अनुवाद – संहिता गुप्ते

भारतामध्ये नाट्यसमूहांना ते कितीही यशस्वी असले तरी दहा वर्षाच्या वर आयुष्य नसते त्यामुळे दिल्लीतला जननाट्यमंच (जनम) हा नाट्यसमूह जेव्हा या मार्चमध्ये त्याच्या पन्नासाव्या वर्षात पदार्पण करतो तेव्हा तो एक नवा मापदंड उभा करतो. ह्या इतक्या वर्षात जनम ने जवळपास 120 नाटकांची निर्मित केलेली आहे. भारताच्या 300 शहरात व खेड्यांत त्यांचे जवळपास 8000 प्रयोग केले आहेत. हया  नाटकांपैकी मशीन (1978) औरत (1979) हल्लाबोल (1988) गोपी गवैया बाग बजैया (1994) वोह बोल उठी (2001) ये दिल मांगे मोर गुरुजी (2002)अंधेर नगरी (2021) आदी काही राजकीय पथनाट्य अजरामर झालेले आहेत. हबीब तनवीर,अनुराधा कपूर, एम के रैना, गोविंद देशपांडे, अभिषेक मुजुमदार,अनुजा घोसाळकरांसारख्या प्रसिद्ध नाट्यकलावंतांनी या ग्रुप करता अनेक नाटके लिहिली व निर्देशित केली आहेत.

जनमच्या सदस्यांनी भारतात व जागतिक पातळीवर बऱ्याच संस्थांमध्ये व्याख्यान दिलेली आहेत व कार्यशाळाही आयोजित केल्या आहेत. हया नाट्य मंडळांनी पॅलेस्टाईन, साऊथ आफ्रिका,ब्रिटन व अमेरिकेमध्ये सुद्धा आपले प्रयोग सादर केले आहेत. भारतातील अनेक अग्रगण्य नाट्यसमारंभामध्ये या नाट्य मंडळाला आपले प्रयोग सादर करण्यासाठी आमंत्रणे मिळाली आहेत ज्यामध्ये पृथ्वी थिएटर (मुंबई ),रंग शंकरा (बेंगलोर,)नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा व साहित्य कला परिषद (दिल्ली), केरला संगीत नाटक अकॅडमी (कोची),नंदन (कलकत्ता)आणि रंगायन (मैसूर)यांचा समावेश होतो.

जनमच्या पाच दशकाच्या नाट्य प्रवासाकडे बघणे म्हणजे भारतीय प्रजासत्ताक जात,वर्ग ,लिंगभाव आणि अस्मिता या भारताच्या प्रधान समस्यातून कसे उत्कांत होत गेले याचा जणू आलेखच होय. ‘जनम’ सारखे फार कमी नाट्यसमूह हे सतर्क राहून राजकीय व सामाजिक बदलांना प्रतिसाद देत आहेत.

अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील पण मी या सर्व इतिहासातील दोन महत्त्वाचे प्रसंग अधोरेखित करू इच्छितो. दोन्ही प्रसंग हे अत्यंत संकटाचे होते आणि ह्या प्रसंगांना तोंड देतानाच जनमची खरी ओळख सगळ्यांना झाली.

पहिला प्रसंग १९७८ मधला आहे. ती एक शरद ऋतू मधील प्रसन्न संध्याकाळ होती. मध्य दिल्लीतल्या एका सरकारी निवासस्थानाच्या गच्चीवर दहा-बारा तरुण कलावंत,दिग्दर्शक, गायकांचा एक समूह जनमच्या भवितव्याबाबत चर्चा करीत होते. त्यांच्यासमोर काय करावे हा प्रश्न होता. नाटकांचे प्रयोग थांबले होते आणि ग्रुप चालवण्याकरता पैसे नव्हते, हे असेच चालू राहिले असते तर ग्रुप बंद करावा  लागला असता. 

