सावंतवाडीत घुमला ‘जनवादी’ आवाज. जनवादीने बुलंद केला जनांच्या साहित्य- संस्कृतीचा आवाज

गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुसकर संमेलननगरी, आर.पी.डी.कॉलेज सावंतवाडी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९३२ च्या भेटीने ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या सावंतवाडी शहरात ८ व ९ मे रोजी दलित,आदिवासी,भटके-विमुक्त,स्त्रिया,कामगार आणि कष्टकरी बहुजनांच्या मुक्तीवादी साहित्य आणि  संस्कृतीचा आवाज अभूतपूर्वरित्या घुमला. निमित्त होते १ ल्या जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाचे. महाराष्ट्र आणि गोवा येथून आलेल्या साहित्यिक,विचारवंत,कार्यकर्ते आणि कष्टकरी जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसादात हे संमेलन पार पडले.संमेलनाच्या अध्यक्षा जेष्ठ पत्रकार व लेखिका संध्या नरे-पवार या होत्या. संमेलनाचे उद्घाटन कवी आणि सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाले तर समारोप जेष्ठ विचारवंत व अभ्यासक वंदना सोनाळकर यांच्या हस्ते झाला.

दलित पॅंथर सुवर्ण महोत्सवी वर्षाचे निमित्त साधत सर्वहारा वर्गाच्या मुक्ती दायी राजकारणाच्या बाजून सांस्कृतीक हस्तक्षेपासाठी ‘जनवादी’

हे वर्ष ७० च्या दशकात स्थापन झालेल्या दलित पॅंथर या फुले-आंबेडकरवादी क्रांतीकारी संघटनच्या स्तापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. दलित पॅंथरने जातीय अत्याचाराविरोधात लढतानाच साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात ब्राम्हणी वर्चस्वाविरोधात बंडखोरी करीत नवी मूल्ये स्थापित केली. ज्या काळात जातीय-धार्मिक अत्याचाराच्या विरोधात पॅंथर उभी राहिली,तीच परिस्थिती आज आपल्या अवतीभवती आहे. या विरोधात सांस्कृतिक हस्तक्षेप करण्यासाठी आणि लोकशाही मूल्याचा जोरदार जागर करण्यासाठी सावंतवाडीत हे संमेलन घेण्यात आले होते.

सिंधुदुर्ग,गोवा आणि दक्षिण महाराष्ट्राचा संमेलनाच्या आयोजनात पुढाकार

सावंतवाडीत १ ले जनवादी साहित्य-संस्कृती संमेलन यशस्वी करण्यात सिंधुदुर्ग,गोवा आणि दक्षिण महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळींचा महत्तवाचा पुढाकार राहिला. गोव्यातील कार्यकर्ते पहिल्यांदाच या संमेलनाच्या आयोजनात पुधाकारावर होते. गोव्यातील जनविभागही मोठ्या संख्येने संमेलनाच्या दोन्हीही दिवस सहभागी होता. दक्षिण कोल्हापूरनेही आपल्या सांस्कृतिक वारशांसहित या संमेलनाच्या यशस्वी आयोजनात सहभागी राहिला.

ग्रंथदिंडी आंणि शोभायात्रेने संमेलनाच्या पूर्वसंध्येलाच ‘जनवादी’ची रंगतदार सुरुवात

संमेलनाचे ८ मे ला उद्घाटन झाले असले तरी आदल्या दिवशी सायंकाळी काढण्यात आलेल्या ग्रंथदिडी व शोभायात्रेने संमेलनाचा बिगुल वाजला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रेरणाभूमी ते आर.पी.डी. कॉलेज संमेलन नगरी अशी रंगतदार शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन शोभायत्रेचे उद्घाटन केले. संमेलनाच्या अध्यक्षा संध्य नरे-पवार या सावंतवाडीत उशिरा पोहचूनही त्या शोभायतार्ते त्यानंतर शेवटपर्यंत सहभागी राहिल्या. शोभायत्रेतील  चित्ररथांनी सावंतवाडीकरांनी मंत्रमुग्ध केले. कल्प अशा सामाजिक आशयाचा संदेश देणारे चित्ररथ संमेलनाचे आकर्षण ठरले.या शोभायात्रेत आजरा येथून महिलांचे वारकरी भजन सामिल झाले होते. त्यांच्या अभंगाच्या गायनांनी आणि टाळ मृदुंगांच्या साथीने शोभायात्रेत रंगत आणली.

