दि. ८ व ९ मे २०२२ रोजी सावंतवाडी येथे पहिले जनवादी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात जेष्ठ साहित्यिक राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली  ‘आजच्या मराठी साहित्यातील दलित ,आदिवासी,,ग्रामीण,शहरी, कष्टकरी स्त्रीपुरुषांचे जीवनदर्शन’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात दत्ता घोलप यांनी केलेल्या मांडणीचा लेखी दस्तावेज सत्यशोधक प्रतिशब्द च्या वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत. ते मराठी साहित्याचे अभ्यासक आणि समीक्षक आहेत. आपल्या भाषणाचा लेखी दस्तावेज उपलब्ध करुन दिल्याबद्दल लेखकाचे सत्यशोधक प्रतिशब्दच्यावतीने आभार.

– संपादक

‘कृषिजीवनातील प्रक्षोभाचे साहित्य’ या विषयाची मांडणी करताना वर्तमान कृषिजीवनाचे नेमके आकलन नोंदवणे गरजेचे आहे. आज भांडवलशाहीची गतिमानतेने घोडदौड सुरू आहे. बाजारकेंद्रित समाजव्यवस्था आकारली जात आहे. ग्राहक हे व्यक्तीचे मूल्य ठरले आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि लोकशाही अंकित केली आहे. अशा काळात शेती आणि शेतकरी जीवनासंबंधातले प्रश्न अधिक तीव्र स्वरूपात उभे राहिले आहेत. हे प्रश्न सोडवणूकीचे मार्ग धार्मिक कट्टरतावाद, जातीय अस्मिता टोकदार होण्याने धूसर होत चालले आहेत. आर्थिक हितसंबंधातून शेतीप्रश्नातील गुंतागुंत वाढली आहे. नव्वदनंतरच्या खुल्या आर्थिक धोरणात शेतीवरील अनुदान कपात आणि हातात नसलेला बाजार, पर्यावरणातील अरिष्टे यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन तो आत्महत्तेच्या कडेलोटावर आला आहे. आपल्या शेतीप्रधान देशात हा मोठा समूह दुय्यम पातळीवरील जिणे जगू लागला आहे. त्याचा हा सगळा भोवताल मराठी साहित्याने कसा सामावला आहे. शेतीशी निगडित वर्तमानात मराठी साहित्यव्यवहाराने हा जीवनव्यवहार कशा प्रकारे समावून घेतला आहे. कृषिजीवनातील प्रक्षोभाला कोणती वाट करून दिली आहे. भारतीय समाजव्यवस्थेतील मुख्यधारेतील ही जीवनरीत आणि तिचा प्रक्षोभ कशापद्धतीने सामावून घेतला आहे, याचा शोध महत्त्वाचा ठरतो. भारतीय समाजाचे समग्र चित्र ज्यावेळेस साहित्यातून प्रतिबिंबित व्हावे असे आपण अपेक्षिततो, त्यावेळी भारतीय समाजातील शेतकरी या मोठ्या जनसमूहाचे मराठी साहित्यातील चित्र काय आहे, कृषिजनसमूह, त्याच्या समस्या, त्याच्य जगण्याची चाललेली कुतरओढ आणि आत्महत्येकडे झालेला त्याचा प्रवास, कृषिजीवनातील प्रक्षोभ आणि विद्रोहाचे कशा प्रकारे प्रतिरूपण मराठी साहित्यात झाले आहे, याचा शोध प्रस्तुत लेखात घेतला आहे. या विद्रोहाचे स्वरूप, त्यामागील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कारणपरंपरा विवेचनात सामावली आहे.

2.

मराठी साहित्याच्या संदर्भात कळीचा ठरावा असाच प्रश्न सुरुवतीलाच उपस्थित केला पाहिजे. तो म्हणजे कृषिजीवनाबद्दलचे कोणते आकलन आपल्या लेखकांना आहे. कारण कृषिजीवनाचा विचार एक स्वतंत्र जीवनरीत म्हणून जसा करावा लागतो. तसाच शेतीपरंपरेत घडून आलेली स्थित्यंतरे, इथल्या सर्व प्रकारच्या शासनव्यवस्थांच्या वाटचाली, खरेतर हा शेतक-याच्या लुटीचा इतिहास आहे. कृषिजीवनाची आर्थिक बाजू, पर्यावरणीय बाजू या सगळ्यात सामान्य माणसाच्या जीवनानुभवातील प्रक्षोभाचा विचार केंद्रस्थानी येतो. प्रक्षोभ आणि त्याचे विधायक स्वरूप म्हणजे विद्रोहाचा विचार होय. या प्रक्षोभाला वाट करून देणारा विद्रोह कसा प्रकटला आहे, हाही विचार महत्त्वाचा ठरतो.  प्रक्षोभ हा असाह्यतेचा, दुःसह स्थितीचा, वेदनेचा तीव्रतर आविष्कार असतो. व्यवस्थेच्या असमाधानातून प्रक्षोभ जन्माला येतो. त्यातूनच त्या व्यवस्थेत परिवर्तन अटळ ठरते. आहे ही व्यवस्था कोंडीत काढण्यातून, प्रक्षोभातून समूहमन आणि व्यक्तिजीवनातील खदखद व्यक्त होते. समाजजीवनातील हा प्रक्षोभ साहित्यात प्रतिबिंबित होतो. साहित्यगत प्रक्षोभाचे स्वरूप तपासल्यास समाजजीवन नेमकेपणाने आकलनात येते. साहित्याभ्यासात या प्रक्षोभाला लगडून येणारा विद्रोहाचा विचारही महत्त्वाचा ठरतो. विद्रोहाला काहीएक तात्त्विक अधिष्ठान असते. तसेच ती जाणीवपूर्वक केलेली कृती असते. अशोक चौसाळकर म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘विद्रोहाच्या दोन बाजू असतात. एक बाजू नकारात्मक व विघातक असते जी प्रस्थापित व्यवस्थेचा नाश करू इच्छिते. सकारात्मक बाजू विद्रोहानंतरच्या नव्या समाजाच्या रचनेचे आरेखन करते. त्यात जुन्या व्यवस्थेतील अन्याय दूर करून न्यायाच्या आधारावर समाज स्थापन करण्याची कल्पना अनुस्युत असते.’’1 साहित्यकृतीच्या अवकाशातही लेखक प्रतिरोधाची एक सृष्टी निर्माण करतो. आहे या समाजवास्तवापेक्षा जीवनाधारणांपेक्षा अधिक न्यायिक जगाची तो अपेक्षा करत असतो. समाजव्यवस्थेतील अंतर्विरोध उघड करत विद्रोहाची मूल्य पेरत असतो. समकालीन सामाजिक संस्था आणि मूल्यधारणांना सतत लेखक धारेवर धरत असतो. ‘‘समाजातील विविध नागरी व राजकीय संस्थांची अस्तित्वात असलेली व्यवस्था अमान्य करणे, हे विद्रोही साहित्याचे ध्येय असते.’’2 या परिप्रेक्ष्यात कृषिजीवनातील कोणकोणत्या व्यवस्था आणि त्यांची कार्यपद्धती अमान्य केली आहे. या संबंधाने साहित्यात प्रतिबिंबित झालेला विद्रोह पाहणे उद्बोधक ठरते. याबरोबरच साहित्यातील प्रक्षाेभ आणि विद्राेह ङ्माचे स्वरूप सङ्कजून घेताना  ‘‘साहित्यातील विद्रोह-मग त्या कविता असो वा गद्य प्रभावी असूनही तुलनेने त्याचा प्रभाव कमीच असतो. तो तात्कालिक विद्रोहाचा आनंद एक वेळ देत नसेल परंतु सतत विरोध, विसंवाद दर्शवून समाजातील चैतन्य जागृत ठेवण्याचं आणि विश्वाचा दृष्टिकोन बदलण्याचं काम करत राहतो.’’3 मृदुला गर्ग यांच्या या विवेचनातून साहित्यातील विद्रोहाचे नेमके स्वरूप लक्षात येते. हा विद्रोह समाजमनात खोलवरचा प्रभाव निर्माण करतो. सतत चालणा-या निरंतर अशा प्रक्रियेला उर्जा पुरवित असतो. या दृष्टिनेही साहित्यातील विद्रोह अभ्यासणे महत्त्वाचे ठरते.

साहित्याचा मूल्याधिष्ठित विचार करताना प्रक्षोभाला वाट करून देणारा लेखक व्यक्तिगत पातळीवर होणा-या आंतरिकीकरणातील विद्रोहाचा तळठाव घेतो. लेखकाच्या मूल्याधिष्ठित धारणाच समाजवास्तवातील प्रक्षोभाला साहित्यकृतीमध्ये सामावताना नवसमाजबांधणी किंवा अधिक चांगली समाजव्यवस्था आकारली जावी याचे सूतोवाच करत असतो. लेखक या प्रक्षोभाच्या दिग्दर्शनातून काहीएक नैतिक कृती करू पाहतो. समाजधारणेसाठी साहित्याकडून हे अपेक्षित असले तरी, भालचंद्र नेमाडे म्हणतात त्याप्रमाणे ‘‘साहित्याची \लश्रुती सामाजिक उद्बोदधन, लोकशिक्षण किंवा नैतिक उन्नयन ह्यांत होऊ शकते, परंतु ह्या उद्दिष्टांसाठी साहित्याचा साधन म्हणून उपयोग करता येत नाही. म्हणजे विशिष्ट सामाजिक कृती किंवा राजकीय प्रणाली, सुधारणा इत्यादींचं साधन म्हणून प्रचाराचं कार्य ते करत नाही.’’4 साहित्यातील विद्रोहाचा विचार करताना याचे भान सतत ठेवावे लागते. साहित्यिक हा उद्याच्या नव्या जगाचे स्वप्न समकालीन वास्तवातून दाखवून देतो. हे द्रष्टेपण कृषिजीवन चित्रणातही कसे दिसून येते, मराठी साहित्यात विद्राेहाचे प्रखर रूप नेमक्या स्वरूपात दलित साहित्याने आणले याचाही समांतरपणे विचार केल्यास प्रामुख्याने शेतकरी जीवनातील प्रक्षोभाचे स्वरूप लक्षात येते.

