मार्च २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित “द काश्मीर फाइल्स” हा चित्रपट,१९९० मध्ये काश्मिरी पंडितांचे जे स्थलांतर काश्मीर खोऱ्यातून झालं त्याचे चित्रीकरण करणारा हा चित्रपट! हा संपूर्ण चित्रपट सत्य झाकून असत्याला आपल्यासमोर ठेवतो आणि मुस्लीम द्वेषाचे राजकारण यशस्वी करताना दिसतो. काश्मीर खोऱ्यात जे काही घडलं त्यात जसे काश्मिरी पंडित होरपळले गेले तसेच काश्मिरी मुसलमान सुद्धा होरपळले गेले या सत्यावर मात्र जाणीवपूर्वक हा चित्रपट पांघरून घालतो.

मुळात हिंदू-मुस्लिम या वादात बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या मनात मुस्लिमांबद्दल द्वेषाची भावना निर्माण करून त्यात आपले हिंदू राष्ट्रवादाचे राजकारण यशस्वी करण्याचा खुला खेळ ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाच्या माध्यमातून खेळला जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी तर हा चित्रपट पाहण्याचा आवर्जुन आग्रह केला आहे. भाजपशासित राज्यांनी तर आपल्या राज्यात करमुक्त करुन हिंदू राष्ट्रवादासाठी अंधत्व स्विकारलेल्या बेकारांचे तांडे सिनेमागृहाकडे वळावेत मुस्लीम विरोधाचा विकार घेवून बाहेर पडावेत अशी सारी व्यवस्था करण्यात आली. आणि मग सिनेमागृहात धर्मांध फौजांच्या आरोळ्या सिनेमागृहात घुमू लागल्या. हे धर्मनिरपेक्ष देशात राजरोसपणे संविधानाची शपथ घेवून सत्तेत आलेले चित्रपटासारख्या कला माध्यमाचा, ज्यामध्ये फिक्शन मोठ्याप्रमाणात असते ते माध्यम धार्मिक ध्रुवीकरणासाठी हत्यारासारखा वापर करतात.  

या चित्रपटानंतर संपूर्ण देशभरात, संपूर्ण जनमानसांत काश्मिरी पंडीतांबद्दल सहानुभूती आणि मुस्लिमांबद्दल द्वेष याच भावना पाहायला मिळतात. हा चित्रपट म्हणजे काश्मीर खो-यातील गेल्या ३० वर्षांचे वास्तव चित्रण आहे आणि ते ३ तासाचा हा चित्रपट बघून आपल्याला ते कळलय अशा अविर्भावात बरेच लोक पाहायला मिळतात. एक गोष्ट खरी की, १९९०मध्ये काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडीतांबाबत जे काही झाले ते निंदनीय आहेचं पण त्याच वेळी काश्मिरी मुसलमानांबद्दल जे काही झाल तेसुद्धा निंदनीय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे.

भाजप संघीय शक्ती नेहमीच हे जात-जमातीच राजकारण पुढे आणताना दिसतेय. भावनिक (जातीयवादी) प्रश्नांना हात घालून ते नेहमीच आपली सत्तेची पोळी भाजताना दिसतात. सैनिकांचं प्रेम, चीनचा विरोध, पाकिस्तान द्वेष पर्यायाने मुस्लीम द्वेष या भावनिक अजेंड्यावर ते नेहमीच स्वार झालेले दिसतात. सरदार पटेलांचा मोठा पुतळा उभा करायचा पण त्याखाली राहत असलेल्या जनतेला वा-यावर सोडायचं.

ज्या काश्मिरी पंडीतांविषयी यांच्या मनात प्रेम ओतू जातंय त्याच काश्मिरी पंडितांचे प्रश्न सोडवण्यासाठी मागच्या ७ वर्षात या सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचललेले आपल्याला दिसून येत नाही. एकूण जवळपास ८०८ काश्मिरी पंडित अजूनही त्या काश्मीर खो-यात आहेत, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आजही गंभीर आहे. जम्मू मध्ये जे स्थलांतरित काश्मिरी पंडित आहेत त्त्यांना मूळ काश्मीर खो-यात नेण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले जात नाहीय. एकही स्थलांतरित कुटुंब काश्मीर खो-यात परतताना दिसून येत नाही. हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजे.

मुस्लीम द्वेषाचे राजकारण जनमानसांत निर्माण करून आपण कोणता एकसंघ भारत निर्माण करणार आहोत? हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. भारत म्हणजे केवळ भूमी नसून त्या भूमीवरील सर्व माणसे मग ती ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शुद्र किंवा मग हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन. या सर्वांचा मिळून भारत होतो हे आपणास विसरून चालणार नाही.

खरं तर काश्मिर फाईल्स या चित्रपटाचे भाजप ज्या पद्धतीने धार्मिक ध्रुवीकरणाचे हत्यार म्हणून ज्या पद्धतीने वापर करीत आहे ते चिंताजनक आहे. खरं तर काश्मिरी पंडीतांच्या प्रश्नाशी भाजपचे कोणत्याही काळात काहीच देणेघेण नव्हते. आजही नाही. भाजपला काश्मिरी पंडीतांचा प्रश्न सोडविण्यापेक्षा तो धगधगत ठेवणे त्यांच्या जमातवादी राजकारणाच्यादृष्टीने सोईचे आहे. अन्यथा आपल्या गेल्या सात वर्षांच्या  सत्ताकाळात त्यांनी हा प्रश्न धसास लावला असता.

भाजप आणि संघपरीवाराने सत्याचा आणि पर्यायाने इतिहासाचा विपर्यास करीत भारतीय राजकारणाच्या परिप्रेक्षात स्वत:ला उभे केले ते सत्याशी मैत्री करुन राजकारण करतील ही भाबडी आशा आहे. भाजपचा जीव असत्यात आहे. आणि अशी असंख्य असत्यकथने निर्माण करुनच भाजप आणि संघपरीवाराला जिवंत राहता येणार आहे. त्या धडपडीचा भाग म्हणजेच काश्मिर फाईल्स आहे.

लेखक सिंधुदुर्गातील सत्यशोधक चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.