पुरोगामी व्यक्तीचा जात निरपेक्ष व्यवहार असावा अशी अपेक्षा केली जाते. जन्म दाखला किंवा तत्सम डॉक्यूमेन्टवर जातीचा उल्लेख टाळणे, जातीचा अभिमान किंवा न्यून न बाळगणे आदी उपाय सुचवले जातात.पुरोगामी म्हणूनच्या आपल्या भूमिका किंवा कृती यांना जन्माच्या जात वास्तवाशी फारकत घेत तटस्थपणे तपासण्याची अपेक्षा बाळगली जाते.

म्हणजे जन्माचे जातवास्तव, ते नाकरण्याचे उपाय आणि तटस्थता या जातीभेद नाकारण्याच्या तीन बिंदूंशी आपण किमान सहमतीत येतो आणि त्याच सहमतीच्या आधारावर काही मुद्दे मी संवादासाठी अधोरेखित करत आहे.

सदर चर्चा जात हे वास्तव स्वीकारूनच होत आहे पण त्याचंवेळी जात पाहून जजमेंट्स करू नयेत अशी अपेक्षाही बाळगते आणि त्यामुळे कितीही रास्त वाटली तरी ती अपेक्षा विसंगतीत घुटमळते. आपण व्यक्ती म्हणून ब्राह्मण, मराठा किंवा तत्सम जातवास्तव केवळ ‘नाही’ म्हणण्याने नाहीसे होत नसते किंवा व्यक्ती म्हणून आपण जात न माणण्याची भूमिका घेतली म्हणजे जातनिरपेक्ष विचार-व्यवहार करू लागतो असे होत नाही. जात नाकारण्याचा व्यवहार असो की जातीवादी व्यवहार, सत्तारचनेतील स्थनांनुसार त्यांच्या अभिव्यक्तीचे स्वरूप वेगवेगळे राहणार. त्यामुळेच आडनाव न लावणे, जात म्हणून एकत्र न येणे किंवा दाखल्यावरून जातीचा उल्लेख काढणे हे सरसकट सर्व जातींसाठी पुरोगामी पाऊल असणार नाही. जातीअंताचे उद्दिष्ट बाळगून कनिष्ठ जाती जात म्हणून एकत्र येणे स्वाभाविक असेल आणि त्याने काही बिघडेल असेही नाही. परंतु जातीव्यवस्थेच्या समर्थनातच काय पुरोगामी म्हणूनही वरिष्ठ जातींचे एकत्र येणे खऱ्या पुरोगामी राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरेल. महाराष्ट्रात जातीच्या आधारावर एकत्र आलेले पुर्वाश्रमीचे महार म्हणजेच नवबौद्ध हे उदाहरण वरील संदर्भात पुरेसे आहे. एक पॉलिटिकल कास्ट म्हणूनची सजगता आणि एकी या बळावर ही ताकद काही जमतवादी संघटनाच्या तुलनेत प्रचंड आहे. परंतु तरीही तिने संविधानिक लोकशाहीच्या मूल्यांना कधी झुगारले नाही. संघटित हिंसाचार करून जमतवाद पोसला नाही. उलट चळवळींचा जो काही अवकाश आज शिल्लक आहे तो वाचवण्यात महत्वाची भूमिका अदा केली आहे हे कुणीही नाकारू शकत नाही. दुसरे उदाहरण मराठा समाजाचे पाहता येईल. मराठा मूक मोर्चाच्या माध्यमातून आरक्षणासाठी हा समाज मोठ्या ताकदीने रस्त्यावर आला. लाखोंच्या संख्येने रस्त्यावर येऊन कायद्याचा सन्मान करत सार्वजनिक शिस्त कशी बाळगता येऊ शकते हे दलित समूहाच्या संदर्भात दाखवण्याची धडपड एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला ऍट्रॉसिटी ऍक्टच्या गैरवापराचा मुद्दा एकसुरीपणे उपस्थित करत दलितांवर हल्लेही झाल्याचे दिसून आले. तिसरे उदाहरण ब्राह्मण जात म्हणून एकत्र येण्याचे. त्यांनी ब्राह्मणच कसे शोषित असून त्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी करत आपले ब्राह्मणी प्रभुत्व टिकवण्याची भूमिका घेतली…  थोडक्यात जातीसमाजातील व्यक्तिगत अथवा सामाजिक कृती या सरसकट सर्वच जातींच्या दृष्टीने पुरोगामी किंवा प्रतिगामी असण्या-नसण्याच्या सांचेबंद चौकटीत पाहता येत नाहीत. दलित, भटके, ओबीसी, मराठे, ब्राह्मण यांचे चळवळीच्या प्रांतात जातीच्या आधारावर एकत्र येणे सरसकटपणे जातीवादी ठरवता येणार नाही. परंतु त्याचवेळी उच्च जातींच्या एकत्र येण्यात जातीवाद असण्याच्या शक्यता जास्त राहणार…!