गोव्याचा बळी राजाचा चित्ररथ शोभायात्रेत लक्षवेधी होता. त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा चित्ररथही सावंतवाडीकरांचे लक्ष वेधून गेत होता. शोभायात्रेच्या प्रवासात ठिकठिकाणी उभे करण्यात आलेले मानवी पुतळे अनेकांसाठी काही काळ सेल्फी पॉंईंट ठरले.मालवणचे तरुण चित्रकार विकास वराडकर आणि संदेस टेंबवलकर यांनी आपल्या कल्पकतेने चित्ररथ बनवले होते. याशिवाय सत्यशोधक शाहिरी जलशांच्या कलाकारांनी घोषणा, क्रांतीगीते गात जनवादीचा आवाज सावंतवाडी शहरात टीपेला नेला. जवळपास चार तास शोभायात्रा चालली. 

मडक्यांची उतरंड मोडीत काढून सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी संमेलनाचे  अनोख्या पद्धतीने केले उद्घाटन

सावंतवाडीत संपन्न झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध कवी आणि सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे  यांनी केले. जातीप्रश्नाला भिडत स्वतंत्र शैलीचे चित्रपट करणा-या नागराज मंजुळे यांच्या हस्ते तितक्याच अनोख्या पद्धतीने संमेलनाचे उद्घाटन झाले. भारतीय समाजातील वर्ण-जात व्यवस्थेची स्त्रियांसहित  प्रतिकात्मकपणे असलेली मडक्यांची उतरंड मोडीत काढून ती समानतेच्या पातळीवर रचून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. जनवादी संमेलनाचा जात-पितृसत्तेच्या विरोधातला हा यल्गार होता.

उद्घाटनप्रसंगी बोलताना नागराज मंजुळे म्हणाले की, ‘आपण कोणत्या जाती, धर्माचे आहोत याकडे लक्ष न देता प्रत्येकाने एकमेकांशी संवाद साधणे गरजेचे आहे. संवाद तुटला की गैरसमज निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येक माणसाने जाती-पातीचे राजकारण करु नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातींच्या लोकांना सोबत घेवून स्वराज्य निर्माण केले. बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेसाठी आपले आयुष्य खर्ची केले. माणसाचा चेहरा महत्वाचा नसतो तर माणसाचे विचार महत्वाचे असतात.

जनवादीने केला परिवर्तनवादी चळवळीत लढणा-या कार्यकर्त्यांचा सन्मान

जनवादी साहित्य संमेलनात प्रा. नवनाथ शिंदे, दुर्गादास गावडे या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा व आंबेडकरवादी कथालेखक सिद्धार्थ देवधेकरांचा उद्घाटक नागराज मंजुळे व संमेलनाध्यक्षा संध्या नरे-पवार यांच्या हस्ते मानपत्र व सन्मानचिन्ह देवून त्यांच्या कष्टकरी वर्गाच्या लढाईतील योगदानाबाबत यथोचित सन्मान करण्यात आला.

