पितृसत्ता आणि स्त्रीमुक्ती या वंदना सोनाळकर आणि शर्मिला रेगे लिखित पुस्तिकेत अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा करण्यात आली आहे.ते प्रश्न म्हणजे  स्त्रियांना समाजात नेहमीच गौण स्थान का आहे ?मुलींनाच इतकी बंधने का पाळावी लागतात ? शेतकरी कुटुंबात स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त राबतात परंतु त्यांच्या श्रमाला कमी किंमत का? जमिनीची मालकी पुरुषांकडे का ? हे प्रश्न सर्व जातीच्या स्त्रियांना लागू होतात का? जातीची उतरंड आणि स्त्री-पुरुष भेद यांच्यात संबंध कोणता? दलित स्त्रियांचे विशेष प्रश्न कोणते ? अशा प्रश्नांचा मागोवा घेणारी ही पुस्तिका पुढे जाऊन स्रियांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या या दुय्यमतेला कसा विरोध केला याचा आढावा घेते तसेच स्त्रीमुक्तीच्या पुढील दिशेचे मार्गदर्शन करते .आपला समाज एकसंघ नाही ,तो विभागलेला आहे. वर्गीय जातीय विषमता आहेच ,पण त्याहूनही मूलभूत भेद स्त्री-पुरुषांमध्ये आहे. प्रत्येक वर्ग आणि जातीच्या अंतर्गत स्त्रीचे स्थान दुय्यम आहे, पुरुषांचे तिच्यावर वर्चस्व आहे.

लिंगभावाची संकल्पना

स्त्री पुरुषांमध्ये शारीरिक भेद आहेत पण समाजात   स्त्री पुरुषांच्यामध्ये जे विविध प्रकारचे भेद दिसतात त्या सर्वांचे कारण आपल्याला शारीरिक फरकांमध्ये सापडणार नाही.स्त्रिया आणि पुरुष जी अनेक कामे रोज करतात त्या सर्व कामांमध्ये शारीरिक फरकांचा संबंध नसतो, उदा. शाळा शिकण्यासाठीच्या मुलामुलींच्या कुवतीत फरक नसतो तरीही स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी असते ,यामागचे मूळ कारण समाजाच्या मुलींकडे बघण्याच्या दृष्टिकोनात सापडेल .

स्त्री पुरूष यांच्यातील सामाजिक भेद आणि स्त्रियांचे गौण स्थान यांची कारणं नैसर्गिक नसून ती  सांस्कृतिक आहेत. प्राण्यांमध्ये नर आणि मादी यांच्या वागणुकीतील फरक नैसर्गिक असतात मात्र माणसांमध्ये तसे नाही .आपल्यावर लहानपणीपासून झालेले संस्कार आपले साहित्य, कला, शिक्षण ,यांच्यातून स्त्री पुरुष भेद समाजामध्ये आकार घेत असतो. म्हणून त्याला आपण सांस्कृतिक म्हणतो.

स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये जे शारीरिक भेद आहेत त्यांना आपण लैंगिक फरक म्हणतो मात्र समाजात त्यांच्यात जे वेगवेगळ्या प्रकारचे भेद आहेत त्यांना आपण लिंगभावी भेद किंवा लिंगभावाचे फरक असे म्हणू या.एखाद्या व्यक्तीचे लिंग जन्मतःच ( किंवा त्यापूर्वी) ठरलेले असते मात्र लिंगभाव म्हणजे लिंगावर आधारलेल्या समाजाच्या भावना आणि दृष्टिकोन. लिंगभावातील फरकाला सतत नवीन समर्थन मिळत असते ,समाजाच्या विविध अंगाने तो जटिल होतो, आकार घेतो.

कुटुंबातील संस्कार

कुटुंबामध्ये मुलामुलींमध्ये फरक केला जातो ,भारतात हे सिध्द झाले आहे की मुलींच्या खाण्यापिण्यावर ,औषधपाण्यावर,शिक्षणावर कमी खर्च केला जातो ,एव्हढेच नाही तर तिच्या हालचालीवर वागणुकीवरही नियंत्रण ठेवले जाते .