जनम चे मूळ

जनम हा ग्रुप फक्त पाच वर्षांपूर्वी म्हणजे १९७३ मध्ये अस्तित्वात आला होता,जेव्हा आजच्या चर्चेत सहभागी असलेले बरेच जण इंडियन्स पीपल्स थिएटर असोसिएशनच्या (IPTA) दिल्ली शाखेतून बाहेर पडले होते. IPTA चे जुने सभासद हे डाव्या पक्षाच्या कामगार संघटनेच्या विचारांपासून सावध होते जे नवीन कलावंत आग्रहांनी मांडत होते. जेव्हा एकत्र काम करणे कठीण झाले तेव्हा हे सर्व तरुण बाहेर पडले व जनमची निर्मिती झाली

पहिली पाच वर्षे जनम ने भरपूर कलावंतांसोबत, संगीत, प्रकाश योजनेसह मोठे मोठे नाट्य प्रयोग केले. कविता नागपाल यांनी या ग्रुप करता, दिग्दर्शित केलेली ‘बकरी’ हे सर्वात मोठे यशस्वी नाटक होते. हे एक राजकारणावरचे विडंबन काव्य, प्रसिद्ध मार्क्सवादी कवी श्री सतेश्वर दयाळ सक्सेना यांनी या ग्रुप करता लिहिले होते. ही नाटके नाट्यगृहात न होता खुल्या जागेवर त्या उद्देशाने उभारलेल्या स्टेजवर होत असत व हजारो प्रेक्षक ते पाहत असत . हे प्रयोग किसान सभा किंवा कम्युनिस्ट चळवळीशी संबंधित डाव्या संघटनांनी दिलेल्या देणग्यांवर सादर केले जात असत. 

जेव्हा १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर ची निर्मिती करणे कठीण जाऊ लागले. जनम थोड्याफार प्रमाणात निष्क्रिय होऊ लागला. आणीबाणी नंतर हे सदस्य पुन्हा जमले व त्यांनी काही प्रयोगाची निर्मिती केली पण आता प्रयोग करणे कठीण होऊ लागले होते. आम्हाला तुमचा नाट्यसमूह हवा आहे असे कार्यकर्ते जनम ला सांगत होते पण हेही सांगत होते की त्यांना ते परवडत नव्हते.

१९७८ मध्ये एका प्रयोगाकरता पाच हजार रुपये खर्च येत असे . ती त्यावेळची मोठी रक्कम होती.  डाव्या संघटना जे हे प्रयोग सादर करत होते त्यांच्यापाशी आता उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत नव्हते. आणीबाणीत त्यांना भूमिगत राहून काम करावे लागले व आता त्यांच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर लागलेल्या खोट्या आरोपांकरता त्यांना कायदेशीर बाबींवर खर्च करावा लागत होता. जनमच्या नव्या नाटकांकरता कोणीही प्रायोजक नव्हता.

त्या शरद ऋतुच्या संध्याकाळी सर्व तरुण कलावंतांच्या मनात हाच गोंधळ चालू होता. त्यांचे काम चालू राहण्यासाठी त्यांना कोठून पैसा मिळेल हाच सर्वांना प्रश्न भेडसावत होता . एखाद्या कलेची निर्मिती ही स्वखर्चाने होत नसते, त्याच्याकरता एक कोणीतरी प्रायोजक, एखादी पैसे पुरवणारी संघटना, एखादे महामंडळ किंवा सरकार कोणीतरी हवेच असते. कलावंत म्हणून तुम्हाला यापैकी कोणीतरी शोधावे लागते आणि मग निर्मितीला सुरुवात होते. पण अचानक हा पैशाचा स्त्रोत संपून जातो , पाठिंबा कर्त्याचीच आवड बदलते, संघटनांचे पैसे खर्च करण्याचे अध्यादेश बदलतात, महामंडळे आता बाजारात ज्याला भाव येईल त्याच्या पाठीमागे असतात आणि सरकारची राजकीय प्राथमिकता बदललेली असते. आता कलावंत काय करतील? ते पैशाच्या एका नवीन स्त्रोताच्या अपेक्षित होते जो एखाद्या नव्या अध्यादेशात , मर्यादित ढाच्यात असू शकत होता. जर कालचे चलनी नाणे विविधता होती तर आजचे हवामानातील बदल होतील. जर कालची फॅशन ही माध्यमांवर भर देणारी होती तर आजची एखाद्या ठराविक कामाची जागाच होती.