डॉ. प्रा. नवनाथ शिंदे हे आजरा येथील असून त्यांनी परिवर्तनवादी चळवळीत बुद्धीजीवी म्हणून आयुष्यभर भूमिका बजावली आहे. आजरा ,चंदगड परिसरातील जवळपास साडेतीनशे देवदासींची जटा सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर प्रबोधनपर एकपात्री प्रयोग महाराष्ट्रभर सादर करुन प्रबोधनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

गोव्यातील सुप्रसिद्ध आदिवासी कार्यकर्ते दुर्गादास  गावडे हे गोव्यातील गावडा, कुणबी वेळीत या आदिवासी समाजाला अनूसूचित जमातीचा दर्जा मिळवून देण्यासाठी झालेल्या आंदोलनात अग्रभागी राहिले आहेत

सिद्धार्थ देवधेकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील असून ते मराठीतील आघाडीचे कथाकार आहेत. फुले-आंबेडकरी विचारांशी इमान राखत त्यांनी साडेतीन दशके कथालेखन केले आहे

संमेलनाध्यक्ष संध्या नरे पवार यांनी आपल्या भाषणात बुलंद केला जनवादी संमेलनाच्या सांस्कृतिक हस्तक्षेपाचा आवाज

सावंतवाडीत संपन्न झालेल्या १ ल्या जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षा जेष्ठ पत्रकार व लेखिका संध्या नरे-पवार या होत्या. त्यांनी आपल्या भाषणाने संमेलनाची भूमिका वैचारिकदृष्ट्या उंचीवर नेत दलित,आदिवासी,भटके-विमुक्त,स्त्रिया आणि कष्टकरी बहुजनांच्या मुक्तीदायी राजकारणाच्या बाजूने जनवादीने केलेला सांस्कृतिक हस्तक्षेपाचा आवाज अधिक बुलंद केला. धर्मांध –जातीय शक्तींच्या सांस्कृतिक राजकारणाची चिकित्सा करीत जोरदार हल्ला केला. त्याचबरोबर डाव्या परिवर्तनवादी शक्तींच्या प्रतिक्रियावादी क्षीण राजकारणाचाही समाचार घेत पर्यायी सांस्कृतिक राजकारणाचे दिशादिग्दर्शन केले.

त्या आपल्या भाषणात म्हणाल्या, “हे साहित्य आणि संस्कृती संमेलन आहे, केवळ साहित्य संमेलन नाही, ही बाब मला लक्षणीय वाटते. जिथे जनांनी लेखणी हातात घ्यायची का नाही, हे प्रस्थापितांची संस्कृती ठरवते, जनांनी लिहिलेल्या साहित्यकृतीला मान्यता द्यायची का नाही, हे अभिजनांची समीक्षा ठरवते, तिथे या वैचारिक प्रभुत्वाला सामोरे जाताना जनांना आपल्या संस्कृतीसहच उभे राहावे लागते.  

“इथल्या ज्ञानव्यवहारावर कायम उच्चजातीयांचं प्रभुत्व होतंच, त्यातूनच उच्चजातीयांची संस्कृती हीच मुख्य प्रवाही संस्कृती बनलेली होती. त्यामुळे त्यांच्या सांस्कृतिक राजकारणात जनांचं साहित्य आणि संस्कृती या बाबी कायम परिघावरच राहिल्या. त्या केंद्रस्थानी आणण्याची जबाबदारी इथल्या पुरोगामी विचारप्रवाहाची होती. पण त्यावरही प्रस्थापितांची छाप कायम राहिली.

“वर्णआधारित, जातिआधारित विभाजन साहित्याचेही विभाजन करत असते. संस्कृती आणि साहित्य एकमेकांना सापेक्ष असतात, त्याचे प्रत्यंतर जातिआधारित समाजात वारंवार येते.