कुटुंबाचा प्रमुख हा पुरुषच समजला जातो अनेकदा स्त्रीपुरुष दोघेही कमवत असतात तरी मान व निर्णय घेण्याचे अधिकार पुरूषालाच. ज्या कुटुंबात पुरुष असतो तेच कुटुंब पूर्ण समजले जाते, कुटूंबाच्या या वैशिष्ट्यांला आपण पितृसत्ताक कुटूंबपद्धती हे नाव देतो. कारण कुटुंबातील संबंध केवळ रक्ताचे आणि प्रेमाचे नसून  ते सत्तेचे आणि अधिकाराचे देखील असतात. कुटुंबातील पित्याला सर्वाधिकार प्राप्त असतात या अधिकारांचा पाया केवळ आर्थिक नसतो कारण अनेक ठिकाणी पिता हा कमविणारा नसतो तरीही त्याचे कुटुंबात वर्चस्व असते.

पितृसत्ताक कुटुंबपध्दती

समाजाचा मुलभूत घटक कुटुंब आहे. मुलामुलींवर जे संस्कार केले जातात ते सुरुवातीला कुटुंबात केले जातात, म्हणजे स्त्री-पुरुष विषमतेची मुळे ही पितृसत्ताक कुटुंबसंस्थेत असतात. या पितृसत्ताक कुटुंबसंस्थेची मूल्ये सगळ्यांच्या मनामध्ये ठाम बसविली जातात. बऱ्याचदा असे म्हटले जाते की स्त्रियाच स्त्रियांचा छळ करतात, म्हणजे सासू सुनेचा छळ करते,आई आपल्या मुलींपेक्षा मुलांकडे जास्त लक्ष देते, कुटुंबातील स्त्रियांमध्ये सतत भांडण चालू असतात वगैरे पण या सगळ्या संबंधांकडे आपण नीट पाहिले तर त्यातून पितृसत्तेचेच परिणाम दिसतात, सासूने लग्न झाल्यापासून दुय्यम स्थान पत्करलेले असते, ती मुलाची आई झाल्यावर त्या कारणाने तिला थोडा मान मिळायला लागतो तिचा मुलगा तिच्या आयुष्यातील महत्वपूर्ण व्यक्ती असते पण जेंव्हा सून घरात येते तेंव्हा या नात्याचा समतोल बिघडतो. सासू झालेली व्यक्ती नवीन जोडप्याच्या संबंधांमध्ये ढवळाढवळ करायला लागते आणि संबंध बिघडायला सुरुवात होते.

ही सर्व व्यवस्था पुरुषांना फायदेशीर आहे असे म्हणता येईल पण तसेही नाही पुरुषांवरही दडपण असते आपल्या भावना अनेकदा पुरुष मोकळेपणाने व्यक्त करू शकत नाहीत कारण त्यांना तसेच वाढवले जाते. तरी पित्याला आणि कुटुंबातील पुरुषांना स्त्रियांच्या तुलनेने अधिक स्वायत्तता असतें म्हणून या कुटूंबव्यवस्थेला आपण पुरुषप्रधान असे म्हणतो. पुरुषप्रधान या शब्दापेक्षा पितृसत्ताक ही संज्ञा वापरणे जास्त योग्य आहे, या संज्ञेमुळे सामाजिक मूल्यांचे आणि विचारांचे ,सत्तेचे आणि तत्वांचे मूळ कसे कुटुंबात असते याची आपल्याला जाणीव राहते.

जातीव्यवस्था आणि स्त्रियांचे स्थान

स्त्रियांच्या गौण स्थानाशी जातीव्यवस्थेचे अगदी निकटचे संबंध आहेत. आपल्या समाजात जातीच्या अंतर्गत विवाह करण्याची प्रथा आहे ,यामुळे जातीव्यवस्था सुरळीतपणे टिकवली जाते. जातीव्यवस्था म्हणजे एक उतरंड असल्यामुळे स्त्रियांवर पुरुषांचे वर्चस्व वेगवेगळ्या जातीमध्ये वेगवेगळे असते .ते उच्च जातींमध्ये जास्त हिंस्त्र आणि जास्त कडवे असते.तर खालच्या जातीत स्रियांना मिळणारी मोकळीक त्यांचे उत्पादनप्रक्रियेतून शोषण करण्यासाठी असते.ग्रामीण भागात अनेकदा उच्च जातीतील पुरुष खालच्या जातींच्या स्रियांचे शोषण करतात यामागे सत्तेचे प्रदर्शन करणे हा हेतू जास्त असतो.

