भारतीय समाजातील जातीय विषमता, अस्पृश्यता आणि कर्मकांड नष्ट व्हावे म्हणून अहोरात्र कष्ट उपसणारे जोतीराव फुले आधुनिक युगातील बंडखोर तत्त्वचिंतक आहेत. थोर शिक्षणतज्ज्ञ आणि सत्यशोधक विचारवंत, तत्त्वज्ञ जोतीराव फुले हे सर्वसामान्य माणसातील सर्वहरा वर्गाचे अग्रणी आहेत. भारतीय पारतंत्र्यातील समाजाचे वास्तव दर्शन घडवून देशाच्या तात्त्विक प्रगल्भतेत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. जोतीराव फुले यांनी भारत देशातील विषमता, अस्पृश्यता, शोषण, पिळवणूक दाखवून देऊन इथल्या धर्मांधतेवर, कर्मकांडावर, अंधश्रद्धेवर, अज्ञान आणि अविद्या यावर आपल्या सिद्धहस्त लेखणीने प्रहार केले आहेत. शेतकरी कष्टकरी दलित यांच्या जीवनातील दुःख, दैन्य, दारिद्र्य याचे वास्तव चित्रण केले आहे. भारतातील सर्वहारा वर्गाने शिक्षित व्हावे, सज्ञान व्हावे यासाठी शिक्षणाचा प्रसार करणारे जोतीराव फुले हे दृष्टे शिक्षण महर्षि होत. जोतीराव फुले यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथातून आपली भूमिका मांडली. जोतीरावांची शेतकऱ्यांविषयी असणारी जाणिव त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होते. आजच्या भारतीय शेतकऱ्याने जोतीरावांच्या भूमिकेतून शेतीकडे पाहिले असता त्यांच्या आत्महत्या करणे हाच यावर उपाय आहे का? हे शोधावे लागेल. या देशातील वर्णवर्चस्व, जातवर्चस्व, लबाडी समजून घेऊन शेतकऱ्याच्या शेतीवरील आणि त्याच्या जीवनातील अरिष्टे कशी नष्ट होतील यावर भर द्यायला हवा. जोतीराव फुले यांच्या या कार्याचा आणि योगदानाचा अभ्यास करणे हा माझ्या जिज्ञासेचा विषय झाल्याने त्यांच्या कार्यासंदर्भात चिकित्सकपणे विचार मांडणारा शोधनिबंध लिहावा असे मी ठरविले. या शोधनिबंधात जोतीराव फुले यांच्या तत्त्वज्ञानाचा परामर्श घेतला आहे.

प्रास्ताविक :

भारत हा शेतीप्रधान देश आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणूस शेती करीत असतो. शेती हे भारतीय माणसाच्या उपजीविकेचे मुलभूत साधन आहे. अनेक ठिकाणी अगदी सुपीक कसदार शेती असल्याचे दिसून येते; ही शेती बडे जमीनदार शेतकरी यांच्या मालकीची आहे. जोतीराव फुले यांना अभिप्रेत असलेला शेतकरी ग्रामीण भागातील सर्वसामान्य, अल्पभुधारक, जिरायत, पावसाच्या भरवशावर अवलंबून असलेली शेती करणारा शेतकरी आहे. कष्ट करणाऱ्या, स्वतः राबणाऱ्या, आपल्या पोटाला पुरेल, कुटुंबाला पोसता येईल एवढे उत्पन्न मिळविणाऱ्या शेतकऱ्याचा आणि त्याच्या शेतीचा ते विचार करतात. जोतीराव फुले यांचा शेतकरी काबाडकष्ट करणार, पारंपरिक शेती कसणारा, अज्ञान, अडाणी शेतकरी आहे. हा शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून खंगलेला दिसतो. अंगापिंडाने कृश झालेला असतो. त्याच्या समोर शेती आणि ती कसणे या शिवाय दुसरा मार्ग नसतो अशा शेतकऱ्याची कुचंबना, अवहेलना, उपेक्षितता जोतीराव फुले यांना पाहवत नव्हती. प्रस्थापित व्यवस्थेवर ‘शेतकऱ्याचा असूड’ ओढून शेतकऱ्यांच्या दुःख आणि दैन्याला वाचा फोडण्याचे महान कार्य जोतीराव फुले यांनी केले आहे. शेतकऱ्याचे कष्ट आणि त्याच्या कष्टाला प्रतिष्ठा मिळविणे यासाठी जोतीराव फुले यांनी दंड थोपटले आणि बंड केले. जोतीराव हे या देशातील पहिले क्रांतीकारक, सत्यशोधक विचारवंत आहेत. त्यांची राहणी साधी असली तरी त्यांनी आपल्या बुद्धीच्या आणि विचार प्रबुद्धतेच्या जोरावर सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी उभे आयुष्य झिजविले. सामान्य माणसाचे हित लक्षात घेऊन त्याचे कल्याण कसे होईल हेच पाहिले. जोतीराव फुले यांनी माणसाला महत्त्व दिले. माणसातील माणूसपण दाखवून देऊन ते जोपासण्याचे कार्य केले. जोतीराव फुले यांचे समाजाप्रती असलेल्या योगदानातूनच बुद्धिवादी आणि क्रांतीकारी तत्त्वज्ञान त्यांनी मांडले.

‘शेतकऱ्याचा असूड’ हा जोतीराव फुले यांच्या प्रगतशील तत्त्वज्ञानाचा प्रभाव दाखवून देणारा ग्रंथ आहे. शेतकऱ्याचे जीवनमान, त्याची नागवलेली, नाडवलेली अवस्था, सामाजिक परिस्थिती, आर्थिक स्थिती, शैक्षणिक गती यावर जोतीरावांनी प्रकाश टाकला आहे. शेतकऱ्यांच्या अवनतीला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांची, इथल्या तत्कालीन सरकारची हृदयद्रावक चिकित्सा जोतीरावांनी केली आहे. तत्कालीन शेतकरी आणि सामाजिक परिस्थिती यांचा विचार केला असता, महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या जीवनात आणि राहणीमानात फारसा फरक झाला आहे असे म्हणता येणार नाही. शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्या ऐवजी ते अधोगतीला गेले आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. शेतीचे उत्पन्न आणि खर्च यांची तोंडमिळवणी करता करता शेतकऱ्याच्या जीवनात अंधारच दिसून येतो.

आजचे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. भारतीय अर्थव्यवस्था शेतकऱ्यासाठी नसून ती डिजीटल औद्योगिक भांडवलदारांसाठी फायद्याची होईल याचाच विचार केला जात आहे. जोतीराव फुले यांनी शेतकरी विरूद्ध स्थितीशील (प्रतिगामी) व्यवस्थेवर हे आसूड ओढलेले आहेत. ही व्यवस्था उलटवून टाकण्यासाठी, परिवर्तीत करण्यासाठी या आसूडाचे फटकारे वेळोवेळी मारावे लागत आहेत हे दाखवून दिले आहे. परिणामी इथल्या व्यवस्थेला, सरकारला आणि दिशाहीनतेला फरक पडताना दिसत नाही. जोतीराव फुले यांनी अंगिकारलेल्या विचारसरणीचे आणि शेतकऱ्यांच्या घेतलेल्या कैवाराचे आजही तेवढेच महत्त्व दिसून येत आहे. प्रस्तुत शोधनिबंधाच्या परामर्शातून दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचे तत्त्वज्ञान या देशामध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण  भागात सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जीवनात अवतरल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. शेतकरी कर्जबाजारीपणातून बाहेर येणार नाही, त्याशिवाय शेतकऱ्याच्या जीवनाला गती प्राप्त होणार नाही हे विचारात घेऊन हा शोधनिबंध लिहिला आहे.

‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथास महाराज सयाजीराव गायकवाड यांनी लक्षपूर्वक ऐकून समजून घेऊन जोतीराव फुले यांचा आदर सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीस मदत केली. यावरून जोतीरावांची शेतकऱ्याप्रती, दलित, आदिवासी, कष्टकरी समाजाप्रती असलेली जाणिव व कणव दिसून येते. जोतीरावांचा हा ग्रंथ तत्कालीन सर्वहारावर्गाने अनेकदा ऐकला असल्याने या ग्रंथातील प्रसंग व वस्तुस्थिती ही खरी आहे असे त्यांना सांगितले गेले. यावरून या ग्रंथातील शेतकऱ्यांच्या जीवनातील वास्तवाचे भान येते. समाजातील हे भयाण वास्तव बदलण्यासाठी बंड करून उठणे पुरेसे नाही तर पुढील अनेक पिढ्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे; आणि फुल्यांनी नेमके तेच साध्य केले आहे. भावी पिढीला आपल्या पुर्वजांच्या हालअपेष्टांविषयी माहिती उपलब्ध व्हावी, त्यातील संदर्भ जाणून घेता यावेत आणि त्या आधारे आजही आपले होणारे शोषण, पिळवणूक आणि फसवणूक या विषयी जागृत असावे हाच खरा प्रबोधनाचा मार्ग आहे असे म्हणावे लागेल. यावरून जोतीराव फुले हे मानववादी ठरतात. त्यांनी मानवाच्या आणि समाजाच्या जीवनातील वास्तवाचे दिग्दर्शन केले आहे. जोतीरावांनी अंध:कारात सापडलेल्या समाजाला वास्तवाचे भान करून देण्याचे कार्य केले आहे. जोतीराव फुले यांना समाज परिवर्तन हवे आहे. सत्याच्या कसोटीवर उभा असणारा समाज दांभिकता, दुटप्पी, पाखंड या पासून मुक्त व्हावा हे अभिप्रेत आहे. समाजाची अधोगती नाहीशी होऊन नवनिर्मित प्रगत, धर्मनिरपेक्ष समाजाची रचना व्हावी ही नवी दिशा जोतीराव फुले यांनी समाजाला दिली आहे. मानवी समतेचा पुरस्कार करणारी, जातअभिमान व धर्मअभिमान यांना धिक्कारणारी विचारसरणी जोतीरावांना अभिप्रेत आहे. जोतीराव फुले यांनी आपल्या ‘शेतकऱ्याच्या असूड’ या ग्रंथातून शेतकऱ्याच्या जीवनातील दुःख, दैन्य, दारिद्र्य नष्ट होऊन एक भयमुक्त समाज प्रस्थापित व्हावा यासाठी मांडणी केलेली दिसून येते.

फुलेकालीन सामाजिक परिस्थिती :

जोतीराव फुले यांचा १८२७ ते १८९० हा कालखंड होय. या कालावधीत जोतीराव फुले यांची सामाजिक जडणघडण झाली. आधुनिक युगाला आव्हान देणारी आणि परंपरागत मध्ययुगीन समाजरचनेला उखडून टाकणारी विचारसरणी जोतीराव फुले यांनी अंगिकारली. त्यांनी आपल्या ध्येयाची, उद्दिष्टांची आणि सामाजिक जाणिवेची दुरदृष्टी ठेवून समाजाकडे पाहिले. लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, “नवीन ध्येयाचा प्रत्यय आल्याशिवाय, नवीन प्रकारच्या सामाजिक उद्दिष्टांचा अर्थ समजल्याशिवाय परंपरागत सामाजिक संस्था नष्ट करण्याची प्रवृत्ती निर्माण होऊ शकत नाही.’ जोतीराव फुले हे दृष्टे तत्त्वचिंतक होते. त्यांचे स्वत:चे असे तत्त्वज्ञान आहे. समाजाप्रती असलेल्या ध्येयांचा आणि उद्दिष्ट त्यांना नेमका अर्थ समजला होता. त्यांना परंपरागत सामाजिक बंधने नष्ट करून एक भयमुक्त समाज हवा होता. समाजातील सर्व घटक समान पातळीवर एकसारखे जीवन जगतील ही अपेक्षा त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली आहे. अस्पृश्यतेचा अंध:कारमय काळ संपुष्टात यावा यासाठी जोतीराव फुले यांनी अहोरात्र कष्ट घेतले. आपल्या वाणीने आणि लेखणीने समाजाला जागृत केले. पुण्यामध्ये स्त्रिया आणि शुद्र अतिशुद्र यांच्यासाठी शाळा चालविली. देशातील सर्वसामान्यांसाठी मुलींची पहिली शाळा जोतीराव फुले यांनी काढली. जोतीराव फुले आपल्या शेतकऱ्याचा असुड’ या पुस्तकाच्या उपोद्घातात म्हणतात,

“विद्येविना मती गेली;

मतीविना नीती गेली;

नीतीविना गति गेली;

गतीविना वित्त गेले,

वित्ताविना शुद्र खचले,

इतके अनर्थ एका अविद्येने केले.”

सर्वहारा माणसाने अज्ञान, आडाणीपणा टाकून देऊन सज्ञान, सुशिक्षित व्हायला हवे, थोतांड भुलथापा, अफवा यांना बळी न पडता शिक्षण घ्यायला हवे, शिक्षणाने माणसाच्या जीवनातील अज्ञान, अंध:कार नाहीसा होऊन माणसाच्या वाट्याला येणारे अनर्थ टाळता येतील. दुःखदैन्य दारिद्र्य यांचा नि:पात करण्यासाठी माणसाला शिक्षण हवे. त्याला नीती अनीती यांच्यातील भेद माहित झाले तरच त्यांच्या जीवनाला गती प्राप्त होईल. माणसाच्या अंगी बळ येईल, ही उर्मी जोतीराव फुले देतात.

जोतीराव फुले यांनी आपल्या ‘शेतकऱ्याचा असूड’ या पुस्तकात शेतकऱ्याच्या जीवनातील जे वास्तव दाखवले आहेत ते असे, “सर्व शुद्र, अतिशुद्र, शेतकरी आपल्या मुलांमाणसांसह रात्रंदिवस ऊर फुटेस्तोवर शेतीत कष्ट करून सरकारास कर, पट्ट्या, फंड वगैरे जकातीद्वारे साल दरसाल कोट्यावधी रूपयांचा भरणा करीत आहेत. तथापि शुद्र शेतकऱ्याच्या मुलास शेतकीसंबंधी ग्रंथ अथवा नेटिव्ह वर्तमानपत्रातील शेतकीसंबंधी सुचना सुद्धा वाचण्यापुरते ज्ञान आमच्या धर्मशील सरकारच्याने देववत नाही व शेतकऱ्यापैकी लक्षाधीश कुटुंबास वेळच्या वेळी पोटभर भाकर व अंगभर वस्त्र मिळण्याची मारामार पडली असून त्याच्या सुख,संरक्षणाच्या निमित्ताने मात्र आमचे न्यायशील सरकार लष्करी पोलीस, न्याय, जमाबंदी वगैरे खात्यांनी चाकरीस ठेवलेल्या कामगारास मोठमोठाले जाड पगार व पेन्शनी देऊन अतोनात द्रव्य उधळते याला म्हणावे तरी काय!” जोतीराव फुले यांनी तत्कालीन वास्तवावर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. केवळ सत्ता, संपत्ती आणि पैसा याच्या मागे लागलेला समाज, वास्तव सामजिक परिस्थितीचे भान विसरला आहे. कामगार, अधिकारी आपल्या स्वार्थापुरते पहाण्यात गुंग झाले आहेत. शेतकऱ्याला मात्र अन्नपाण्याची भ्रांत पडली आहे, ही परिस्थिती बदलवण्यास राज्यकर्ते, सरकार आणि अधिकारी यांनी जागे व्हावयास हवे. वास्तव परिस्थितीचे आकलन करून घेऊन भानावर यावयास हवे. समाजाप्रती आणि जनतेप्रती आपली एक बांधिलकी आहे हे त्यांना समजले तरच ही सामाजिक परिस्थिती बदलता येईल. शेतकरी कष्टकरी यांच्या जीवनातील समस्या सोडविण्यासाठी त्यावर उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कररूपी पैशाचा उपयोग व्हायला हवा. शेतकऱ्याच्या मुलाबाळांना चांगले शिक्षण मिळायला हवे, समाज संरक्षण आणि समाजस्वास्थ्य ह्या मुलभुत गोष्टी असल्या तरी त्यावर वारेमाप खर्च न करता ते सत्कारणी लागायला हवा, हे जोतीराव फुले यांनी सुचविले आहे. ज्या गोष्टी सरकारने करावयाच्या आहेत त्या इतरांवर सोपवून सरकारने अंग काढून घेऊन नामानिराळे राहाता येणार नाही, ही शेतकऱ्याच्या असूडामागे जोतीराव फुले यांची स्पष्ट भूमिका असल्याचे दिसून येते. ‘शेतकऱ्याचा असूड’ ही जोतीराव फुले यांची एक स्वच्छ भूमिका व मुलभूत दुरदृष्टी आहे. सरकार आणि सरकारी कामगार हे जनतेचे सेवक आहेत. त्यांनी जनतेच्या भल्यासाठी, हितासाठी काम करावे ही रास्त भूमिका जोतीरावांनी घेतली आहे. जोतीराव फुले यांनी तत्कालीन सामाजिक परिस्थितीत शुद्र, अतिशुद्र, शेतकरी यांना नाडविणाऱ्यांची जणू कुंडलीच मांडली आहे. इंग्रज सरकार आणि त्यांचा गलथानपणा, त्याचा गैरफायदा घेणारा भट कामगार यांच्या परोपरीच्या क्लृप्त्या जोतीराव फुले यांनी आपल्या लिखाणातून स्पष्ट केल्या आहेत. जोतीराव फुले म्हणतात,