“संपूर्ण आसमंतात एक वैचारिक कोलाहल आहे. विविध विचारांचे टकराव आहेत, संस्कृतींचे संघर्ष आहेत. वास्तवाचे अनेक तुकडे सभोवताली आहेत. वातावरणात एक तीव्रता आहे. समाजाचे मानस रोजच्यारोज उलटेपालटे होत आहे. काहीच एकसंध नाही, सगळंच खंडित आहे. धर्म, जात, भाषा, वर्ण, लिंग या परंपरागत विभाजकांच्या बरोबरीनेच नागरिकत्व, राष्ट्रवाद, देशप्रेम या गोष्टीही आता विभाजनासाठी वापरल्या जात आहेत. सांस्कृतिक संघर्ष अत्यंत टोकदार बनला असून झुंडबळींच्या रुपाने व्यक्त होत आहे. विद्यापीठांच्या आवारांमध्ये या वैचारिक, सांस्कृतिक संघर्षाची कुस्ती खेळली जात आहे. या अशा स्थितीत ज्यांनी विचारांना दिशा द्यावी, अशी अपेक्षा असते ती माध्यमं काही अपवाद वगळता आपली वैचारिक प्रस्तुतताच हरवून बसली आहेत

उत्तर आधुनिक काळात एकूणच जगण्याला वेग आलेला आहे. सामान्य माणूस त्या वेगाशी आपल्या जगण्याची गती जुळवत असतानाच कट्टरतावाद्यांकडून एकामागोमाग एक अशा दुहीची पेरणी करणाऱ्या घटना घडवून आणल्या जात आहेत. ‘नकाब का शिक्षण’ हा वाद संपत नाही तोच ‘रामनवमी आणि मांसाहार’ हा वाद पुढे आणला जातो, तो संपायच्या आधीच ‘भोंगे का हनुमानचालिसा’ हा प्रश्न उच्चरवात विचारला जातो. एक घटना मनात रुजायच्या आधीच दुसरी घडतेय. तुमच्या स्मृतीत कुठचीच गोष्ट टिकू दिली जात नाहीए. अखलाखच्या झुंडबळीची घटना कधीतरी खूप मागे घडल्यासारखी वाटते. मुजफ्फरनगरची दंगल स्मृतीपटलावर अंधूक झाली आहे किंवा काहींच्या बाबतीत ती पुसली गेली आहे. ग्रॅहम स्टेन्सला त्याच्या दोन मुलांसह जिवंत जाळणारा दारासिंग तर आज कोणाच्या लक्षातही नाही. हे एक प्रकारे स्मृतींचं खच्चीकरण आहे

खऱ्या स्मृतींच्या खच्चीकरणाबरोबरच खोट्या स्मृती रुजवण्याचं कामही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यातून संपूर्ण समुहाची मिळून एक ‘मिथ्यास्मृती’ तयार केली जाते. त्यासाठी भाषेचाही अचूक वापर केला जातो,  भाषिक राजकारण खेळले जाते. उदा. आर्यांचे आगमन आणि मुस्लिमांचे आक्रमण. आगमन आणि आक्रमण या दोन शब्दांमधून जे सूचित होते ते असे की, आर्यांचे जे काही स्थलांतर झाले, ते निशःस्त्र, अगदी शांततामय मिरवणूक काढून झाले आणि मुस्लिम आले ते तलवारी परजत आले. यातून तलवारीच्या जोरावर मुस्लिम राजांनी, सरदारांनी धर्मांतरं केली, अशी एक मिथ्या स्मृती तयार केली जाते.

“आजच्या सांस्कृतिक वर्चस्ववादाची मूळं पुरुषसुक्तात आहेत.म्हणूनच ‘जन’ ची व्याख्या करताना वैदिक वाङ्मयाने पुरुषसुक्ताच्या माध्यमातून ज्यांना ‘अन्य’ ठरवून हीन लेखले असे सर्व शूद्रजन आणि जे या वर्चस्ववादी विचारधारेला विरोध करतात, जे अब्राह्मणी-अवैदिक विचारधारा मानतात ते सर्व असे म्हणावे लागते. ‘जन’ ही संज्ञा व्याख्यांकित करण्याची तातडी यासाठी आहे की त्याशिवाय सांस्कृतिक संघर्ष काय स्वरुपाचा आहे, याची स्पष्टता येत नाही.