बलात्काराचा प्रश्न

बलात्कार या गुन्ह्यासंबंधी समाजाचा दृष्टिकोन काय आहे? बलात्कार झालेल्या मुलीचा कोंडमारा, मानसिक ताण याचा विचार कोणीही करत नाही. न्यायालयात सुद्धा स्त्रीलाच आरोपीसारखे वागवले जाते. अनेकदा स्त्री ज्या कुटुंबातील, जातीतील, वर्गातील असते त्या गटातील पुरुषांच्या विरोधात केलेले ते सत्तेचे प्रदर्शन असते, त्यामुळे बलात्कार झालेली स्त्री त्या जातीच्या वर्गाच्या पराभवाचे लक्षण बनते. ज्यावेळी तिला सहानुभूती आणि मानसिक आधाराची जास्तीत जास्त गरज असते त्याचवेळी तिला उपेक्षित ठेवले जाते, बलात्कार या गुन्ह्याचे हेच भयानक स्वरूप आहे.

पुस्तिकेच्या दुसऱ्या भागात आपल्या समाजाच्या विविध कार्यात आणि विविध क्षेत्रात स्त्रियांचे स्थान आणि त्यांची भूमिका कोणत्या स्वरूपाची आहे हे सांगितले आहे.

स्त्रियांचे श्रम

आपल्या समाजात स्त्रिया अनेक प्रकारचे श्रम करत असतात पण त्यांच्या घरातील श्रमाला तर कुणी फारशी किंमत देत नाही आणि घराबाहेरही अनेकदा स्त्री म्हणून भेदभावाची वागणूक मिळते.

स्त्रियांचे श्रम मोठ्या प्रमाणात अदृश्य असतात. त्यांना दृश्य करणे आणि त्यांना योग्य मोबदला मिळवून देणे हा भविष्यकाळासाठी आपला कार्यक्रम असला पाहिजे.

भारतीय लोकसंख्येतील स्त्री

एकूण लोकसंख्येमध्ये स्त्री-पुरुषांचे प्रमाण साधारणपणे सारखे असायला पाहिजे ,अनेक देशात स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा थोदे जास्तच आहे पण आपल्या देशात 1961 ते 1991 च्या दरम्यान भारताच्या लोकसंख्येतील स्त्री पुरुष गुणोत्तर 1000 ला 941 वरून 1000 ला 927 इतके घटले आहे.

त्यामुळे समाजातील आधुनिकीकरण झाल्यावर स्त्रियांचे समाजातले स्थान उंचावेल असे नाही. बाजारयंत्रणा स्त्रियांचे वस्तुकरण करते त्यातून अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतात .समाजातील बदलाची प्रक्रिया बरीच गुंतागुंतीची असते.

स्त्रिया आणि आर्थिक विकास

स्वातंत्र्यानंतर औद्योगिकरण, नियोजन आणि आर्थिक स्वावलंबन याचा मार्ग स्वीकारला गेला पण प्रमुख उत्पादन साधन असलेल्या जमीन मालकीचे पाहिजे त्या प्रमाणात पुनर्विभाजन झालेच नाही आणि त्यातही जमीनीचा मालकी हक्क प्रामुख्याने पुरुषांकडे राहिल्याने स्त्रियांच्या वाटेला फक्त शेतीतील श्रमच.

१९७५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहिर केले. त्यावेळी सरकारने माहिती गोळा करून ‘समानतेच्या दिशेने’ हा अहवाल प्रसिद्ध केला .भारतीय स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य ,निरक्षरता ,अनारोग्य असल्याची अधिकृत नोंद झाली. त्यानंतरच्या काळात या प्रश्नासंदर्भात बरेच संशोधन झाले आणि स्त्रियांच्या आर्थिक समस्या हाताळण्याचा प्रयत्न केला .स्त्रियांचे आर्थिक प्रश्न आधीपेक्षा ‘दृश्य’ झाले असले तरी नवीन आर्थिक धोरणामुळे समाजात विषमता आणि तणाव वाढत आहेत, पर्यावरण नष्ट होत आहे त्याचे पुरुषांपेक्षा जास्त गंभीर परिणाम स्रियांना भोगावे लागत आहे.

