• 1. सावित्री_तुझ्यामुळे !

शाळा कॉलेजात जातोय
विद्यापीठाच्या प्रांगणात बागडतोय
प्रज्ञेच्या खुल्या अवकाशात झेपावतोय
सावित्री तुझ्यामुळे !

प्रोफेसर होतोय
HOD बनतोय
कूलगुरुंची खुर्ची मिळवतोय
सावित्री तुझ्यामुळे !

मोर्चे काढतोय
आंदलने छेडतोय
अत्याचाराविरोधात बंड पुकारतोय
सावित्री तुझ्यामुळे !

मुक्तपणे लिहितोय
निर्भीडपणे वावरतोय
अस्तित्वाचे हिशोब मांडतोय
सावित्री तुझ्यामुळे !

डिजिटल बनतोय
ॲन्ड्राईड हाताळतोय
नव्या दुनियेच्या नकाशावर स्त्रीत्व कोरतोय
सावित्री तुझ्यामुळे !

स्वाभिमानाचा घास खातोय
स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेतोय
अबला नव्हे, तर सबला म्हणून जगतोय
सावित्री तुझ्यामुळे !

व्यवस्थेला जेरबंद करतोय
रडणं सोडून लढणं स्वीकारतोय
अन् तुझ्या स्मरणाने पुन्हा पुन्हा सज्ज होतोय
सावित्री तुझ्यामुळे !

२.ऋणानुबंध !

सर्वत्र दिशा अंधारली आहे
चांदणं मात्र शिंपायचे आहे !

खाचखळगे इथे भेटणार आहे
चालणे मात्र चालवायचे आहे !

इथे काट्यांशी संघर्ष जारी आहे
पाऊलांना मात्र सजवायचे आहे !

प्रवास जरुर लांबचा आहे
मंझिलीपाशी मात्र जायचे आहे !

कत्तल फुलांची होत आहे
आयुष्य मात्र फुलवायचे आहे !

जगणे इथे जहरी होत आहे
समृध्द जगणं मात्र जगायचे आहे !

अक्षरच इथे गुलाम होत आहे
साक्षरतेचे बंड मात्र पुकारायचे आहे

हेळसांड इथे नित्याची होत आहे
सावित्रीला मात्र आठवायचे आहे !

जय इथे अज्ञानांचा होत आहे
प्रज्ञेचे नगर मात्र वसवायचे आहे !

प्रत्येक क्षण इथे युध्दखोर होत आहे
ऋणानुबंध मात्र बुध्दाशी जोडायचे आहे !

३. नवे स्वप्न !

होत्या तिथे त्या अंधार वाटा जरी
मात्र चांदण्यांची धार सोबत होती

होते खाचखळगे जागोजागी जरी
मात्र चालण्यास माझी संमती होती

होत्या उसळत त्या महालाटा जरी
मात्र त्या रोखण्याची एक रित होती

होता डोंगरद-यांचा माझा गाव जरी
मात्र निळ्या नभांशी एक प्रीत होती  

होती झाडाझुडपांची दाट गर्दी जरी
मात्र सुगंधणारी तिथे एक आस होती

होते काट्याकुट्यांचे ते जगणं जरी
मात्र वेदनांना सजवण्याची प्यास होती

होते तुटलेलं ते अवघं आयुष्य जरी
मात्र उंच झेपाविण्याची एक सुरूवात होती

होते कसे सारे ओसाड वैरान जरी मात्र
नंदनवन फुलवण्याचे नवे एक स्वप्न होते

४. काय_म्हणू?

ऐन थंडीत भल्या पहाटे
घरातली चूल पेटवण्यासाठी
कायम धडपडत असतेस
कित्येकदा तू गारठतेस

पण, कधीच जाणवू देत नाहीस
चूल पेटवली की मग 
घरातलं अवघं वातावरण 

किती ऊबदार होऊन जातं
तूझी ही ऊबदार माया
अन् ऊबदारपणाचं विज्ञान

आज जाणतोय आम्ही
आणि अंदाजतोय तुझी 
तेव्हाची घालमेल सुध्दा

तू चालायला शिकवलंस
म्हणून चालतोय गं आम्ही
तू शिक म्हणालीस
म्हणूनच शिकतोय आम्ही

स्वतःचं आयुष्य गोठवून
आमचं जगणं ऊबदार 
अन् प्रकाशमान करण्याचा 
तुझा संघर्ष खरोखरच 
जगातल्या कैक क्रांतिकारकांपेक्षा 
मला खूप क्रांतिकारक वाटतोय

कारण,
मुळात तू नारी
तूच महान क्रांतिकारकांची जन्मदात्री

त्यामुळे तुझ्या या संघर्षाला 
काय म्हणू ?
क्रांतिनायिका_की_आई!

.झुंज !

शब्दातून अजून किती बोलायचे
हीच वेळ आता, पावले उचलायची

बघता बघता कसे सारेच सरायचे
हीच वेळ आता, काहीतरी पेरायची

झाडाने ठरवलंय पाने उसवायचे
हीच वेळ आता, ते घरटे शिवायची

वादळांना कुठे सुमार कसे घोंघायचे
हीच वेळ आता, ते आभाळ पेलायची

रात्र वै-याची हे कुठवर आळवायचे
हीच वेळ आता, चांदरात उधळायची

ते इरादे दिसताहेत डाव मोडण्याचे
हीच वेळ आता, नेमके घाव घालण्याची

केव्हाचे निघालेत मोर्चे फुलपाखरांचे
हीच वेळ आता, फुलाफुलाने फुलण्याची

कसे उसळलेत योद्धे त्या महायुध्दाचे
हीच वेळ आता, निडरपणे झुंजण्याची !

(प्रा. पूनम गायकवाड ह्या मुंबई विद्यापीठ अंतर्गत सावंतवाडी येथील सिंधुदुर्ग उपपरिसर महाविद्यालयात समाजकार्य विषयाचे अध्यापन करीत आहेत.)