“मुस्लिम समुदायाविरोधात पितृभू आणि पुण्यभू या सावरकरप्रणित संकल्पनांनुसार जे धार्मिक कट्टरतावादाचं राजकारण सुरु आहे, त्यात बुरख्यासारख्या गोष्टींच्या निमित्ताने मुस्लिम समाज आजही धर्मांध आहे, हे संभाषित वारंवार पुढे आणले जाते. हे संभाषित ज्याप्रमाणे हिंदुत्वाचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनी रुजवलं त्याचप्रमाणे नरहर कुरुंदकरांसारख्या पुरोगामी विचारवंतानेही रुजवलं. संपूर्ण मुस्लिम समाज धर्मांध आहे असे म्हणणे एखाद्या संपूर्ण समुदायाचे राक्षसीकरण करणे असतेच पण त्याचवेळी परिवर्तनाच्या सगळ्या शक्यता नाकारणे असते. कुरुंदकरांच्या मांडणीचा प्रभाव काही प्रमाणात तरी पुरोगामी विचारवर्तुळात राहिला. त्यामुळेच आज काही पुरोगामी वर्तुळातील मंडळीही वाईट मुस्लिम दहशतवादी असतात आणि चांगले मुस्लिम त्याला पाठिंबा देतात, अशी विधानं समाजमाध्यमांवर करत असतात.

“सर्व मुस्लिम धर्मांध असतात, हे कथन एकदा समाजात रुजले की कोणत्याही दंगलसद्दश परिस्थितीत मुस्लिम तरुणांना पकडले जाते, तुरुंगात डांबले जाते. यातले काही घरी परतून येत नाहीत. या वास्तवाचा शोध घेत समर खडस हा कथाकार  ‘बकऱ्याची बॉडी’ हा कथासंग्रह लिहितो तेव्हा तो केवळ प्रतिगामीच नाही तर पुरोगामी विचारविश्वासमोरही प्रश्न उपस्थित करत असतो.

संमेलनातील परिसंवादांनी केली वैचारिक घुसळण

दोन दिवसांच्या जनवादी संमेलनात तीन परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. या तीनही परिसंवादात महाराष्ट्रातील दिग्गज विचारवंत,साहित्यिक, कार्यकर्ते सहभागी झाले होते. संमेलनाच्या पहिल्या दिवशी एक तर दुस-या दिवशी दोन परिसंवाद संपन्न झाले.

पहिल्या दिवशीच्या परिसंवादाचा विषय होता ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव- आमच्या स्वातंत्र्याचे काय?’ औरंगाबाद येथील जेष्ठ इतिहासकार डॉ.उमेश बगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात डॉ. प्रदिप आवटे, उल्का महाजन, सरफराज अहमद, शैला यादव आदी मान्यवर वक्त्यांनी मांडणी केली. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होवूनही या देशातले दलित बहुजन ज्या ख-या स्वातंत्र्याची वाट पाहत आहेत ते स्वातंत्र्य त्यांच्यापर्यंत पोहचलेच नसल्याची मांडणी करत सर्वच वक्त्यांनी सत्ताध्यां-यांच्या धोरणनीतीवर कडाडून हल्ला केला. या परिसंवादातील शेला यादव यांनी भटक्यांच्या जगण्याच्या फरफटीची विदारता मांडत अजुनही भटक्या समुहांची भटकंती थांबलेली नाही.अशा स्वातंत्र्याला आम्ही आमचे स्वातंत्र्य म्हणवे तरी कसे असा सवाल केला.