सुजाण आणि अजाण विरोध –

व्यक्तीगत प्रश्नही राजकीय असतात. स्त्रियांना मोठ्या प्रमाणात राजकारणात भाग घेणे शक्य होण्यासाठी त्यांना आधी आपल्या कौटुंबिक जंजाळातून बाहेर काढावे लागेल एवढेच नाही तर पितृसत्ताक कुटुंबपद्धतीच्या दडपणात राहणाऱ्या बाईला इतरांसाठी जगण्याची सवय होऊन जाते,आपल्यावर अन्याय होत आहे, आपले काही अधिकार आहेत म्हणजे पहिली पायरी ओलांडणे. हे पहिले पाऊल ओलांडणे म्हणजेच आपले व्यक्तिगत प्रश्न केवळ आपलेच नाहीत ते या समाजातील इतर अनेक स्त्रियांशी मिळतेजुळते आहेत हे समजून त्याच्याविरुद्ध कृती करणे.

स्त्रिया आपल्यावरील अन्यायाची जाणीव नसतानासुध्दा आपापल्यापरीने प्रतिकार करत असतात. भारतीय समाजात स्त्रीच्या अंगात येण्याचा जो प्रकार आहे त्याकडे अजाण बंड म्हणून पाहता येईल .ही प्रथा समाजाच्या स्वास्थ्यासाठी योग्य नाही पण शेवटी इथे बंडखोर वृत्ती अजाण पद्धतीने व्यक्त होते .

स्त्रीचा सुजाण विरोध तिच्या स्वतःबद्दलच्या जाणिवेतूनच निर्माण होऊ शकतो .अजाण विरोध कोणतीही नवीन गोष्ट घडवू शकत नाही .सुजाण विरोधामध्ये विवेकबुद्धीचा वापर,आजूबाजूच्या समाजाकडे व स्वतःकडे तटस्थ होऊन पहाण्याची वृत्ती,आत्मविश्वास या सर्वांचा भाग असतो. सुजाण विरोध पुढच्या टप्प्यात न्यायचा असेल तर तो कुठल्यातरी सामूहिक कृतीत व्यक्त करावा लागतो. आपल्या विरोधाची भूमिका इतर चार जणींना समजावणे,त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवणे, इथूनच राजकारणाला सुरुवात होते.

स्त्री पुरुष समानतेचे राजकारण

महात्मा फुले यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकात’ मानवी हक्क ही संज्ञा वापरण्याऐवजी प्रत्येक ठिकाणी स्त्री पुरुष किंवा स्त्री अथवा पुरुष असा उल्लेख ते करतात भारतातील पुरोगामी राजकारणामध्ये स्त्रीला समाजाचा एक स्वतंत्र घटक म्हणून मान्यता देऊन स्त्री पुरुष समानतेच्या स्थानाकर त्यांनी केंद्रस्थानी आणले ,विशेष म्हणजे बहुजनातील, दलितांमधील कष्टकरी स्त्रीसुद्धा सर्व मानवी हक्कांना पात्र आहे हे तत्व ते आपल्या लिखाणातून आणि कार्यातून ठासून सांगत राहिले.

हिंदू संहिता आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर

१९४७ साली कायदेमंत्री असताना बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला त्यांच्यामते सामाजिक न्यायाचा लढा पुढे नेण्यासाठी हिंदू समाजाच्या वैयक्तिक कायद्यामध्ये जातीव्यवस्था आणि पुरुषप्रधानता नाकारून समान वैयक्तिक संबंधाचा पाया तयार झाला पाहिजे .पण सनातन्यांच्या विरोधामुळे या प्रश्नांवरून बाबासाहेबांनी राजीनामा दिला.मात्र डॉ.आंबेडकरांचे म्हणणे खरे असल्याचे अनेक पुरावे आजच्या परिस्थितीत आहेत .

स्थानिक स्वराज्य संस्थेत स्त्रियांसाठी एक तृतीयांश जागा राखीव करण्यात आल्या असल्यातरी विधानसभा आणि लोकसभेत मात्र अजूनही तशी तरतूद करण्यात आलेली नाही. पितृसत्तेविरोधातील लढा सोपा नाही.

