विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने १० व ११ डिसेंबर २०२२ रोजी पुणे येथे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित केले होते. या संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ विचारवंत व जनचळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर हे होते. यांनी या संमेलनात केलेले अध्यक्षीय भाषण विद्रोही साहित्य संमेलनाच्या सौजन्याने मासिक सत्यशोधक प्रतिशब्दच्या वाचकांसाठी या अंकात देत आहोत.

-संपादक

जन साहित्य, जन संस्कृती आणि जन कलांचे प्रतिनिधी असलेल्या स्त्री-पुरुष जनांनो,

या साहित्य, संस्कृती, कलांच्या संमेलनात आपल्या सर्वांच्यासह सहभागी होत असताना मला आनंद होत आहे.

सर्व प्रथम मला, १९९९च्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे प्रेरणास्थान असलेल्या, महात्मा फुले यांनी ग्रंथकार सभेस लिहिलेल्या पत्राची तुम्हाला आठवण मुद्दाम करुन द्यायची आहे. कारण त्यातल्या आशयामुळेच आम्हाला ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या समांतर विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करावेसे वाटले. ते लिहितात.-работни обувки fw34 steelite lusum s1p 38
normamascellani.it
covorase man
bayern münchen spieler
karl sneakers
addobbi fai da te matrimonio
prestonstadler.com
spoločenské šaty pre moletky
fingateau.com
lifeonthevineministries.com

“वि. वि. आपले ता. १३. माहे मजकूरचें कृपापत्रासोबतचें विनंतिपत्र पावलें. त्यावरून मोठा परमानंद झाला. परंतु माझ्या घालमोठ्या दादा, ज्या गृहस्थाकडून एकंदर सर्व मनुष्याच्या मानवी हक्काविषयीं वास्तविक विचार केला जाऊन ज्यांचे त्यांस ते हक्क त्यांच्याने खुषीनें व उघडपणें देववत नाहींत. व चालू वर्तनावरून अनुमान केलें असतां पुढेही देववणार नाहींत, तसल्या लोकांनी उपस्थित केलेल्या सभांनी व त्यांनी केलेल्या पुस्तकांतील भावार्थाशीं आमच्या सभांचा व पुस्तकांचा मेळ मिळत नाहीं. कारण त्यांच्या पूर्वजांनी आम्हांवर सूड उगविण्याच्या इराद्यानें, आम्हांस दास केल्याचें प्रकर्ण त्यांनी आपल्या बनावट धर्मपुस्तकांत कृत्रिमार्ने दडपलें. याविषयीं त्यांच्यांतील जुनाट खल्लड ग्रंथ साक्ष देत आहेत. यावरून आम्हां शूद्रादि अतिशूद्रांस काय काय विपत्ति व त्रास सोसावे लागतात. हे त्यांच्यांतील ऊंटावरून शेळ्या वळणाऱ्या ग्रंथकारांस व मोठमोठ्या सभास्थानीं आगांतूक भाषण करणारांस कोठून कळणार? हैं सर्व त्यांच्या सार्वजनिक सभेच्या उप्तादकांस जरी पक्के माहीत होतें, तरी त्यांनी फक्त त्यांच्या व आपल्या मुलाबाळांच्या क्षणिक हिताकरितां डोळ्यावर कातडें ओढून त्याला इंग्रज सरकारांतून पेनशन मिळतांच तो पुनः अट्टल जात्याभिमानी, अट्टल मूर्तिपूजक, अट्टल सोवळा बनून आपल्या शूद्रादि अतिशूद्रांस नीच मानूं लागला; व आपल्या पेनशनदात्या सरकारने बनविलेल्या कागदाच्या नोटीससुद्धां सोवळ्यानें बोट लावण्याचा विटाळ मानूं लागला! अशीच कां शेवटी ते सर्व आर्य ब्राह्मण या हतभाग्य देशाची उन्नति करणार! असो, आता यापुढे आम्ही शूद्र लोक. आम्हांस फसवून खाणाऱ्या लोकांच्या थापांवर भुलणार नाहींत. सारांश, यांच्यांत मिसळल्यानें आम्हा शूद्रादि अतिशूद्रांचा काही एक फायदा होणें नाहीं, याबद्दल आमचा आम्हीच विचार केला पाहिजे. अहो. त्या दादांना जर सर्वांची एकी करणें असेल, तर त्यांनी एकंदर सर्व मानवी प्राण्यांत परस्पर अक्षय बंधूप्रीति काय केल्यानें वाढेल, त्याचें बीज शोधून काढावें व तें पुस्तकाद्वारें प्रसिद्ध करावें. अशा वेळी डोळे झांकणे उपयोगाचें नाहीं. या उपर त्या सर्वांची मर्जी. हे माझें अभिप्रायादाखल छोटेखानी पत्र त्या मंडळीच्या विचाराकरितां तिजकडे पाठविण्याची मेहेरबानी करावी. साधे होके बुढ्ढेका येह पहिला सलाम लेव.