अर्थात मामला क्लिष्ट असल्याने त्यावर भरपूर आणि भयमुक्त चर्चा करावी लागणार हे ओघाने आलेच…

हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थित केलेल्या सदर चर्चेत पुरोगामी असण्या-नसण्याचे निकष गृहीत धरलेले असल्याने पुरोगामी म्हणजे काय यावरही थोडे बोलणे गरजेचे आहे. पुरोगामी असणे म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता या उद्दिष्टासाठी आकलन आणि व्यवहाराची व्यापक अशी गतिशील प्रक्रिया आहे… या प्रक्रियेतील अनेक गुंत्यापैकी पुरोगामी ब्राह्मण किंवा पुरोगामी मराठा किंवा पुरोगामी अलाना-फलाना हाही एक गुंता आहे… (अर्थात त्यावर बरेच बोलता येईल) त्यावर गांभीर्याने संवाद केला तर या चर्चेच्या निमित्ताने जे धक्के बसत आहेत त्याहून कित्येक पटीने अधिक धक्के बसतील आणि अर्थात ते धक्केच सत्याची वाट प्रशस्त करतील…

उदाहरणार्थ – ब्राह्मण पुरोगामी सध्याच्या परिस्थितीत अजित पवार यांच्यावर टीका करत देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करता झाला किंवा झाली तर शंका घेतली जाते. पुरोगामी ‘ब्राह्मण’ असल्याचा पेच समोर येतो. हेच जातीच्या उतरत्या क्रमात घडत राहते. मराठा पुरोगामी व्यक्ती मराठा ठरतो. प्रक्रिया म्हणून पाहिले तर त्यात पॅटर्न दिसतो. मग असा पॅटर्न कसा, केव्हा, कुठे, का तयार होतो हेही पाहता येऊ शकते…

हेरंब कुलकर्णी यांनी पुरोगामी चळवळीतील ब्राह्मण व्यक्तींची होणारी जी कोंडी मांडली आहे त्यावर यापूर्वीही भरपूर चर्चा झाल्या आहेत. सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेत्तरी चळवळ आणि आंबेडकरी चळवळीच्या इतिहासातही तशी उदाहरणे आहेत. तर गो. पु. देशपांडे यांनी लिहिलेल्या ज्योतिबा फुले यांच्यावरील नाटकाच्या संदर्भात विजय कुंजीर यांनी लिहिलेल्या लेखाच्या अनुषंगाने काही चर्चा झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच संजय आवटे यांनी शर्वरीच्या निमित्ताने लिहिलेली fb पोस्टही पाहता येऊ शकते. म्हणजे या नाजूक विषयावर चर्चा तर होत राहिली आहे पण तिला सैद्धांतिक चौकटीत समजून घेण्याइतपत गांभीर्याने घेतले गेल्याचे दिसत नाही. ब्लेमगेम, मॉरल पोझिशन आणि इग्नोरिंग या चौकटीत दैनंदिन पुरोगामी व्यवहारातील ही समस्या दुर्लक्षित राहिली. त्यामुळे तिला गांभीर्याने संवादाच्या प्रक्रियेत घेतल्या शिवाय तिचे स्वरूप समजणार नाही.