संधि साधून।।

“हिशोबी घोळ।। सर्व गोंधळ।।

वाढवी कर्ज डोईवर।।

आंतून होई सावकार।।

पैशावर जीव।। येईना कींव।।

अर्ध्या करवी धन्यावर।।

पैसा देई गाहाणावर।।

वेळ

पाहून।

मागणी नेट त्याजवर।।

तगादा धाडी पाठीवर।।

दाम दुप्पट।। सर्व एकवट।।

नोंदिती गहाणखतावर।।

दुमाला पुस्त रजिस्टर।।’

न्याय, अत्याचाराला वाचा फोडून, शोषण, पिळवणूक यापासून मुक्त समाज निर्माण करता यावा हे जोतीराव फुले यांना यातून दाखवून द्यावयाचे आहे. यावरून त्यांनी तत्कालीन परिस्थितीचे वर्णन केलेले दिसून येते. तथापी जातीधर्माच्या नावावर कोणत्या एका समुहाचे प्राबल्य असणे हे समाजाच्या अधोगतीचे कारण ठरले आहे. स्वार्थ, आपमतलब, सर्वसामान्यांप्रती असणारी उदासिनता, दुष्ट भावना आणि दुष्ट हेतू ठेवून केलेली कार्ये समाजघातक ठरली आहेत. त्यातून सर्वसामान्य माणसाला डोके वर काढता आले नाही. वेळोवेळी धर्माचे कर्मकांडाची आणि त्याच्या अवडंबराची भीती दाखविणे, अंधश्रद्धा पसरविणे, माणसांना आपल्या प्राबल्यात, वर्चस्वाखाली ठेवणे हा धुर्त कावेबाजपणा ओळखता आला पाहिजे. समाजातील या धुर्त निशाचारांनी अख्खा समाज दुर्बल बनवून टाकला आहे. नाना त-हेचे उपदेश करून, समाजाला भ्रमिष्ट करून दिशाहीन बनविले आहे. सर्वसामान्य माणूस,शेतकरी, शेतमजूर यांचा वैचारिक आणि बौद्धिक गोंधळ उडवून देण्यात माहीर असलेली मंडळी आजही शांत होताना दिसत नाहीत. अनेक योजनांच्या, उपक्रमांच्या, सुधारणांच्या नावाखाली, नवी परिवर्तने घडवण्याच्या नादात खुपच विसंगत कार्यक्रम पार पाडले जावू लागले आहेत. सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी अट्टल कर्जबाजारी होऊ लागला आहे. उथळ भन्नाट कल्पनांचा सुळसुळाट झाला आहे. जोतीराव फुले यांनी आपल्या शेतकऱ्यांच्या असूडाद्वारे तत्कालिन समाजातील या अवडंबरावर प्रहार केले आहेत. जोतीरावांना या समाजातील थोतांड, लबाडी मान्य नाही. त्यांना विसंगती, विपर्यास, बडेजाव, शिरजोरी, ऐतखाऊपणा यासारख्या ढोंगीपणाचा तिरस्कार असलेचे दिसून येते. गरीब, श्रीमंत यातील भेद त्यांना नाहीसा करावयाचा आहे. वर्णाधिष्ठीत समाजव्यवस्था नष्ट होऊन समतेच्या तत्त्वावर आधारलेली समाजरचना जोतीराव फुले यांना अभिप्रेत आहे. समानतेचे ते पुरस्कर्ते आहेत. जातीय उतरंड, विषमता यांचा नायनाट करून सर्वसामान्य माणूस, शेतकरी, मजुर, दलित, आदिवासी यांना उन्नत जीवनमानाची जाणिव करून देणे हेच जोतीराव फुले यांना अभिप्रेत आहे.

पारंपरिक धार्मिक समजुती व उच्चवर्णीयांचे परंपरागत स्थान :

या देशातील सनातन धर्माने इथल्या समाजाच्या मनावर अनेक रूढी, परंपरा, चालीरिती, धार्मिक विधी, व्रते आणि वैकल्ये यांचा छाप उमटविला आहे. समाजाला मानसिक आणि धार्मिक गुलाम बनविले आहे. पौरोहित्य करणे आणि ते इष्ट कसे आहे हे पटवून देण्याचे काम त्याकाळातील भटांनी केले. त्याचा परिणाम म्हणून एकुणच भारतीय समाज एककली, दुर्बल आणि मागास ठेवला गेला. हे वास्तव जोतीराव फुले यांनी त्यांच्या ‘शेतकऱ्यांचा असुड’ व अन्य लेखनसाहित्यातून नेमकेपणाने दाखवून दिले आहे. मुलतः भारतीय समाज विविध जाती, पंथ आणि संप्रदायामध्ये विभागला गेला आहे. ही विभागणी विषमता निर्माण करणारी आहे. काही समाजघटक समाजाच्या उच्चस्तरावर राहिले, तर काही समाज घटक नीचस्तरावर ढकलले गेले. या विभागणीचा सर्वाधिक फायदा उच्चवर्णियांनी उठविला. उच्चवर्णिय ब्राह्मण हे नेहमीच सर्वोच्चस्थानी राहिले. श्रीमंत, सवर्ण आणि भांडवलदार हा एक वर्ग या विभागणीतून उत्पन्न झाला. त्या वर्गालाही या विभागणीचा आपोआप फायदा झाला. जोतीराव फुले म्हणतात त्याप्रमाणे तत्कालिन परिस्थिती आपल्या समोर स्पष्टपणे उभी राहते. तत्कालिन ब्रिटिश सरकारच्या सर्व खात्यामध्ये या पुरोहितशाहीने आपले बस्तान बसविले. स्वजातीचे सरकार दरबारी प्राबल्य प्रस्थापित केले. याचा परिणाम म्हणून पुरोहितशाहीने शेतकऱ्यांना अडविण्याचे आणि नाडविण्याचे काम केले. या विभागणीचा अशा पद्धतीने सर्वाधिक फायदा स्वार्थी, मतलबी व कावेबाज भट, ब्राह्मणांनी करून  घेतला. परिणामतः शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांच्या अडचणींमध्ये भरच पडत गेली. शेतकरी व सर्वसामान्यांचे अज्ञान व अडाणीपण अबाधित कसे राहील आणि स्वजातीचा अधिकाधिक फायदा कसा करून घेता येईल हे पुरोहितशाहीने कटाक्षाने पाहिले. तत्कालिन कष्टकरी समाजाचे, शेतकऱ्याचे एकूण जीवन व त्यांची होणारी अडवणूक याचे विदारक चित्र जोतीराव फुले यांनी सर्वप्रथम रंगविले. पटलेले हे विचार जोतीराव फुले यांनी आपल्या लेखणीच्या व कृतीच्या सहाय्याने प्रत्यक्षात उतरविण्याचे काम केले. कष्टकरी समाजाला गती प्राप्त करून देण्यासाठी, प्रगती हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी आणि एकूणच गरीब, कष्टकरी वर्गावर आलेले अरिष्ट नष्ट करण्यासाठी जोतीराव फुले यांनी आपल्या ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथातून मुलगामी विचार मांडले आहेत. जोतीराव फुले म्हणतात, “सरकारी सर्व खात्यांमध्ये ब्राह्मण कामगारांचे प्राबल्य असल्यामुळे त्यांचे स्वजातीय स्वार्थी भटब्राह्मण आपले मतलबी धर्माचे मिषाने अज्ञानी शेतकऱ्यास इतके नाडतात की, त्यास आपली लहान चिटकुली मुले शाळेत पाठविण्याची साधने राहात नाहीत व एखाद्यास तसे साधन असल्यास त्यांच्या दुरूपदेशाने तशी इच्छा होत नाही. सर्वसामान्य माणसाने या ब्रह्मकपटातून मुक्त व्हायला हवे. त्यांचे डावपेच ओळखून पुराणांतील भाकडकथांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलाबाळांना शिक्षण द्यायला हवे. सरकारने आणि धोरणकर्त्यांनी शेतकऱ्याच्या हालअपेष्टा समजून घेऊन त्यावर योग्य उपाय योजायला हवेत. मात्र असे घडताना दिसत नाही, उलट शेतकऱ्याला पक्षपातीपणाची वागणूक मिळताना दिसते. हे जोतीराव फुले यांनी दाखवून दिले आहे. शेतकऱ्यांपैकी काही अनाथ, रांडमुंडीची व निराश्रित पोरक्या मुलामुलींची सोय तत्कालिन सरकार रावबाजींनी केली नाही, ही खंत जोतीराव फुले यांनी व्यक्त केली आहे. भेकड इंग्रज सरकारने त्या वहिवाटी जशाच्या तशा चालू ठेवून त्याप्रित्यर्थ कष्टाळू शुद्रादि अतिशुद्र शेतकऱ्याच्या निढळाच्या घामाचे पट्टीचे द्रव्यातून हजारो रूपये साल दरसाल खर्ची घातले ही वस्तुस्थिती जोतीराव फुले यांनी दाखवून दिली आहे. यावरून शेतकऱ्याचे शुद्र, अतिशुद्राचे पारंपरिक धार्मिक स्थान आणि समजूती जशाच्या तशा राहिल्याचे दिसून येते. त्या नष्ट झाल्या नाहीत. याचा परिणाम म्हणून जोतीराव फुले म्हणतात, “सांप्रत कित्येक शुद्रादि अतिशुद्र शेतकरी ख्रिस्ती धर्म स्वीकारून मनुष्यपदास पावल्याने, भटब्राह्मणांचे महत्त्व कमी होऊन त्यांना स्वतः मोलमजूरीची कामे करून पोट भरण्याचे प्रसंग गुदरत चालले आहेत, हे पाहून कित्येक धुर्त भटब्राह्मण खुळ्या हिंदूधर्मास पाठीशी घालून नानाप्रकारचे नवे समज उपस्थित करून त्यामध्ये अपरोक्ष रितीने महमदी व ख्रिस्ती धर्माच्या नालस्त्या करून त्याविषयी शेतकऱ्यांची मने भ्रष्ट करीत आहेत. हा धुर्त कावेबाजपणा नष्ट करून पारंपरिक धार्मिक समजुती बदलल्या पाहिजेत, नव्हे या काढूनच टाकाव्यात. समाज परिवर्तनास वाव करून देता यावा, इतरांची निंदानालस्ती करणे शहाणपणाचे लक्षण नव्हे, हे बदलले तरच या देशातील माणसाला माणूसपणा प्राप्त होईल. इथली धार्मिक, सामाजिक विषमता नष्ट होऊन, जातीपातीचे उच्चाटन होऊन समता प्रस्थापित होईल यासाठी वर्तमान पिढ्यांनी अहोरात्र कष्ट करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. “शुद्र शेतकऱ्यास ज्ञान देऊ नये’ या परिस्थितीतून माणसाने बाहेर पडले पाहिजे आणि दिवसेंदिवस शिक्षण घेत राहून आपले ज्ञान वाढविले पाहिजे, संशोधन केले पाहिजे, नवनवे विचार आत्मसात करता आले पाहिजेत ही अपेक्षा जोतीराव फुले यांनी व्यक्त केली आहे.