आपला दोस्त
जोतीराव गो. फुले’
(ज्ञानोदय, दि. १९ जून १८८५)

यानंतर तुकोबांच्या दोन अभंगांचा खास उल्लेख करणे मला आवश्यक वाटते. कारण ते, आपण ज्या परिस्थितीत इथे जमलो आहोत त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बळ देणारे अभंग आहेत. तुकोबाराय म्हणतात,

ओले मूळ भेदी खडकाचे अंग । अभ्यासासी सांग कार्यसिद्धी ||१||
नव्हे ऐसे काही नाही अवघड । नाही कईवाड तोच वरी ॥ छ।
दोरे चिरा कापे पडिला काचणी । अभ्यासे सेवनी विष पडे ॥ २ ॥
तुका म्हणे कैचा बैसण्यासी ठाव । जठरी बाळा वाव एकाएकी ||३।।

आपली चळवळ, आपला विचार ओल्या मुळा सारखा आहे. कुणाला वाटेल हे विचारांचे ओले मूळ, काही हजार वर्षे आपल्याला दडपून टाकत आलेल्या शोषक संस्कृतीच्या, कलेच्या, साहित्याच्या खडकाला भेदून चळवळीच्या रोपट्याला भला मोठा बोधी वृक्ष बनवणारं बळ कसं देणार? पण अशी ओली मुळंच खडकाचं अंग भेदत असतात आणि भेदू शकतात असा विश्वास आपल्याला, तुकोबा त्यांच्या कवितेतून देतात. अभ्यासाने सर्व साध्य होऊ शकतं, दोराने सुद्धा कठीण खडक कापला जाऊ शकतो असा आत्मविश्वास निर्माण करतात. त्यांचा जो दुसरा अभंग मी सांगणार आहे तो शब्दांच्या ताकती विषयी आहे. म्हणजेच तो भाषेच्या, ज्ञानाच्या ताकती विषयी आहे,

आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांची च शस्त्रे यत्न करू ||२||
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन । शब्दे वाटू धन लोका ॥२॥
तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव । शब्देचि गौरव पूजा करू ||३||

संतांपैकी फक्त तुकोबांनाच मानणारे जोतिबा,

विद्येविना मती गेली,मती
विना नीती गेली, नीती विना गती गेली,
गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र
खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले

असा अखंड लिहून शेतकऱ्याचा असूड ची सुरुवात करतात. ज्ञान ही एक भौतिक शक्ती असते असे तत्त्वज्ञान या दोघांनी सुद्धा मांडले आहे. ते या माध्यमातून एका नव्या जगाचे स्वप्न पाहतात जे प्रेमावर आणि मानव मुक्तीच्या ज्ञानावर आधारलेले असेल. म्हणूनच कबीर म्हणतात,

पोथी पढी पढी जग मुआ,
पंडित हुआ न कोय.
ढाई अक्षर प्रेम का
कहे तो पंडित होय.