संवादाच्या प्रक्रियेतच विचार-व्यवहार अधिकाधिक पुरोगामी होत जातो हे उघड आहे. पण मुळात ‘आपण’ सर्वच जण त्यासाठी तयार आहोत का? ‘आपण’ संशयी, अहंकारी, लोकशाही न पचलेले नाही आहोत का? असे प्रश्नही सुरुवातीलाच स्वछपणे विचारण्यात काही गैर आहे असे वाटत नाही.

आपण ज्यांना ओळखत नाही अशा कुणीही विरोधी प्रतिक्रिया दिली तर हा पुरोगामी नसणारच असा समज सहजच व्यक्त होतो. Nikhil Wagle यांच्या fb वॉलवर मी तसा अनुभव नुकताच घेतला आहे. चर्चा होती ढोंगी पुरोगामी या संदर्भात… काहींनी वरवरची फुटकळ लक्षणे नोंदवत विधाने केली होती पण पुरोगामी व्यवहार Hippocratic situationमध्ये फसण्याची प्रक्रिया मात्र दुर्लक्षित केलेली होती. त्यावर दिलेल्या जेमतेम प्रतिक्रियेवर अपरोक्षपणे हा कोण प्रतिगामी अशीही एक शंका घेतली गेली… मी काय म्हणतोय आणि समोरून काय रिसिव्ह होतेय हे पाहून गंम्मत वाटली…😃 इथे हा संदर्भ यासाठी आवश्यक वाटतोय की, हाही एक असाच नाजूक विषय आहे की ज्यावर बोलणे अत्यंत गरजेचे आहे… तसे हे दोन्हीही विषय मॉरल चौकटीतील वाटतील पण खरे तर हे दोन्ही विषय एकूणच चळवळींची  कोंडी फोडण्याची क्षमता बाळगून आहेत… पोटतिडिकीचा संवाद होत राहिला तर अतिमहत्वाकांक्षी वाटणारे वरील विधान आपणासही पटू लागेल याची मला आजतरी खात्री वाटत आहे.

आता चालू विषयाच्या गाभ्याला हात घालताना एकमेकांच्या लिंगभाव-जात-वर्गीय स्थानाचा विचार करत प्रश्न विचारणे, अगदी हेतुवर शंका घेणे आदी गैर नसून गरजेचे आहे. त्यातूनच आपली सर्वांची पुरोगामी म्हणूनची तथाकथित तटस्थता प्रश्नांकीत होत राहील आणि आपण खऱ्याअर्थाने पुरोगामी होत राहू हा माझा निष्कर्ष आहे.

लिंगाभाव-जात-वर्गीय विषम वास्तवात ज्याचे-त्याचे कॉम्प्लेक्स लोकेशन ज्याला-त्याला विशिष्ट आंतरदृष्टी देते असते. ती सत्याचा काही अंश दाखवते आणि त्याचवेळी बरेचसे फसवे आकलनही देते राहते. ब्राह्मण म्हणतात शेतकरी जातीच दलितांवर अत्याचार करतात. शेतकरी जाती म्हणतात, ब्राह्मणच ब्राह्मणवाद पेरतात. मातंग म्हणतात, महारांनीच sc कोट्यातून नोकऱ्या पळवल्या. महार म्हणतात, क्रांतिकारी महारांना डावलण्यासाठी मातंग उमेदवार निवडले जातात वगैरे वगैरे ही एक बाजू… तर पुरोगामी ब्राह्मण असे म्हटले की, मनापासून दुखावणारांमध्ये पुरोगामी ब्राह्मणच जास्त असतात. पुरोगामी मराठा म्हटले की, पुरोगामी मराठ्यांची नस ठणकते हे नाकारता न येणारे जैव-सामाजिक वास्तव ही दुसरी बाजू… एका बाजूला शोषक म्हणूनचे खापर दुसऱ्या स्पर्धक समूहावर फोडले जाते तर दुसऱ्या बाजूला अपराधभाव देण्याची आणि झिडकारण्याची प्रक्रिया घडत राहते. शोषित म्हणूनच्या जाणीवेतून येणाऱ्या नीतीबळाचा अगदी ब्राह्मण समूहालाही मोह पडतो… याच प्रक्रियेत मग सर्वाधिक शोषित कोण याचेही दावे झडू लागतात.