सरफराज अहमद यांनी भारतातल्या मुस्लिमांची ज्या त-हेने कोंडी केली जात आहे, त्यांना दुय्यम नागरिक म्हणून जगावे लागत आहे त्यावर परखड भाष्य केले. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात मुस्लिमांनी असामान्य त्याग केला. तरीही त्यांना बहुसंख्यांकाच्या जोरावर दुय्यम नागरिक ठरवले जात आहे. त्यांच्या असहमतीचा आवाज दाबला जात आहे. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

संमेलनाच्या दुस-या दिवशीच्या पहिल्या सत्रात ‘आजच्या मराठी साहित्यातील दलित,आदिवासी,शहरी,ग्रामीण कष्टकरी स्त्री-पुरुषांचे जीवनदर्शन “ या विषयावर परिसंवाद झाला. जेष्ठ साहित्यिक राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात महेंद्र कदम, नारायण भोसले, दत्ता घोलप आणि आदी मान्यवर वक्ते सहभागी झाले होते.

या परिसंवादात दत्ता घोलप यांनी शेतकरी स्त्रियांचा आवाज साहित्यात उमटायला हवा, तिचे जीवनदर्शन हवे तसे मराठी साहित्यात आले नसल्याची तक्रार त्यांनी केली. तर नारायण भोसले यांनी मराठी साहित्याने भटक्याच्या जगण्याची दखल अभावानेच घेतली आहे.मराठी साहित्यात आजही भटक्याचे जग अस्पर्श आहे. असी टीका केली.

राजन गवस यांनी परिसंवादाच्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले,महापुरुषांनी आपल्याला वैचारिक बैठक दिली. या बैठकीशी इमानदारी राखत आपण साहित्य निर्मिती केली आहे काय असा प्रश्न उपस्थित करीत बहुजनांतून शिकलेली पिढी जबरदस्त वेगाने पांढरपेशी बनली. जी लिहू लागली ती अभिजन वर्गाच्या फॉर्मध्येच व्यक्त होवू लागली. त्यांनी आपल्या परंपरेतला फॉर्म विकसित केला नाही किंवा त्या रचनाबंधात स्वत:ला व्यक्त केले नाही. आपण आपले रचनाबंध का तयार केले नाहीत. आपल्या परंपरेशी तुटून ल्हिते होण्याने आपल्या साहित्यात रशरशीतपण येणार नाही. असे प्रतिपादन केले.

संमेलनाचा शेवटचा परिसंवाद ‘सांस्कृतिक दहशतवाद-साहित्यिक,कलावंत,बुद्धीजीवींची भूमिका ‘ या विषयावर जेष्ठ कादंवरीकार प्रवीण बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद संपन्न झाला. या परिसंवादात हुमायुन मुरसूल,अजय कांडर,शर्मिष्ठा भोसले,धम्मसंगिनी रमागोरख आदी वक्त्यांनी मांडणी केली. बांदेकरांनी आत्मनिवेदनातून सांस्कृतिक दहशतवादाचे आजचे भयावह स्वरुप उलगडून दाखवले. दमनकारी व्यवस्थेच्या विरोधात लेखक लिहिण्याचे जेव्हा धाडस करतो तेव्हा त्याचे खाजगी जीवनच उध्वस्त केले जाते. आज याच पद्धतीने लेखक,कलावंतांची कोंडी केली जडात आहे.त्यांना सरकारच्या निगराणीखाली जगावे लागते. म्हणूनच पेरुमल मुरुगनला आपण मेल्याचे जाहिर करावे लागले. असे असले तरी जगभरातल्या लेखकांनी धोका पत्करुन दमनकारी यंत्रणेच्या विरोधात लिहिले आहे.

कविसंमेलनातही उमटला ‘जनवादी’चा सूर

नागपूर येथील सुप्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. सांगलीच्या कवयित्री लता ऐवळे-कदम यांच्या अप्रतिम सूत्रसंचालनाने रंगतदार बनलेल्या या कविसंमेलनात अजय कांडर, दीपक पटेकर, अरुणनाईक, विठ्ठल कदम,मधुकर मातोंडकर अभिजित पाटील,नमन धावस्कर, सरिता पवार, प्रा. निलम यादव-कांबळे,प्रज्ञा मातोंडकर,स्नेहा कदम डॉ. महेश पेडणेकर, क्रांतिराज सम्राट,मिलिंद माटे, संपत देसाई, अंकुश कदम, भिमराव तांबे, ऋतुजा सावंत-भोसले,पुनम गायकवाड, युवराज जाधव, सुनिता खाडे, मुर्ती कासार आदि कवींनी आपल्या कवितेतून दर्जेदार काव्यरचना सादर केल्या.