संत रैदास आपल्याला बे-गम-पुराचं म्हणजेच दुःख नसलेल्या, उच्च नीचता नसलेल्या, कुणालाही कुठेही विहार करण्याची मुभा असलेल्या शहराचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा देतात. आपल्या साहित्यात, कलेत, सांस्कृतिक व्यवहारात हे स्वप्न असायला पाहिजे. ओढ असायला पाहिजे. दोन प्रेमिकांच्या नात्यात असणारी ओढ आपल्या सर्वांगीण साहित्य कला आणि सांस्कृतिक व्यवहारात असायला पाहिजे. वारकरी संत कवींना विठूमाऊली विषयी असणारी ओढ अशीच व्यक्त झाली आहे. म्हणूनच ते चंद्रभागेच्या वाळवंटावर ‘वर्ण अभिमान विसरल्या याती, एक एका लोटांगणी जाती’ असा व्यवहार करू शकले. अवघा रंग एक जाला, रंगी रंगला श्रीरंग. दाखवल्या शिवाय राहणार नाही. मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया असा भाव संत सोयराबाईने व्यक्त केला तो सर्व समाजातील संबंधां विषयीचा सुद्धा आहे. ती स्वतःला ‘चोखियाची महारी’ म्हणवते पण प्रत्यक्षात जात-धर्म-लिंग भेद ओलांडून पल्याड जाते.

साहित्य, संस्कृती आणि कलांचा इतिहास मातृप्रधान गण व्यवस्थांच्याही पूर्वी पर्यंतच्या काळापर्यंत मागे जातो. जगभरातील गुहा चित्रे आणि खुणांची भाषा याची साक्ष देतात. मानवी समाज अशा व्यवहारातून, स्वतःला उर्वरित निसर्गापासून स्वतंत्र, अलग करीत गेला. तेव्हापासून ते आजतागायत घडलेला इतिहास आणि माणसांनी घडवलेला भूगोल याची साक्ष देतात. हे घडवणारी विविध लिंगाची माणसे नवनिर्माण करण्यासाठी राबणारी माणसेच होती आणि आजही आहेत. ऐत खाऊनी कधीच साहित्य, संस्कृती, कला या क्षेत्रात नव नवे काही घडविलेले नाही. ऐतखाऊ कधीच नवनिर्माण करू शकत नाहीत, शकलेले नाहीत. लोककला, लोकसाहित्य आणि लोक संस्कृती यांनीच समाज धारणा केली आहे.

आज जे पूर्वाश्रमीचे अस्पृश्य, अतिशूद्र गणलेले, शेती करतात म्हणून शूद्र गणलेले आणि यांमधील स्त्रिया आहेत त्यांनी आणि त्यांच्या पूर्वजांनी वाद्ये तयार केली, संगीत निर्माण केले, गाणी आणि कथा-नाट्ये रचली आणि अभिनयातून व्यक्त केली. त्यांनीच संस्कृती निर्माण केली. ऐतखाऊ मुठभरांनी हिंसा, शोषण, दडपशाही, लुबाडणूक या शिवाय काहीही निर्माण केले नाही. या जगाला सुंदर आणि समृद्ध करण्याचे कार्य सर्व प्रकारचे नव निर्माण करणा-या सर्व लिंगांच्या जनतेने केले आहे. जगाला उद्ध्वस्त, विद्रूप करण्याचे आणि निसर्गाला प्रदुषित करण्याचे काम या मुठभरांनी केले आहे. इतिहास घडवणे तर दूरच, उलट खोटा इतिहास लिहिण्याचे आणि खरा इतिहास पुसून टाकायचे काम त्यांनी केले आहे. माणसांच्या कत्तली करण्याचे काम केले आहे. आणि असे काम ते आजही करीत आहेत. त्यांचा पराभव अहिंसेच्या, अवैराच्या, नवनिर्माणाच्या आणि प्रेमाच्या मार्गाने केल्याशिवाय ही जनता राहणार नाही. नवे जग निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. इतिहासात जनतेने असेच केले आहे आणि आजची जनता ही देदीप्यमान कामगिरी पुन्हा केल्याशिवाय थांबणार नाही. गौतम बुद्ध म्हणतात त्याप्रमाणे वैराने वैर कधीच संपत नाही. अवैरानेच ते संपवता येते. जनता आपली करामत दाखवल्याशिवाय राहणार नाही.

