जख्मांच्या खपल्या
झाल्यात की,
घाई होते खपल्या काढायची
अनिवार जखमा
ठणकतच असताता तेव्हाही

***

पाऊस
अकस्मात घेरतो
आणि झोडपून काढतो
स्वप्नांनाही
तेव्हा किती कठीण असते
स्वतःच स्वतःला
समजावणे.

***

कितीदा डोहात
बुडवल्यात कविता
तरी पुन्हा पुन्हा त्या तरंगतात
कुणाच्या तरी भेटीसाठी
त्या बुडतच नाहीत
कितीही खोल पाण्यात

***

माझ्या श्वासांना
धक्काही लागू नये
म्हणून तू चुपचाप
निघून गेलीस
माझ्या सा-या वेदना
सोबत घेऊन

***

मौनात जगण्याची शिक्षा
कुणालाही मिळू नये
खूप जीवघेणं असतं
चुपचाप डोळे मिटून जगणं

***

हे एकटेपण
वाटून घेता येत नाही
तरीही
तुला
मला
जगणे तर भागच आहे
उद्यासाठी.

***

निरोपही घेतला नाही
आणि एकमेकांत गुंतणेही
सुटले नाही
तरीही खूप दूर
निघून गेलो आहोत
किनारे सोडून
एका अकाली तुफानात
तू आणि मी

***

कुठले तरी स्वप्न
रोज पडत असते
कुठली तरी भूमिका
असतेच स्वप्नात
एक स्वप्न असे पडले
हळुवार मिठीत
मध्यरात्री उमलणा-या फुलांनी
रात्रीचाही रंगच बदलला

***

सत्याचे बोट पकडून
चालणे एवढे सोपे नसते
असत्यालाही ठोकर मारून
पुढे जाणेही नसतेच सोपे
सत्याचे निखारे नेहमीच
स्वप्नांना पोळत ठेवतात
असत्याचा बर्फ नेहमीच
जगणे मुश्किल करतो
कविते,
तुझे रस्ते तर सत्यालाच
मिठीत घेणारे
तुझेच बोट धरून चालतो आहे.

***

ज्या रस्त्याने जायचं नव्हतं
नेमके तेच रस्ते खुणावत राहिले
पावलं कशी भरकटलीत
कळलेच नाही
कविते,
किती संयमी राहिलीस तू
माझे चुकलेले रस्ते
बदलून टाकलेत रातोरात
पुन्हा त्याच वळणावर 
आणलेस मला
जिथून मी सुरूवात केली होती
माझ्या प्रज्ञाशील आयुष्याची !

कवी जळगाव येथील असून  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर येथे विभागीय सचिव म्हणून कार्यरत होते.