रूढी परंपरांचे, धर्माचे अवडंबर माजवून शेतकऱ्याचे आणि शुद्र अतिशुद्रांचे फार मोठे नुकसान झाले आहे. धर्माच्या, देवाच्या नावाने सण, उत्सव साजरे करणे, त्यासाठी कर्ज काढणे हे शेतकऱ्यांच्या जीवनातील अरिष्ट होय. अडवणूक, फसवणूक यांचा नायनाट करून माणसाला नवी उर्मी द्यायला हवी. त्यासाठी त्याला नव्या विचाराने, वैज्ञानिक दृष्टीने आपले स्थान बळकट करता आले पाहिजे. याची दखल सरकार दरबारी घेऊन माणसाच्या जीवनाला गती देता येणे अभिप्रेत आहे. माणसाला माणुसपण देणारे तत्त्वज्ञान जोतीराव फुले यांनी अंगीकारले आहे. माणसाने माणसाला जगण्यासाठी वाव करून द्यायला हवा. माणसाच्या विचाराने माणसाचा विकास घडेल यावर जोतीराव फुले यांचा विश्वास आहे.

तत्कालिन शेतकऱ्याची अवस्था :

शेतकरी हा सुद्धा एक माणूसच आहे. देवाधर्माच्या थोतांडामुळे शेतकऱ्याची अवस्था बिकट झाली आहे. यावर जोतीराव फुले यांनी नेमकेपणाने बोट ठेवले आहे. अडाणीपणा, अज्ञान हेच खरे शेतकऱ्याच्या जीवनास हानीकारक ठरत आले आहे. तत्कालिन शेतकऱ्याची अवस्था वर्णन करताना जोतीराव फुले म्हणतात, “एकंदर सर्व लहानमोठ्या खेड्यापाड्यांसहित, वाड्यांनी शेतकऱ्यांची घरे, दोन तीन अथवा चार खणांची कौलारू अथवा छपरी असावयाची. प्रत्येक घरात चुलीच्या कोपऱ्यात लोखंडी उलथने अथवा खुरपे, लाकडी काथवट व कुंकणी भाणुशीवर तवा, दुधाचे मडकें व खाली आळ्यात रांधण्याच्या खापरी तवल्या, शेजारी कोपऱ्यात एखादा तांब्याचा हंडा, परात, काशाचा थाळा, पितळी चरवी अथवा वाटी, नसल्यास जुना गळक्या तांब्या शेजारी मातीचा मोखा, परळ व जोगल्या असावयाच्या. त्या लगत चारपाच डेऱ्यामडक्यांच्या उतरंडी ज्यात थोडे थोडे साठप्याला खपले, हुलगे, मटकी, तुरीचा कणुरा, शेवया, भुईमुगाच्या शेंगा, भाजलेला हुळा, गव्हाच्या ओंब्या, सांडगे, बिवड्या, मीठ, हळकुंडे, धने, मीरी, जिरें, बोजवार, हिरव्या मिरच्या, कांदे, चिंचेचा गोळा, लसुण, कोथंबीर असावयाची. त्याच्या लगत खाली जमिनीवर काल संध्याकाळी गोडबोल्या भट पेन्शनर सावकाराकडून, वाढीवाढीने जुने जोंधळे आणलेले, तुराठ्यांच्या पाट्या भरून त्या भिंतीशी लावून एकावर एक रचून ठेवलेल्या असावयाच्या. एका बाजूला वळणीवर गोधड्या, घोंगड्यांची पटकूरे व जुन्यापान्या लुगड्यांचे धड तुकडे आडवेउभे दंड घालून नेसण्याकरिता तयार केलेले धडपे, भिंतीवर एक लाकडाची मेख ठोकून तिजवर टांगलेल्या चिंध्याचांध्याच्या बोचक्यावर भुसकट व गोवऱ्या वाहावयाची जाळी, दिव्याच्या कोनाड्यात तेलाच्या गाडग्याशेजारी फणी व कुंकवाचा करंडा, वरती माळ्यावर गोवऱ्या व तीनधारी निवडंगाचे सरपणाशेजारी वैरण नीट रचून ठेवली असावयाची. खाली जमिनीवर कोन्याकोपऱ्यांनी कुदळ, कु-हाड, खुरपे, कुळवाची फास, कोळप्याच्या गोल्ह्या जाते, उखळ, मुसळ व केरसुणी शेजारी थुकावयाचे गाडगे असावयाचे. दरवाज्याबाहेर डाव्या बाजूला खापरी रांजणाच्या पाणईवर पाणी वाहावयाचा डेरा व घागर असून पलिकडे गडगळ दगडाची उघडी न्हाणी असावयाची. उजवे बाजूला बैल वगैरे जनावरे बांधण्याकरिता आढेमेढी टाकून छपरी गोठा केलेला असावयाचा.’ शेतकऱ्याने या अवस्थेतून बाहेर पडायला हवे. त्याची शेती प्रगतशील विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित असायला हवी. शेतकऱ्याचे जीवनमान उंचवायला हवे. त्याने प्रगतशील वैचारिक आणि सज्ञान असायला हवे. शेतीचे आणि जीवनाचे शिक्षण घ्यायला हवे असे जोतीराव फुले यांना अभिप्रेत आहे. जोतीराव फुले यांनी शेतकऱ्याच्या जीवनातील हे दुःख दैन्य दारिद्र्य दाखवून देऊन त्याला वाचा फोडली आहे. शेतकऱ्याची ही दीनवानी अवस्था नष्ट होऊन त्याची परिस्थिती सुधारली पाहिजे, त्यांचे जीवनमान उंचवावे, त्यासाठी समाजात समानता प्रस्थापित होणे गरजेचे आहे असे जोतीराव फुले यांना सुचवावयाचे आहे. शेतकऱ्याची परिस्थिती बदलली तरच सर्व समाजाची परिस्थिती बदलेल, जगाचा पोषिंदा, अन्नदाता या बिरूदावल्या खऱ्या ठरवायच्या असतील तर शेतकऱ्याच्या कष्टाचे चीज व्हायला हवे. शेतीला आणि शेतमालाला योग्य तो भाव, मूल्य असल्याशिवाय शेतकऱ्याला माणूस म्हणून जगता येणार नाही हेच जोतीराव फुले यांना सांगावयाचे आहे.