यासाठी कला, संस्कृती, साहित्य क्षेत्रात योगदान देऊ इच्छिणाऱ्या आपल्या सारख्या लोकांनी जनांच्या जीवनात, अवघा रंग एक झाला आणि मी तू पण गेले वाया अशा पद्धतीने मिसळून गेले पाहिजे. असे करण्यातूनच आजच्या काळातली जन संस्कृती आणि जनांसह पुन्हा एकदा मानुष करण्यासाठी यशस्वी वाटचाल करता येईल. जन संस्कृतीच्या नवनिर्माणातले अडथळे बाजूला काढून जनांसह नवनिर्माणाचा उत्सव करता येईल. मी आपणा सर्वांना आवाहन करतो, की आपण सर्वांनी हा नवनिर्माणाचा उत्सव साजरा करण्यापर्यंत जाण्यासाठी जनांमधे मिसळावे, जनांना समजून घ्यावे. जनांचा इतिहास जनांपर्यंत पोहोचवावा आणि जनांकडून शिकावा.

दळण करण्याची जाती गेली हे चांगले झाले. पण त्याबरोबरच जात्यावरची गाणी सुद्धा गेली, विहिरीतून पाणी उपसणाऱ्या मोटा गेल्या हे चांगले झाले पण त्याबरोबरच मोटेवरची गाणी गेली. अशा अनेक बदलातून माणसांच्या जीवनातलं काव्य संपलं. हस्त नक्षत्र आजही आहे पण हातग्याची गाणी गेली. तशी आजची वेगळी गाणी कोणत्या प्रक्रियेतून तयार होतील या सर्वांचा शोध जनांच्या आणि आपल्या एकरूप होण्यातून घेण्याचा संकल्प करण्यासाठी हे संमेलन आहे असे मी समजतो. जनांमधल्या उत्स्फूर्ततेला जागे करण्याचा संकल्प करण्यासाठी उशीरच झाला आहे आता जास्त उशीर व्हायला नको म्हणून निर्मितीक्षम विचार करण्याला प्रेरणा मिळवण्यासाठी हे संमेलन आहे.

महाराष्ट्रात घट बसवल्यापासून दसरा येण्यापर्यंत, पूर्वीच्या काळी देवी बसवण्याची परंपरा कधीच नव्हती. हा काही जनसंकृतीचा भाग नव्हता. घट म्हणजे कृषी संस्कृतीचे प्रतीक, जमिनीतून नवनिर्माण घडवण्याचे प्रतिक. काही ठिकाणी तरुणाईच्या पुढाकाराने सार्वजनिक घटोत्सव सुरु झाला. लोकांना आवडला, आयात प्रकारापेक्षा लोकांनी चांगला सहभाग दिला. लोकांना असे पर्याय पाहिजे आहेत. गणपतीच्या दहा दिवसांत मगणव्यवस्था उत्सवाचा पर्याय लोकांनीं काही वर्षे चालवला. आपल्या सारख्यांच्या सहभागाअभावी हा उपक्रम बंद पडला. आणखी वेगळ्या प्रकारे जनसहभाग करून घेतला तर लोकच असे नवे-जुने सांस्कृतिक कार्यक्रम निर्माण करतील आणि नव्या नवनिर्माण संस्कृतीची निर्मिती करतील. आपल्यासारख्यांनी यासारख्या प्रक्रियेत- आपापल्या ठिकाणी झोकून देऊन काम करणे आज निकडीचे आहे. हीनवजीवनाची संस्कृती नक्कीच सर्वदूर उगवून येईल.

