१.कॅनव्हास

कॅनव्हासवर रेखाटावी
श्रृंगारविहीन
वस्त्रविहीन
स्त्री
अन चौकाचौकात
भरवावे
प्रदर्शन
त्यांच्या डोळ्यातील
नग्नता मरेपर्यंत……

२.वादळ

माणसांनी वाटून घेतलेत रंग की,
रंगानी वाटणी केलीय माणसांची
या शहरात दिसतात ते केवळ
विशिष्ट रंगात रंगलेली माणसं
सर्वत्र वादळं उठवून
या रंगानी दुषित झालंय शहर
लोकांची घरं, घरातील भिंती, भिंतीवरील प्रतिमा
माखल्या जातात विशिष्ट रंगात एके दिवशी
सा-या रंगाना आपल्यात सामावून घेणा-या
तिरंग्याच्या पांढ-या रंगात रंगता येत नाही

या शहरातील माणसांना……

३. शोध

एकांत…..
असा आदेश देऊन
दूर कुठेतरी जावं
एखाद्या निर्जनस्थळी
की पडून राहावं निपचित
एखाद्या बंद खोलीत
की टेबलावर पडलेल्या
को-या कागदावर
आडव्या- तिडव्या रेषा माराव्यात
वेड्यासारखं
की सोलवटून काढावी
आपलीच त्वचा
आणि सुरक्षित (?)ठेवावी
लांडग्यापासून… दूर….  कुठेतरी
की शोध घ्यावा तिच्या आस्तित्वाचा
की टाहो फोडून सांगावं
बाई माणूस असते
मादी नसते म्हणून !

४. बुरुज

विशाल बुरूज
बुरुजावरचं घुबड
भेडसावत असतात
येणाऱ्या जाणाऱ्यांना
बुरुजाची माती
ढासळते हळूहळू
कालांतराने
बुरुजही होतो जमीनदोस्त
माती झालेल्या बुरुजातून
उभारल्या जातात
घराच्या पक्क्या  भिंती
रात्रीच्या काळोखा
गोट्यासारखे दोन डोळ
चमकत असतात
अंगणातील झाडावर
अन दिवसाढवळ्या
ऐकू येतो घुत्कार
ते अजूनही भेडसावतात
उंबरठ्याच्या आत
उंबरठ्याच्या बाहेर

५. फ्रेममध्ये बसत नाही प्रतिमा

काळानुसार बदलणारी
वेगवेगळी रूपे तिची
फ्रेम मात्र एकच
आता आखूड होतेय
तिची प्रतिमा मावत नाही त्यात
पण त्यांचा अट्टाहास किती
मोडून दुडपून
ते बसवू पाहताहेत
पुन्हा पुन्हा त्याच फ्रेममध्ये तिला
तडे गेलेत आता
मी कालच भिरकावलीय ती फ्रेम
घरामागच्या उकिरड्यावर
नवी प्रतिमा नवी फ्रेम
मोठ्या दिमाखात लावलीय
घराच्या भिंतीवर
तर म्हणे त्यांच्या
संस्कृतीची अवहेलना झाली
अन घराची शोभा गेली.

कवयित्री स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे संशोधक विद्यार्थी म्हणून अध्ययन करीत आहेत.