सावंतवाडीत ८ व ९ मे रोजी १ ले जनवादी साहित्य-संस्कृती संमेलन संपन्न झाले. जेष्ठ पत्रकार व लेखिका संध्या नरे-पवार या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. संमेलनातील त्यांचे अध्यक्षीय भाषण विशेष गाजले. हे भाषण छापील स्वरुपात संमेलनात प्रकाशितही करण्यात आले. त्यांचे हे भाषण सत्यशोधक प्रतिशब्दच्या वाचकांसाठी दोन भागांत प्रसिद्ध करीत आहोत. भाषणाचा पूर्वार्ध संमेलन संयोजन समितीच्या सौजन्याने या अंकात प्रसिद्ध करीत आहोत.

संपादक

गणांमध्ये अन्नधान्याचे, जमिनीचे वाटप करणाऱ्या, वेदपूर्व काळात होऊन गेलेल्या गणमाता; सर्व शृंखलांपासून मुक्ते तू मुक्त होऊन जा, असे सांगणाऱ्या बौद्ध भिख्खुणी मुक्ता थेरी; भूभागाच्या सीमा ओलांडून धम्मप्रसार करणारी संघमित्रा, स्त्री जन्म म्हणूनी न व्हावे उदास, असे सांगणाऱ्या संत जनाबाई; स्वराज्याचे स्वप्न पाहाणाऱ्या राजमाता जिजाबाई; शिक्षणाने मनुष्यत्व, पशुत्व हटते पहा, असे सांगणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख; वेद हे ईश्वराकडून आले म्हणावे तर त्याचा उपभोग सर्व प्राणिमात्रांना सारख्या पद्धतीने का घेता येत नाही, असा प्रश्न विषमतामूलक जातव्यवस्थेला विचारणारी मुक्ता मांग; १८८५ मध्ये ‘स्त्रीपुरुषतुलना’ हा ग्रंथ लिहून श्रुतिस्मृतिपुराणोक्त अशा पुरुषसत्तेला खडसावणाऱ्या ताराबाई शिंदे; वैदिक सनातन्यांच्या विरोधाला प्रत्युत्तर देत, धर्मांतर करत, ख्रिस्ती धर्म स्वीकारत स्त्रियांसाठी संस्थात्मक कामाची सुरुवात करणाऱ्या पंडिता रमाबाई; नको नको रे ज्योतिषा नको माझा हात पाहू, असे म्हणत दैववादाला नाकारणाऱ्या बहिणाबाई, दलितांच्या उन्नतीसाठी कष्टाची वाट स्वाभिमानाने चालणाऱ्या रमाई आंबेडकर… स्त्रियांच्या या घट्टमुट्ट वारशाचे मी इथे या जनवादी साहित्य आणि संस्कृती संमेलनात स्मरण करते. अभिवादन करते. विषमतावादी समाजव्यवस्थेला नाकारत समतावादी मुल्यांची रुजवात करणारे भगवान बुद्ध, संत कबीर, चक्रधरस्वामी, संत नामदेव-तुकाराम, छत्रपती शिवराय, समाजक्रांतिकारक जोतिबा फुले, राजर्षि शाहू, घटनाकार बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील या महामानवांनाही मी इथे अभिवादन करते. तसेच विज्ञाननिष्ठ समाजाच्या निर्मितीसाठी विवेकाच्या वाटेवरुन निर्भयपणे चालताना कट्टरतावादी, सनातनी विचारांच्या गोळ्या झेलत मृत्यूला सामोरे जाणारे नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्यांचे स्मरण करत आणि आपल्यालाही त्याचे स्मरण देत मी या विचारवंतांच्या स्मृतीलाही वंदन करते.

हे स्मरण, हे अभिवादन थोडे लांबले आहे याची मला कल्पना आहे. पण हे जनांचे साहित्य आणि संस्कृती संमेलन आहे. त्यामुळे जनांच्या साहित्य आणि संस्कृतीचा म्हणजेच त्यांच्या समग्र अस्तित्त्वाचा नेमका वारसा काय आहे, हे इथे सुरुवातीलाच स्पष्ट करणे आवश्यक आहे.

या जनवादी साहित्य आणि संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड करुन मला या विचारमंचावर माझे विचार मांडण्याची संधी दिली याबद्दल मी या संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष संपत देसाई, उपाध्यक्ष मधुकर मातोंडकर, उपाध्यक्ष मिलिंद माटे, कार्याध्यक्ष प्रतिभा चव्हाण, सचिव अंकुश कदम तसेच स्वागताध्यक्ष संजय वेतुरेकर यांचे आणि आयोजनात सहभागी असलेल्या सर्व संघटनांचे आभार मानते. दलित पॅंथर या लढाऊ संघटनेच्या स्थापनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या सुवर्ण महोत्सवी वर्षात या अशा संमेलनाचे आयोजन करणे हे आजच्या काळात अधिक औचित्यपूर्ण आहे.

आज इथे या मंचावर उभी असताना मला माझा जीवनसाथी जयंत पवार आणि वडील दत्ता नरे यांची तीव्रतेने आठवण येत आहे. यात केवळ व्यक्तिगत दुःखं किंवा भावनिक भाग नाही, तर वैचारिक प्रवासातील सोबती दुरावल्याचे दुःखं आहे. जयंत पवार यांनी सातत्याने लेखकांचं, कलावंतांचं, अभ्यासकांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम राहावे यासाठी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका, त्यांच्या लेखनातून शोषित जनांच्या दुःखाला दिलेले द्दश्य स्वरुप, मुंबईतील गिरणी कामगारांच्या वाताहातीविषयी सातत्याने केलेले लिखाण याबाबी इथे उपस्थित असलेल्या बहुतेकांना माहीत आहेत. जयंतचे गावही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि वडिलांचे गावही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. आईच्या वडिलांचे गावही पंचक्रोशीतलेच. म्हणजे सगळी मुळं या लाल मातीतच रुजलेली आहेत. मुलगा थोडा वयात आला की त्याला मुंबैकडे धाडायचा, चाकरमनी करायचा हा या लाल मातीचा पन्नास, साठच्या दशकातला रिवाज होता. वडील शाळकरी वयातच मुंबईला जाऊन काकांच्या खोलीत राहू लागले. दिवसा छोटीमोठी कामं करत रात्रशाळेत जाऊन त्यांनी आपलं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. नंतर नोकरी करत असतानाच तरुण वयात बॅ. नाथ पै, मधु दंडवते या समाजवादी नेत्यांची भाषणं ऐकत, त्यांच्याशी संपर्क साधत त्यांच्या सहवासात आले. जवाहरनगर इथल्या वस्तीत राहात असताना तिथल्या लोकांच्या प्रश्नांवर काम करत कार्यकर्ता बनले. आणीबाणीला विरोध करत तुरुंगात गेले आणि नंतर १९७७ च्या जनता पक्षाच्या राजवटीत नगरसेवक म्हणून निवडून आले. हे इथे सविस्तरपणे सांगण्याचे कारण म्हणजे वडील त्या काळात कॉंग्रेस (congress) पक्षावर नेहमी भ्रष्टाचारी म्हणून टीका करत, पण त्याचवेळी उजव्या विचारांच्या पक्षांबाबत बोलताना कायम एक वाक्य उच्चारत की, ‘ते लोकं बरोबर नाहीत.’ कुटुंबातील मुलांपैकी कोणी जर उजव्या विचारधारेच्या विद्यार्थी संघटनेच्या एखाद्या कार्यक्रमाला गेल्याचं त्यांना कळलं तरी ते तेच वाक्य उच्चारत, तिथे जाऊ नका. ते लोकं बरोबर नाहीत. वडील एक कार्यकर्ता होते. त्यांना सैद्धान्तिक भाषेत बोलता येत नव्हतं, वैचारिक मांडणी करता येत नव्हती. त्यांनी कोणतंही तत्त्वज्ञान वाचलेलं, अभ्यासलेलं नव्हतं. पण तरी त्यांच्या सामाजिक जीवनातल्या अनुभवाच्या आधारे, एका उपजत शहाणीवेच्या आधारे उजव्या विचारसरणीच्या संघप्रणीत राजकारणाचा त्यांनी एका वाक्यात निचोड काढला होता, ‘ते लोकं बरोबर नाहीत.’ दुहीची बीजं पेरली की विद्वेषाचं तण माजतं, हे त्यांना उमगलेले होते. वडील जे काही सांगू पाहात होते त्याचा प्रत्यय १९९२ मध्ये अयोध्येत, २००२ मध्ये गुजरातमध्ये आणि २०१४ नंतर संपूर्ण देशात येत आहे. म्हणूनच वडिलांची, त्यांच्या या विधानाची सातत्याने आठवण येत असते.

इथे उभं असताना मला पॅंथर कवी नामदेव ढसाळ यांच्या ’चिंध्यांची देवी’ या कवितेचंही स्मरण होत आहे. या कवितेत नामदेव ढसाळ म्हणतात,

‘आई निवर्तून झालेली चिक्कार वर्षे..

मी असा भटकून चिंध्यांच्या देवीच्या

पंचक्रोशीतून करतो ये, जा

या रस्त्यातून चालताना आईसोबत असायची तेव्हा वाटायचे सुरक्षित,

आता त्या भयाण पर्वतराजीत वाटू लागते

भीती.

आणि मी जन्माचा नास्तिक

हाकारु लागतो चिंध्यांच्या देवीला

त्या निर्जन पंचक्रोशीत

हसते कोणी – ढगांच्या गडगडाटासारखे

दचकून जातो जीव

आणि अलगद कुणी पकडल्यासारखे

वाटते माझे बोट –

देहातल्या सर्व अष्टमहाभित्या होऊन जातात

नाहिशा!

मी हिमतीने आक्रमू लागतो वाट,

डोंगराचा माथा फोडून

आरपार गेलेली काठी

चिंध्यादेवीचीः जणू पृथ्वीच्या नाभीला स्पर्श करणारी

काठीला गुंडाळलेल्या जगड्व्याळ चिंध्या

सुई, सुई वाऱ्यावर

फडकत राहातात – आसमंताला चिरीत..’

मानवी मन आस्तिक असो वा नास्तिक, मातेच्या गर्भातील सुरक्षितता त्याला कायम हवीशी वाटते. कारण मातेच्या गर्भात भूकेचे हिशोब नसतात. पोट भरण्याची हमी असते. नामदेव ढसाळांनी चितारलेली ही चिंध्यांची देवी जितकी अद्भूत आहे तितकीच वास्तव आहे. बायाबापड्या तिला चिंध्या वाहतात आणि अगणित चिंध्यांची देवी बनते. दैवत्वाचं, अलौकिकत्वाचं वलय तिला नाही. तिचं नातं इथल्या दारिद्र्याशी, इथल्या भूकेशी आहे. किंबहुना इथल्या भूकेने, दारिद्र्याने देवत्वाची कल्पना करताना ती मातृरुपात तर केलीच पण ती चिंध्यांच्या रुपात केली, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकदा पोटाची भूक सहन करता आली की मनुष्याला कसलंच भय उरत नाही. त्याअर्थी ही चिंध्यादेवी मनातल्या अष्टभित्या घालवणारी आहे. ढसाळांच्या नास्तिक मनाला बालपणी आईच्या सहवासात जी सुरक्षितता लाभली ती मोठेपणी या चिंध्यादेवीच्या स्मरणाने लाभते. हे स्मरण जितके देवीचे आहे तितकेच दारिद्र्याचे, भूकेचे आहे. म्हणूनच देवीच्या काठीला गुंडाळलेल्या चिंध्या आसमंताला चिरत फडकत राहतात, दारिद्र्याचं ऐलान करत, भूकेचा हिशोब मागत.  

कोकणाचा हा परिसरही अशा अनेक ग्रामदेवतांनी, मातृदेवतांनी भरलेला, भारलेला आहे. काळ्या पाषाणाच्या स्वरुपात, कोणत्याही पुरुष सहचराशिवाय उभ्या असलेल्या सातेरी, काळंबाई, विठ्ठलाई, मरिआई, जाखाई या अशा अनेक देवता आपल्याला थेट वेदपूर्व काळाशी, सिंधु संस्कृतीशी जोडतात. वेदसंस्कृतीतल्या देवपत्नींपेक्षा त्या सर्वस्वी निराळ्या आहेत. त्यांना रुढार्थाने पती नाही पण त्या माता आहेत. मातृरुपात त्यांचे पूजन केले जाते. सौत्रान्तिक मार्क्सवादी शरद् पाटील यांनी त्यांच्या ‘दासशुद्रांची गुलामगिरी’ या ग्रंथात ज्या गणमातांची मांडणी केली आहे किंवा हडप्पा-मोहोन्जोदडो इथल्या उत्खननात ज्या अनेक मातृदेवतांच्या मूर्ती सापडल्या आहेत त्यांचे आणि भारतभर आढळणाऱ्या मातृदेवतांचे नेमके नाते काय आहे, यासंदर्भात देवीप्रसाद चट्टोपाध्यायांपासून ते दामोदर कोसंबींपर्यंत वेगवेगळ्या अभ्यासकांनी विश्लेषण केले आहे. पाक्ष्चिमात्य अभ्यासकांनी यासंदर्भात मांडणी केली आहे. हा काळाच्या पडद्याआड पुसला गेलेला, विस्मरणात गेलेला मातृसत्तेचा, स्त्रीसत्तेचा वारसा आहे. अनेक समुदायांनी धर्मांतरानंतरही आपल्या मातृदेवतांचे स्मरण कायम ठेवल्याचे दाखले मिळतात. आजच्या सांस्कृतिक संघर्षाच्या काळात, धर्मांध कट्टरतेच्या आक्रमक पुरुषदेवासमोर इथल्या मातृदेवतांचा हा समतावादी वारसा पुन्हा एकदा उजागर करायला हवा. या मुद्द्यासंदर्भात मी पुढे अधिक मांडणी करेन. तूर्तास या मातृदेवतांना सौहार्दाचे आणि समतेचे गाऱ्हाणे घालून मी पुढच्या मुद्द्यांकडे वळते.

हे साहित्य आणि संस्कृती संमेलन आहे, केवळ साहित्य संमेलन नाही, ही बाब मला लक्षणीय वाटते. जिथे जनांनी लेखणी हातात घ्यायची का नाही, हे प्रस्थापितांची संस्कृती ठरवते, जनांनी लिहिलेल्या साहित्यकृतीला मान्यता द्यायची का नाही, हे अभिजनांची समीक्षा ठरवते, तिथे या वैचारिक प्रभुत्वाला सामोरे जाताना जनांना आपल्या संस्कृतीसहच उभे राहावे लागते. शिवाय जनांच्या साहित्याची निर्मिती जनांच्या संस्कृतीमधून, विविध लोकप्रकारांमधून, लोकगीतांमधून, मौखिक कथांमधून झालेली आहे. आज पाक्ष्चिमात्य साहित्यातील सिंड्रेलाची कथा इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या कृपेने घराघरात पोहोचली आहे. पण भिल्ल आदिवासींमध्ये कुंदीराजा, फुलवंती आणि तिची सावत्र आई यांची लोककथा आहे, ती मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत आलेली आहे. पण सिंड्रेला आपल्याला माहित असली तरी फुलवंती अपरिचित असते, कारण परिघावरच्या संस्कृतींमधील साहित्यही परिघावरच राहाते. आदिवासींमध्ये प्रत्येक जमातीत रामसीतेची कथा वेगळी आहे. आदिमांचे रामसीतायण वाल्मिकींच्या रामायणापेक्षा वेगळे आहे. यात कधी सीता रामाची बहिण आहे, कधी रावणाची मुलगी आहे तर कधी सीतेला स्वयंवरात लक्ष्मणाने जिंकले आहे. वारली आदिवासींच्या रामसीतायणात लक्ष्मणाने सीतेला जिंकल्यावर त्याने रामाला सीतेशी लग्न करायला सांगितले. नंतर एकदा लक्ष्मण आणि सीता यांचे भांडण होते, तेव्हा लक्ष्मण रामाला सीतेचा त्याग करायला सांगतो. रामाने तसे केल्यावर ती सात समुद्र फिरुन सकोबा आणि इटोबा यांच्या आश्रमात राहाते. आश्रमातच तिचे दोन्ही मुलगे मोठे होतात. तिकडे नगरात राम रावणाचे युद्ध सुरु झालेले सीतेला कळते. ती आपल्या दोन्ही मुलांना घेऊन तिथे जाते. युद्धात रामाचा पराभव होत असतो. राम-लक्ष्मण दोघेही जखमी झालेले असतात. तेव्हा सीता आपल्या दोन्ही मुलांसह युद्धात उतरते, रावणाशी युद्ध करते आणि जिंकते. ही अशी विविध रामायणं कधी पुढे आणली गेली नाहीत. पुरोगामी विचारप्रवाहानेही ही रामायणं पुढे आणत लोकांना ती सांगितली नाहीत. अगदी १९९२ नंतरही नाहीत. वारली आदिवासीही महाराष्ट्रातलेच आणि आजही रावण आणि मेघनादाची पूजा करणारे कोरकू आदिवासीही महाराष्ट्रातलेच. बहुजन जातींमधील ग्रामीण स्त्रियांच्या लोकगीतांमध्येही रामायण स्त्री परिप्रेक्ष्यातून उलगडत जाते. सीतेचे निष्पापपण गाताना ग्रामीण स्त्री म्हणते,

‘वधावया नेली सीतासारख्या नारीला

कलंक लागला चंद्रासारख्या देवाला…’

दुसरी एखादी ‘राम म्हनू राम, नाही सीतेच्या तोलाचा’ असा सीतेच्या श्रेष्ठत्वाचा निर्वाळाही देते. सीतेच्या माध्यमातून ग्रामीण स्त्री आपले स्वतःचे दुःखंही व्यक्त करते आणि त्या दुःखाला शब्दांमध्ये बांधत म्हणते,

‘सीताला सासूरवास, सासू केकईनं केला

रामासारखा भरतार, तिला न्हाई भोगू दिला

सीतेला सासूरवास, कवठाच्या कवठीपरी

नाही ग भोगू दिला, रामाच्या नवतीमधी..’

राम आणि सीता या दोन व्यक्तिरेखा इथल्या बहुजनांच्या दैनंदिन जगण्यातला अविभाज्य भाग आहेत, त्यांच्या सहज अभिव्यक्तीचा आविष्कार आहेत. सासूच्या सासूरवासापासून ते पतीपत्नीमधील तणावापर्यंत वेगवेगळ्या गोष्टी राम-सीतेच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असताना सर्वसामान्यांच्या अभिव्यक्तीतील राम-सीता कधी संस्कृतीच्या पृष्ठभागावर आले नाहीत. प्रस्थापित उच्चजातीय अभिजन संस्कृतीच्या केंद्रस्थानी कायम वाल्मिकी रामायण, तुलसीदासांचे रामायण आणि नंतर माडगुळकरांचे गीत रामायण राहिले. मोजक्या अभ्यासकांव्यतिरिक्त लोकमानसातील राम-सीतेशी, आदिवासींमधील रामसीतायणाशी इथल्या पुरोगामी विचारप्रवाहानेही स्वतःला जोडून घेतले नाही. आम्ही आमच्या नास्तिकपणात, आधुनिकतेत आणि नंतर उत्तर आधुनिकतेत मग्न राहिलो. पाक्ष्चिमात्य साहित्य अभ्यासत राहिलो आणि इथल्या मातीतल्या लोकप्रतिभेला विसरलो. त्यातल्या मिथकांना, मिथकांमधल्या अद्भुताला नाकारत मार्क्वेझच्या मॅजिकल रिअलिझमची चर्चा करत राहिलो. लोकसाहित्य हा विषय अभ्यासकांपुरता मर्यादित झाला. तो मुख्य प्रवाहाचा भाग बनला नाही. इथल्या ज्ञानव्यवहारावर कायम उच्चजातीयांचं प्रभुत्व होतंच, त्यातूनच उच्चजातीयांची संस्कृती हीच मुख्य प्रवाही संस्कृती बनलेली होती. त्यामुळे त्यांच्या सांस्कृतिक राजकारणात जनांचं साहित्य आणि संस्कृती या बाबी कायम परिघावरच राहिल्या. त्या केंद्रस्थानी आणण्याची जबाबदारी इथल्या पुरोगामी विचारप्रवाहाची होती. पण त्यावरही प्रस्थापितांची छाप कायम राहिली.

सत्तरच्या दशकानंतर दलित लेखकांनी लिहिलेले साहित्य मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होऊ लागले. आत्मचरित्र, कथा, कविता असे याचे स्वरुप होते आणि आहे. अलिकडे भटक्या विमुक्त समुहातील स्त्री-पुरुषांची आत्मचरित्रे अधिक येत आहेत. पण उच्चजातीय अभिजनांच्या द्दष्टीतून या साहित्याचे कायम एक्झाटिसायझेशन (Exoticization) केले जाते. आपल्या अनुभवविश्वाच्या पल्याड असे काहीतरी विलक्षण, विचित्र या स्वरुपात या आत्मचरित्रांमधून दर्शित होणाऱ्या जीवनाकडे पाहिले जाते आणि त्या स्वरुपातच ते काही काळाने रिचवले जाते. त्यातील संस्कृती ही कायम उपऱ्यांची, परिघावरची अशीच राहाते. ती आपली होत नाही. वर्णआधारित, जातिआधारित विभाजन साहित्याचेही विभाजन करत असते. संस्कृती आणि साहित्य एकमेकांना सापेक्ष असतात, त्याचे प्रत्यंतर जातिआधारित समाजात वारंवार येते.

आज इथल्या सांस्कृतिक संघर्षाने सांस्कृतिक दहशतवादाचे रुप धारण केले आहे. अशा पार्श्वूभूमीवर हे जनांचे साहित्य आणि संस्कृती संमेलन होत आहे. आजच्या या सांस्कृतिक संघर्षाचे अनेक पैलू आहेत. त्यातील गुंतागुंतही तीव्र आहे. त्यातील काही प्रमुख मुद्दे इथे चर्चेसाठी घेतले आहेत.

धर्मांध कन्सेन्टचे मॅन्यूफॅक्चरिंग आणि माध्यमसंस्कृती –

मी माध्यमकर्मी आहे. त्यामुळे सुरुवात माध्यमांपासून करते. संपूर्ण आसमंतात एक वैचारिक कोलाहल आहे. विविध विचारांचे टकराव आहेत, संस्कृतींचे संघर्ष आहेत. वास्तवाचे अनेक तुकडे सभोवताली आहेत. वातावरणात एक तीव्रता आहे. समाजाचे मानस रोजच्यारोज उलटेपालटे होत आहे. काहीच एकसंध नाही, सगळंच खंडित आहे. धर्म, जात, भाषा, वर्ण, लिंग या परंपरागत विभाजकांच्या बरोबरीनेच नागरिकत्व, राष्ट्रवाद, देशप्रेम या गोष्टीही आता विभाजनासाठी वापरल्या जात आहेत. सांस्कृतिक संघर्ष अत्यंत टोकदार बनला असून झुंडबळींच्या रुपाने व्यक्त होत आहे. विद्यापीठांच्या आवारांमध्ये या वैचारिक, सांस्कृतिक संघर्षाची कुस्ती खेळली जात आहे. प्रशासकीय यंत्रणा सोबतीला घेतली जात आहे. विरोधकांची, विद्यार्थ्यांची डोकी फोडली जात आहेत. एकूण वातावरण ‘गोली मार भेजे में, भेजा शोर करता है’ असे आहे. मान्य नसलेल्या विचारांची थेट हत्या केली जात आहे. या अशा स्थितीत ज्यांनी विचारांना दिशा द्यावी, अशी अपेक्षा असते ती माध्यमं काही अपवाद वगळता आपली वैचारिक प्रस्तुतताच हरवून बसली आहेत. एकूण एककल्ली वातावरणात माध्यमंही एककल्ली बनली आहेत. आज माध्यमांचा अवाका आणि पसारा वाढला आहे. लोकांच्या संपूर्ण जगण्याला माध्यमांनी वेढले आहे. मोबाईलमधून रात्री झोपतानाही सगळी माध्यमं लोकांच्या उशाशी असताना माध्यमांना आपल्या वैचारिक भूमिकेचे विस्मरण होणे आणि धर्म,जात,वर्ग,लिंग, भाषा यांच्याबरोबरीने माध्यमांनीही एक विभाजक बनणे, ही बाब अतिशय घातक आहे. शोषितपिडितांच्या, शूद्र-अतिशूद्रांच्या दुःखाविरोधात व्यक्त होणारे बाबासाहेबांचे ‘मूकनायक’ हे एक टोक मानले तर आजची माध्यमे ही पार दुसऱ्या टोकाला उभी आहेत आणि हे कडेलोटाचे टोक आहे. संख्येच्या द्दष्टीने पाहता माध्यमांची व्याप्ती वाढत आहे. एका परीने माध्यमांचे लोकशाहीकरण होत आहे. समाजमाध्यमांवर आज वेगवगेळ्या पोर्टलच्या, मीम्सच्या माध्यमातून सर्वसामान्यही व्यक्त होऊ शकतात. पण त्याचवेळी आशयाच्या द्दष्टीने पाहता त्यातला कट्टरतावाद वाढत चालला आहे. माध्यमं झुंडशाहीची वाहक बनत आहेत.

एकूणच माध्यम-संसकृतीविषयी बोलताना आपल्याला ग्रामश्ची या नवमार्क्सवादी विचारवंताची मांडणी लक्षात घ्यायला हवी. अभिजन विचारसरणीच्या प्रभुत्वाची संकल्पना मांडताना माध्यमं याकामी महत्त्वाची भूमिका पार पाडतात, याकडे ग्रामश्ची लक्ष वेधतो. समाजातले अभिजन विचारसरणीचे प्रभुत्व (हेगिमनी) केवळ बळजबरीने किंवा हिंसेच्या माध्यमातून (कोअर्सिव्ह ॲपॅरॅटस्) प्रस्थापित होत नाही, तर सामाजिक चलनवलनातल्या प्रभावी हस्तक्षेपाने, काही वाटाघाटींमधून हे प्रभुत्व कायम राखले जाते. आधुनिक काळात ही हस्तक्षेपाची, निगोशिएशन्सची प्रक्रिया माध्यमं पार पाडतात, असे ग्रामश्ची यांचे प्रतिपादन आहे. भारतासारख्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या नीतीमूल्यांवर आधारित जातवर्णवर्गवर्चस्ववादी समाजव्यवस्थेत हे वर्चस्व कायम राखण्याचं काम पर्यायी माध्यमं सोडता मुख्य प्रवाहातील भांडवली माध्यमं कायम करत आलेली आहेत. मात्र आज या प्रक्रियेने अधिक वेग घेतला आहे. माध्यमांचा हस्तक्षेप अधिक चिथावणीखोर झाला आहे.

अलिकडच्या काळात हरर्मन आणि नोआम चोम्स्की या पाश्चात्त्य अभ्यासकांनी ‘मॅन्युफॅक्चरिंग कन्सेन्ट’ म्हणजेच सहमतीचं उत्पादन ही संकल्पना माध्यमांच्या संदर्भात वापरली आहे. त्यांनी ही संकल्पना प्रामुख्याने राजसत्ता आणि भांडवलशाहीच्या संदर्भात वापरली आहे. लोकशाही व्यवस्थेत सहमतीचं उत्पादन ही आता एक नवी कला झाली आहे. नव्वदीच्या दशकानंतर खासगीकरण, जागतिकीकरण, बाजारकेंद्री भांडवलशाही यांचं पर्व सुरु झाल्यावर समाजात कन्झ्युमरिझम – चंगळवाद रुजविण्यासाठी भांडवलशाहीने माध्यमांना हाताशी धरले. तीव्र होत जाणाऱ्या विषमतेच्या पायावरच चंगळतावादाचे चकाकते इमले उभे असतात. चंगळतावादाचे इमले चढवत न्यायचे तर उपभोक्तावादी संस्कृती समाजात रुजवायला हवी. तिला पोषक ठरतील, असे आचारविचार समाजात रुजवायला हवे. लोकांची सहमती निर्माण करायला हवी. मग वर्तमानपत्रेच सौंदर्यस्पर्धा आयोजित करु लागली, नवरात्रीत साड्यांचे नवरंग उधळू लागली. खासगी महागडं शिक्षण हे एक उत्पादन आहे. ते विकण्यासाठी माध्यमांमध्ये करियर गायडन्सवर सदरं सुरु झाली. तज्ञांचे मार्गदर्शन सुरु झाले. स्त्रिया या चंगळवादी संस्कृतीच्या मुख्य ग्राहक आहेत. साहाजिकच स्त्रियांसाठी वेगळ्या पुरवण्या सुरु झाल्या. माध्यमांमध्ये स्त्रियांची एक वेगळी उपसंस्कृती निर्माण करण्यात आली. छापील माध्यमापासून ते इलेक्ट्रॉनिक (electronic) माध्यमांपर्यंतची विविध माध्यमं स्वतःला आधुनिक, उदारमतवादी म्हणवत असली तरी प्रत्यक्षात त्यांची धर्मसंस्था, राजसत्ता आणि अर्थव्यवस्था या त्रयीशी हातमिळवणी असते. धर्मसंस्था, राज्यसंस्था आणि भांडवली अर्थव्यवस्था हे तिन्ही घटक पुरुषप्रधान असल्याने या तीन घटकांच्या आधारे कार्यरत असणारी माध्यमेही पुरुषप्रधानतेच्या साच्यातच स्वतः घडतात आणि पुन्हा पुरुषप्रधानतेचा साचा नव्याने घडवतात. यातूनच कधी जाणीवपूर्वक तर कधी त्यांच्याही नकळत माध्यमं सार्वजनिक पितृसत्तेची भूमिका पार पाडतात. साचेबद्ध स्त्रीप्रतिमांची निर्मिती केली जाते. चौकटीतल्या स्त्रिया आदर्श ठरतात, तर चौकटीबाहेर पाऊल टाकणाऱ्या स्त्रिया स्वैराचारी ठरतात. आज माध्यमांमध्ये ज्या पद्धतीने स्त्रियांचे चित्रण येत आहे तसेच माध्यमांच्या प्रभावाखाली असणाऱ्या मध्यमवर्गीय-उच्चजातीय स्त्रिया ज्याप्रमाणे धर्मांधतेचे, कट्टरतावादाचे समर्थन करत आहेत, त्यामागे हीच रचना कारणीभूत आहे.

नव्वदीनंतर बाजारकेंद्री भांडवलशाहीचे हितसंबंध जपत माध्यमांनी सहमतीचे भरघोस पिक काढले. २०१४ नंतर यात थोडा बदल झाला. सत्ताधारी असलेल्या धर्मांध कट्टरतेशी माध्यमांची मालकी असलेल्या भांडवलदारांनी हातमिळवणी केली, तसेच सत्तेच्या मर्जीतल्या भांडवलदारांनी माध्यमांची खरेदी केली. सत्तेच्या मर्जीतली माणसं संपादकपदावर बसविण्यात आली. यानंतर आता माध्यमांनी मोठ्या प्रमाणात धर्मांधतेच्या सहमतीचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे. सर्वसामान्य वाचक, प्रेक्षक धर्मांधतेच्या विविध पैलूंशी सहमती दाखवू लागला आहे. लव्ह जिहाद ते काश्मीर फाईल्स असा हा व्यापक विस्तार आहे.

जागतिक इतिहास हा वर्ग संघर्षांचा इतिहास आहे आणि त्यात उत्पादन साधनांची मालकी महत्त्वाची भूमिका पार पाडते, असे कार्ल मार्क्स यांनी सांगितलेले आहे. माध्यमंही सहमतीचे उत्पादन काढत असल्याने तीही उत्पादन साधनं बनली आहेत. आणि ही अशी उत्पादन साधनं जेव्हा सत्ताधारी कट्टरतेशी, धर्मांधतेशी हातमिळवणी केलेल्या भांडवलदारांच्या ताब्यात असतात, तेव्हा माध्यमं ही प्रबोधनाचे किंवा मनोरंजनाचे केंद्र न राहता त्यांच्या मालकांच्या हातातले शस्त्र बनतात. आज सत्तेच्या विरोधात बोलणाऱ्यांवर, अल्पसंख्यांक समुदायांवर हे शस्त्र रोखलेले आहे.

स्मृतींचे खच्चीकरण, मिथ्या स्मृती आणि तर्कविसंगत मिथ्यासमर्थन –

२०१४ ला २००२ ची पार्श्वभूमी आहे, २००२ ला १९९२ ची पार्श्वभूमी आहे तर १९९२ ला १९२५ ची पार्श्वभूमी आहे. आणि १९२५ ला पार ऋग्वेदकाळातल्या पुरुषसुक्ताची पार्श्वभूमी आहे. पण सध्या असा सलग विचार करणं एकूणच कठीण झालं आहे. कारण वर्तमान अतिशय वेगाने वाकडातिकडा, उभाआडवा फिरतोय. सभोवतालचा कोलाहल इतका वाढला आहे की एक सलग संगती लावणं अशक्य बनत आहे. एकामागोमाग एक घटना घडत आहेत. प्रत्येक घटना अधिकाधिक विखार घेऊन समोर येतेय. समाजिक आणि राजकीय वातावरण असे आहे की, बुद्धीचा, विवेकाचा, समतावादी विचारांचा खून पडला तरी चालेल पण आमच्या भावना, आमचा वृथा धर्माभिमान, आमचा जातीअहंकार दुखावता कामा नये. तो दुखावला तर सनातनी, कर्मठ विचाराचे विविध गट आक्रमणाला तयार आहेत. मानवी मुल्यांची पाठराखण करणारे, राज्यघटनेच्या चौकटीतले तुमचे एखादे विधान कधीही, केव्हाही धर्मविरोधी, राष्ट्रविरोधी बनते आणि तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात ढकलले जाता.या अशा वेळी राज्यसंस्था नामक यंत्रणा अद्दश्य असते.

समाजातील कट्टर धार्मिकता, सनातनी विचारांचा प्रभाव यामुळे स्त्रिया, अल्पसंख्यांक समुदाय आणि इतर शोषित जन यांच्यावरचे अत्याचार वाढत आहेत. स्त्रियांचा पेहराव, त्यांचं वागणं-बोलणं, त्यांचा प्रेमात पडण्याचा, जोडीदार निवडीचा अधिकार या साऱ्यावर बंधनं येताहेत. मांसाहार करायचा की नाही, करायचा असेल तर कुठे करायचा, केव्हा करायचा याचे निकष ठरवले जात आहेत. या विरोधात वागणाऱ्यांची डोकी फोडली जात आहेत. गोमांस बाळगल्याच्या संशयावरुन एखाद्याला झुंडीने संपवले जात आहे, लिंचिंग केले जात आहे. रहिवाशी संकुलांमध्ये अल्पसंख्यांकांना आणि मांसाहार करणाऱ्यांना जागा नाही, हे अर्थसत्तेच्या बळावर न बोलता सांगितले जात आहे. समाजाचे घेट्टायझेशन (Ghettoization) केले जात आहे. धर्मांतर करण्याचा राज्यघटनेने दिलेला अधिकार नाकारुन धर्मांतरबंदीच्या कायद्याची मागणी केली जात आहे, काही राज्यांमध्ये तो केलाही जात आहे. आंतरधर्मिय लग्नांना ‘लव जिहाद’ ठरवले जात  आहे. नागरिकत्त्वाच्या अधिकारांचा संकोच करुन देशांतर्गत वसाहतवाद लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांवरचा सर्व्हेलन्स, टेहळणी वाढली आहे. अगदी सहजतेने कोणावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतोय किंवा त्याला-तिला देशद्रोही असे संबोधले जात आहे. अतिशय असभ्य भाषेत महिलांना, तरुणींना ट्रोल केले जात आहे. बलात्काराच्या धमक्या दिल्या जात आहेत. सुल्ली अॅप्सवरुन अल्पसंख्यांक महिलांची आभासी विक्री केली जात आहे. कोविडच्या काळातही सगळे नियम बाजूला सारुन कुंभमेळा पार पाडला जातो पण त्याचवेळी भोंगा विरुद्ध हनुमान चालिसा असं द्वैत निर्माण करुन धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा नवा प्रयोग केला जात आहे.

एक घटना घडते, आपण त्यावर काही विचार करु लागतो, त्याचा अन्वयार्थ लावू पाहतो तोवर दुसरी घटना घडते, तिच्यातून सावरेपर्यंत तिसरी. उत्तर आधुनिक काळात एकूणच जगण्याला वेग आलेला आहे. सामान्य माणूस त्या वेगाशी आपल्या जगण्याची गती जुळवत असतानाच कट्टरतावाद्यांकडून एकामागोमाग एक अशा दुहीची पेरणी करणाऱ्या घटना घडवून आणल्या जात आहेत. ‘नकाब का शिक्षण’ हा वाद संपत नाही तोच ‘रामनवमी आणि मांसाहार’ हा वाद पुढे आणला जातो, तो संपायच्या आधीच ‘भोंगे का हनुमानचालिसा’ हा प्रश्न उच्चरवात विचारला जातो. एक घटना मनात रुजायच्या आधीच दुसरी घडतेय. तुमच्या स्मृतीत कुठचीच गोष्ट टिकू दिली जात नाहीए. अखलाखच्या झुंडबळीची घटना कधीतरी खूप मागे घडल्यासारखी वाटते. मुजफ्फरनगरची दंगल स्मृतीपटलावर अंधूक झाली आहे किंवा काहींच्या बाबतीत ती पुसली गेली आहे. ग्रॅहम स्टेन्सला त्याच्या दोन मुलांसह जिवंत जाळणारा दारासिंग तर आज कोणाच्या लक्षातही नाही. हे एक प्रकारे स्मृतींचं खच्चीकरण आहे. सलग अशी कोणतीच स्मृती उऱणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. विलक्षण अशी मानसिक, भावनिक अस्थिरता निर्माण केली जात आहे. अगदी एका वाक्यात सांगायचे तर प्रतिपक्षाची दमछाक केली जात आहे. मग स्मृती उरल्याच तर त्या तुकड्यातुकड्याने उरतात. सामान्यजनांना त्यांची एकत्र संगती लावणे अशक्य होते. स्मृती आठवल्याच तर त्या निर्जीव चित्रासारख्या आठवतात. त्यातला जिवंतपणा, त्यातले रागलोभ, क्रियाप्रतिक्रिया संपलेल्या असतात. ग्रॅहम स्टेन्स आठवा किंवा अखलाख आठवा, त्यावेळी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी, संबंधित एखादा फोटो नजरेसमोर येईल. बाकी फारसे तरंग मनात उमटणार नाहीत. स्मृती आहेही आणि नाहीही, ही अशी अवस्था म्हणजे स्मृतींचं खच्चीकरण आहे, असे मला वाटते.

खऱ्या स्मृतींच्या खच्चीकरणाबरोबरच खोट्या स्मृती रुजवण्याचं कामही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यातून संपूर्ण समुहाची मिळून एक ‘मिथ्यास्मृती’ तयार केली जाते. त्यासाठी भाषेचाही अचूक वापर केला जातो,  भाषिक राजकारण खेळले जाते. उदा. आर्यांचे आगमन आणि मुस्लिमांचे आक्रमण. आगमन आणि आक्रमण या दोन शब्दांमधून जे सूचित होते ते असे की, आर्यांचे जे काही स्थलांतर झाले, ते निशःस्त्र, अगदी शांततामय मिरवणूक काढून झाले आणि मुस्लिम आले ते तलवारी परजत आले. यातून तलवारीच्या जोरावर मुस्लिम राजांनी, सरदारांनी धर्मांतरं केली, अशी एक मिथ्या स्मृती तयार केली जाते. मुळात भारतात इस्लाम आला दक्षिण भारतात, तो अरब व्यापाऱ्यांच्या माध्यमातून आणि नंतर सूफी संतांच्या माध्यमातून. मुस्लिम राजवटीत काही ठिकाणी जबरदस्तीने धर्मांतरं झाली असतील. पण खरंच सरसकट तलवारीच्या जोरावर धर्मांतरं झाली असती तर स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशातल्या हिंदूंची संख्या पन्नास टक्क्यांहून कमी असायला हवी होती. कारण जवळपास ७०० वर्ष भारतावर तुर्कांची, मोगल राजांची राजवट होती. पण स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळेला हिंदू ८५ टक्के होते. यासंदर्भातील दुसरी एक मिथ्यास्मृती म्हणजे मुस्लिम आक्रमकांमुळे हिंदूंमध्ये मुलींच्या बालविवाहाची प्रथा रुढ झाली. मुळात इस्लामची स्थापनाच झाली ती सातव्या शतकात झाली आणि बालविवाहाचं समर्थन करणारे स्मृतिग्रंथ पहिल्या दुसऱ्या शतकातले आहेत. पण रेटून सातत्याने खोटं बोलत रहा आणि समूहमनात मिथ्यास्मृती निर्माण करा, हा उजव्या धर्मवादी विचारसरणीचा व्यूह आहे. आजही या दोन्ही गोष्टी त्यांच्या प्रचारकांकडून समूहमनात सातत्याने पेरल्या जात असतात.

स्मृतींचं खच्चीकरण, मिथ्यास्मृतींची पेरणी या प्रक्रियेत काही गैरसोयीच्या बाबी विस्मृतीत लोटल्या जातात. उदा. बौद्ध कालखंड. विविध प्रकारच्या शास्त्रांमधले, वैद्यकीय क्षेत्रातले नवीन शोध, विद्यापीठं, ज्ञानाच्या क्षेत्रातले त्या काळचे जागतिकीकरण हे सगळे बौद्ध कालखंडात घडले. हा खरा सुवर्णकाळ होता. पण त्याला सुवर्णकाळ न म्हणता वैदिक काळाला सुवर्णकाळ म्हटले जाते. म्हणजे एकीकडे मिथ्यास्मृती निर्माण करायची आणि दुसरीकडे बौद्ध कालखंडाच्या वैशिष्ट्यांना विस्मृतीत लोटायचे. आज इतिहासाचे फारसे वाचन नसलेल्या लोकांनाही गार्गी, मैत्रेयी ही नावे ऐकून माहीत असतात. कारण वेदकाळात या विदुषी होऊन गेल्या असे सतत वेगवेगळ्या माध्यमातून सांगितले जाते. गार्गी, मैत्रेयीबद्दल वैदिक विचारांच्या अभ्यासकांना जरुर आदर असावा. मात्र त्याचवेळी ही अभ्यासक मंडळी संघमित्रा हे नाव का उच्चारत नाहीत, हा प्रश्न उपस्थित करायला हवा. ज्या स्त्रीने दोन हजार वर्षांपूर्वी आपल्या भूभागाच्या सीमा ओलांडून धम्मप्रसाराचे काम केले म्हणजेच त्यातील नीतीमूल्ये, तत्त्वज्ञान प्रसारित करण्याचे, त्यासंबंधी विचारविमर्श करण्याचे काम केले, तिचे नाव प्राचीन काळातील विदुषींची नावे घेताना घेतले जात नाही. ते विस्मृतीत लोटण्याचे प्रयत्न केले जातात. इथे जो काही इतिहास आहे तो वैदिक संस्कृतीचा आहे, हे वेगवेगळ्या मार्गाने प्रस्थापित करत राहाणे, हे इथल्या वैदिक संस्कृतीचे सांस्कृतिक राजकारण आहे.

तर्कविसंगत मिथ्यासमर्थन हे या सांस्कृतिक राजकारणाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. तर्कविसंगत मिथ्यासमर्थन या संकल्पनेबाबत एरिक फ्रॉम या अभ्यासकाने ‘फिअर ऑफ फ्रिडम’ या आपल्या ग्रंथात मांडणी केली आहे. मिथ्यासमर्थानांमध्ये सत्याचा अभाव असतो, फक्त अस्तित्त्वात असलेल्या भावनिक पूर्वग्रहांना द्दढ करण्याचे काम ती करत असतात. मिथ्यासमर्थनाच्या प्रक्रियेला सत्य शोधायचे नसते, तर अस्तित्त्वात असलेल्या वस्तुस्थितीबरोबर आपल्या स्वतःच्या इच्छांचा मेळ घालायचा असतो. आपली मतं वस्तुस्थितीवर लादायची असतात. दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी हे छत्रपतींचे गुरु होते, हे असेच एक मिथ्यासमर्थन आहे. शुद्ध आर्यवंश हे नाझीवादाचे असेच एक मिथ्यासमर्थन होते. मिथ्यासमर्थनाची पुढची पायरी तर्कविसंगत मिथ्यासमर्थनाची असते. एरिक फ्रॉम ने दिलेले तर्कविसंगत मिथ्यासमर्थनाचे पुढील उदाहरण आजच्या काळात जे काही चालले आहे ते अधोरेखित करते. एरिक सांगतात, एका माणसाने आपल्या शेजाऱ्याकडून एक काचेचा प्याला विकत आणला. तो त्याच्या हातून फुटला. शेजाऱ्याने पेला परत मागितल्यावर त्याने उत्तर दिले, पहिली गोष्ट म्हणजे मी तो पेला तुम्हाला या अगोदरच परत दिलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी तो पेला तुमच्याकडून आणलेलाच नव्हता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मला ज्या वेळेला तो प्याला दिला त्या वेळेला तो फुटलेलाच होता. गेल्या काही वर्षात ही अशी चित्रविचित्र विधानं आपण सातत्याने ऐकत आहोत. ज्याकाळात विजेचाही शोध लागलेला नव्हता, त्या काळात आमच्याकडे प्राचीन काळात प्लास्टिक सर्जरी होत होती, विमाने उडत होती, असे सांगितले जाते. पराकोटीची महागाई असताना, देशातील असहिष्णुता वाढलेली असताना अच्छे दिन आलेले आहेत, असे ठामपणे सांगितले जाते. चिकित्सक विचारशक्तीचे दमन करणे हा सांस्कृतिक राजकारणातला मुख्य अजेंडा असतो.

जन म्हणजे कोण?

तर्कविसंगत मिथ्यासमर्थनाने भारलेल्या वातावरणात हे जनवादी साहित्य आणि संस्कृती संमेलन होत आहे. त्याला विषमतावादाविरोधात, जातवर्णवर्चस्ववादाविरोधात एल्गार पुकारत जन्माला आलेल्या दलित पॅंथर या लढाऊ संघटनेच्या सुवर्णमहोत्सवाचे निमित्त आहे. आपण इथे ‘जनवादी’ म्हणतोय, म्हणूनच यातले ‘जन’ कोण, त्यांची व्याख्या काय, हे  स्पष्ट होणे आवश्यक आहे. कारण जन म्हटले म्हणजे त्यात सर्वजनही येतात, अभिजनही येतात आणि बहुजनही येतात. बहुजनांमध्ये अभिजनांचे अनुकरण करुन सांस्कृतिकिरणाच्या प्रक्रियेत सामावले जाणारे बहुजनही असतात आणि अभिजनांच्या प्रभुत्वाला आक्षेप घेणारे बहुजनही असतात. जे अभिजन नाहीत ते बहुजन, ही बहुजन शब्दाची व्याख्या असली तरी नुसता बहुजन शब्दही जन शब्दाइतकाच अस्पष्ट राहातो. म्हणूनच इथे १९७२ मध्ये दलित पॅंथरने प्रसिद्ध केलेला जाहिरनामा मार्गदर्शक ठरतो.

दलित कोण, याची व्याख्या करताना या जाहिरनाम्यामध्ये अनुसुचित जाती-जमाती, नवबौद्ध, कामगार, भूमिहिन आणि शेतमजूर, स्त्रिया तसेच राजकीय, आर्थिकद्दष्ट्या शोषित असलेले आणि धर्माच्या नावाने ज्यांचे शोषण केले जाते, असे सर्व समूह म्हणजे दलित, असे सांगितले आहे. इथे दलितत्वाची व्याख्या अतिशय व्यापक करत सर्व शोषित जनसमूहांना त्यात सामावून घेण्यात आले आहे. तसंच राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि धर्मव्यवस्था यांचा उल्लेख करत शोषणव्यवस्था नेमक्या कोणत्या तेही सांगितले आहे. शोषण करणाऱ्या व्यवस्था कोण आणि ज्यांचे शोषण होत आहे ते कोण, हे स्पष्ट करणारी ही १९७२ मधली एक क्रांतिकारी व्याख्याच होती. स्वातंत्र्योत्तर काळात गावगाड्यातील अनुसुचित जातीजमातींवरचे, नवबौद्धांवरचे अत्याचार वाढले होते. याच काळात वेगवेगळ्या दलित लेखकांची आत्मचरित्र, कविता प्रसिद्ध होत होत्या. त्यातल्या अन्यायअत्याचारांच्या विविध कथनांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही दलित सूमहांची दुःस्थिती कायम असल्याचे चित्र पुढे येऊन प्रतिकाराची भावना वाढीस लागली. ब्लॅक पॅंथर्सचा आदर्श समोर ठेऊन तशाच लढाऊ संघटनेची गरज नव्या तरुण पिढीला वाटू लागली आणि नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज.वि.पवार, अर्जुन डांगळे इत्यादी कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने दलित पॅंथर्स ही संघटना आकाराला आली. या संघटनेने त्या काळात जो विद्रोह पुकारलेला होता, आज त्या तशाच विद्रोहाची गरज आहे.

अलिकडेच नागराज मंजुळे यांनी विद्रोह म्हणजे प्रेम, अशी विद्रोहाची व्याख्या केली होती. एका अर्थी नागराज मंजुळे म्हणतात ते बरोबर आहे. जेव्हा ‘विद्रोह’ म्हटले जाते किंवा शहीद भगतसिंगांनी दिलेल्या नाऱ्याप्रमाणे ‘इन्किलाब जिन्दाबाद’ म्हटले जाते तेव्हा त्याच्या मुळाशी मानव्याचे प्रेमच असते. शोषणाविरोधातली लढाई, गुलामगिरीविरोधातली लढाई मानव्याविषयी, मानवी जगातील नीतिमूल्यांविषय़ी अंतःकरणात प्रेम असल्याशिवाय, करुणा असल्याशिवाय उभी राहात नाही. गुलामगिरीविरोधातल्या लढ्यासाठी अंतःकरण प्रेममय असण्याचीच गरज असते, ते हिंसावादी लोकांचं काम नाही. हिंसावादी लोक जनांमध्ये उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य, सोवळं-ओवळं, पवित्र-अपवित्र असे भेद निर्माण करुन उतरंडीचा एक सापळा तयार करतात. या उतरंडीच्या सापळ्यातून ते केवळ शारीरिकच नाही तर मानसिक, भावनिक, शाब्दिक अशी सगळ्या पातळ्यांवरची हिंसा जन्माला घालतात. या हिंसेविरोधातला उच्चार म्हणजे विद्रोह, समाजपरिवर्तन करु पाहणारी क्रांती म्हणजेच मानव्याविषयीचं प्रेम, बुद्धांची करुणा आणि भेदाभेद अमंगळ म्हणणाऱ्या तुकोबांचा वारसा. मात्र मानवी गुलामगिरीविरोधात, भेदाभेदाविरोधात एक शब्दही न उच्चारता जर केवळ प्रेम हा शब्द उच्चारला जात असेल तर तो केवळ एक पोकळ शब्द ठरेल. प्रेम या भावनेचे ते कलेवर असेल. दलित पॅंथर्सच्या ह्रदयात मानव्याविषयीचे प्रेम होते म्हणूनच त्यांनी ‘दलित’ या शब्दाच्या व्याख्येत सर्व शोषितांना सामावून घेतले, धर्म-अर्थ-राज्य या शोषणव्यवस्थांनाही अधोरेखित केले. या व्याख्येच्या आधारेच जर समाजपरिवर्तनाच्या लढ्याची पुढची वाटचाल झाली असती तर कदाचित आज देशासमोर जो धार्मिक राष्ट्रवाद, जातीय कट्टरतावाद उभा आहे तो उभा राहिला नसता.

दलित पॅंथर्सच्या ‘दलित’ या शब्दाच्या व्याख्येला प्रमाण मानले असता ‘जन’ शब्दाची व्याख्या ‘सर्व शोषित जनसमूह’ अशी होते. मात्र आजच्या संदर्भात त्यातही अधिक स्पष्टता असायला हवी, असे वाटते. कारण आज शोषित जनसमुहातलेच अनेकजण जातवर्णवर्गवर्चस्ववादी अशा उजव्या राजकारणात, सांस्कृतिक दहशतवादाच्या कट्टरतावादी विचारधारेत सामावलेले दिसतात. त्यामुळेच वर्तमानात कधी नव्हे एवढी शोषक आणि शोषित यांचं स्वरुप स्पष्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे.

इथल्या प्रस्थापित वैदिक, ब्राह्मणी वर्चस्वावर आधारित जातवर्णवर्चस्ववादी व्यवस्थेने ज्ञानाची, पौरोहित्याची, प्रमाण भाषेची मक्तेदारी निर्माण केली. त्या मक्तेदारीच्या आधारे शोषण व्यवस्थांचा व्यूह रचण्यात आला आणि आता स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदाच सर्वंकष सत्ता हाती आल्यावर कट्टरतावादाचा, फॅसिझमचा एक भीषण चेहरा समोर आणला आहे, त्याविरोधात हे जनांचे साहित्य आणि संस्कृती संमेलन आहे. त्यामुळेच इथे जनांची व्याख्या फॅसिझमला, कट्टरतावादाला विरोध करणारे जन अशी होते. पण इथे पुन्हा कोणत्या फॅसिझमला हे जन विरोध करत आहेत, भारतीय संदर्भात या फॅसिझमचे स्वरुप काय, हा प्रश्न उपस्थित होतो. या प्रश्नाच्या उत्तरातूनच आजच्या या सांस्कृतिक संघर्षात कोणते जन कुठे उभे आहेत, हे स्पष्ट होईल. आजचा भारतातला फॅसिझम हा सांस्कृतिक-धार्मिक राष्ट्रवादाच्या रुपात उभा आहे हे खरे. पण सांस्कृतिक-धार्मिक राष्ट्रवाद हीसुद्धा अकादमिक क्षेत्रातील व्यापक संज्ञा झाली. म्हणजे श्रीलंकेतील सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि भारतातील सांस्कृतिक राष्ट्रवाद यात फरक आहे. प्रत्येक देशातल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाची मूळं ही तिथल्या सांस्कृतिक राजकारणात रुजलेली असतात. म्हणूनच या सांस्कृतिक राजकारणातला कोणता गट शोषक आहे आणि कोणता गट शोषित आहे, हे थेट सांगितल्याशिवाय आजच्या सांस्कृतिक संघर्षाला स्पष्टता येत नाही. जर्मनीतला नाझीवाद हा ज्युंविरोधी असला तरी तो मुळात नार्डिक वंशाच्या, आर्य वंशाच्या श्रेष्ठत्वाच्या भावनेवर आधारित होता. नाझीवाद म्हणताना त्यामागच्या या वर्णश्रेष्ठत्वाच्या भावनेचे स्मरण ठेवणे आवश्यक असते.