शासनसंस्था आणि स्त्री

शासनसंस्थेच्या कार्यपद्धती मध्येही पितृसत्तेमुळे निर्माण होणारे दोष आढळतात त्यामुळे आजकाल शासकीय अधिकाऱ्यांची लिंगभावासंबंधी जाणीव वाढविण्यासाठी खास प्रशिक्षण दिले जाते, परंतु समाजातील मूल्यांमध्ये परिवर्तन होणे हे दीर्घकालीन काम आहे.

एकीकडे शासन कल्याणकारी योजना राबवत असले तरी दुसरीकडे समाजव्यवस्था आहे तशी टिकवून ठेवण्यासाठी कार्य करत असते ती मूळातच भांडवलदार वर्ग ,उच्चजाती ,पुरुषप्रधानतेच्या ,बाजूने उभी राहणारी असते त्यामुळे शासनसंस्थेकडून अधिकार मागणे शासनसंस्थेने दिलेल्या सवलती वापरणे आणि त्यांचा लाभ गरजू लोकांपर्यंत पोहचेल यासाठी प्रयत्न करणे हा राजकीय लढ्याचा भाग असतो ,मात्र शासनसंस्था समाज परिवर्तन घडवू शकेल असा भ्रम कधी बाळगू नये.

स्त्रिया आणि धर्म

सर्व धर्म स्त्रियांना दुय्यम स्थान देतात व स्त्रियांवर बंधने घालतात तरीही बहुसंख्य स्त्रिया धर्माकडे आकर्षित होतात आणि धार्मिक बंधने पाळत राहतात असे दिसते. कारण धर्म एकीकडे भ्रमात ठेवतात तर दुसरीकडे माणसाच्या काही खऱ्या गरजा पूर्ण करतात.हिंदू स्त्रीला पूजा,पूजेसाठी फुले गोळा करणे,रांगोळी काढणे या गोष्टी तिच्या गर्दीच्या आयुष्यात शांतता आणि सौन्दर्याचे काही अंश तिला उपलब्ध करून देतात असेच काहीसे इतर धर्मातही घडते.

प्रत्येक धर्मातील प्रतिगामी आणि मूलतत्त्ववादी शक्ती जेव्हा सत्तेसाठी दंगली घडवितात तेंव्हा त्याचे गंभीर दुष्परिणाम जास्त प्रमाणात स्रियांना भोगावे लागतात .त्यामुळे याविरोधात लढले पाहिजे.

स्त्रीमुक्तीचा लढा

१९७० च्या नंतर भारतात स्त्रीमुक्ती ही संज्ञा वापरण्यात आली.त्याआधी युरोपात पुरुषप्रधानतेच्या विरोधात स्त्री संघटना उभ्या राहिल्या .भारतात सुरुवातीला मध्यमवर्गीय सुशिक्षित स्त्रिया यात होत्या मात्र गेल्या वीस बावीस वर्षात यातील काही स्त्रियांनी ग्रामीण भागात कार्य सुरू केले .हळूहळू दलित बहुजन स्त्रियांनीही स्त्री मुक्तीच्या लढ्यात भाग घ्यायला लागल्या परंतु भविष्यात हा लढा अधिक व्यापक करण्याची गरज आहे.

भारतातील स्त्रीप्रश्न: काही आक्षेप व त्यांचे स्पष्टीकरण

स्त्री मुक्ती ही संकल्पना पाश्चिमात्य देशांकडून आलेली असल्याने ती भारतीय स्त्रियांना लागू करता येत नाही असा आक्षेप घेतला जातो परंतु कोणत्याही मुक्तीवादी विचारला भौगोलिक आणि प्रादेशिक मर्यादा पडत नाहीत .दुसरा आक्षेप घेतला जातो की भारतीय संविधानात स्रियांना समान हक्क दिलेले आहेत मग आता स्त्री मुक्तीची मागणी का केली जाते परंतु केवळ संविधानात्मक पातळीवर समान हक्क दिल्याने सर्व समस्या दूर होत नसतात.स्त्रियांवरील अत्याचारांची आकडेवारी पाहता लक्षात येते की बलात्कार ,छेडछाड ,लैंगिकछळ,यांचे प्रमाण वाढतच आहे.