आज अनेक ठिकाणी बळीराजा उत्सव साजरे होतात. आपण ते सर्वदूर पसरत जाण्यासाठी कार्य केले पाहिजे. अशा उत्सवांची निर्मिती करण्यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. खरे म्हणजे स्त्री-शूद्रातिशूद्र जनता, नवनिर्माण करणाचे जे जीवन जगत आली आहे त्या जीवनातून नेणिवेच्या पातळीवर जे जे सण-उत्सव निर्माण करीत आली आहे त्यांच्यावर आज ब्राह्मण्यवादी, भांडवली आणि पुरुष सत्ता वादाची पुटे चढली आहेत. त्या पुटांना नाहिसे करण्याचे कार्य सोपे करण्यासाठी आपण, जनतेचा भाग म्हणून, तिला सहकार्य करणे आज निकडीचे आहे. नेणिवेपासून जाणिवेकडे प्रवास करणे सोपे करण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. त्यातूनच एका क्रांतीगामी असलेल्या नव्या सांस्कृतिक परिसराची निर्मिती होईल. गायन, वादन, चित्रकला, दृकश्राव्य माध्यमे, शिल्पकला, साहित्य निर्मिती या सर्व क्षेत्रात नव्या आशय आणि आकृतीबंधाला जन्म घातला जाण्यासाठी प्रेरणा दिली पाहिजे. जनतेतील सुप्त क्रांतीगामी जाणिवांना प्रवाहित करण्याचे बळ दिले पाहिजे.

साहित्य आणि संस्कृती या गोष्टी केवळ विचारांच्या क्षेत्रातल्या किंवा नेणीव-जणिवेच्या क्षेत्रातल्या अमूर्त गोष्टी नाहीत. त्यांच्यामध्ये समग्र जीवन आमूलाग्र बदलण्याची भौतिक शक्ती असते. म्हणूनच महात्मा जोतिबा फुले म्हणाले होते, “विद्येविना मती गेली. मती विना नीती गेली. नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना विना शूद्र खचले, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले” म्हणूनच जातीय उतरंडीच्या शोषण व्यवस्थेत स्त्री- शूद्रातिशूद्रांना ब्राह्मणवादी व्यवस्थेने ज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश करण्याला बंदी घातली होती. आजही, ब्राह्मणी, कॉर्पोरेट भांडवली आणि धर्मांध फॅसिझमने छुप्या पद्धतीने ही बंदी घातली आहेच. ही बंदी मोडून काढण्यासाठी साहित्य, संस्कृतीच्या, कलेच्या क्षेत्रातून रणसंग्राम सुरू झाला पाहिजे. टिव्ही, व्हिडिओ, सिनेमे, नाटके इत्यादी सारख्या माध्यमातून जनसंकृतीला सुरुंग लावून ब्राह्मणी संस्कृतीचा मारा केला जातो आहे. अण्णा भाऊ साठे यांनी तमाशाला लोकनाट्याचे स्वरूप देऊन नवे घडवायला सुरुवात केली. ती परंपरा विकसित करून नवा तमाशा लोक कलाकारांच्या सहभागातून उभा केला पाहिजे. विश्वव्यापी जन गणा, तुज करुनी वंदना… असा गण लिहून कला, संस्कृतीच्या केंद्र स्थानी कष्टकरी जाती जमातींना विराजमान केले. जाती व्यवस्थेच्या जोखडात अडकलेली कला नव्या युगाच्या मानव मुक्तीच्या दिशेने नेऊन आविष्कारित करायला सुरुवात केली. आपण अण्णा भाऊ, अमर शेख, गव्हाणकर, बलराज सहानी, शैलेंद्र, कैफी आझमी, साहिर, इत्यादी कलाकरांच्या खांद्यावर उभे राहून नवी पिढी निर्माण केली पाहिजे. अशी पिढी; नव यान महा जलसा, एल्गार सांस्कृतिक मंच अशा माध्यमातून उभी राहायची सुरुवात झाली आहे. त्यांनी नवीन आशय आणि आकृती बंध शोधले आहेत. ही प्रक्रिया गतिमान झाली पाहिजे. पुन्हा एकदा, बदललेल्या काळात नव्या उत्थापनाला सुरुवात केली पाहिजे. आज या क्षेत्रात जन चळवळीची गरज आहे. नवी मशागत करून नवे अंकुर जन्माला येतील असा परिसर निर्माण केला पाहिजे.