मोस्ट वेलकम नाटकाने जनवादीच्या सूर अधिक तीव्र केला

वर्तमानावर भाष्य करणारे ‘मोस्ट वेलकम’ या नाटकाने संमेलनात अधिक रंगत आणली. आजच्या परिस्थितीवर भाष्य करणारे ,मोस्ट वेलकम’ या नाटकाने अनेक विषयांवर रसिकांना अंतर्मुख करण्यास भाग पाडले. पहिल्या दिवशीच सादर झालेल्या या नाटकाने जनवादीचा सांस्कृतिक हस्तक्षेपाचा सूर अधिक तीव्र केला. निशिगंध निर्मित व कलासाधना निर्मित मुंबईच्या तरुण रंगकर्मींनी ह्या नाटकाचे सादरीकरण केले.

गटचर्चेने गाजवले संमेलनाच्या दुस-या दिवशीचे पहिले सत्र

दुस-या दिवसाची सुरुवात गटचर्चेने झाली. गोवा समजून घेताना, काश्मीर फाईल्स- धार्मिक धृवीकरणासाठी चित्रपट माध्यमाचा उपयोग केला जात आहे का?, नवीन शैक्षणिक धोरण आणि बहुजनांचे शिक्षण, पर्यायी सांस्कृतिक राजकारण आणि समतेची प्रतिके, तीन कृषी कायदे- सत्ताधारी कोणाच्या बाजुने?,काश्मिर फाईल्स-धार्मिक ध्रुवीकरणासाठी चित्रपट माध्यमाचा उपयोग केला जात आहे काय? आदी विषयावर गटचर्चा झाली. या गटचर्चेत उपस्थितांनी उस्फुर्तपणे सहभागी होत चर्चेत भाग घेतला.

चर्चा संकलनात प्रभाकर ढगे, डॉ.उल्हास चांदेलकर,ॲड.कृष्णा पाटील, मल्लीका माटे,रणजित कालेकर, पराग गावकर यांनी मांडणी केली.

विचारवंत वंदना सोनाळकर यांच्या उपस्थितीत संमेलनाचा शानदार समारोप

दोन दिवस जबरदस्त उत्साहात सुरु असलेल्या जनवादी साहित्य संस्कृती संमेलाचा समारोप जेष्ठ विचारवंत वंदना सोनाळकर याच्या उपस्थितीत संपन्न झाला. संमेलनाच्या समारोपात बोलताना त्या म्हणाल्या,आज भारतातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे.जाती-धर्मावरुन एकमेकांत भांडणे लावण्याचे काम सुरु आहे.असावेळी आपापसातील मतभेद दूर ठेवून आपण सर्व एकच लेकरे आहोत या भावनेने एकमेकांना साथ द्या तरच ख-या अर्थाने विवेकवादी समाजाची निर्मिती होईल. आजच्या अत्यंत संवेदनशील काळात आपण लोकशाही मूल्यांचा जागर करण्यासाठी जनवादी संमेलन घेतले आङे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. असे सांगत सोनाळकर यांनी प्रच्छन्न भांडवशाहीवर टीका केली.

संमेलनाचा समारोप करताना संमेलनाध्यक्ष संध्या नरे-पवार म्हणाल्या, समारोप करताना सम्मेलनाध्यक्षा संध्या नरे-पवार म्हणाल्या की, हे जनवादी साहित्य संमेलन म्हणजे संविधानाचा जागर होता. अत्यंत कठीण काळात घेतलेले हे संमेलन एक प्रकारे आपल्याला ऊर्जा प्रदान करणारे आहे. सभोवतालच्या परिस्थितिवर हा सकारात्मक हस्तक्षेप असून आपण संमेलनातून चांगली बीजे पेरत आहोत.