मराठी साहित्यातील कृषिजीवनातील प्रक्षोभाचा विचार करणे आणखी वेगळ्या एका परिप्रेक्ष्यातही महत्त्वाचे ठरते. भारतीय समाजजीवनातील एका केंद्रवर्ती जीवनप्रवाहाचे साहित्यगत रूप तपासण्याचा हा प्रयत्न आहे. यासाठी मॅनेजर पांडेय यांचे निरीक्षण विचारात घ्यावे लागते. ते म्हणतात, ‘‘शेतक-यांच्या जगण्याशी जोडून घेऊनच भारतीय कादंबरीत खरी भारतीयता विकसित झाली आणि कादंबरी भारतीय जीवनाच्या आख्यानाचं साहित्यिक रूपही झाली. शेतकरी हा भारतीय समाजाचा मेरूदंड होता आणि भारतीय चेतनेचं मूर्त रूपही….. शेतक-यांच्या जीवनाशी कादंबरी जोडली जाणं म्हणजे भारतीय समाजाच्या समग्रतेच्या केंद्राशी जोडलं जाणं. त्याच्या ऐतिहासिक वाटचालीतील वेगवेगळ्या शक्तींच्या परस्परसंबंधांची ओळख होणं. हे साम्राज्यवाद आणि सरंजामवाद यांच्यातील साटंलोटं समजून घेऊन, कृषिजीवनाशी जोडून घेऊनच शक्य होतं. म्हणूनच कादंबरीत कृषिजीवन केंद्रस्थानी आलं, तेव्हाच ती राष्ट्रीय भावना आणि जनचेतना यांची वाहक झाली.’’5 भारतीय कादंबरीच्या संबंधातील हे निरीक्षण एकूणच साहित्यालाही लागू पडते. भारतीय समाजातील कृषिजनसमूहासारखा मुख्य प्रवाह त्याच्या जीवनधारणांसह, आशा-आकांक्षांसह साहित्यात प्रतिबिंबित असणे हे भारतीय समाजाच्या केंद्राचं प्रतिनिधित्व म्हणून महत्त्वाचे आहे. ह्या मुख्य जीवनप्रवाहाचे  एकूण मराठी साहित्यातील स्वरूप अभ्यासणे महत्त्वाचे ठरते. शेतकरी जीवनाचे वास्तवचित्रण, व्यंगात्मक, विकृत, मूल्यदृष्टीचा अभाव असणारे, रंजक स्वप्नसृष्टीचे चित्रण शेतकèयाचे जीवन रंगवणाèया ग्रामीण साहित्यात झाले आहे. यथे समंजस आंतरिकीकरण झालेले  संयतपणे प्रक्षोभ आणि विद्रोहाचे चित्रण करणा-या कथात्म साहित्याचाच विचार प्रामुख्याने केला आहे.

4.

 सुरुवातीलाच एकोणिसाव्या शतकातील वैचारिक वाङ्मयाचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. वैचारिक लेखनातून शेतीप्रश्न आणि त्यातील समस्यांचे काहीएक चिंतन झाले आहे. विशेषतः म. फुले यांच्या विचारचिंतनातून कुणब्याच्या जगण्याची शेतीसंबंधाने महत्त्वाची भूमिका व्यक्त झाली आहे. या काळातील शेतीप्रश्न प्रामुख्याने ‘पुणे सार्वजनिक सभा’ आणि ‘सत्यशोधक समाज’ या दोन वेगवेगळ्या दृष्टीने काम करणाèया संघटनांनी हाताळलेला आहे. वासाहतिक समाज व्यवस्थेत पुणे सार्वजनिक सभेला भांडवली अर्थशास्त्रावर भर देऊन शेतीचा विकास अभिप्रेत होता. तर म. फुले प्रणित सत्यशोधक समाज शेतक-यांवर लादलेल्या सर्वांगीण गुलामगिरीविरुद्ध विशेषतः ब्राह्मणी वर्चस्वातून पुरोहितशाही, नोकरशाही आणि सावकारशाही या जोखडातून शेतक-याची सोडवणूक झाल्याशिवाय  तो सुधारणार नाही. शेतातील जुजबी सुधारणा फारशा उपयोगाच्या नाहीत.  ह्या मताचे म. फुले होते. त्यामुळे आपोआपच कृषिजीवनाच्या सर्व स्तरात सत्यशोधक समाजाचा शिरकाव झाला आणि म. फुले यांच्या कार्याला पाठिंबा वाढत गेलेला दिसतो. सर्वसामान्य शेतक-याचे नेतृत्व पुणे सार्वजनिक सभेला करता आले नाही. ‘गुलामगिरी’, ‘शेतक-याचा आसूड’, ‘इशारा’ इत्यादी लेखनातील म. फुले यांच्या मांडणीत शेतकरी आणि शेतीव्यवस्था केंद्रस्थानी राहिली आहे. त्यांचे शेतीविषयक चिंतन मूलगामी स्वरूपाचे तसेच दिशादर्शक राहिले आहे. शेतीतून निघणा-या वरकड मालाची लूट कोणकोण करत आहे हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. कृषिजनसमूह हा आपल्या एकूण समाजरचेनचा महत्त्वपूर्ण घटक आहे. या घटकाची स्थिती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत सामाजिक स्वरूपाचे कोणतेही परिवर्तन आमूलाग्रपणे घडून येणार नाही. असे म. फुले यांनी निरीक्षण नोंदवले होते. ते आजही आपल्याला ते लागू पडते.

आधुनिक काळातील साहित्य हे प्रबोधनवाद्यांची उदारमतवादी विचारधारा आणि फुलेप्रणीत सत्यशोधकी साहित्याची विद्रोही विचारधारा यामध्ये वाटचाल करत होते. उदारमतवादी साहित्य हे मुख्य प्रवाहात होते. काही प्रमाणात या साहित्यात शोषितांच्या सहानुभूतीचा विचार मांडला गेला आहे. असे असले तरी त्याला मर्यादा होत्या. सत्यशोधकी साहित्य गोविंद पानसरे म्हणतात त्याप्रमाणे,‘‘सत्यशोधकी साहित्य हे आधुनिक मराठीतील पहिले विद्रोही साहित्य आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घ्यायलाच हवी’’7 या साहित्याने सामाजिक शोषणव्यवस्थेला जसा हात घातला, तसाच शेती आणि शेतकरी याविषयीचे मूलगामी स्वरूपाचे लेखन केले आहे. त्यामुळे या सत्यशोधकी साहित्याचा विचार कृषिजीवनातील प्रक्षोभ अधोरेखित करताना महत्त्वाचा ठरतो.

म. फुले यांच्या विचारविश्वातून जी पिढी पुढे आली. त्यामध्ये प्रामुख्याने कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, धोंडीराम कुंभार, मुकुंदराव पाटील, भास्करराव जाधव, दिनकरराव जवळकर इ. शेतक-याच्या उन्नत्तीसाठी अनेक मार्गांचे अवलंबन करणारी ही मंडळी होती. सत्यशोधक साहित्ङ्माने प्रतिकारशास्त्र दिले. शेटजी-भटजी आणि राज्यसंस्थेविषयीचा विद्रोह प्रकट केला. आपल्या वैचारिक आणि कथात्म साहित्यातून विडंबन, उपहास, विनोद या सर्व प्रकाराने हा टोकाचा प्रक्षोभ व्यक्त केला आहे. यामध्ये कृष्णराव भालेकरांचे कार्य शेतक-यांसाठी महत्त्वाचे आहे. ‘दीनबंधू’ चे ते पहिले संपादक राहिले आहेत. ‘शेतक-यांचा कैवारी’ आणि ‘दीनमित्र’ यासारखी पत्रेही भालेकर यांनी पुढे चालविली होती. भालेकरांनी वैचारिक लेखनाबरोबरच ललित लेखन केले. त्यांच्या ललित लेखनात फुले अन्वेषन पद्धतीचा स्पष्ट प्रभाव जाणवतो. कृष्णराव भालेकरांनी 1888 साली ‘बळीबा पाटील’ ही ग्रामीण कादंबरी ‘दीनमित्र’ या नियतकालीकातून प्रकाशित केली. तिचे शीर्षक होते ‘बळीबा पाटील आणि 1877 चा दुष्काळ’ ज्या काळात मराठी साहित्यव्यवहारात ‘मुक्तामाला’ प्रवृत्तीची रंजनवादी कादंबरी लिहिली जात होती, लोकप्रिय होत होती. त्या काळात भालेकरांनी दुष्काळासारखा विषय हाताळला आहे. खेड्यातील राबणारा अज्ञानी जनसमूह आणि त्याला लुबाडण्यासाठी उभा राहिलेल्या पाटील व कुलकर्णी यांच्या व्यवस्था भालेकरांनी वास्तवपद्धतीने रेखाटल्या आहेत. या कादंबरीचे वेगळेपण आणखी एका बाबतीत जाणवते. ज्या काळात मदनमंजिरी, मंजुळा, राजपुत्र, राजहंस अशा  नायक-नायिकेच्या रंजनपर कादंब-या लिहिल्या जात होत्या, त्या काळात कृष्णराव भालेकरांनी प्रगल्भ प्राैढ असा पंच्यान्नव वर्षांचा बळीबा पाटील कादंबरीचा नायक केला. त्यांची व्यक्तिरेखाटनांची ही कृती तत्कालीन साहित्यव्यवहारात महत्त्वाची होती.