१९६७ ते १९७५ या कालखंडात साहित्य क्षेत्रात नवीन पर्व सुरू झाले. जनांची भाषा; कविता आणि कथा-कादंबऱ्यांच्या माध्यमातून साहित्यात येऊ लागली. नामदेव ढसाळ, राजा ढाले, अर्जुन डांगळे, दया पवार, ज. वि. पवार असे तरूण कवी नवीन कविता घेऊन पुढे आले. कवितेला नवा आकृतीबंध प्राप्त झाला. स्वातंत्र्य कुठे आहे, कशाला म्हणायचं असे सवाल कवितेनं उभे केले. अश्लीलतेच्या व्याख्या बदलल्या. शोषित जनतेच्या जीवनातलं सौंदर्य कवितांमध्ये पहिल्यांदाच आलं. घमासान चर्चा यासंदर्भात सुरू झाल्या. सौंदर्य शास्त्रीय सिद्धांताच्या क्षेत्रात सुद्धा नव्या विचारांची घुसळण सुरू झाली. तुकोबा, चोखामेळा, सोयराबाई, कर्ममेळा, जनाबाई इत्यादी संत कवींची चर्चा साहित्याच्या क्षेत्रात सुरु झाली. आजही टवटवीत आणि साहित्याला नवी प्रेरणा देणारे साहित्य म्हणून ही चर्चा सुरू झाली. तुकोबांची कविता तर जागतिक पातळीवर गेली.

अण्णा भाऊ साठे यांच्या कथा, गाणी आणि कादंबऱ्या, बाबुराव बागुल यांच्या कथा आणि कविता यांनी आधीच साहित्य क्षेत्रात नवीन परिमाणे आणि भाषा सौंदर्य आणलेच होते. त्यांच्या खांद्यावर उभे राहून १९६७ ते ७७ या कालखंडातील साहित्य विकसित झालं होतं. यामध्ये ‘कोसला’ लिहिलेल्या नेमाडेंनी प्रवेश केला होता. ‘हिंदू, एक समृद्ध अडगळ’ पर्यंत जे साहित्य निर्माण केले ते अनेक नवीन पायंडे पाडणारे होते. या पाठोपाठ ग्रामीण साहित्य निर्मिती सुरू झाली आनंद यादव, रा. रं. बोराडे इत्यादी साहित्यिक हा प्रवाह घेऊन पुढे आले. राजन गवस यांच्या सारख्यांनी हे साहित्य समृद्ध केले. याच काळात आदिवासी साहित्य प्रवाह सुरू झाला. वाहरु सोनावणे, भुजंग मेश्राम, दया पवारांच्या ‘बलुत’ मधून इत्यादी साहित्यिकांनी या प्रवाहाला समृद्ध केले.

वंचित, शोषित जाती जमातींमधे जन्माला आलेल्या साहित्यिक कार्यकर्त्यांची आत्मकथनं पुढे येवू लागली, लक्ष्मण माने यांचं ‘उपरा’, लक्ष्मण गायकवाड यांचं ‘उचल्या’, शरणकुमार लिंबाळेंचं ‘अक्करमाशी’ आणि अलिकडेच आलेलं नारायण भोसले यांचं. ‘देशोधडी’ हे आत्मकथन ही परंपरा पुढे नेणारं ठरलं. १९८० ते २०१० पर्यंतची दोन दशके हा या साहित्य चळवळीचा उभारीचा कालखंड आहे. कॉ. शरद पाटील यांनी सुरू केलेल्या दलित, आदिवासी, स्त्री, जनवादीसाहित्य संमेलने आयोजित करायला सुरुवात करण्यात पुढाकार घेतला. १९८८ नंतर परिस्थिती बदलत गेली आणि १९९९ साली झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाने महाराष्ट्रातील युवकांच्या हृदयाला स्पर्श केला. युवकांच्या स्वप्नांना नवे घुमारे फुटण्याची प्रेरणा दिली. २००२ पासून विद्रोही साहित्य संस्कृती प्रवाहाला खिंडारे पडायला सुरुवात झाली. आजही ही खिंडारे अस्तित्त्वात आहेत. माझ्यासारखे कार्यकर्ते या सर्व प्रक्रियेतून बाजूला राहिले. कुणी बोलावले तर संमेलनात भाग घेत राहिलो. मांडणी करीत राहिलो. आज या प्रसंगी विद्रोही च्या सर्व प्रवाहांनी एकत्र येऊन संमेलन व्हावे असा प्रयत्न केला पण यश आले नाही. ही खंत मी या वेळी व्यक्त करीत आहे.