संमेलनात प्रादेशिक फूडस्टालचा रसिकांनी घेतला आस्वाद

संमेलनात पुस्तक स्टालसहीत गोवा,कोल्हापूर खाद्य संस्कतीचेही स्टॉल लावण्यात आले होते. गोवन पाककलेच्या फुडस्टालने खवय्यांची चंगळ केली. आज-याचा सुप्रसिद्ध घनसाळ तांदुळ विक्रीचा स्टॉलही खरेदीदारांसाठी आकर्षित करणारा होता. ग्रंथविक्रीच्या स्टालवरही वाचकांची खरेदीसाठी दोन दिवस झुंबड उडाली होती.

असह्य उन्हाळा, लग्नसराई अशा प्रतिकूल वातावरणात हे संमेलन प्रचंड यशस्वी झाले. रेल्वेची तिकीटे मिळत नसतानाही  धुळे, औरंगाबाद, जळगांव, नागपूर,सां गली,सातारा,पुणे,गोवा,मुंबई आदी भागांतून कार्यकर्ते मिळेल त्या वाहनांनी मोठ्या संख्येने संमेलनासाठी सावंतवाडीत दाखल झाले  होते.

जनवादी संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सिंधुदुर्ग, गोवा आणि दक्षिण कोल्हापूर येथील कार्यकर्त्यांची सहभागातून निर्माण केलेल्या संयोजन समितीने प्रचंड मेहनत घेतली. संयोजन समितीचे संपत देसाई (अध्यक्ष), मिलिंद माटे (उपाध्यक्ष), मधुकर मातोंडकर (उपाध्यक्ष) प्रतिभा चव्हाण (कार्याध्यक्षा), अंकुश कदम (सेक्रेटरी), प्रा. रुपेश पाटील (उपसेक्रेटरी), संतोष पाटणकर (खजिनदार),  राजेंद्र कांबळे, मोहन जाधव (प्रसिद्धी) , युवराज जाधव(प्रसिद्धी), योगेश सकपाळ(प्रसिद्धी), अमोल कांबळे, परमेश्वर सावळे, प्रज्ञा मातोंडकर दिपक दाजी कदम, सिद्धार्थ गोपाळ तांबे,स्वाती तेली,महेश पेडणेकर, उषाकिरण सम्राट, डॉ.प्रज्ञाकुमार गाथाडे, डॉ.सुनिल भिसे,दिपक पटेकर, प्रकाश मोरस्कर, मारुती चंदर पाटील,विठ्ठल कदम, अर्जुन जाधव,सुधाकर पेडणेकर, ॲड.जितेंद्र गावकर, ॲड.प्रीती गावडे,मल्लिका माटे, सरीता पवार, सुरेश पवार,विजय ठाकर,दिपक जाधव, विकास वराडकर,सुभाष गोवेकर, निलेश जाधव, निलिमा जाधव,जितेंद्र पेडणेकर,सुजित सावंत,राजेश सखाराम माने, डॉ.उल्हास चांदेलकर, सत्यवान पेडणेकर,नारायण खराडे, प्रवीण गांगुर्डे, प्रभाकर ढगे,,संतोष पेडणेकर, शंकर जाधव, दत्तात्रय वावधने, राजेंद्र कांबळे, गणेश म्हापणकर,अर्पित शांडिल्य, परिक्षित शर्मा, रमेश जाधव,रवी जाधव,मनिष नारायण तांबे,सुधांशू गौतम तांबे,रणजित कालेकरकृष्णा सावंत,संजय घाटगे,काशिनाथ मोरे, वंदन जाधव, बजरंग पुंडपळ,, अशोक शिवणे, नरेंद्र पाटील, विद्या तावडे आदींनी या समितीत सक्रिय सहभाग दिला.


योगेश सकपाळ हे सिंधुदुर्गातील सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते आहेत.