डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये शिक्षणापासून वंचित असलेल्या मागासवर्गीय घटकांना शिक्षण प्रवाहात येण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याची तरतूद केली. यांमध्ये SC, ST, NT, OBC, VJNT, SCB अशा प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षण घेऊ लागले. आताच्या काळात आर्थिकदृष्ट्या मागास मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी सुरू आहे. शिष्यवृत्तीचा आधार घेऊन अनेक मागासवर्गीय आता सरकारी नोकरी करत आहेत.

राज्यघटनेने दिलेल्या अनेक अधिकारांपैकी शिष्यवृत्तीचा अधिकार आपल्या विद्यार्थ्यांना आहे. पूर्वी शाळा, कॉलेज शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांकडून फी न घेता त्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमधून ती फी वजा केली जात असे. परंतु ऑनलाईन शिष्यवृत्त्या सुरू झाल्यापासून शाळा, कॉलेजेसने विद्यार्थ्यांचे फॉर्म्स भरण्याची जबाबदारी झटकली आहे. शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांकडून ऍडमिशनच्या वेळेस पूर्ण फी आकारली जाते. विद्यार्थ्यांवर पूर्ण फी भरण्यासाठी दबाव आणला जातो, त्यांचे प्रवेश नाकारले जातात. ह्या दबावाखाली येऊन अनेक विद्यार्थी शिक्षण क्षेत्रातून बाहेर पडत आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होत आहे. स्वतःचे हक्क, स्वतःच्या जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांना माहीत नसल्याने त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात अनेक अडथळे येत असतात.

अशाच विद्यार्थ्यांच्या अनेक प्रॉब्लेम्सवर उपाय सुचविण्यासाठी सत्यशोधक विद्यार्थी संघटना, सिंधुदुर्ग आणि समता प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग संघटनांनी एक दिवशीय शिबीर पार पडले. शिबिरामध्ये ‘विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणी, प्रवेश प्रक्रिया कशी करावी, शिष्यवृत्ती योजनांचे प्रकार, शिष्यवृत्तीसाठी पात्रता, शिष्यवृत्ती फॉर्म कसा भरावा, शिष्यवृत्तीसाठी लागणारे सरकारी कागदपत्र आणि ते कसे मिळवावे’ यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराला मार्गदर्शक म्हणून राजेंद्र कांबळे (सावंतवाडी), ऍड. स्वाती तेली, सुजय जाधव, राहुल कदम आणि सुधांशू तांबे लाभले होते. याचबरोबर युनिक अकादमी, कणकवलीचे मार्गदर्शक सचिन कोर्लेकर आणि अच्युत देसाई यांनीदेखील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शिबिराला कणकवली तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली होती. विद्यार्थी मार्गदर्शन शिबिराला सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल कदम, कणकवली तालुकाध्यक्ष सुजय जाधव तसेच समता प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे अध्यक्ष अमोल कांबळे आणि सचिव अंकुश कदम उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसंदर्भात मार्गदर्शन शिबिराचा शेवट विद्यार्थ्यांच्या उस्फुर्त प्रतिसदासोबत घोषणा देत संपन्न झाला.

(लेखिका सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्राची राज्य कार्यकरिणी सदस्य आहे.)