५) तत्कालिन शेतीची अवस्था :

जोतीराव फुले यांनी आपल्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ यामध्ये शेती हे उत्पन्नाचे साधन आहे. ते शेतकऱ्याच्या उपजीविकेचे साधन आहे, याविषयी मुलभुत विचार मांडला आहे. शेतकऱ्याच्या आपल्या शेतीतूनच अन्नधान्य, फुले, फळे, भाजीपाला पिकविता येतो आणि तेच माणसाचे खरे अन्न आहे. माणूस काहीही खाऊन पिऊन जगत असला तरी त्याला एकवेळचे तरी अन्न खावेच लागते. माणसाला अन्नधान्य, जनावरांना वैरण, पशुपक्षाला चारापाणी या सर्व गोष्टी शेतीतूनच मिळत असतात. माणसाचे जीवन शेतीच्या उत्पादन क्षमतेवर आणि उत्पन्नावरच अवलंबून आहे. शेती पिकली तरच ही सजीव सृष्ट टिकेल. उद्योगधंदे, व्यापार-उदीम, आर्थिक उलाढाल, सामाजिक स्वास्थ्य आणि राजकीय खेळी यांना महत्त्व प्राप्त होईल. शेतीच्या जीवावरच समाजाचे भरणपोषण होत असते हे विसरून चालणार नाही. विज्ञान तंत्रज्ञान हे शेतीला पुरकच असले पाहिजे. योग्य ती खते, औषधे शेतीचे रक्षण करू शकतील हे जरी खरे असले तरी शेतीची सुपीकता, शेतीला भरपूर पाणी याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत, हे जोतीराव फुले यांनी दाखवून दिले आहे.

जोतीराव फुले यांनी युरोपमधील रोमन लोकांनी कसलेल्या शेतीचे वर्णन केले आहे. तेथे शेतीची निर्मिती कशी झाली यावर प्रकाश टाकला आहे. शेतीमुळेच जगभरात व्यापारधंद्याचा विस्तार झालेला दिसून येतो. इंग्रज, मुस्लीम आणि इतरांनी एकमेकांवर कुरघोड्या करून, भारतासारख्या देशावर स्वाऱ्या करून इथल्या जनतेला, शेतकऱ्याला लुटले, लुबाडले. ब्राह्मणांच्या धुर्तपणाने आणि कावेबाज धोरणाने इथल्या शुद्र अतिशुद्र लोकांना आणि शेतकऱ्याला दरिद्री, भुकेकंगाल बनविले. तथापि तत्कालिन सरकारने इथल्या सर्वसामान्य माणसाच्या बोडक्यावर अनेक प्रकारचे कर असताना लोकल फंड नावाचा आणखी एक कराचा बोजा लादला आणि या देशातील शेतकऱ्याला पुरता जेरीस आणला हे वास्तव जोतीराव फुले यांनी दाखवून दिले आहे. जोतीराव फुले म्हणतात, “इरिगेशन खात्यावरील बेपर्वा युरोपियन इंजिनिअर आपली सर्व कामे ब्राह्मण कामगारांवर सोपवून आपण वाळ्याचे पडद्याचे आत बेगम साहेबासारखे ऐषआरामांत मर्जीप्रमाणे कामे करीत बसतात. इकडे धुर्त ब्राह्मण कामगार आपली हुशारी दाखविण्याकरिता इंजिनिअर साहेबांचे कान फुकून त्याजकडून पाहिजेल तेव्हा, पाहिजेल तसे जुलमी ठराव सरकारकडून पास करून घेतात.” शेतीच्या वाईट अवस्थेला कारणीभूत असणारे घटक दिवसेंदिवस वाढतच चाललेले दिसून येतात. शेतकऱ्याला आणि त्याच्या शेतीला नाडविणे हा जणू या भटकामगारांचा धंदाच होऊन बसला आहे असे म्हणावे लागते. जोतीराव फुले म्हणतात, “वक्तशीर कालव्यातील पाणी सरल्यामुळे शेतकऱ्याची एकंदर सर्व जितराबांची होरपळून राखरांगोळी जरी झाली, तरी त्याची जोखीम इरिगेशन खात्याच्या शिरावर नाही.” सरकारनेच जर शेतीकडे दुर्लक्ष केले तर शेतकऱ्याने कुणाच्या तोंडाकडे पहावे? हा प्रश्न जोतीराव फुले यांनी उपस्थित करून शेतीच्या अवस्थेविषयी इरिगेशन खाते सुद्धा तेवढेच जबाबदार आहे. सरकार आणि इरिगेशन खात्याच्या कारभारावर आसूड ओढून जोतीराव फुले यांनी सरकारला शेतीच्या होणाऱ्या नुकसानीची जाणिव करून दिली आहे. सरकारने ही नुकसान भरपाई कबूल करायला हवी. शेतीचे होणारे नुकसान भरून द्यायला हवे, हे रोखठोक सांगण्यात जोतीराव फुले यांनी मागेपुढे पाहिले नाही. शेतकऱ्याच्या प्रश्नांना वेळीच वाचा फोडणारा पहिला महान तत्वचिंतक म्हणून जोतीराव फुले यांचा उल्लेख करावा लागेल. जोतीराव फुले यांनी शेतीची अवस्था सुधारण्यासाठी शेतीव्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन यावरही भर दिलेला दिसून येतो. जोतीराव फुले म्हणतात, “जेथे हजारो रूपये दरमहा पगार घशात सोडणाऱ्या गोऱ्या व काळ्या इंजिनिअर कामगारास धरणात हल्ली किती ग्यालन पाणी आहे, याची मोजदाद करून ते पाणी पुढे अखेर पावेतो जेवढ्या जमिनीस  पुरेल, तितक्याच जमिनीच्या मालकास पाण्याचे फर्मे द्यावे, असा तर्क नसावा काय?” जोतीराव फुले यांनी नेमका प्रश्न उपस्थित करून कामचुकार सरकारी इरिगेशन खात्याची अब्रुच वेशीवर टांगली. त्यांच्या कामातील हलगर्जीपणा, गलथानपणा दाखवून देऊन त्या कामगारांना ताळ्यावर आणण्याचे काम जोतीराव फुले यांनी आपल्या लेखणीतून केले आहे.