रूपबंधाच्या दृष्टीनेही ही कादंबरी फुले प्रभावात आहे. तिचा चर्चात्मक रूपबंध आहे. शेतक-यांच्या जीवनातील अनेक कंगोरे भालेकरांनी या चर्चात्मक रूपबंधातून उजागर केले आहेत. असे असले तरी ‘बळीबा पाटील’ या कादंबरीला साहित्य इतिहासात स्थान दिलेले नाही. हे रूढ चौकटीत विचार करणाèया आपल्या साहित्यव्यवहाराला साजेसेच आहे. परंतु इतिहासात नोंद नाही म्हणत ग्रामीण साहित्याची स्वतंत्र मांडणी करणारेही नेहमी खळखळ करताना दिसतात. मुळात ही कादंबरीच नाही, इथपासून ते  हा एक पहिलावहिला प्रयत्न होता अशी भलामण दिसते. कृषिजीवनातील दुष्काळासारख्या दुस्थितीतील प्रक्षोभ या कादंबरीतून प्रथमच मराठी साहित्यव्यवहारात पुढे आला होता.

मुकुंदराव पाटील यांनी शेतकरी केंद्रवर्ती ठेवून शोषणलढा चित्रित केला आहे. कुलकर्णी वतन आणि कालबाह्य झालेल्या बलुतेदारीविरुद्ध त्यांनी लिहिले आहे. हे कुलकर्णी पद रद्द करण्यासाठीचा लढा त्यांच्या ‘कुलकर्णीलिलामृत’मध्ये दिसतो. कुलकर्णी पद हे शेतीव्यवस्थेत कसे शोषणकारी झाले आहे. त्याचे सप्रमाण विश्लेषण करून त्याच्या धार्मिक शोषणाचे आणि दडपणुकीचे विवेचन करत हे पदच मोडीत काढण्याचे सूतावाच मुकुंदराव पाटील यांनी केले आहे. मुकुंदराव पाटील यांच्या साहित्यातून व्यक्त झालेला कुलकर्णी वतनाचा हा प्रक्षोभ तत्कालीन मुंबई प्रांताच्या काैन्सिलमध्ये 1914 ला या वतनाचा प्रश्न उपस्थित झाला होता.8 शिवाय शाहू महाराजांनी तर हे वतनच खालसा केले तसा जाहिरनामा प्रसिद्ध केला. शेतीव्यवस्थेतील दुःस्थितीला कवेत घेत हा प्रक्षोभ संघटितपणे एका निश्चित शेवटाकडे घेऊन जाणारे हे अपवाद्भुत उदाहरण आहे. सत्यशोधकी साहित्यपरंपरेत कृषिजीवनासंबंधी मोजकेच लेखन आहे. परंतु ह्या लेखनाने कृषिजीवनातील प्रक्षोभ प्रखरपणे पुढे आणला. कृषिजीवनातील दुःस्थिती दाखवून देत त्यामागील कारणांचा सर्व शक्यतांनी शोध घेत व्यवस्था परिवर्तनाचे नेमके भान दिले आहे. सत्यशोधकी साहित्य, त्यांचे जलसे यांनी प्रतिकाराचे नवे शस्त्र सामान्य माणसाला दिले. जलशातून सर्वसामान्य शेतक-यांच्या भाषेत हा प्रक्षोभ प्रभावीपणे प्रकटला आहे.

5.

सत्यशोधकी साहित्याच्या विचारानंतर महत्त्वाचे नाव म. शिंदे यांनी कृषिजीवनासंबंधी मूलगामी असे काम केले आहे. जातीनिरपेक्ष शेतकरी चळवळ उभारण्याचा प्रयत्न म. शिंदे यांनी केला होता. दुसरा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे समान वाटपाशिवायचे उत्पादन वाढीचे प्रयत्न, लहान शेतकरी आणि भूमिहीन शेतमजुरावर अन्याय करतील असा त्यांचा कयास होता जो आजही खरा ठरताना दिसतो आहे.

याबरोबरच स्वातंत्र्य चळवळीत विशेषतः गांधीजींचे राष्ट्रीय नेतृत्व उदयास आल्यापासून त्यांना सामान्य शेतकरी, कष्टकरी समूहाचा सर्व स्तरात पाठिंबा मिळत होता. स्वयंपूर्ण खेड्याची आदर्श संकल्पना गांधीजींनी उचलून धरली. खेडी सुधारली तरच देश सुधारणार त्यामुळे ‘खेड्याकडे चला’ असा कार्यक्रम, अशी हाक दिली. खेड्यातूनही या हाकेला प्रतिसाद मिळाला. यादरम्यान शेतक-यांनी जी बंडे केली ती उल्लेखनीय अशी आहेत. साता-याच्या क्रांतिसिंह नाना पाटील यांचे प्रतिसरकारसारखे अनेक असे लढे  शेतक-यांनी उभारले आहेत. परंतु या प्रतिकाराचा इंग्रजी राजवटीविरुद्धच्या प्रक्षोभाचा तीव्रतर आविष्कार  मराठी साहित्यात प्रतिबिंबिंत झाला नाही. कारण हा काळ -खांडेकरी मध्यमवर्गीय लेखनाचा रंजनवादी काळ साहित्यव्यवहारात  सुरू होता. त्याकाळातील मराठी लेखक गांधीजींची ग्रामसुधारणेची हाक न ऐकता ‘हदयाची हाक’ ऐकत होते. त्यामुळे गांधीजींच्या ध्येय धोरणांचा मथितार्थ आकलनात आला नाही. गांधीजींच्या लोकलढ्यातील ग्रामसंबंधाचे नीटपणे आकलन आपल्या साहित्य जगताला झाले नाही. मध्यमवर्गीयांना ग्रामीण अनुभवविश्व रूचीपालट म्हणून हवे होते. याची पूर्ती करण्यासाठी पार्श्वभूमीदाखल शेतशिवार वापरून रंजनपर खूप लिहिले गेले आहे. याकाळात ह्या पद्धतीचे विपुल लेखन झाले आहे. वि. स. खांडेकर, म.भा. भोसले, ग.ल. ठोकळ, र. वा. दिघे अशा सारख्यांचे लेखन याचा उत्तम नमुना आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय समाज हा प्रामुख्याने शेती आणि त्यासंबंधाच्या व्यावसायांनीच आकारला आहे. शेती हा मुख्य व्यवसाय होता. या व्यवसायाशी संबंधित जीवनव्यवहार मुख्यधारेतील मराठी साहित्यात एका मर्यादेपर्यंत आलेला आहे. मुळातच शेती आणि शेतकरी हा व्यवस्थाघटक केंद्रवर्ती ठेवून मराठी साहित्यातील सामाजिक-सांस्कृतिक कारणे शोधू लागल्यास आपल्याला असे दिसते की, मराठी मुद्रित परंपरेतला साहित्यव्यवहार हा दीर्घकाळ नागरी परंपरेशी आणि मध्यमवर्गीय जीवनदृष्टीचा राहिला आहे. त्यामुळे या साहित्यव्यवहारात कृषिजीवनाचे फार तोकडे असे चित्रण सुरुवातीच्या काळात झाले आहे. म. फुले आणि त्यांची सत्यशोधकी साहित्यपरंपरा, शिवाय ह.ना.आपटे, श्री.म.माटे काही प्रमाणात र.वा.दिघे आणि व्यंकटेश माडगूळकर यांचा अपवाद वगळता एकूण मराठी साहित्य हे बोधवादी आणि रंजनपर स्वरूपाचे राहिलेले आहे. इंग्रजी शिक्षणव्यवस्थेत निर्माण झालेला शिक्षित तरुण उच्चवर्णीय आणि पुण्या-मुंबईपुरताच मर्यादित शहरी केंद्रात होता. या नवशिक्षित समाजातून आकारलेल्या वाङ्मयसंस्कृतीच्या चर्चाविश्वात कृषिजीवनव्यवहाराचा संबंध वारसा आलेला नाही. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील मुख्यप्रवाहातील मराठी साहित्याचे जग कोत्या अनुभवविश्वावर उभारले आहे. थोड्याफार फरकाने ऐंशीच्या दशकापर्यंत मराठी साहित्यात हे चित्र कायम राहते.

6.

