ लेखिका अंजली जोशी यांनी केली आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

‘मी अल्बर्ट एलिस’ या कादंबरीने मराठी साहित्य विश्वात आपली स्वतःची ओळख निर्माण करणार्‍या लेखिका अंजली जोशी व्यवसायाने मानसोपचार तज्ज्ञ आहेत. वरील ग्रंथासोबतच “विवेकी पालकत्व” व “लक्षणीय ५०” या ग्रंथाचे ही वाचकांनी स्वागत केले आहे. अतिशय कमी कालावधीत त्यांच्या दोन्ही कादंबऱ्यांचे अनेक आवृत्ती प्रकाशित पाहता त्यांच्या लेखनाची वेगळेपण लक्षात येते. याबाबतीत शब्द पब्लिकेशन मुंबई चे ही अभिनंदन करणे पात्र ठरते. कारण त्यांनी अशा वेगळ्या विषयाच्या पुस्तकांना प्रकाशित करण्याचे धाडस केले.

“विरंगी मी! विमुक्त मी!” ही तीनशे छत्तीस पानांची कादंबरी तिच्या मुखपृष्टापासूनच वाचकांचे लक्ष वेधते. या कादंबरीतील मुख्य नायिका ‘बेटी डॉडसन’  आहे. ही अमेरिकेतील एक चित्रकार लेखिका. तिचा जन्म अमेरिकेतील कॅन्सस शहरातल्या ‘विचिटा’ या गावातील असून कर्मभूमी मात्र न्युयॉर्क आहे. बालपणापासून चित्रकलेची आवड असल्याने व सोबतच बंडखोर असल्याने वडिलांच्या इच्छेविरुध्द जाऊन ती आपली वेगळी ओळख निर्माण केली. काही वर्षे ती स्त्रीवादी चळवळीचे काम केली. या चळवळीत काम करताना व्याख्याने, परिषदा, चर्चासत्राच्या माध्यमातून भरीव कामे केली पण काही वैचारिक मतभेद झाल्याने या चळवळीपासून ती स्वतःला दूर झाली. “स्त्रीची खरी मुक्ती तिच्या लैंगिक मुक्तीत असून त्या मुक्तीचा केंद्रबिंदू हस्तमैथुन आहे. त्यासाठी पुरुषाची साथ मिळाली तर उत्तम पण नाही मिळाली तर तिने तिचे काम सुख हस्तमैथुन द्वारे उत्तम रित्या करू शकते” हा तिचा विचार परंपरागत समाज मानसिकतेत जगणाऱ्या व्यवस्थेला तडा देऊन गेला. एक वादळ निर्माण झाले. या विचाराच्या पुष्टीसाठी व सिद्ध करण्यासाठी अनेक प्रात्यक्षिक, कार्यशाळा आयोजित केल्या. स्वतःच्या कामक्रिडेची चित्रप्रदर्शन भरून अनेकांचा रोष ओढवून घेतला. त्यामुळे तिचे टोपण नाव ‘पोर्न आर्टिस्ट’ असे पडले. स्त्रियांच्या हस्तमैथुनाचा  विषय सर्व दूर जाण्यासाठी तिने या विषयावर काही पुस्तकेही लिहिली. या पुस्तकांची विक्रमी विक्री झाली. वयाच्या उत्तरार्धात आजही ती या विषयावर समुपदेशन करीत आहे. एवढेच या कादंबरीचे कथानक आहे.

कळत असो, नकळत असो किंवा अतिप्रसंग असो अथवा मुलगी नको म्हणून कुटुंब प्रमुखाचा धाक असो या सगळ्या प्रकारात स्त्रियांनाच मरण यातना सहन कराव्या लागतात हे वैश्विक शक्ती ही कादंबरी वाचकांसमोर ठेवते. या कादंबरीतील नायिकेच्या  आयुष्यात आलेले मार्टिन, फ्रेड स्टर्न किंवा ग्रॅंट टेलर ही पुरुष मंडळी अमेरिकेतच सापडतात असे नाही तर ती सर्वत्र दिसून येतात. उदा. शरीर संबंध ठेवताना आनंदी राहणारा मार्टिन जेव्हा नायिका गरोदर आहे म्हणून कळते तेव्हा तो म्हणतो, “तुझ्या पोटात वाढणारं मूल नक्की माझं आहे याची खात्री पटली तर घेईनही ती जबाबदारी” (पृ.१४३) असे बेजबाबदार बोलणारा पुरुष जगात कुठेही सापडतो. थोडक्यात या कादंबरीचा कालावकाश अमेरिका असली तरी पात्रांची वृत्ती प्रवृत्ती, स्थायीभाव सगळीकडे सारखीच वाटते.

लेखक इंदिरा गांधी महाविद्यालय, सिडको, नांदेड येथे मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत.