भटक्यांचे अभावग्रस्त आयुष्य वाट्याला आलेले व त्यातून संघर्ष करीत स्वत:चे आयुष्य घडविणारे डॉ.नारायण भोसले यांचे ‘देशोधडी : आडं,मेढी बारा खुंट्याची’ हे आत्मकथन नुकतेच प्रकाशित झाले आहे.मनोविकास प्रकाशनने हे आत्मकथन प्रकाशित केले आहे.

भारतात १६ कोटी भटका समुह आहे.भारतीय जातीव्यवस्थेने या भटक्या जातींना अधिकारवंचित करीत जगण्याचीच शिक्षा वाटावी अशी दारुणता त्यांच्यावर लादली.स्वातंत्र्यानंतरही जगतानाच्या यातना कमी होताना दिसत नाही. या समुहातील भटक्या जमाती  आजही आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी सतत भटकतो आहे. याच भटक्या समुहापैकी एक असलेल्या नाथपंथी डवरी गोसावी या जातीत जन्म झालेल्या डॉ.नारायण भोसलेंनी आपल्या आत्मकथनातून त्यांनी भटक्या जातीत जन्माला आलेल्याचे यातनामय जगणे रोखठेकपणे मांडले आहे. भोसले यांनी या आत्मकथनात स्वत:सह समुहाच्या जगण्याचे चित्रण केले आहे.

हे आत्मकथन म्हणजे नाथ डवरी गोसावी समुहाच्या अभावग्रस्त जगण्याचा इतिहासच आहे. त्यांनी आपल्या मनोगतात लिहिले आहे,मानव्य शाखेच्या विविध विषयात भटक्याचे सामाजिक जीवन एखादा अपवाद सोडता लोणच्यासारखे घेतले जाते.सोळा कोटी समुदायाचा इतिहास-वर्तमान अनिवार्यपणे कधी अभ्यासला जाईल? यादृष्टीने मी ज्या नातपंथी डवरी गोसावी  भटक्या जातसमुहाचा भाग म्हणून जन्माला आलो,त्याच्या इतिहास वर्तनाचे रेखाटन करणे मला आवश्यक वाटले.प्रस्तुत स्वकथन हे त्या प्रकल्पाचाच एक भाग आहे.

डॉ.नारायण भोसले हे सद्या मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. ते भटक्या –विमुक्त समुहाच्या इतिहासाचे संशोधक म्हणूनही महाराष्ट्रात परिचित आहे.   ‘भटक्या -विमुक्तांची पितृसत्ताक जातपंचायत :परंपरा आणि संघर्ष’, ‘विमुक्तांचे स्वातंत्र्य, महाराष्ट्रातील भटके-विमुक्त:सद्यास्थिती आणि आव्हाने’ आदी संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. 

 याशिवाय ‘डॉ.आंबेडकर आणि अब्राम्हणी इतिहासमीमांसा’, ‘महाराष्ट्रातील स्त्रीविषयक सुधारणावादाचे सत्ताकारण’, ‘जातवर्गलिंगभाव इतिहासमीमांसा’, ‘अब्राम्हणी स्त्रीवाद आदी महत्त्वाच्या पुस्तकांचे लेखन तसेच संपादन केले आहे.

डॉ.नारायण भोसले यांचे आत्मकथन तीन भागात वाचकांना उपलब्ध होणार आहे.त्यापैकी ‘देशोधडी’ हा पहिला भाग आहे.

उर्वरित ‘अ-नाथपंथी’ व ‘भटक मरो मत कोय’ हे दोन भाग प्रकाशनाच्या वाडेवर आहेत.

‘देशोधडी : आडं,मेढी बारा खुंट्याची’ हे आत्मकथन ३०६ पृष्ठांचे असून किंमत रु.३५० आहे.

पुस्तक ऑनलाईन मिळण्याचा पत्ता-

Website:https://manovikasprakashan.com/
संपर्क:-8888550837,/ 02029806665