भारतीय समाजात दलित हे शोषित आहेत व त्याचबरोबर स्त्रियासुध्दा शोषितच आहेत मग सर्व स्त्रियांना दलितच म्हणता येईल का ? परंतु सर्व स्त्रियांना दलितच म्हणणे चुकीचे ठरेल दलित कष्टकरी स्त्रियांच्या शोषणाला तिहेरी पदर आहे दलित म्हणून एक स्त्री म्हणून आणि कष्टकरी म्हणून अशी तिहेरी पिळवणूक आहे

स्त्री प्रश्न म्हणजे स्त्री विरुद्ध पुरुष असे ध्रुवीकरण नसून या प्रश्नाला एक व्यवस्थात्मक पाया आहे हे लक्षात घ्यावे लागेल .पुरुषप्रधान व्यवस्था ही समाजातील शोषण शासनाची व्यवस्था आहे,जातीव्यवस्था ,वर्गव्यवस्था आणि पुरुषप्रधान व्यवस्था यांचा परस्परसंबंध आहे .

पुरूषप्रधान व्यवस्था -संरचना व स्वरूप

पुरुषप्रधान व्यवस्था ही नैसर्गिक नसून सामाजिक व्यवस्था हैं .स्त्रियांच्या वेगळ्या शरीर रचनेमुळे स्त्रियांना दुय्यम स्थान मिळते असा जो गैरसमज आहे त्याचा पुरुषप्रधान व्यवस्थेने प्रचार केला आहे.

पुरूषप्रधान व्यवस्थेचे स्वरूप स्थल ,काल ,जात वर्ग यानुसार बदलते .सरंजामशाही आणि भांडवलशाही व्यवस्थेतील स्त्रियांच्या शोषणाचे स्वरूप भिन्न आहे.पुरुषप्रधान व्यवस्था ही केवळ कुटुंबापुरतीच मर्यादित नसून ती धर्मसंस्था,अर्थसंस्था,राज्यसंस्था ,कायदा सुव्यवस्था यामध्ये देखील दिसून येते .

स्त्रियांना कुठल्याही मोबदल्याशिवाय घरातील कामे करावी लागतात.याउपर या श्रमाला काम समजले जात नाही .आपण सुध्दा सहज काम करणाऱ्या आणि काम न करणाऱ्या असे विभाजन करतो .परिस्थितीनुसार स्रियांचे घराबाहेर श्रम करणे मान्य  वा अमान्य केले जातेस्त्रियांच्या प्रजोत्पादन शक्तीवर संपूर्ण नियंत्रण ठेवले जाते .मुलं केंव्हा ,किती किंवा हवीतच का ?याबाबतचे निर्णय स्त्रियांच्या हातात नसतात.

पुरुषप्रधान समाजामध्ये लैंगिकतेच्या बाबतीत दुहेरी नीतिमूल्ये असल्याचे आपल्याला दिसते पुरुषांच्या स्वैराचाराकडे दुर्लक्ष केले जाते आणि स्त्रियांवर मात्र दैनंदिन जीवनातही अनेक बंधने लादली जातात

थोडक्यात म्हणजे पुरुषप्रधान व्यवस्था ही स्त्रियांच्या श्रमावर,प्रजोत्पादनावर ,लैंगिकतेवर आणि वारसा हक्कांवर असलेल्या नियंत्रणावर उभी आहे.

पुरूषप्रधान व्यवस्थेतील स्रियांचा सहभाग

पुरुषप्रधान व्यवस्था ही पुरुषांना सत्ता बहाल करणारी असली तरी या व्यवस्थेत स्त्रिया संपूर्ण सत्ताहीन असतात असे नसते .विषमतेवर आधारलेली कोणतीही व्यवस्था कायम ठेवण्यात त्यातील शोषितांचा सहभाग हा गरजेचा असतोच.समाजात पुरुषप्रधान व्यवस्थेची मुळे इतकी खोलवर रुजलेली आहेत की ती मूल्ये स्त्रिया आत्मसात करतात आणि त्याही त्या व्यवस्थेचा भाग बनतात.