स्वातंत्र्याेत्तर काळात कृषिजीवनातील प्रक्षोभ समजून घेताना, ग्रामीण साहित्याचा विचार येथे प्रामुख्याने अपेक्षित आहे. ग्रामीण समाजजीवन शेतीला केंद्रवर्ती ठेवून आकारले आहे. कृषिकेंद्रितता हाच ग्रामीण समाजरचनेचा पाया आहे. त्यामुळे ग्रामीण लेखकांच्या साहित्यामध्ये कृषिजीवनाचे चित्रण प्रामुख्याने येते, ते स्वाभाविकही आहे. गावखेड्यातील शिक्षणप्रसाराने पुढे आलेल्या पिढीने जे लेखन केले त्यामधील शेतीव्यवस्थेला केंद्रवर्ती ठेवून झालेल्या. या लेखनाचे स्वरूप तपासल्यास या साहित्यात ग्रामबदलाचे चित्रण येते. होणारी स्थित्यंतरे कृषिव्यवस्थेवर आघात करणारी ठरणार अशा पद्धतीने पाहिले गेले आहे. उद्धव शेळके, रा.रं. बोराडे, आनंद यादव, शंकर पाटील यांच्या लेखनातून पारंपरिक कृषिजीवनाचे काहीएक उदात्तीकरणही झालेले दिसते. ह्या  कालखंडात मोठ्या प्रमाणात साहित्यलेखन झाले आहे. रीतिरिवाज, परंपरा, मूल्यधारणा बदलताना दाखविण्यासाठी दोन परस्परविरोधी अवकाश (ग्रामीण-नागर) समांतरपणे चित्रित करणे किंवा दोन पिढ्यांमधील अंतराळ चित्रित करणे. त्यामुळे रोमँटिकतेचाच प्रगल्भ आविष्कार यामधून होतो. कृषिजीवनाच्या तळच्या पातळीवरील प्रक्षोभ येण्यास मर्यादा पडतात. यापद्धतीने कृषिजनजीवन आलेले आहे. तर दुसरी प्रवृत्ती वास्तववादी लेखनाची आहे. वर्तमानातील बदलांना कवेत घेत फोटोग्राफिक पद्धतीने हे जीवनचित्रण दाखवतात. र. बा. मंचरकर म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘ग्रामीण लेखकांनी वर्णीय संघर्ष आणि वर्गीय तणाव दृष्टीआड करून ग्राङ्कजीवनाचे परिसरनिष्ठ चित्रण केले आहे. त्यामुळे त्यांचे लेखन मूल्याकतेकडून वर्णनपरतेकडे झुकते. बाह्य दृश्यवास्तव एक प्रकारच्या तटस्थ व नैतिक दृष्टीने ग्रामीण साहित्यात चितारले जाते. त्यामुळे त्यांचे समाजजीवनाचे आकलन वरचेवर व समग्र जीवनाच्या संदर्भापासून तोडलेले वाटते.’’10 ह्या वास्तववादी जीवन चित्रणातून बदलांचा सर्वांगीण शाेध घेऊन कृषिजीवनात त्याचे कोणते पडसाद पडलेत याचा तळठाव या साहित्यातून लागत नाही. कृषिजीवनातील प्रक्षोभाची दाहकता तीव्रपणे येते. दुःसह अनुभवाचे हे प्रकटीकरण सर्वंकष विद्रोहाला कवेत घेत नाही, याची कारणे आपल्या साहित्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेत शोधावी लागतात. कृषिजीवनातील खदखद व्यवस्थेच्या नेमक्या आकलनाकडे या काळातील साहित्य खेचत नाही तर वास्तव परिस्थिती चित्रणावर भर देते. त्यामुळे विद्रोहातून आकारणा-या अधिक चांगल्या समाजरचनेकडे हे साहित्य मार्गक्रमित होत नाही. आपल्या लेखकांचे व्यवस्थेचे आकलन थिटे पडते. माणूस आणि त्याचा भोवताल असे न होता माणसाच्या कुटुंबकथा होतात. मानवी भावभावना, त्यामधील विषाद यामध्ये लेखक अधिक रस घेतात. नातेसंबंधातील ताणतणाव, परिस्थितीशरणता हे महत्त्वाचे वाटते. कृषिसमूहाचे समाजशास्त्रीय आकलन नीटपणे झाल्याशिवाय या समूहाचे प्रश्न आणि त्यांच्या उठावाचा रास्त आवाज आपल्याला शब्दबद्ध करता येणार नाही. कृषिजन समूहाचे, संस्कृतीचे आकलन तोकडे पडते. स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या पिढीचे कथात्म ग्रामीण साहित्य वर्तमान वास्तवाच्या सरधोपट आकलनातून लिहिले आहे. ते व्यवस्थेचे तळकोपरे धुंडाळत नाही. त्यामुळे सर्व स्तरातला प्रक्षाेभ शब्दबद्ध होत नाही.

7.

ऐंशीच्या दशकानंतर ख-या अर्थाने मराठी साहित्यात शेतकèयाच्या जगण्यातले प्रत्यक्षगत ताणतणाव त्यामधून येणारा प्रक्षोभ येऊ लागला. या काळात भांडवलशाहीची गतिमानतेने घोडदौड सुरू आहे. बाजारकेंद्रित समाजव्यवस्था आकारली जात आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतीय अर्थव्यवस्था प्रभावित केली आहे. अशा काळात शेती आणि शेतकरी जीवनासंबंधातले प्रश्न अधिक तीव्र स्वरूपात उभे राहिले आहेत. आपल्या शेतीप्रधान देशात हा मोठाच समूह दुय्यम पातळीवरील जिणे जगू लागला आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवरून हा वर्तमान कृषिजीवनातील प्रक्षाेभ समजून घेण्याचा प्रयत्न मराठी साहित्यात होत आहे. कृषिजीवनात जे दुःख, दारिद्र्य आणि शोषणाच्या मिती काय आहेत आणि या शोषण निर्मितीमागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न दिसतो. हे प्रयत्न तुटक तुटक असले तरी या साहित्यलेखनातून एकूण कृषिजीवनाच्या प्रक्षोभाचे दर्शन घडते आहे. कृषिजीवनातील संघर्षाची तसेच प्रक्षोभाची विविध प्रारूपे ऐंशीनंतरच्या कथात्म ग्रामीण साहित्यातून आलेली आहेत. यातूनच पुढील काळात कृषिजीवनातील प्रक्षोभ समग्रपणे आकलनात येईल अशी आशा करायला जागा आहे. 

ग्रामीण कथात्म साहित्यात नैसर्गिक अरिष्ट, शेतकरी चळवळ, सहकार ते राजकारण, नागरीकरण अशा अनेकविध पातळीवर कृषिजीवनातील स्थित्यंतरे आणि नव्याने निर्माण झालेले पेच यातून सामान्य शेतकèयाच्या आयुष्यातील प्रक्षोभ मराठी साहित्यातून वास्तवपूर्णतेने येऊ लागला आहे. नैसर्गिक पर्यावरणाचा जैवसंबंध कृषिजीवनाशी आहे. कृषिजीवनाचे निसर्गाधीन जगणे ह्याबाबतीत विचारात घ्यावे लागते. नैसर्गिक अरिष्ट ही फार परिणामकतेने कृषिजीवनाला भोगावी लागतात. त्यातून बाहेर पडण्याचा चिवट संघर्ष महत्त्वाचा ठरतो. शेतीसंबंधाने आकारलेल्या समूहजीवनाची येथे उलथापालथ घडून येते. परंपरेने आकारलेल्या मूल्यव्यवस्थेत परिवर्तन घडून येते. पिढ्यानपिढ्या जपणूक केलेल्या मूल्यजाणिवा बधिर ठराव्या अशा प्रक्षोभाचा हा काळ असतो. अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण करणारा नैसर्गिक अरिष्टाचा काळ मोठ्या प्रमाणात स्थलांतरेही घडवून आणतो. दुःसह होणारा कृषिजीवनातील हा प्रक्षोभ प्रदेशानुसार पुन्हा वेगळा ठरतो. ‘अवकाळी पावसा दरम्यानची गोष्ट’, ‘छावणी’ या कादंब-यांमधून अवर्षण पट्ट्यात दुष्काळाने आकारलेला जीवनव्यवहार समजून घेतला आहे. तर पावसाचे, अतिवृष्टीचे संहारक रूप कृष्णात खोत यांच्या ‘झिडझिंबड’ या कादंबरीमध्ये प्रकटते. ‘चाळेगत’मध्ये मत्स्यदुष्काळ आणि त्यामागील पर्यावरणीय आणि नवभांडवली काळातील समुद्र खरवडून काढणारी अजस्त्र यंत्रणा यापद्धतीने येतो.