शेती सुधारण्याची उपाय योजना :

शेतकऱ्याला शेती कसण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या अवजारांची आवश्यकता लागते. त्यासाठी त्याला कर्ज काढावे लागते. कर्ज काढून त्यावरील व्याज फेडता फेडता शेतकऱ्याच्या अनेक पिढ्या लयास गेल्या आहे. शेतकरी स्वतः आपल्या मुलाबाळांसह शेतीत राबत आहेत. शेतीत कष्ट करून रक्ताचे पाणी करत आहेत. जोतीराव फुले यांनी तत्कालीन शेतीची अवस्था दाखवून देऊन ती सुधारण्याविषयी आपले विचार मांडले आहेत. जोतीराव फुले म्हणतात, “सरकारचे मनात जर आम्हा कंगाल शेतकऱ्यांविषयी खरोखर कळवळा आहे, तर ते आपले विलायती सावकारांचे एक अर्ब रक्कमेचे व्याज अजिबाद बंद का करीत नाहीत? आणि तसे केल्याबरोबर शेतकऱ्याचे पाय कसे थारी लागत नाहीत, हे पाहू बरे?” शेतकऱ्याच्या शेतीवरील कर्ज नष्ट व्हावे, त्याला कर्ज काढावे लागू नये. शेतकऱ्याच्या कर्जाला व्याज असता कामा नये तरच शेतकऱ्याला शेतीसाठी खर्च करता येईल. शेतीच्य खर्चाची रक्कम कर्जस्वरूपात असल्याने ती व्याजापोटी फुगत जाते. तत्कालीन ब्रिटिश सरकारने शेतकऱ्याच्या कर्जावरील व्याजाची रक्कम विलायतेस नेऊन तेथील सावकारांस मोठे केले आणि भारतीय शेतकऱ्यास कर्जबाजारी बनविले. कर्जाचे  अव्वाच्या सव्वा व्याज देऊनच शेतकरी आणि सर्वसामान्य माणसे जेरीस येतात. हे आजही दिसून येते आहे. शेतीची खालावलेली अवस्था सुधारण्यासाठी सरकारने, इरिगेशन खात्याने शेतकऱ्यास मदत केली पाहिजे. पाण्याचे योग्य ते वाटप होणे, दुष्काळासारख्या परिस्थितीत पाण्याचे नियोजन करता येणे, हे तांत्रिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरते असे जोतीराव फुले यांना दाखवून द्यावयाचे आहे. जोतीराव फुले म्हणतात, “आमचे न्यायशील सरकार आपले हाताखालच्या ऐशआरामी व दूसरे धुर्त कामगारांवर भरवसा न ठेवता शेतकऱ्याच्या शेतीस वेळच्यावेळी पणी देण्याचा बंदोबस्त करून, पाण्यावरचा दर कमी करीत नाहीत, म्हणून सांप्रतकाळी शेतकऱ्यांची दिवाळी निघून सावकारास त्याच्या घरादाराचे लिलाव करून, ते सर्व पैसे या निर्दयी कामगारांच्या पदरी आवळावे लागतात.’ शेती आणि शेतकऱ्यांविषयी योग्य ती माहिती सरकारी खात्यांनी जतन करून ठेवायला हवी. शेतीच्या आवश्यकतेनुसार शेतीस लागणारी खते, पाणी, बी-बियाणे यांचे दर सरकारी दरबारी योग्य असणे आणि ते शेतकऱ्याला परवडणे हे शेतकऱ्याच्या हिताचे ठरते. शेती सुधारण्यासाठी आणि पिकविण्यासाठी अशा उपाययोजना करता यायला हव्यात, तरच शेतकऱ्याला शेती फायद्याची होईल, त्याच्या घरादाराचे लिलव होणार नाहीत, शेतकऱ्यावरील अरिष्ट टाळता येईल, हेच जोतीराव फुले यांना दाखवून द्यावयाचे आहे. समाजातील या सामान्य माणसांवर होणारा अन्याय, अत्याचार नाहीसा करण्यासाठी कायद्याची आवश्यकता असली तरी ते कायदे लोकशाही मार्गाने करणे हे समाजहिताचे ठरते. शासनकर्त्यांनी कायदे मोडीत काढून आपण काहीतरी चांगले करतो आहोत आणि ते लोकांच्या हिताचे करतो आहोत या भुलथापा देऊन ऐषआरामात जगणे हेच सर्वसामान्य माणसाला जीवनातून उठविणारे आहे. शेतकऱ्याच्या जीवनातील अरिष्टे अशा भुलथापानीच बळावली आहेत असे जोतीराव फुले यांच्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथातील विवेचनावरून दिसून येते. जोतीराव फुले म्हणतात, “शेतकऱ्याच्या शेताच्या पाण्याच्या मानाप्रमाणे प्रत्येकास एकेक तोटी करून द्यावी, जिजपासून शेतकऱ्यास जास्त पाणी वाजवीपेक्षा घेता न यावे.” ही जोतीराव फुले यांची दुरदृष्टी आहे. शेतीसाठीच्या पाण्याच्या नियोजनाचे व्यवस्थापन ते दाखवून देतात. शेतकऱ्याने आणि सरकारने सुद्धा यातून नेमका बोध घ्यायला हवा. शेती ही अतिशय महत्त्वाची वेगळी असूच आणि शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याची आहे. शेती सुधारण्याची उपाय योजना याहून शकत नाही. हवे तेवढे आणि नेमके पाणी मिळणे हे शेतकरी आणि शेतीसाठी उपकारक ठरते. यावरून पाण्यासाठी होणाऱ्या खर्चात बचत होईल. पाण्यावरचे दर कमी करण्यचे ठराव पास करता येतील असे जोतीराव फुले यांना दाखवून द्यवयाचे आहे. शेतीसाठी करावयाचे कानून कायदे शासनकर्त्यांनी आणि कामगारांनी पायदळी तुडवावयाचे आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीकडे दुर्लक्ष करावयाचे ही ठकबाजी कमी झाली पाहिजे. शेतकऱ्यासाठी इमानेइतबारे काम करणे हे सरकारी नोकर चाकरांनी लक्षात घेऊन काम केले पाहिजे, तरच शेती सुधारण्यास मदत होईल. शेतकऱ्यावरील अन्याय दूर होईल. शेतकऱ्याला ज्या जुलुम, जबरदस्ती आणि पिळवणूकीला सामोरे जावे लागते ते थांबविता येईल. जोतीराव फुले यांनी शेतीचे आणि पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन दाखवून देऊन सरकारी कामगारांनी, इरिगेशन  खात्याने शेतकऱ्याच्या हिताकडे लक्ष दिले तरच शेतकऱ्याच्या जीवनातील अरिष्ट टळेल. शेतीत सुधारणा घडून येईल असा सल्ला जोतीराव फुले यांनी दिला आहे.

जोतीराव फुले यांच्या विचारांची सद्यकालीन प्रस्तुतता :

तत्कालीन शेतकऱ्याला अनेक अरिष्टे आणि संकटांनी ग्रासले होते. त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनतील दुःख, दैन्य, दारिद्र्य कमी होताना दिसत नाही. जोतीराव फुले यांनी या शेतकऱ्याला नाडविणाऱ्याची आणि अडविणाऱ्याची चांगलीच फजिती केली आहे. जोतीराव फुले यांनी शेतकऱ्याच्या जीवनातील अरिष्टाचे विश्लेषण केले आहे. तत्कालीन शेतकऱ्याच्या जीवनातील वास्तव दखवून देऊन जिज्ञासू, विद्वान, अभ्यासक आणि भारतीय राज्यकर्ते, यांना त्यांनी अंतर्मुख बनविले आहे. जोतीरावांनी आपल्या विचारांची धार दाखवून दिली आहे.