पुरूषप्रधान व्यवस्थेचा उगम

पुरुषप्रधान व्यवस्थेच्या उगमाविषयी सर्वमान्य एकच एक असे विश्लेषण नाही.वेगवेगळे विचारप्रवाह आहेत.मार्क्सवादी व समाजवादी स्त्रीवादी अभ्यासकांनी पुरुषप्रधान व्यवस्थेच्या उगमाचे सिद्धांत मांडले .त्यातील बहुतेक अभ्यासक भांडवलशाही व पुरुषप्रधान व्यवस्था यामधील परस्पर संबंध स्पष्ट करतात.

भारतीय समाजात जाती व्यवस्था ही शोषणाची एक प्रमुख व्यवस्था आहे .जातीव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या ब्राह्मणी ग्रंथांमध्ये स्त्रियांना व शूद्रांना समान मानून दोघांनाही अपवित्र व हीन मानले जाते.मात्र सवर्ण स्त्रियांच्या बाबतीत मात्र स्त्री स्वभाव व स्त्री धर्म यात फरक केल्याचे दिसून येते .

तसेच उच्चजातीय स्त्रियांसाठी पातिव्रत्यधर्माची चौकट बंदिस्त करून त्यांच्या हातात कनिष्ठ जाती-वर्गातील स्त्रीपुरुषांवर मर्यादित स्वरूपाची तथाकथित सत्ता देऊन स्त्रियास्त्रियांमध्ये फूट पाडली म्हणजेच ब्राह्मणशाहीने पुरूषप्रधान व्यवस्था आणि जातीव्यवस्था यांच्यामध्ये स्वतःचे हितसंबंध जोपासण्यासाठी हातमिळवणी घडवून आणली आणि दोन्ही व्यवस्थांनाही बळकट केले.त्यामुळे जातीअंताचा लढा हा पुरुषप्रधान व्यवस्थाअंताचा लढाई असेल.

स्त्री -प्रश्नांवरील विचारप्रवाह : ब्राह्मणी व अब्राह्मणी

ब्राह्मणी व अब्राह्मणी या समाजशास्त्रीय संकल्पना आहेत .वर्ग,जात व स्रीदास्य याचे समर्थन करणाऱ्या शक्तींना ब्राह्मणी असे संबोधले जाते तर  याउलट वर्ग ,जात  व स्त्री दास्य याचा अंत करू इच्छिणाऱ्या शक्तींना अब्राह्मणी समजले जाते.

थोडक्यात जातीव्यवस्था व स्त्रीदास्य उगम यांचा परस्पर संबंध आहे .त्यामुळे फक्त भांडवलशाही नष्ट झाली तर स्त्री दास्याचा आपोआप अंत होणार नाही .जातीव्यवस्थेच्या अंताच्या लढ्याचा स्त्री मुक्तीचा लढा हा अविभाज्य भाग आहे .स्त्री मुक्तीचा लढा प्रभावी व्हायचा असेल तर दलित आणि बहुजन समाजातील स्त्रियांचा पुढाकार आवश्यक आहे.गेल्या दशकात दलित बहुजन स्त्रियांच्या संघटना ठिकठिकाणी उभ्या रहात आहेत आणि स्त्री मुक्तीचे नवे  व व्यापक अर्थ पुढे येत आहेत.

पितृसत्ता व स्त्रीमुक्ती ही पुस्तिका अभ्यासणे आजही अत्यंत आवश्यक आहे . कारण आजही आपण आपल्या अवतीभवती असलेल्या स्त्रीया पुरुषांच्या किती  दबावाखाली जगत असतात ते अनुभवतो .स्त्रियांची प्रचंड घुसमट कुटुंबात होत असते परंतु आर्थिक परावलंबन ,मुलांचे संगोपन ,कुटूंबाची समाजातील प्रतिष्ठा या सगळ्यांचा विचार करत अनेक स्त्रिया आयुष्यभर अन्याय सहन करत राहतात त्यापैकी काही अन्यायाविरुद्ध आवाज उठवितात पण ती संख्या खूप कमी आहे पितृसत्तेविरोधाततील लढा सोपा नाही त्यामुळेस्त्रियांचे संघटन वाढणे खूप आवश्यक आहे.

लेखिका औरंगाबाद येथील असून सत्यशोधक महिला चळवळीतील सक्रिय कार्यकर्ती आहे.