शेतक-याच्या जगण्यावर परिणाम करणा-या दुष्काळासारख्या नैसर्गिक अरिष्टातही त्याचा फायदा करून घेणारे लाभार्थी निर्माण होतात. त्याविरुद्धचा प्रक्षोभ काही कादंब-यांचा विषय झालेला आहे. ‘पांढर’ (रवींद्र शोभणे), ‘छावणी’ (नामदेव माळी), ‘पांगिरा’ (विश्वास पाटील), ‘कोयता’ (सरदार जाधव), ‘लेकमात’ (विजय जावळे) तर नैसर्गिक अरिष्टातही भारतीय समाजातील जातवास्तव टोकदारपणे कार्यरत असते. सर्वांना एकाच पातळीवर उभे करणारे नैसर्गिक आक्रमण जातीय पीळ ढिले होऊ देत नाही. ‘उलट चालिला प्रवाह’ या नागनाथ कोत्तापल्ले यांच्या कादंबरीमधून आणि भास्कर चंदनशिव यांच्या काही कथांमधून हे वास्तवपूर्णतेने येते. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीमधून भू-सांस्कृतिक परिमाणातून आकारणारी हिंदू धर्मव्यवस्था उलगडत जाते. भौगोलिकतेचा संदर्भ कुठेही हरवत नाही. हे त्यांच्या संस्कृतिचिकित्सेचे महत्त्वाचे परिमाण राहिले आहे. हिंदू धर्मातील अस्पृश्यतेसंबंधी ‘‘ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकापर्यंत सगळीकडे दुष्काळ पडायचे. सहाव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत पुन्हा पुन्हा भयानक दुष्काळ. नद्यांचे काठ धरूनच लोक जगायचे. मधल्या काळात इकडेतिकडे वसलेली नगरं वस्त्या उजाड होऊन गेल्या. कवडीलासुद्धा नाण्ङ्माचा दर्जा ह्याच काळात मिळाला. कवडीचुंबक, मी तुझी कवडीलासुद्धा देणं लागत नाही – असं अजून आपण म्हणतो. अशा कंगाल काळातच ह्याला शिवू नका, त्याचं सोवळं पाळा, असे नुत्पादक हिंदूधर्मी नियम  कट्टर होत गेले. ऐतखाऊ बांडगुळी धंदे सांभाळणा-या काही जाती समाजाची मूळ आडवी रचना करायला धडपडल्या. कष्ट करणा-या खेडवळ जातींना दुष्काळी परिस्थितीत जिवंत राहण्यापुरते हक्क त्यांना मिळाले. लंगोटी आणि झोपडी एवढ्यापुरतीसुद्धा उत्पन्नाची तुटपुंजी साधनं नसलेल्या जातींना खाली गुलामीत ढकलत शेवटी पोटापुरतं देऊन राबवून घेतलं. अशा अस्पृश्य जाती तयार झाल्या असणार’’11 हिंदू धर्मातील कट्टरता वाढण्यात-वाढविण्यात वैदिकांनी काही गोष्टी केल्या. शिवाय तत्कालीन भौगोलिक पर्यावरणही वापरून घेतले. नैसर्गिक संकटेही स्वतःच्या फायद्यासाठी वापरणा-या वैदिक संस्कृतीचे हे वेगळेच रूप नेमाडे अधोरेखित करतात.  दुष्काळामुळेसुद्धा सगळं मोहनजोदडोचं ओस पडणं ह्या शक्यतेपासून ते दुष्काळाने आकारलेला सबंध मानवी इतिहासाचा पटच इथे उलगडला जातो. खंडेरावच्या समकालीन आकलानातून हे होते.

 दुष्काळ हा अनेक कथा-कादंब-यांचा विषय झाला आहे. सामान्य माणसाची होणारी परवड अधिक प्रमाणात येते असाह्य हतबलतेचे चित्रण या लेखनात केंद्रवर्ती राहते. येथे दुष्काळा सारखा विषय विचारात घेताना मराठी साहित्याच्या एका ठळक मर्यादेची नोंद करणे आवश्यक आहे. कृषिजीवनावर कितीही मोठे आघात झाले, तरी आपल्या साहित्यव्यवहारात तात्कालिक आणि विलंबाने असे कोणत्याही काळातील त्याचे पडसाद तीव्रतर स्वरूपात उमटत नाहीत. यामध्ये आपल्याला साहित्यिकांचा प्राधान्यक्रम दिसून येतो. 1972 च्या दुष्काळात जवळ जवळ संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र एका वेगळ्याच हाल-अपेष्टांशी झुंजत होता. त्या नंतरच्या मराठी साहित्याचे आकलन तपासल्यास साहित्य आणि समाज यांच्यातील फारकत लक्षात येते. यासाठी ‘प्रतिष्ठान’ या नियतकालिकाचा ‘मराठी साहित्य आणि दुष्काळ’12 हा विशेषांक पहावा. मध्यमवर्गीय नागरकेंद्री अनुभवद्रव्य मराठी साहित्यव्यवहारात दीर्घ काळ प्रतिबिंबित होत राहिले. हे याचे मुख्य कारण होय. यामुळे शेतक-यांवर जी काही अरिष्टे आली किंवा त्यांनी जे काही  छोटे-मोठे लढे लढले गेले, उठाव केले. याचे काही अपवाद वगळता यथायोग्य दिग्दर्शन मराठी साहित्यात झाले नाही.

8.

नैसर्गिक अरिष्टाबरोबरच शेतीसंबंधाने प्रश्न घेऊन जे लढे लढले गेले, चळवळी केल्या गेल्या, या लढ्यांचे कृषिजीवनातील महत्त्व अधोरेखित करत त्यांच्या कार्यपद्धतीतील आंतरविरोध किंवा भूमिकांशी फारकत घेणे याही बाबी लेखकांनी चिकित्सेच्या पातळीवर आणल्या आहेत. त्याची वस्तुस्थिती प्रत्यक्षगत शेतकèयाच्या जीवनव्यवहारात कोणते बदल झाले किंवा त्याला काय मिळाले. हे लढे जेवढे चर्चिले गेले, त्यामधून चळवळी करणारांचे राजकीय सत्तेच्या जवळ जाणे, आर्थिक हितसंबंध जोपासणे हे उघड करत सामान्य शेतकèयांचा यामधून कसा भ्रमनिराश झाला हेही दाखवून दिले आहे. हा एका वेगळ्या पातळीवरचा प्रक्षोभ आहे. महादेव मोरे  ‘झोंबड’ या कादंबरीमध्ये शरद जोशींच्या शेतकरी आंदोलनाचे त्यातील प्रक्षोभाचे रिपोर्ताजसदृश्ये लेखन केले आहे. सीमित कालावकाशात टोकदार होत गेलेले आंदोलन त्यात शेतक-यांचे बळी जाणे आणि नेत्यांची अनपेक्षित माघार यातून चळवळीच्या अस\लतेची कहाणी सांगितली आहे. ‘बारोमास’ चा नायक एकनाथ शेतक-यांच्या सभेत त्याच्या मनातील आक्रोश व्यक्त करतो. शिवाय  भास्कर चंदनशिव यांच्या काही कथा, शेषराव मोहिते, आसाराम लोमटे आणि राजन गवस ‘ब, बळीचा’. याबरोबरच शेतक-याच्या हितासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली सहकार चळवळ, प्रत्यक्षगत या सहकारी संस्थांची कार्यपद्धती, स्थानिक राजकारण आणि यामध्ये अंतिमतः नाडवला गेलेला शेतकरी याचेही चित्रण वास्तवपूर्णतेने येते. भास्कर चंदनशिव यांच्या काही कथा, आसाराम लोमटे यांची ‘चरक’, राजन गवस यांच्या ‘आपण माणसात जमा नाही’ मधील काही कथा शिवाय मोहन पाटील यांचे कादंबरीलेखन. सामान्य सभासद शेतक-याला ह्या सहकाराचा डोलारा उभारून काय मिळाले? ही खदखद, हा प्रक्षोभ महत्त्वाचा आहे. ऊस बागायती शेतक-याची परवड हे नव्या सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकारणाच्या संदर्भात होते आहे. यातून काहीएक आवाज शेतकरी चळवळीला मिळाला. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जो प्रक्षोभ पुढे आणला, त्याचा जनाधार असणा-या शेतक-याचा आक्रोश नेमका कसा आहे, सहकाराची गरज आणि तिच्या मर्यादा, सहकारातील राजकारणाने अंतिमतः केलेले शेतक-याचे शोषण या सर्व घटकांच्या विरुद्धच्या प्रक्षोभाची मीमांसा वास्तवपूर्णतेने मोहन पाटील यांच्या ‘साखरेरा’ या कादंबरीत येते. शिवाय शिक्षणाने शहानपण आलेल्या पिढीचा विद्रोह आलेला आहे.  भास्कर चंदनशिव यांच्या कथेत चार-पाच पिढ्या मारवड्याच्या सावकारी पाशात राबल्या परंतु पुढची शिक्षित पिढी ‘‘जमाना बदललाय अन् आजून बी बदलंल…. माजी पिढी पुरता हिशोब मागितल्याबिगर राहणार न्हाय…’’13 आपला पूर्वइतिहास कसा जुलमानं पिचला त्याचाच हिशोब मागणा-या या नव्या पिढीचा प्रक्षोभ वास्तवाच्या कसोटीवर उतरतो. ‘नवी हत्यारं’ या कथेत उपोषणाचा मार्ग आज कालबाह्य होत आहे. लोकशाहीच्या जमान्यात आता नवी हत्यारं शेतकèयांनी शोधली पाहिजेत याचे विद्रोहीभान या कथेत आहे. सदानंद देशमुख यांच्या ‘खुंदळघास’ या संग्रहातील काही कथांमधून शेतमजूरही कसे शेतक-यांचे शोषण करतात, हा वेगळाच मुद्दा पुढे आला आहे.