आजच्या शासनकर्त्यांनी जोतीराव फुले यांच्या विचारातील वास्तव समजून घेतले पाहिजे. शेतकऱ्याच्या जीवनातील आणि शेतीवरील अरिष्ट यांचा विचार केला पाहिजे. हा शेतकरी ग्रामीण, कष्टकरी, जिरायत, पावसाच्या भरवशावर शेती करणारा शेतकरी आहे. शेती कसण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा पैसा नसलेला कंगाल शेतकरी आहे. या शेतकऱ्याला वेळोवेळी बदलणाऱ्या सरकारी धोरणांचा सामना करावा लागला आहे. राज्यकर्त्यांनी आपापल्या राजकारणासाठी, पक्षीय बळांसाठी शेतकऱ्याचा वापर करून घेतला आहे. शेतकरी, सर्वसामान्य माणूस, दलित, आदिवासी यांनाच लक्ष करून राज्यकर्त्यांनी आपले राजकारण केल्याचे दिसून येते. सरकार दरबारी निर्णय घेताना सर्वहारा वर्गावर अन्याय झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. सर्वहारावर्गाचे जीवनमान उंचावणे, त्यांची गरीबी, दैन्य अवस्था नाहीशी होण्याऐवजी दिवसेंदिवस त्यात भरच पडत आहे असे दिसून येते. उलट सवर्ण, श्रीमंत, भांडवलदार यांच्या हिताची जोपासणा करणे, त्यांचे गोडवे गाणे यामुळे प्रचंड मोठी विषमता निर्माण झाली आहे. गरीब हा गरीबच राहिला आहे आणि श्रीमंत हा श्रीमंतच होत चालला आहे. राज्यकर्त्यांनी शेतकरी, शेतमजूर, दलित, कष्टकरी, आदिवासी यांना विचारात घेऊन सर्वसामान्य माणसाभिमुख धोरणे आखणे अथवा सर्वहारावर्गाच्या हिताचे, त्यांना उपकारक ठरतील असे निर्णय घेणे महत्त्वपूर्ण ठरते. अलिकडच्या काळातील शासनकर्ते ही शेतकऱ्यांचीच मुले आहेत त्यांना शेतीची उपयोगिता आणि शेतकऱ्याची अवस्था लक्षात यायला नको का? असा प्रश्न उपस्थित करता येईल. आरक्षणासारख्या, शेतीसारख्या, शेतीच्या उपयोगासाठी वीज, पाणी यासारख्या घटकांवर राजकारण करून एकमेकांवर चिखलफेक करून, कुरघोड्या करून, शाब्दिक छल करून शेतकऱ्याचे, सर्वहारावर्गाचे प्रश्न बाजूला फेकले गेले आहेत. शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे आणि ते सोडविण्यची पराकाष्ठा करणे या ऐवजी आपली राजकीय पोळी भाजून घेण्यात राज्यकर्ते दंग झाले आहेत. सरकारी कर, पट्ट्या, फंड, गुंतवणूक यासारख्या आर्थिक अरिष्टांनी सर्वसामान्य माणसाचे कंबरडेच मोडले आहे. जोतीराव फुले यांनी आपल्या ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथात शेतकरी अणि त्याच्या शेतीच्या शोषण पिळवणूकीचा पाढाच वाचला आहे. शेतकऱ्याने आपले एखादे काम करून घेता येत नव्हते हे वास्तव जोतीरावांनी दाखवून दिले आहे. शेतकऱ्याने चिरीमिरी दिली नाही तर तो कामगार आपल्या इतर संबंधित जातबांधवास, सग्यासोयऱ्यांस सांगून शेतकऱ्यास जेरीस आणल्याशिवाय राहात नसे, हे आज दडून राहिले नाही. लाच देणे आणि घेणे हा गुन्हा असला तरी हे प्रकार थांबलेत आणि नष्ट झालेत असे दिसून येत नाही.

शेतकऱ्याला आपल्या संसार प्रापंचिक गोष्टीवर खर्च करावा लागतो त्यामुळे तो कर्जबाजारी होतो हे म्हणणे धादांत खोटे आहे हे जोतीराव फुले यांनी आपल्या शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथात दाखवून दिले आहे. जोतीराव फुले म्हणतात, “जगातील एकंदर सर्व देशांचे इतिहास एकमेकांशी तोडून पाहता, हिंदूस्थानातील अज्ञानी व देवभोळ्या शुद्र शेतकऱ्याची स्थिती मात्र इतर देशातील शेतकऱ्यापेक्षा निकृष्ट असवस्थेस पात्र होऊन केवळ पशुपलिकडचे मजलशीस जाऊन पोहचली, असे दिसून येईल.” भारतीय शेतकऱ्याच्या जीवनात देव, धर्म, धार्मिक विधी, अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांचे फार मोठे प्राबल्य आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस धार्मिक बंधनात अडकल्याचे दिसून येते. धार्मिक अवडंबराने या देशातील शेतकऱ्याच्या वाट्याला आलेले जीवन भ्रमिष्ट अवस्थेतील करून टाकले आहे. इथला शेतकरी अनेक भ्रमांमध्ये, बडेजाव करण्यामध्ये गुंग झालेला दिसून येतो. त्याला अहंकार मोठेपणा यासारख्या भ्रामक, भोंगळ अविर्भावाचा सोस पडल्याचे दिसून येते. याचा परिणाम म्हणून इथला शेतकरी, सर्वहारा माणूस इतरांशी जीवघेणी स्पर्धा करू लागला आहे. इर्षा बाळगू लागला आहे. आपल्याला झेपत नसलेल्या गोष्टींचा स्वीकार करू लागला आहे. भारतीय भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार आहार, विहार आणि विचार करणे या विषयी प्रबोधन होणे, शेतकऱ्यासाठी आणि शेतीसाठी योग्य ठरेल. शेतीचे नेमके तंत्रज्ञान माहीत करून घेणे, नगदी पिकांसाठी लागणारे कौशल्य आत्मसात करणे शेतकऱ्याच्या हिताचे ठरते. पिकपाण्याचे विज्ञान तंत्रज्ञान माहित असणे अत्यावश्यक ठरावे. आपली आणि आपल्या शेतीची क्षमता त्याने जाणून घेणे आणि प्रशिक्षित होणे शेतकऱ्यास आणि सर्वसामान्य माणसास आधुनिक जीवन पद्धतीत मोलाचे ठरेल. पुरेशा पाण्याचा वापर समजून घेऊन, पाऊस आणि हवामान यांच्या प्रगतशील तंत्रज्ञानानेच शेतकऱ्याच्या जीवनाला उभारी येईल हे शेतकऱ्याबरोबरच इथल्या राज्यकर्त्यांनी लक्षात घेणे, शेतकऱ्याच्या जीवनात आशा पल्लवीत करणे ही जोतीराव फुले यांच्या विचारांची प्रस्तुतता ठरेल.

