१.धागा…

तुझ्या मनगटावर दादा 
बांधला मी धागा
ठेव काळजात तुझ्या 
मला थोडीतरी जागा

तुझा फुलू दे संसार 
वेल जावो मांडवाला
शीणलेला माझा जीव 
येतो तुझ्या विसाव्याला 

तुझी काकरी नको रे 
तुझा बांधही नको रे 
तुझ्या भरल्या घरात 
मला कोपरा असू दे 

माझ्या जिवाचा धगाटा 
आयुष्याचा रे उन्हाळा 
आता कुठं उतरला 
माझ्या घरी पावसाळा 

बाप कष्टला झुंजला 
माय मातीमाय झाली 
तापलेल्या आयुष्याला 
आता घट्ट साय आली

तुझ्या माझ्या भवताली 
घट्ट नात्यांचे रिंगण 
नाही तुटायाचे असे 
वेड्या मायेचे बंधन


२.बायांनो…

तुमच्या चर्चा शिफॉन, नेट, इटालियन सिल्क
आणि भरजरी साड्यांच्या…
अप्पर लिप्स, ब्लीच, फेसियल, ॲब्रो
आणि मँचिंग कलरच्या…
आमचं बोलणं 
हंडाभर पाण्याचं
तळपत्या उन्हाचं
आणि बांधावरच्या घामाचं…

सयांनो…
तुम्ही किती गं निटनेटक्या…
टापटीप…
आणि लूक जपणा-या…
तुमचं रूबाबदार झोकात चालणं
भाषाही मोजकी…निवडलेली…
आणि हायफाय…

आमची मातीत मळलेली रंगहीन पातळं
रापलेले हात…
मोकळंढाकळं बोलणं…
गणगोतावळ्याचं…
पाऊसपाण्याचं…
माहेरपणाचं…

सख्यांनो …
अभिमान वाटतो गं तुमचा
आणि हेवासुध्दा…
कारण…
आम्ही बांधावरच्या बाभळी
वेड्यावाकड्या वाढलेल्या…
आणि तुम्ही

तुम्ही बागेतल्या वेली
आभाळाकडे झेपावणा-या…
पण, 
आपली वाट एकच ना…
बाईपणाची…
धर्मही एकच…माती धरुन ठेवण्याचा…
आणि भितीही एकच…
माती सुटण्याची…
पण, फरक फक्त  एवढाच…
आमच्या अंगाफांद्यांवर घाव बसूनही
आम्ही उभ्याच…
आणि तुमचा मात्र …
बोन्साय झालेला.


लता ऐवळे-कदम सांगली जिल्ह्यातील अंकलखोप येथील असून त्या मराठीतील आघाडीच्या कवयित्री आहेत.

ईमेल आयडी-aivalelata@gmail.com