ग्रामीण समाजरचनेत नव्या व्यवस्था आकारला आल्याने ग्रामीण जीवनात काही बदल झाले. परंतु त्यामधून मूळच्या सरंजामी वृत्तीतून नव्या व्यवस्थाही शोषणाच्याच ठरल्या आहेत. आसाराम लोमटे यांच्या ‘बेइमान’ या कथेत सरपंच पदाच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी भगीरथकडून होणा-या राहीचे शोषण आणि एकूणच व्यवस्थेकडून भगीरथसारख्या एका सामान्य शेतक-याची परवड होते. सामान्यांच्या लढ्याची ‘नवी शस्त्रं’ सुद्धा पुन्हा जगण्याला सुखकारक पर्याय शोधण्यापेक्षा अस्मिता गोंजारण्याचे नवे मार्गच दाखवतात. हे तीव्रतर दाहक अनुभवातून ‘जिणगानीचा जाळ’ या कथेत येते. प्रयागबाईच्या वारसांच्या रोजीरोटीपेक्षा तिच्या बलिदानाचा पुतळा उभारण्यात लढ्याची व्यवस्था कार्यरत ठेवणे येथे महत्त्वाचे ठरते. कृषिजीवनाला नव्या राजकीय व्यवस्थेने नेमके कसे शोषित-अंकित केले आहे. त्याच्या शोषणाचा विविध पातळीवरील सामान्य माणसाचा प्रक्षोभ तसेच खेड्यातील राजकारणाचे, त्या सत्ताकारणाची जरब कृषिसमूहातील माणसाच्या जगण्यात नव्याच समस्या निर्माण करत आहे. हा वेगळ्या पातळीवरील प्रक्षोभ आसाराम लोमटे यांच्या ‘चरक’, ‘होरपळ’, ‘खुंदळण’, ‘कुभांड’ ‘जीत’ यासारख्या कथांमधून आणि कृष्णात खोत यांच्या ‘रौंदाळा’ कादंबरीतून येतो.

शेतीतून बाहेर पडण्याचा उपलब्ध आणि जवळचा मार्ग म्हणजे शिक्षण. शिक्षण मिळवण्याचा जीवघेणा संघर्ष ‘झोंबी’ या कादंबरीपासून दिसतो. शेती सुटल्यानंतरचे सुखलोलुप आयुष्य, त्याचबरोबर एक भाऊ नोकरी वगैरेने सुस्थित तर शेती करणाèया भावाची दुरावस्था असे चित्रण विषय मराठी कथात्म साहित्यात झाले आहेत. ‘ओझं’ (आसाराम लोमटे), ‘अवकाळी पावसा दरम्यानची गोष्ट’, आडव्यापाची ‘ब,बळीचा’मधील कहाणी असे अनेक प्रसंग आहेत. सदानंद देशमुख यांच्या काही कथा. देशमुख यांच्या ‘बारोमास’ या कादंबरीत शिकून नोकरी नसण्याने शेतीतून बाहेर पडण्याचे प्रयत्न आणि पुन्हा शेतीला पर्याय नसणे असे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. अशाही पातळीवर शिक्षित भ्रमनिराश पिढीच्या हतबलतेचे  प्रक्षोभाचे चित्रण ‘मेड इन इंडिया’, ‘देशोधडी’ यासारख्या काही कथा-कादंबरीतून येते. तर नागरीकरणाच्या रेट्यात कृषी व्यवस्था कशी उद्ध्वस्त होतत आहे. त्यातील प्रक्षोभाचे सूक्ष्म पातळीवरील अवलोकन सीताराम सावंत यांच्या ‘भुई भुई ठाव दे’ या कादंबरीत केले आहे. ‘गुंठा गुंठा विकून देशोधडीला लागलेल्या बळीपरंपरेतील सर्वांना’ ही कादंबरी अर्पण केली आहे. मोहन पाटील यांच्या ‘बांडगुळ आख्यान’ मध्ये शहरालगतच्या उपजाऊ जमीनी धोक्यात आलेल्या आहेत. शहरीकरणाचा हा रेटा कृषिजीवनाला उद्ध्वस्त करत आहे. अभिजित हेगशेट्ये यांच्या ‘टकराव’ ह्या कादंबरीत एनरॉन प्रकल्पात जमीन काढून घेणे शेतक-याचा मुळ आधारच आता काढून घेतला जात आहे. औद्यागिकरणाच्या नावाखाली जमीन उद्याेगाच्या घशात घालणे सुरू आहे. शंकर सखाराम ‘सेझ’, तर प्रवीण बांदेकर ङ्मांच्ङ्मा ‘चाळेगत’ मध्ये खनीज उत्पादन आणि रेल्वे साठी जमीनी काढून घेण्यासारखे प्रश्न आले आहेत. बबन मिंढे आणि महेश निकम यांचेही कादंबरीलेखन याबाबतीत महत्त्वाचे आहे. ‘झाडाझडती’मध्ये धरणग्रस्त विस्थापित शेतक-यांचा प्रक्षोभ तीव्रतेने येतो.

1980 नंतरच्या मराठी कथात्म साहित्यात भांडवलशाही ते पर्यावरणातील बदल अशा भोवतालचा कृषिजीवनातील परिणाम, त्यातून निर्माण झालेल्या समस्या, त्याच्या निराकरणाचे प्रयत्न आणि या सर्वांना सामोरे जातानाची कृषिजीवनातील सामान्य घटकांची होणारी दमछाक होते. तसेच शेतक-याची परवड होण्यातून आकारलेला प्रक्षोभ समकाळातील भांडवलकेंद्री अर्थव्यवस्था, नैसर्गिक आक्रमणात शिवाङ्म समाजनिर्मित शासकीय व्यवस्था यांच्या पिळवणूकीचे शेतीजीवनातील संवेदन ग्रामीण कथात्म साहित्यात आले आहे.

निसर्ग-मानव आणि मानव-मानव संबंधाच्या पातळ्या ह्या नैसर्गिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि इतर अरिष्ट्ये कृषिजीवनात कशी प्रतिबिंबित होतात. शेतक-यांच्या प्रश्नातील गुंतागुंत समजून घेत त्याचे आंतरसंबंध लक्षात घेऊनच त्यांची मांडणी झाली पाहिजे. हे भान जसे म. फुले आणि सत्यशोधकीय लेखन परंपरेला होते, ते समकाळीतील साहित्यलेखनात काही मर्यादेपर्यंत येते. कृषिजीवनातील प्रश्नांची गुंतवळ, प्रक्षोभाचे आकलन अपुरे ठरते. त्यांचा अन्वयार्थ लावायला मर्यादा पडतात. ग्रामीण भागात ज्यांची मुळे आहेत अशा शिक्षित पिढीचेही शेतकरी जीवनाबद्दलचे  आकलन यथातथाच असल्याचे दिसते. या कृषिव्यवस्थेला भारित करणाèया घटकांचे सर्व पातळीवरील अन्वयार्थ येत नाही. तळच्या पातळीवरील कृषिजीवनातील समस्यांचे जे दिसते ते रूप चित्रित होऊ लागते.

दुरवस्थेची, विवशतेची, परपीडणाची भावविभोर वास्तवचित्रणे मोठ्या प्रमाणात येतात. परंतु ही खदखद दाखवतानाच याचा शेवट साहित्यकृतीगत कालावकाशात त्याला एका सोडवणुकीकडे, प्रत्यक्ष कृती करताना मराठी साहित्य दिसत नाही. कृषिजीवनातील दुःस्थितीतला प्रक्षोभ कवेत घेत तिच्या दुःखमुक्तीच्या वाटा शोधणारा विद्रोह ह्या साहित्यात फारसा येत नाही. जो दलित साहित्यात महत्त्वाचा ठरला होता. लेखकाला साहित्यकृतीच्या अवकाशात एक नैतिक कृती करावी लागत असते. ‘यमुनापर्यटन’मध्ये यमुनेचं ख्रिस्ती होणं आणि पुनर्विवाह याचं बाबा पद्मनजी यांनी त्याकाळात विधवेच्या पुनर्विवाहाची केलेली नैतिक कृती महत्त्वाची ठरली. समस्येच्या एका मर्यादित अवकाशात अशी कृती करायला ग्रामीण लेखक कमी पडतात. कथात्म साहित्यात हे असं एका संदर्भबिंदूला शेवट करणे जमत नाही. विवंचनाग्रस्त शेतकèयाला आशावादी दाखवून नियतीशरणतेचे चित्रण लेखक करताना दिसतात. दुष्काळासारख्या परिस्थितीतील परवड मांडताना पावसाचा आशावाद दाखवतात. शासनयंत्रणा, समाजव्यवस्था या नियोजनकर्त्याबद्दलचा असंतोष, प्रक्षोभ वैयक्तिक पातळीवर किंवा सामूहिक पातळीवर कसा प्रकटेल याचे काही अपवाद वगळता कोणतेही सूचन होत नाही. शेतीच्या संबंधाने जे साहित्य निर्मिले आहे यामध्ये परिस्थितीच्या वर्णनापलीकडे हे साहित्य फारसे जात नाही. ही खदखद सर्वशक्यतांनी कवेत घेण्यात मराठी साहित्यव्यवहार तोकडा पडतो. याची कारणे आपल्या सांस्कृतिक व्यवहाराच्या सामाजिकतेत आहेत. सहनशीलतेला, सोशिकपणाला आहे ही जनरीत सांभाळीत आयुष्य कंठणारा समाजस्वभावच यातून प्रगटतो. लेखक आहे या वास्तवाला एका निश्चित शेवटाकडे अधिक चांगल्या व्यवस्थेच्या उभारणीकडे मार्गक्रमित करत नाहीत. तसा व्यूह स्वतःकडेच असावा लागतो. वास्तवाच्या मर्यादा नोंदवत उद्याची गणितं मांडावी लागतात. भास्कर चंदनशीव.. यांच्या ‘नवी हत्यारं’ या कथेत याचे नेमके सूचन आले आहे. किंवा लोमटे यांच्या कथेतील राही म्हणते चुलीतलं लाकूड डोस्क्यात घालायचं. नेहमीच्या रोजमर्रा संघर्षाचा हा आवाज शब्दबद्ध करता आला पाहिजे, त्याला विधायक वाट दाखवता आली पाहिजे.  परंपरेतही काही काही वाटा आहेत. आनंद विंगकर यांची ‘अवकाळी पावसा दरम्यानची गोष्ट’(2011) ही या काळातील महत्त्वाची कादंबरी आहे. दुःख विसरण्याची, त्याला मागे सारण्याची, रोजच्या जगण्यात मिसळून जाण्यासाठी पुन्हा श्रमाला जोडून घेण्याचाच पर्याय कष्टकरी-शेतकरी समाजापुढे असतो. या कादंबरीतील आत्महत्या केलेल्या शेतक-याच्या मुलीला तिची धुरपाआत्ती म्हणते, ‘‘खराय माझे लेकी, रानच माणसाला पोटात घेतं, काम सांगतं अन् दुःख विसरायला लावतं.’’14 श्रमाला जोडूनच सुख-दुःखे सामावून घेण्याचे उच्चकोटीचे श्रमसंस्कृतीतील मूल्यभानच येथे प्रकटते. आत्महत्या केलेल्या कुटुंबातील वास्तवाचा अन्वयार्थ लावत भविष्यदर्शी वाटचाल त्याच वर्तमानाचे भागध्येय असणार आहे. याचे नेमके सूचन यामध्ये आहे.