शेतकऱ्याच्या जीवनातील वस्तुस्थिती आणि परिस्थिती विचारात घेऊन सामाजिक बदल होणे, वैचारिक परिवर्तन होणे याला महत्त्व आहे. शेतीसाठी असणारे जातीवंत वाण, बी- बियाणे, जनावरांची पैदास याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. आधुनिकतेच्या नावाखाली विदेशी बी-बियाणे, संकरीत जनावरे, किटकनाशके आणि औषधे यांचे धोके ओळखून निवड करणे योग्य ठरेल. पिकांची, फळाफुलांची, वनस्पतींची आणि जनावरांची नैसर्गिक बूज राखणे शेतकऱ्यासाठी आवश्यक आहे. मुळचा वाण, बी, पिंड, रूप, रंग, गंध नाहीसा करून कृत्रिमपणे निर्माण केलेल्या पैदाशीने शेतकऱ्याला परावलंबी व्हावे लागले आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्याचे परावलंबित्व वाढत जाऊन पैशाला महत्त्व प्राप्त झाल्याने शेतीसाठी असणारे वस्तुविनिमय बंद पडले आहेत. शेतकरी पद्धतीतील वाढता पैशाचा वावर शेतकऱ्यास हानीकारक ठरू लागला आहे. बदलते हवामान, बदलती जीवनशैली शेतकऱ्याच्या आवडीनिवडीत विसंगती निर्माण करताना दिसते. प्रा. हरि नरके म्हणतात, “जोतीरावांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथात १८८३ साली शेती आणि शेतकरी यांच्या समग्र विकासाचे संकल्पचित्र प्रकाशित केले. शेतीचे शिक्षण, संकरित बियाणे, अवजारे, पिकपद्धती, शेतीला जोडधंदे, ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या मोहिमेद्वारे पाणी पुरवठ्याचे नियोजन आधुनिक पद्धतीने करण्यावर त्यांनी भर दिला. शेतीमालाला ‘उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव’ मिळाले पाहिजेत याचा त्यांनी आग्रह धरला.’ शेतकरी हा केवळ हौस-मौज म्हणून किंवा छंद म्हणून शेती करीत नसून या देशाच्या उन्नती आणि विकासात शेतीचा आणि शेतकऱ्याचा फार मोठा महत्त्वाचा वाटा आहे. इथला माणूस आणि त्याचे जीवनमान शाश्वत राहण्यासाठी शेतीला आणि शेतकऱ्याला प्राधान्य देणे हे जोतीराव फुले यांच्या विचाराचे महत्त्व आणि प्रस्तुतता दाखवून देते. केवळ औद्योगिक आणि भौतिक विकासच देशाला आणि समाजाला तारू शकेल असे नव्हे तर, शेती शेतकऱ्याचे कष्ट, सर्वसामान्य माणसाचे योगदान हे या देशाच्या आणि समाजाच्या विकासासाठी हातभार लावणारे आहे. जोतीराव फुले यांनी दाखवून दिले आहे की, या देशातील भट ब्राह्मण अतिशय कृतघ्नपणे वागून आपला स्वार्थ साधत होते. त्यांना इथल्या शुद्र अतिशुद्र समाजाचे काहीही देणे घेणे पडलेले नाही हे वास्तव असल्यामुळे या देशाचा विकास शेतकऱ्याशिवाय होणार नाही. सर्वहारावर्गाचा सहभाग असल्याशिवाय हा समाज आणि देश सुधारू शकणार नाही, हीच जोतीराव फुले यांच्या विचारांची प्रस्तुतता आहे. प्रा. हरि नरके म्हणतात, “शेती परवडत नाही म्हणून आजवर देशातील लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. १३० वर्षापूर्वी त्यांनी शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळाल्याशिवाय शेती आणि शेतकरी यांचे दैन्य संपणार नाही असे ‘शेतकऱ्याचा असूड’मध्ये सांगून या समस्येकडे देशाचे लक्ष वेधले होते. आधुनिक पद्धतीची शेती करणे, तलाव, तळी, धरणे बांधून शेतीला ‘नळाद्वारे’ पाण्याचा पुरवठा करणे, शेतीला जोडधंदे, पुरक उद्योग यातून शेती किफायतशीर बनविण्याचा नकाशा त्यांनी मांडून दाखविला होता. अशाप्रकारे आजच्या ठिबक सिंचनाचे बीजरूपच जणू ते दाखवित होते.’ वरील अवतरणाचे खुलाशेवार विश्लेषण करावे लागेल. आजच्या शेतकऱ्याच्या संदर्भात हे अवतरण काही स्पष्टपणे सांगते. देशामध्ये लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही.आजचा शेतकरी आत्महत्या का करतो? या प्रश्नाचे एक उत्तर असे की, शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळत नाही. आजचे हे वास्तव जोतीराव फुले यांनी एकोणीसाव्या शतकातच ओळखले होते. ‘उत्पादन खर्चावर आधारित’ बाजारभाव मिळाल्याशिवाय शेती आणि शेतकरी यांचे दैन्य संपणार नाही हे वास्तव जोतीराव फुले यांनी ओळखले होते. ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथात फुले यांनी या समस्येचे तत्कालीन समाजधुरीणांचे व राजकारण्यांचे लक्ष वेधले होते. शेतकऱ्याच्या दृष्टीनेही जोतीरावांनी आपले म्हणणे याच ग्रंथात मांडले आहे. शेतीला आधुनिक रूप दिले पाहिजे अशी मागणी जोतीरावांनी केलेली दिसते. शेतीला होणाऱ्या पाणीपुरवठ्या संबंधी देखील जोतीराव फुले आग्रही होते. १३० वर्षापूर्वी फुलेंनी तलाव, तळी, धरणे बांधून शेतीला नळाद्वारे पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी तत्कालीन सरकारकडे केले, एकाअर्थाने जोतीराव फुल्यांनी समन्यायी पाणी वाटपाचे धोरण त्या काळात सुचविले होते. नळाद्वारे पाण्याचा पुरवठा करणे म्हणजेच आधुनिक काळात ठिबक सिंचन पद्धतीचा स्वीकार करणे होय. आजच्या काळात जोतीराव फुले असते तर त्यांनी ठिबक सिंचनाचा पुरस्कार केला असता. शेतीबरोबरच काही जोडधंदे व पूरक उद्योगांची शिफारसही जोतीरावांनी आजच्या काळाला अनुसरून केली असती. यावरून स्पष्ट होते की जोतीराव फुले हे शेतीचा, शेतकऱ्याचा व त्याने उत्पादित केलेल्या मालाचा मुलगामी विचार करणारे दृष्टे विचारवंत होते.

शेतकरी मग ते एकोणिसाव्या शतकातील असो अथवा एकविसाव्या शतकातील असो त्याला दोन प्रकारची संकटे नेहमीच भेडसावतात. आपल्या देशातील शेतकरी हा निसर्गावर अवलंबून राहतो. तथापि निसर्ग बऱ्याचवेळा लहरीपणाने वागतो कधी पाऊस खूप पडतो तर कधी तो पडतच नाही. काही भागात पडतो तर काही भागात अजिबातच पडत नाही. कधी ओला दुष्काळ पडतो तर कधी कोरडा दुष्काळ पडतो. अशा या आस्मानी संकटाला तोंड देण्यास तो नेहमीच सज्ज असतो. तथापि अशा संकटाच्यावेळी शासन व्यवस्थेने त्याला काही मदतीचा हात देणे आवश्यक असते. परंतु भारतीय इतिहासात शेतकऱ्याकडे अशा परिस्थितीत दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले आहे. दुसऱ्या बाजूला शासनव्यवस्थाच आडमुठे धोरण अंमलात आणू इच्छिते. या आडमुठेपणाचा तोटा शेतकऱ्यालाच सहन करावा लागतो. भारतीय इतिहासात असे बरेच कालखंड येऊन गेले आहेत. त्या कालखंडात शासनव्यवस्थेने शेतकऱ्याची उपेक्षा केल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. इतिहासकाळ बाजूला ठेवू, आजचे शासनकर्तेही बऱ्याचवेळा शेतकऱ्याच्यां वाजवी प्रश्नाकडे ढुंकूनही लक्ष देत नाहीत. गेंड्याच्या कातडीचे हे असंवेदनशील सरकार शेतकऱ्याला सर्व बाजूंनी नाडताना दिसते. अशाप्रकारे एका बाजूला सुलतानी संकट आणि दुसऱ्या बाजूला आस्मानी अरिष्ट अशा कात्रीत भारतीय शेतकरी अनेकदा भरडला गेला आहे. आजही लोकशाही शासन व्यवस्था कार्यरत असताना शेतकरी आणि शेतकऱ्यावरील संकटे बऱ्याचवेळा दुर्लक्षित राहतात. कधीकधी शासनयंत्रणा अशा शेतकऱ्यांपर्यंत पोहचू शकत नाही, ही सर्वात दुःखाची गोष्ट होय. मला असे वाटते की, शेतकऱ्याचा आसूड मधील जोतीराव यांचे विचार आजच्या शेती आणि शेतकरी वर्गाच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरणारे आहेत. हे विचार सरकार व सरकारी यंत्रणेच्या पातळी व योग्य ती धोरणे आखून त्यांची यथायोग्य अंमलबजावणी केल्यास आजच्या शेतकऱ्याला आत्महत्या कराव्या लागणार नाहीत. जोतीराव फुले म्हणतात, “आर्य विद्वज्जनांस, जर खरोखर या देशातील सर्व लोकांची एकी करून या देशाची उन्नती करणे आहे, तर प्रथम त्यांनी आपल्या विजयी व पराजितांमधील चालत आलेल्या दृष्ट धर्मास जलसमधी देऊन, त्या जुलमी धर्माने नीच केलेल्या शुद्रादि अतिशुद्र लोकांसमक्ष उघड रीतीने, आपल्या वेदांतमतासह जातीभेदाचे उरावर थयथया नाचून कोणाशी भेदभाव न ठेवता, त्यांच्याशी कृत्रिम करण्याचे सोडून निर्मळपणे वागू लागल्याशिवाय सर्वांची खरी एकी होऊन या देशाची उन्नती होणे नाही.’ समाजातील विषमता नष्ट होऊन समता प्रस्थापित होणे हेच जोतीराव फुले यांना अभिप्रेत आहे. बेकी सोडून या देशामध्ये एकी होणे आवश्यक आहे. कृत्रिम छद्मीपणा सोडून निर्मळ सत्यपणाने वागण्याची नितांत गरज आहे. जोतीराव फुले यांच्या विचाराचे हे धारदार गमक आहे. आधुनिक शासनकर्त्यांनी, समाजाच्या पुरस्कर्त्यांनी आणि या देशातील विद्वानांनी जोतीरावांच्या विचारांची धग समजून घेणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हीच फुलेंच्या विचारांची सद्यकालीन प्रस्तुतता ठरेल.

संदर्भ

१) रंधों, शेष समाजस्वास्थ ,पद्मगंधा प्रकाशन पुणे, २०१०.

२) महात्मा फुले, समग्र वाङ्मय

लेखक बॅ.बाळासाहेब खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ला ( सिंधुदुर्ग ) येथे तत्त्वज्ञान विषयाचे प्राध्यापक आहेत.