मराठी वाङमयविश्वात सद्या एका पुस्तकाची जोरदार चर्चा सुरु आहे. बहुचर्चित असलेल्या या पुस्तकाचे नाव आहे ‘भुरा’. भुरा हे शरद बाविस्कर यांचे  आत्मकथन आहे. शरद बाविस्कर हे सद्या दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात फ्रेंच तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत.

‘भुरा’ हे आत्मकथन लोकवाङमयगृहाने प्रकाशित केले आहे. या आत्मकथनाचा पहिला प्रकाशन समारंभ सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने धुळे येथे आयोजित केला होता.

धुळ्याच्या रावेर ते दिल्लीच्या जागतिक दर्जाच्या जेएनयु विद्यापीठ पर्यंतचा शरद बाविस्करांचा  प्रवास थक्क करणारा आहे. रावेर सारख्या दुर्गम गावात कुणबी कुटुंबात जन्माला आलेले शरद बाविस्करांनी शिक्षणासाठी हिंमतीने दिलेला संघर्ष अवाक करणारा आहे. दारिद्र्य, इंग्रजी भाषेत गती नसल्याने १० वीच्या महत्त्वाच्या परीक्षेत आलेले अपयश, बहुजन जातींना सहजपणे शिक्षण मिळू न देणारी उच्चजातीय,उच्चभ्रूकेंद्रीत शिक्षणव्यवस्था या सर्वांशी चिकाटीने सामना करीत शरद बाविस्करांनी इंग्रजी बरोबरच फ्रेंच भाषेवर प्रभुत्व मिळवत प्रगल्भ ज्ञानव्यवहार आत्मसात करत जागतिक किर्तीच्या जेएनयु विद्यापीठात प्राध्यापक म्हणून आपला सन्मानाचा अवकाश प्राप्त केला. बाविस्करांनी आत्मसन्मानाशी किंचितही तडजोड न करता  शिक्षणासाठीचा दिलेला संघर्ष त्यांनी ‘भुरा’ या आपल्या आत्मकथनात मांडला आहे.

“मला व्यवस्था आणि स्वातंत्र्य ह्या मानवी जीवनातील एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात. व्यवस्था मानवी जीवनाची अपरिहार्यता आहे, तर व्यवस्थेचं कुठल्याही क्षणी निरंकुश होणं मात्र मानवी स्वातंत्र्यावरील टांगती तलवार. व्यवस्था म्हणजे फक्त समाज आणि इतिहास नसून,आपण जी भाषा बोलतो तीसुद्धा व्यवस्थेचं काम करत असते. आपलं कुंठीत आणि शीघ्र आकलनसुद्धा व्यवस्थेचं प्रतिबिंब असते. एका अर्थाने आपला जन्मच अनिवार्यपणे व्यवस्थेनं घेरलेल्या साखळदंडांमध्ये बंदी म्हणून होत असतो. त्या साखळदंडांच्या अस्तित्त्वाची जाणीव ही आपल्या सापेक्ष सुटकेची पूर्वअट.”

धुळे जिल्ह्यातील रावेर या लहानशा खेड्यात एका कोरडवाहू शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या, रोजंदारीवर पडेल ते काम करून भाषाशिक्षण आणि तत्त्वज्ञानाच्या ओढीने वेगवेगळ्या देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिकलेल्या, भाषा आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी जग पालथे घालणाऱ्या, तत्त्वज्ञानासारख्या गहन आणि गंभीर विषयाच्या अभ्यासाने समृद्ध झालेल्या, ‘भुरा’ ही आपली जातजाणीव ओलांडून मार्क्स, अल्थुझर, ग्राम्शी , महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपर्यंत पोहोचूनही स्वतंत्रपणे आपले सामाजिक वास्तव संवेदनशीलतेने आणि तेवढ्याच कठोर वैचारिक शिस्तीने तपासणाऱ्या प्रा. शरद बाविस्कर यांचे हे प्रांजळ आत्मकथन.  

‘भुरा’ या आत्मकथनात बाविस्करांचे अनुभव,कुटुंब तसेच सामजिक व्यवस्थेशी केलेला झगडा सून्न करणारा आहेच. पण  त्याचबरोबर मार्क्स,फुले-आंबेडकर आणि फ्रेंच तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून त्यांनी भारतीय जात वर्ग लिंगभाव आणि एकूणच भारतीय शिक्षणव्यवस्थेविषयी जे ठिकठिकाणी स्वत:चे जे चिंतन मांडले आहे ते वाचकालाही वेगळे भान देणारे आहे.  

शरद वाबिस्करांचे भुरा हे आत्मकथन वाचनीय असून ते ॲमेझॉन, तसेच लोकवाङमयगृहाच्या संकेतस्थळावर सवलतीच्या दरात ऑनलाईन उपलब्ध आहे.

पुस्तकाची एकूण पृष्ठे ३५४ असून मूळ किंमत रु.५०० आहे