9.

ऐंशीच्या दशकात प्रभावी ठरलेल्ङ्मा शरद जोशी याम्च्या शेतकरी चळवळीची आंदोलने महत्त्वाची होती. परंतु शरद जोशी यांची शेतकरी चळवळ जरी जाणीव जागृती करण्यात यशस्वी झाली असली, तरी सर्वंकष प्रक्षोभ-विद्रोह ह्यातून पुढे आला नाही. एकतर ही चळवळ सुरुवातीला अराजकीय भूमिका घेऊन होती. दुसरी ती शेतीमालाच्या किमतीविषयी, अर्थविषयक बाबींवर केंद्रित झाली होती. त्यामुळे आपोआपच एकारलेपण आले. नगदी पिके केंद्रस्थानी ठेवून ही चळवळ कार्यरत राहिल्यामुळे सर्व शेतकèयाचे तिला होता आले नाही. सद्यकालीन स्थितीत तिच्या मर्यादा पुढे येत आहेत. विधायक दृष्टिकोन नसेल तर हा प्रक्षोभ एका मर्यादेनंतर निष्प्रभ ठरतो. सामान्य माणसाला अधिक गर्तेत घेऊन जातो. लोमटे आणि राजन गवस यांच्या काही कथांनी या आंदोलनातील फोलपणा दाखवून दिला आहे.

म. फुलेप्रणीत लेखनातला प्रक्षोभ व्यापक पट कवेत घेणारा होता. शरद जोशी यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिलेली शपथ, ‘‘मी शपथ घेतो की, शेतक-याचे लाचारीचे जिणे संपवून त्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सन्मानाने व सुखाने जगता यावे याकरिता ‘शेतीमालाला रास्त भाव’ या एक-कलमी कार्यक्रमासाठी संघटनेचा पाईक म्हणून मी सर्व शक्तीने प्रयत्न करेन….’’ यामध्ये शेतीव्यवस्थेतील सर्वंकष विद्रोह सामावला जाईल किंवा तो आकलनाच्या टप्प्यात येईल अशी भूमीच या आंदोलनाला नव्हती. असे आज आपल्याला दाखवता येते. ‘शेती मालाला रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमाने एका मर्यादित प्रश्नापुरते हे आंदोलन प्रभावित राहिले आणि आपोआपच त्याला मर्यादा पडत गेल्या. जोशी यांनी शेती ही जीवनपद्धती आहे याची यथायोग्य दखल न घेतल्याने, त्यातील क्रांतिप्रवणता निघून गेली. म. फुले यांनी याच लुटीचा शेटजी आणि भटजी असा सूर आवळला होता. यातला भटजी आपोपच मागे पडला. दुसरे म. शिंदे यांनी शेतकरी नेमका कोण? हे सांगितले होते. यालाही यामध्ये पद्धतशीर बगल मिळाली. शेतकèयांतही अनेक स्तर निर्माण झाले आहेत. जातीयता तीव्र होत असतानाच पर्यावरणीय प्रश्नांनी उग्र रूप धारण केले आहे. शासनव्यवहारात बोकाळलेला भ्रष्टाचार, अपुरा पतपुरवठा, बी-बियाणे खते यांची भांडवली गुंतवणूक आवाक्याबाहेर गेली आहे. नियंत्रणाबाहेरचे मार्केट, मर्यादित उत्पादन सोर्सेस या सर्वातून सामाजिक दर्जा घसरल्याने जगण्याचा स्तर खालावला आणि शेतकरी आत्महत्यांच्या कडेलोटावर आला आहे. याचा सर्वांगीण विचार या चळवळीतील धोरणात दिसत नाही. खुल्या अर्थव्यवस्थेचे अनाकलनीङ्म समर्थन ही चळवळ करत राहिली आणि आज तर ती निष्प्रभ ठरली आहे.

10.

कादंबरी या साहित्यप्रकारात कृषिजीवनातील सर्व शक्यता कवेत घेण्याची कुवत आहे. परंतु मराठीमध्ये कृषिव्यवस्थेतील ताणाचे, त्यातील प्रभावातून आकारलेले समाजभान कवेत न घेता कुटुंबातील निर्माण होणा-या तणावातून कादंबरी आशय आकारला जातो. शेतक-याची लार्जर प्रतिमा येत नाही. ह्या कादंब-या कुटुंबकथा होतात. व्यक्तीच्या जगण्याचा अवकाश आणि तिच्या जगण्यातल्या भूमिनिष्ठ जाणिवांचा शोध देशीवादी दृष्टीने घेणे महत्त्वाचे ठरते. या पार्श्वभूमीवर राजन गवस यांची  ‘ब,बळीचा’ आणि भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू  जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबèयांचा विचार करावा लागतो. ‘ब, बळीचा’ ही राजन गवस यांची कादंबरी कृषिव्यवस्थेतील अगतिकता-प्रक्षोभ वेगळ्या पातळीवरून समजून घेते. कृषिजनांच्या वैचारिक धारणांच्या म. फुलेप्रणीत विचारविश्वाशी जोडून घेते. कृषिसंस्कृती ही एक जीवनपद्धती आहे. ती जगण्याची एक रीत आहे. त्याच्यावर कोणकोणते आघात होत आहेत. आधुनिक मूल्यव्यवस्थेचे टकराव काय करत आहेत. आधुनिकतेच्या व्यक्तिवादी मूल्यदृष्टीचे आघात समूहाने आकरणाèया कृषिजन संस्कृतीतील प्रक्षोभ  कसा आकारला आहे याचे नेमके भान ‘ब,बळीचा’ मध्ये दिसते.

‘हिंदू’मध्ये शेतकरी समूहाचं जगणं केंद्रस्थानी आहे. खंडेराव सतत कृषिव्यवस्थेला चिकित्सेच्या दृष्टिकोनातून पाहतो. त्याचा वैयक्तिक निर्णय घेण्याच्या टप्प्यावर नागर, अभिजन अदिवासी ते औद्योगिक संस्कृती याची तुलना करतो. अप्पलपोटी शेतीसंस्कृती  वनसंस्कृतीच्या पोटावर पाय देऊन आली आहे. कुणब्याने निर्मिलेली गावगाड्याची व्यवस्था एकमेकांच्या साहाय्याने विकसित होत आली. औद्यागिकरणाच्या, नागरीकरणाच्या झपाट्यात कोणते स्थित्यमतर ग्रामसंस्कृती अनुभवते याचेही वास्तवदर्शी चित्र होते. सिंधू संस्कृतीच्या उगमापासूनचा हा सर्व पट कादंबरीत रिचवताना ङ्मा समूहाच्या लोकजीवनाचे आव्हान बनून होते. या समूहाचा ऐतिहासिक पट उलगडला जातो. वर्तमानातून भूतकाळ आणि भूतकाळातून वर्तमान ङ्मा पातळीवर काळांची सरमिसळ करून ही कादंबरी शेतीसमुहाच्या जीवनाशी जोडून घेत भारतीय उपखंडातील सामान्य कृषिजनच्या इतिहास-संस्कृती दर्शनाचा प्रयत्न करते. कृषिसंस्कृतीतील श्रममूल्यांचा समुच्चय पानोपानी दाखवून बहुजन श्रमसंस्कृतीचे स्वरूप दाखवून दिले आहे. बहुजन संस्कृतीच्या गुलामाला कारण ठरलेली ब्राह्मणी अधिसत्तावादी संस्कृती भाषेच्या पातळीवर खेळलेले राजकारण उघडे करत, श्रमाने आकारलेली संस्कृती शुद्र कशी ठरवली गेली, या सांस्कृतिक सत्तासंबंधाचा वस्तुपाठ काय राहिला, याचा मुळातून शोध घेते. सांस्कृतिक सत्ताकारणाचा मोठा कालपट जाणिवांच्या मूळांचा शोध घेण्यास उपयुक्त ठरला आहे. खंडेरावाने शेतकरी होऊन कुटुंबाचा वारसा चालवावा असे त्याच्या कुटुंबाला आणि मोरगावकरांना वाटते. ‘हे घर नांदतं राहू दे देवा’ अशी शेवटी प्रार्थना आहे. यामध्येही अंतराय निर्माण झाल्यास होणारे द्वंद्व खंडेरावच्या द्विधा मनस्थितीतून दाखविले आहे. शेती कराङ्मचं ठरवलंस तर नवरा होऊ नकोस किंवा लग्न करायचं ठरवलंस तर शेतकरी होऊ नकोस हे त्याचे वाटणे स्वाभाविक आहे. कृषिपरंपरेतून बाहेर पडतानाचा हा सनातन झगडा आहे.