हे फक्त कलेच्या प्रांतात होते असे नाही तर विविध क्षेत्रातल्या शोधकार्य सुद्धा निधी देणाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे हेच होत होते जो कोणी पिपाणी खरेदी करत असेल त्याची धून वाजत असे. १९७८ मधल्या शरद ऋतूच्या संध्याकाळी सर्व कलावंत हीच द्विधावस्था अनुभवात होते जर मग कामगार संघटना व किसान संघटना त्यांच्या नाटकांकरता पैसा पुरवत नसतील तर त्यांना दुसरा कोणीतरी पाठिंबा देणारा शोधावा लागत होता आणि हाच एक समाधानकारी पर्याय होता.

जनम-२

पण एक नवयुवक जो फक्त 26 वर्षाचा होता. त्याच्यापाशी एक वेगळीच कल्पना होती ‘जर आपण लोकांपर्यंत मोठे नाटक नेऊ शकत नाही तर आपण आता छोटी नाटके घेऊन जाऊ’ दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कोणाही पाठिंबा कर्त्याकडे, जो जनमने निर्मित केलेल्या नाटकांच्या करता पैसा उभा करेल, न जाता कामगार संघटनांना व अन्य डाव्या संघटनांना परवडतील अशी नाटके द्यायची. थोडक्यात सांगायचे तर अर्थशास्त्राच्या पुढे राजकारण ठेवले पाहिजे हे त्याच्यातून स्पष्ट होते. त्या तरुण माणसाचे नाव सरदार हाश्मी असे होते आणि त्याच्या हया साध्या विधानाने ‘पथनाट्य’ या संकल्पनेला जन्म दिला गेला.

“मुक्त नाट्यगृहे”

पुढील काही आठवड्यातच ‘जनम’ ने त्यांचे पहिले पथनाट्य लिहून प्रदर्शित केले. “मशीन.” गाझियाबाद फॅक्टरीतील मजुरांच्या संघर्षावर व त्यांच्या हत्येवर हे नाटक आधारित होते . हे पथनाट्य सर्वप्रथम १५ ऑक्टोबर १९७८ ला सादर केले गेले आणि इथूनच जनमच्या विलक्षण समृद्ध अशा कालावधीला सुरुवात झाली.

पुढच्या चार वर्षात जनम’ने वर्षाला ४०० प्रयोग सादर केले. ही नाटके छोटी, सुलभ कुठेही, कधीही सादर करण्यासारखी आणि विशेष मोठ्या गरजा नसल्यामुळे हे शक्य झाले होते. ही मुक्त नाट्यगृह होती. मुक्त दोन्ही अर्थाने एक म्हणजे खर्चाच्या बाबतीत ही मोफत होती आणि कोणत्याही बाह्य दडपणापासून ती मुक्त होती. कामगार संघटना व इतर डाव्या संघटनांना नेमके हेच हवे होते. जनम ही अगणित निषेधांचे व संघर्षांचा स्तंभ बनला होता. पैशाच्या स्त्रोताच्या मागे न लागता आपल्या राजकीय वचनबध्दतेशी तडजोड न करता जनम आपल्या पायाभूत आदर्शाशी व कामगार वर्गाशी प्रामाणिक उभा राहिला.

जनमच्या इतिहासातील दुसरा प्रसंग अतिशय उल्लेखनीय असा आहे. दिनांक १ जानेवारी १९८९ ला ‘हल्लाबोल’ या पथनाट्याचा प्रयोग झेंडापूर हया, गाजियाबाद मधील साहिबाबाद औद्योगिक वसाहतीच्या, एका शहराचा चेहरा असलेल्या खेडेगावामध्ये प्रयोग चालू होता. तेव्हाचा राजकीय पक्ष काँग्रेसच्या राजकीय गुंडांनी जनम’च्या ग्रुप वर हल्ला केला. त्यांनी एका नेपाळी स्थलांतरित मजुरावर गोळीबार करून त्याला ठार केले, केवळ दहशत पसरवण्याकरता. त्यांनी इतर काही जणांना जखमी केले, त्यात सफदर हाश्मी गंभीररित्या जखमी झाले. लोखंडी सळ्यांनी व बांबूच्या काठ्याने त्यांच्या कवटीवर प्रचंड प्रहार केले गेले.

