घरातून बाहेर पडल्यावर
अनेक माणसं दिसतात कुत्र्या मांजरांसह
कावळे, चिमण्या, किडे, मुंग्याही रस्त्यावर
वेगवेगळ्या धर्माचे, जाती, पंथाचे, विचाराचे,
काळे, गोरे, धुष्टपुष्ट, पिचलेले, गरीब, श्रीमंत, बायका, मुलं
त्यांच्या स्वप्नांचे डोळे आले तरी
ते सुखाच्या रांगोळ्या काढून पडतात घराबाहेर
आपापल्या प्रश्नांना सोबत घेऊन उत्तराच्या प्रतीक्षेत.

मनुष्य होण्याचा अधिकार गमावून बसण्याची भीती बाळगून
हे सर्व लोक वेगवेगळ्या दिशेने जा ये करतात
काळ्या पांढऱ्यातील गुपित तर यांना जाणून घ्यायचं नाही ना?
आयुष्य संपले तरी त्यांना लागत नाही शोध
भले त्यांनी कितीही लांब केल्या जिभा स्वतःच्या उंचीपेक्षा
केवळ वायफळ बडबडीसाठी.

कणकेसारखं मळत बसतात ते स्वतःला
नाचवत राहतात डोळ्यांच्या बाहुल्या सर्वत्र
त्यांना कधीच दिसत नाही सत्याचा चेहरा
जरी गळून पडला जगण्याचा विदुषकी मुखवटा
काळजाला घाव केलेल्या घटना
स्मृतीभ्रंश होईपर्यंत राहतात त्यांच्या आठवणीत
उन्हाळ्यात पावसाला हाका मारून
घसा कोरडा पडला तरी
खापरात डुचमळणारं त्यांच्या स्वप्नांचं रंगीत पाणी
आटत नाही कधीच
त्यांच्या टपटप ओघळणाऱ्या अश्रूंच्या थेंबात
दडून बसलेला असतो पाऊस
मात्र, पोटाची भूक धुमसत राहते अखंड
आपल्यात ईश्वराचा अंश असल्याचा भ्रम बाळगून
भुकेतही जिवंत ठेवतात ते आपली स्वप्नं.

ही सर्वच माणसं
वेगवेगळ्या दिशेने न जाता
संसदेकडे तोंड करून निघाली तर?