खंडेरावचे पुरातत्त्वाचा संशोधक विद्यार्थी असणे आणि त्ङ्माचे संस्कृती शोधासाठींचे उत्खनन या गोष्टी विशेष महत्त्वाच्या आहेत. गतकालीन संस्कृतिशोध त्याला जाणिवेच्या माध्यमातून घ्यायचा आहे. हे करत असताना आपल्या मुळांचा शोध महत्त्वाचा वाटतो. वैदिकांनी कृषिसंस्कृतीला कसे परावलंबी केले. हे सांस्कृतिक सत्तास्थानांचे राजकारण विस्ताराने उलगडले आहे. श्रमाला बाजूला करून वाणी आणि लेखणी महत्त्वाच्या ठरवणारी व्यवस्था आकाराला आली, याची पोलखोल ‘हिंदू’मध्ये केली आहे. व्यवस्थेच्या मुळापर्यंत जाऊन शोध घेतला आहे. कृषिजीवनाचे हे आख्यान मराठी आणि एकूणच भारतीय साहित्यात महत्त्वाचे आहे. कृषिसंस्कृतीच्या संबंधाने ‘हिंदू’ कांदबरीचे आवाहकत्व व्ङ्मापक स्तरावर आहे. मराठीमध्ये असे प्रयत्न अपवादात्मक आहेत.

11.

मराठी कथात्म साहित्यातून सामान्य शेतक-याबाबतचे कोणते आकलन होते. याचा हा प्रातिनिधिक शोध आहे. शेतीसमूहाच्या-कृषिजीवनाच्या पिचलेपणाच्या, अपरिमित दुःखाच्या करुण कहाण्या विपुल झाल्या आहेत. प्रक्षोभ हा तळातल्या आणि शोषणव्यवस्थेतल्या शेवटच्या घटकाचा महत्त्वाचा आक्रोश असतो. ह्या प्रक्षोभाच्या कसोटीवर कृषिजीवनातील स्त्री ही सर्वाधिक पीडित आहे. तिचा प्रक्षोभ हा केंद्रवर्ती असला पाहिजे. परंतु मराठी कथात्म साहित्यात हा आक्रोश, तिचा म्हणून प्रक्षोभ आलेला नाही. कृषिजीवनातील अनेक पातळीवरचा दुःखपट या लेखनात सामावला जात नाही. त्यातील गुंतागुंत उलगडून दाखवायला, त्यांचे हितसंबंध उघडे करण्याला लेखकीय जीवनदृष्टीला मर्यादा पडतात. याची कारणे आपल्या साहित्यव्यवहारात आहेत. सर्वंकष व्यवस्थेचे आकलन येथे थिटे पडते. जो अधिकांशाने मध्यमवर्गीय नागरकेंद्री व्यवस्थेत आकारलेला आहे. सर्वंकष प्रक्षोभ कवेत न आल्यामुळे शेती जीवनातील साहित्य विद्रोहाकडे झेपावत नाही असे खेदाने नमूद करावे लागते. जे एकेकाळी विद्रोहाचा बुलंद आवाज इथले सत्यशोधकी साहित्य करत होते. या दुःखावर मात करण्याचे, आपल्याच वाट्याला लादलेल्या या भयावह स्थितीचे करुणार्द पदर जसे उलगडले जाणे आवश्यक असते. मराठी साहित्यात हे वास्तवपूर्णतेने येते. परंतु याच वास्तवाची कारणमीमांसा करत लादलेल्या दुःखाची आणि व्यवस्थेची अभ्यासपूर्ण व्यासंगाने पोलखोल होत नाही. सर्व पातळीवरून व्यवस्था आकलनाशिवाय हा प्रक्षोभ अंकित करता येत नाही. शेतकरीसमाज हा विकीर्ण समाज आहे. जात, भू-प्रदेश, उत्पादन संबंध या पातळीवर स्तरभेद असल्याने त्यांचा प्रक्षोभ, विद्रोह एकत्रित करता होत नाही. शेतीसमूहाचा प्रक्षोभ तीव्रतर स्वरूपात प्रकटत नाही याचे हे महत्त्वाचे कारण आहे. ह्याची सोडवणूक आधी झाली पाहिजे. दलित साहित्ङ्मातील विद्रोहाचा आविष्कार मराठी आणि एकूणच भारतीय साहित्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे. त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचारवारसा आहे. अस्मिता ठळक करत हा विद्रोह प्रकटतो. स्त्रीवादी साहित्ङ्मात नागरी चर्चाविश्व (डिस्कोर्स) महत्त्वाचे ठरले आहे. या तुलनेत आपल्ङ्मा सामाजिक चळवळी शेती प्रश्नांपासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळे कृषी संबिंधत जीवनव्यवहार हा मुख्यधारेतला असूनही मराठी साहित्य व्यवहारात त्याचे राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक अशा बहुमिती परिप्रेक्ष्यातून या प्रक्षोभाचे खोलवरचे संवेदन काही अपवाद वगळता सामर्थ्याने आले नाही. हे मान्य करावे लागते.

संदर्भ:

1. चौसाळकर, अशोक : ‘विद्रोहाचे तत्त्वज्ञान’, ‘तत्ववेध’, स्मरणिका, संपा. ज.रा. दाभोळे, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद, कोल्हापूर, 2008, पृ.131.

2. नेमाडे, भालचंद्र : ‘टीकास्वयंवर’, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, दु.आ. 2001, पृ.182.

3. गर्ग, मृदुला : ‘साहित्यातील विद्रोह’, अनु. पूर्णिमा जाधव-कोहली, मायमावशी , अंक-8, वासंतिक विशेषांक, 2011, पृ.14

4. नेमाडे, भालचंद्र : ‘साेळा भाषणे’, लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई, प्र.आ.2009, पृ.37

5. पांडेय, मॅनेजर :  ‘कादंबरी आणि लाेकशाही’, अनु. रंगनाथ पठारे, लोकवाङ्मय गृह, मुंबई, प्र. आ. 2011,  पृ. 25

6. चौसाळकर, अशोक : ‘महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ’, लोकवाङ्मय गृह, मुंबई, आवृत्ती पाचवी, 2007, पृ.16

7. पानसरे, गोविंद : ‘सत्यशोधक साहित्य संमेलन’, कॉ. गोविंद पानसरे समग्र वाङ्मय, खंड-2, संपा. डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. रणधीर शिंदे, लोकवाङ्मय गृह, मुंबई, प्र.आ.2017, पृ.389

8. बगाडे, उमेश (संपा.) : ‘प्रस्तावना’, ‘विचारकिरण, दीनमित्रधील अग्रलेख, 1910-15, भाग-1’, दीनमित्रकार               मुकुंदराव पाटील स्मारक समिती, तरवडी, जि. अहमदनगर, प्र.आ. 2009

9. पवार, जयसिंगराव (संपा.): ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी, कोल्हापूर, 2001, पृ.130

10. मंचरकर, र. बा : ‘नवे वाङ्मयीन प्रवाह’, ‘वाङ्मयीन चळवळी आणि दृष्टिकोन’, संपा. सुमती लांडे, शब्दालङ्म, श्रीरामपूर,  प्र.आ. 2008, पृ.153

11. नेमाडे, भालचंद्र : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, 2010, पृ. पृ. 153,154

12 प्रतिष्ठान, मराठी साहित्य आणि दुष्काळ, विशेषांक

13. चंदनशिव, भास्कर : ‘अंगारमाती’ साकेत प्रकाशन, औरंगाबाद, आवृत्ती चौथी, 2012, पृ.17

14. विंगकर, आनंद :  ‘अवकाळी पावसादरम्यानची गोष्ट’, लोकवाङ्मय गृह, मुंबई, 2011, पृ.158

डॉ. दत्ता घोलप
संशोधक विद्यार्थी,
मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ
कोल्हापूर-416004
मो.7588505079