सफदर हाश्मी यांचा अंत्यसंस्कार, ३ जानेवारी १९८९. | फोटो क्रेडिट: जन नाट्य मंच संग्रह

दोन जानेवारीला सफदर हाश्मींचे हॉस्पिटलमध्येच निधन झाले. सगळ्या वृत्तपत्रांनी या बातमीला पहिल्या पानावर प्रसिद्धी दिली. दुसऱ्या दिवशी पंधरा हजाराहून अधिक लोक सफदर हयांच्या अंत्ययात्रेला सामील झाले होते. एखाद्या नाट्यकलावंताला दिल्लीत क्वचितच असा निरोप दिला असेल. हया अंत्ययात्रेतील बऱ्याच जणांना सफदर माहिती होते किंवा त्यांनी जनमची पथनाट्य पाहिली होती, पण असेही बरेच जण होते की त्यांनी हे पाहिले नव्हते. ते फक्त या अंतयात्रेत दुःखाने व रागाने सामील झाले होते. जर एखादा माणूस फक्त पथनाट्यात भाग घेतल्यामुळे मरत असेल तर ह्या लोकशाहीत नक्कीच कुठेतरी चुकत होते.

दुसऱ्या दिवशी दिनांक ४ जानेवारीला,म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर फक्त 36 तासांमध्ये. कलावंत व संघटक असलेली  सफदरची बायको, मोलायश्री हाश्मी,  हिने जिथे हल्ला झाला तिथेच तो खंडित झालेला नाट्यप्रयोग या ग्रुपने सादर केला. हा एक अतिशय प्रेरणादायी व अंत:करण ढवळून टाकणारा असा क्षण होता.

माझ्या मताप्रमाणे ४ जानेवारी १९८९ चा ‘हल्लाबोल’ हा जनमचा पथनाट्य प्रयोग जो मोलाईश्री ला घेऊन, सफदरवर जिथे हल्ला झाला त्याच ठिकाणी करणे हे भारतीय नाट्य इतिहासातील एक अतिशय महत्त्वपूर्ण सादरीकरण होते. हया सगळ्यांमध्ये कलावंतांचा धारिष्ट होतेच, विशेषत: मोलायश्रीचे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे जनम’ची त्यांच्या प्रेक्षकांप्रती असलेल्या बांधिलकीचे निदर्शक होते.

. मोलयश्री हाश्मी आणि इतर जनम कलाकार सफदरच्या हत्येच्या ठिकाणी ‘हल्ला बोल’ सादर करतात, 4 जानेवारी 1989. | फोटो क्रेडिट: जन नाट्य मंच संग्रह

हा फक्त जनम’ वरचा हल्ला नव्हता तर हा प्रेक्षकांवरचा सुद्धा हल्ला होता. जसा कलावंतांच्या सादरीकरणाच्या हक्कावर होता तसाच प्रेक्षकांच्या बघण्याच्या हक्कावर सुद्धा होता. ज्याप्रमाणे आर्थिक स्त्रोत्राचा अभाव जनम’च्या प्रेक्षकांशी असलेल्या बांधिलकीला हरवू शकला नाही त्याचप्रमाणे हिंसा, धमक्या, दोन मृत्यू हे सुद्धा हरवू शकले नाहीत. नाट्य क्षेत्रात जनमचे अर्धशतकाहून अधिक असलेले काम हे शहरी तसेच ग्रामीण कामगार प्रेक्षकांच्या प्रती असलेल्या अथक आणि आग्रही बांधिलकीचे प्रतीक आहे. कलात्मक योगदानाच्या कितीतरी वरची ही जनमची मोठी ताकद व उपलब्धी आहे.