असे गुंतागुंतीच्याही पलीकडचे आंशिक सत्याने संपृक्त आणि बरेचसे फसवे आकलन भाषेच्या आधारे आपल्या मन:पटलावर  उमटू लागते. तर मन आणि भाषा यांच्या बाबतीत असे म्हणता येईल की, मन आणि भाषा हा आंतरदृष्टीच्या काजव्यांनी अधे-मधे स्पार्क होणारा गूढ काळोखी प्रांत आहे… अशा प्रांतातून पुरोगामी म्हणून वाटा तुडवताना मेरी ओ-ब्रायन आणि शरद पाटील यांच्या एकत्रित वाचनातून methodological torche आपल्याला मिळू शकतो.

आपण तटस्थ नसलो तरी वास्तवातलं सत्य तटस्थच असते. त्यामुळे आपल्या विशिष्ट आंतरदृष्टीचे आंशिक सत्य म्हणजे पूर्ण वास्तव नसते. ‘इतर’ अस्तित्वातून आपल्या तथाकथित तटस्थतेवर स्वाभाविक शंका घेण्यातून तेच तर अधोरेखित होत असते. त्यामुळे शंका घेणे, प्रश्न उपस्थित करणे, प्रसंगी हेतुवरही शंका घेणे हे संवादात गैरलागू ठरत नाही. किंबहुना गरजेचे, अत्यावश्यक ठरते. त्यातून आपापल्या तथाकथित तटस्थता प्रश्नांकित होत राहतात. जाणीव-नेणीवयुक्त तर्कशास्त्र इथे मदतीला येते आणि आपल्याच मनातील उत्स्फूर्त प्रतिक्रिया, आवड, निवड, चव, राग, लोभ, सौंदर्य आदी कल्पनांची ब्राह्मणी-अब्राह्मणी चौकटीत छाननी करता येते. बाहेरच्या वास्तवाप्रमाणे मनातल्या वास्तवाचेही की जे विरचित वास्तवाला संरचित करते (सामाजिक चौकटीत समजून घेण्याच्या सोईसाठी कोडिफाय करते) त्याचेही परीक्षण करता येऊ शकते. मग इतर कोणाकडे नुसते बघून त्याची नेणीव ब्राह्मणी आहे की नाही या इतरांना सर्टिफिकेट देण्याच्या सोप्या मार्गापेक्षा स्वतःच्या नेणीवेला विधायक संपादनात घेता येऊ शकते. त्यातून कलाकार, कार्यकर्ते, अभिनेते, पत्रकार स्वतःच्या आंतरदृष्टितील विषम ब्राह्मणी संस्कार झिडकारून स्वतंत्रपणे काही लिहू, बोलू, करू शकण्याच्या क्षमतेस पोहोचू शकतात. येथे स्त्रीवादी चर्चाविश्वातील सेल्फ रिफ्लेक्सीविटीची मेथड म्हणून मोलाची मदत होऊ शकते… लिंगभाव-जात-वर्गीय संस्कारातल्या आंशिक सत्यकडून अधिकाधिक सापेक्ष सत्याकडे प्रवाही व्हायचे असेल, खऱ्या अर्थाने पुरोगामी व्हायचे असेल तर अशा स्वतःच्या कातडी सोलण्याच्या कठीण मार्गाला काही पर्याय आहे असे वाटत नाही… त्यामुळे कोणी टीका केली तर ती कात टाकायला मदत किंवा नव्या आकलनाची संधी समजता येऊ शकते (निंदकाचे घर असावे शेजारी). आपल्या टीकाकाराचे सगळे खरे नसले तरी त्यातील आंशिक सत्य लक्षात घेऊन विकसित होता येऊ शकते. पुरोगामी होण्याचा हा निकष नाकारून चालणार नाही…

लेखक माफुआंचे अभ्यासक असून सत्यशोधक चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आहेत.