खरे तर गेल्या काही वर्षांत; नव निर्माणाच्या, शोषण मुक्तीच्या, मानव मुक्तीच्या, निसर्ग-मानव मैत्रीच्या, जाती अंताच्या, स्त्री मुक्तीच्या, वर्ग अंताच्या आणि नव्या सौंदर्य दृष्टीच्या प्रेरणा घेऊन होणा-या साहित्य निर्मितीची आणि सांस्कृतिक व कलेची चळवळ थिजल्यासारखी झाली आहे. काळ मात्र असा आहे, की ब्राह्मणी, भांडवली, धर्मांध -जातीयवादी फॅसिस्ट प्रेरणांच्या आधारावर साहित्य, संस्कृती, माध्यमे आणि कलांच्या क्षेत्रात थैमान घातले आहे. माझ्यासारख्या सतत जनसमुदायांच्या चळवळीत राबणाऱ्या कार्यकर्त्याला मात्र जनमानसात असलेल्या सर्व क्षेत्रात नवनिर्माण करण्याच्या अंतः प्रेरणांची अनुभूती येत आहे. मला वाटते की माझ्यसह आपणच कुठेतरी कमी पडत आहोत. अशा वेळी तुकोबा म्हणतात त्या एका अभंगातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. कॉ. शरद् पाटील यांनी मांडलेल्या, सौतांत्रिक मार्क्सवादाची आणि फुले-आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानांची प्रेरणा पण घेऊया. तुकोबांचा हा अभंग आपल्याला मार्ग दाखवील,

मीच मज व्यालो, पोटा आपुलिया आलो ।
आता पुरला नवस, निरसोनी गेली आस ।
जालो बरा बळी, गेलो मरून ते काळी ।
दोहीकडे पाहे, तुका आहे तैसा आहे ।

तसेच आपणही आपल्या पोटी जन्माला आले पाहिजे आणि नवनिर्माणाची उभारी धरून नव्या उन्मेषाने साहित्य संस्कृतीच्या कलेच्या क्षेत्रात पुन्हा एकदा वादळाला जन्माला घातले पाहिजे. मी सुद्धा स्वतःच्या पोटी नवा होऊन आहे तैसा उभारी धरून या वयात ही तरुणाईच्या पुढाकाराखाली कार्य करण्याचा शब्द आपल्याला देत आहे.

बुद्धाचे एक वचन आहे,

न हि वेरेन वेरानी सम्मन्तीध कुदाचनं ।
अवेरेनच सम्मन्ति एस धम्मो सनंतनो ।

वैरानं वैर कधीच संपत नाही. अवैरानंच संपतं असं लोक धर्म सांगतो. आम्ही आमचं दु:ख मुक्तीचं स्वप्न , दुःख मुक्तीचा समाज निर्माण करण्याकडे चाललो आहोत. आमचं कुणाशीही वैर नाही. जे आमच्याशी वैर करतील त्यांनी खुशाल करावं. ते ओलांडून आम्ही आमच्या ध्येयापर्यंत निश्चितच पोहोचू. आपला संवाद चालूच राहिल. सध्या मी थांबतो. सर्वांना, जय सावित्री, जय भीम, जय जोतिबा.

डॉ. भारत पाटणकर हे जेष्ठ विचारवंत असून जे श्रमिक मुक्ती दलाचे नेते आहेत.