जनमची सुवर्ण जयंती ही कोणत्याही शांत क्षणी आलेली नाहीये. आपल्या धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताकाची मूलभूत तत्वे दररोज अभूतपूर्व हल्ल्यांच्या सावटाखाली आहेत. काही हल्ले उघड तर काही छुपे. लोकशाहीचे रक्षण व संरक्षण करण्याचा संघर्ष कधीही एवढा तातडीचा झाला नव्हता.

लोकशाहीला काहीच अर्थ नाही जेव्हा ती फक्त अधून मधून होणाऱ्या पाच वर्षांच्या कार्यविधींसारखी असते. लोकशाहीचा खरा अर्थ पाहायचा असेल तर, त्याला त्याचा खरा चेहरा आणि अर्थ द्यायचा असेल तर, तो आपल्या सामाजिक जीवनाच्या प्रत्येक छोट्या गोष्टींनी वेढलेला असेल तसंच फक्त राजकीय कक्षेच्या पलीकडे त्याचे अस्तित्व असेल. लोकशाही ही कायद्याच्या पलीकडे सार्वजनिक जीवनात असली पाहिजे. लोकशाहीचा खरा अर्थ बघायचा असेल तर सार्वजनिक जागा जिवंत झाल्या पाहिजेत, रस्त्याचे कॉर्नर्स, उद्याने, बागा, लहान वस्त्या, शैक्षणिक संस्था आणि कितीतरी. तसेच खाजगी जागा आपले दिवाणखाने, स्वयंपाक घर व बेडरूम सुद्धा.

जनम’ सारखे शेकडो नाट्यसमूह आहेत जे लोकांपर्यंत नाटके घेऊन जातात. जे उपेक्षित, न बोलणारे व पीडित लोकांना एक आवाज देतात. ते हे सार्वजनिक सादरीकरण करूनच साध्य करतात. हे प्रयोग सगळ्यांसाठी खुले असतात, जेथे कोणत्याही वर्गाचे, जातीचे, लिंगभेदाचे शिष्टाचाराचे बंधन नसते तसेच इथे प्रयोग बघायला पैशांचीही गरजही नसते. खुल्या आणि स्वतंत्र विचारांची संस्कृती आणि सार्वजनिक प्रदर्शन हे लोकशाही संस्कृतीचे पाळेमुळे घट्ट करणारे असते, तिला खरे अर्थ देणारे असतात.

जनम’चा पन्नास वर्षाचा प्रवास आपल्याला भारताच्या लोकशाहीच्या आचार आणि परंपरेच्या ज्या एकाच वेळेस नियामक आणि चैतन्यदाई अशा दोन्ही आहेत याची आठवण करून देते. हे नियामक सध्या प्रचंड दबावाखाली आहेत आणि म्हणूनच त्यांचे रक्षण करण्याची, वाढवण्याची आणि मोठे करण्याची नितांत गरज आहे.

 एखाद्या नाट्यसमूहाचे अर्धशतक साजरे करणे महत्त्वाचे आहे, कारण रंगभूमीला शक्य असणाऱ्या स्वातंत्र्यासाठी जोपर्यंत लढा दिला जात नाही तोपर्यंत तो अर्थहीन आहे.

—————————————————————————————————————-

इंग्रजी पाक्षिक ‘फ्रंटलाईन’ च्या ९ जून २०२२ च्या अंकातून साभार.



सुधन्वा देशपांडे हे 1987 पासून जन नाट्य मंचचे अभिनेता, दिग्दर्शक आणि संयोजक आहेत. लेफ्टवर्ड बुक्सचे संपादक, ते हल्ला  बोल: द डेथ अँड लाइफ ऑफ सफदर हाश्मी  (2020) चे लेखक आहेत.

या लेखाच्या अनुवादक संहिता गुप्ते या पुणेस्थित असून त्या निवृत्त बॅंक अधिकारी आहेत.