ब्राह्मणी प्रभुत्वावर आधारित वैदिक धर्माचे सांस्कृतिक वर्चस्व हे इथल्या सांस्कृतिक राजकारणाचे स्वरुप आहे.

वैदिकांचा हा सांस्कृतिक वर्चस्ववाद ‘अदरिंग’च्या प्रक्रियेतून, विशिष्ट समूहांना इतर ठरवण्याच्या प्रक्रियेतून जन्माला आला आहे. आपण आणि ते, आपण आणि इतर अशी ही विभागणी आहे. या विभागणीवरच हा वैदिक सांस्कृतिक वर्चस्ववाद उभा आहे. वैदिकांचं हे अदरिंगचं तत्त्वज्ञान पुरुषसुक्ताच्या माध्यमातून व्यक्त होते. हे पुरुषसुक्त जसं ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात आहे तसंच ते यजुर्वेदात आणि इतर वैदिक संहितांमध्येही आहे. यावरुन वैदिक विचारविश्वातील त्याचे महत्त्वाचे स्थान स्पष्ट होते. षोडशोपचार पूजा करताना पुरुषसुक्तातील एकेक ऋचा म्हणून एकेक उपचार अर्पण करण्याची पद्धत रुढ आहे. म्हणजे आजही हे पुरुषसुक्त व्यवहारात प्रचलित आहे. वैदिक धर्मातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा उगम या पुरुषसुक्तात आहे.

पुरुषसुक्तामध्ये विश्वनिर्मिती कशी झाली हे सांगताना मानवी समाजाची चार वर्णांमध्ये विभागणी केली आहे. विराट पुरुषाच्या मुखातून ब्राह्मण, बाहुंमधून क्षत्रिय, मांड्यांमधून वैश्य आणि पायांमधून शूद्र जन्माला आले, असे या सूक्तात सांगण्यात आले आहे. इथे मुखातून जन्माला आलेले ब्राह्मण श्रेष्ठ असे सगळ्या स्मृतिग्रंथांनी सांगितले आहे. शूद्रांनी पहिल्या तिन्ही वर्णांची सेवा चाकरी करायची असेही स्मृतिग्रंथांमध्ये सांगितले आहे. म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद या श्रुतिग्रंथांनी मानवी समुदायाची शरीरातील अवयवांच्या आधारे विभागणी केली आणि स्मृतिग्रंथांनी त्यातील उतरंड ठरवत विषमतावादी समाजरचनेची मांडणी केली. या मांडणीत प्रत्येक वर्णासाठी दुसरा वर्ण हा स्व पेक्षा वेगळा असा ‘अन्य’ आहे, इतरेजन आहे, स्वतःहून कमी दर्जाचा किंवा उच्च दर्जाचा आहे. म्हणजे ‘अदरिंग’ची प्रक्रिया, विशिष्ट जनसमूहांना ‘इतर’ ठरवण्याची प्रक्रिया हे वैदिक चातुर्वर्ण्याचं वैशिष्ट्य असून ते पुरुषसुक्ताच्या माध्यमातून उच्चारित झाले आहे.

वेदकाळातील या अदरिंगच्या प्रक्रियेने आधी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी समाजाची चार वर्णात विभागणी केली. नंतरच्या काळात कलियुगात ब्राह्मणांखेरीज सगळे शूद्र असे सांगत ही अदरिंगची प्रक्रिया अधिक काटेकोर केली. आजही ही ‘अदरिंग’ची प्रक्रिया, इतर समूहांना ‘अन्य’ ठरवून, आपल्यापेक्षा हीन ठरवून त्यांच्यावर वर्चस्व गाजविण्याची प्रक्रिया सुरुच आहे. आजच्या सांस्कृतिक वर्चस्ववादाची मूळं या पुरुषसुक्तात आहेत.

म्हणूनच ‘जन’ ची व्याख्या करताना वैदिक वाङ्मयाने पुरुषसुक्ताच्या माध्यमातून ज्यांना ‘अन्य’ ठरवून हीन लेखले असे सर्व शूद्रजन आणि जे या वर्चस्ववादी विचारधारेला विरोध करतात, जे अब्राह्मणी-अवैदिक विचारधारा मानतात ते सर्व असे म्हणावे लागते. ‘जन’ ही संज्ञा व्याख्यांकित करण्याची तातडी यासाठी आहे की त्याशिवाय सांस्कृतिक संघर्ष काय स्वरुपाचा आहे, याची स्पष्टता येत नाही.

विश्वोत्पत्तीची कथा सगळ्याच प्राचीन संस्कृतींमध्ये देण्यात आली आहे. पण कुठेच अशी जन्मजात विषमतेची मांडणी करणारी रचना आपल्याला आढळत नाही. भारतातील आदिवासी जनसमुहांमध्ये विश्वोत्पत्तीच्या अनेक कथा आहेत. त्यातील कोरकू आदिवासींच्या मौखिक वाङ्मयातील कथा अतिशय विलक्षण आहे.

जेव्हा पृथ्वीवर कोणीच नव्हते, त्यावेळेस हुडिया-ओढा या अक्षय्यवटाच्या पारावर देवतांची सभा भरली आणि त्याठिकाणी मनुष्यप्राण्याची निर्मिती करण्याचे सर्वानुमते ठरले. त्यासाठी लागणारी माती कशी मिळवायची? समुद्रकिनारी राहाणाऱ्या दिमकदेवी जवळची माती आणण्यासाठी म्हणून कागभुशुंडजीची (कागलिया मासा) विशेष दूत म्हणून नेमणूक करण्यात आली. कागभुशुंडजीने माती आणण्याचे कबूल केले आणि प्रयाण केले. उड्डाण करत असताना अनेकदा त्याचे पंख झडले. अनेकदा तो थकला. थांबला पण पुन्हा त्याला पंख फुटले. अनंत अडचणींना तोंड देत मोठ्या प्रयासाने कागभुशुंडजी दीमकदेवीजवळ पोहोचला. त्याने देवीची प्रार्थना करुन देवतांनी मनुष्यप्राणी निर्मितीसाठी मातीची मागणी केल्याचे सांगितले. दीमकदेवीने माती देण्याचे कबूल केले पण एक अट घातली. ती म्हणजे माझ्यापासून नेलेली माती मला परत करायची. परतबोलीची अट मान्य करुन कागभुशुंडजीने देवतांना माती आणून दिली. देवतांनी त्या मातीच्या स्त्री आणि पुरुष अशा प्रतिमा केल्या आणि त्या सुकण्यासाठी म्हणून ठेवल्या, तर त्यांची पऱ्यांनी मोडतोड करुन टाकली. रोजच असे घडायचे. देव कंटाळले. शेवटी त्या प्रतिमांच्या रक्षणासाठी देवांनी कुत्र्यांची नेमणूक केली. तेव्हा त्या प्रतिमा सुकल्या. त्यांच्यात मग देवांनी प्राणांची फुंकर घातली आणि मनुष्यप्राणी निर्माण झाला. कुत्र्याची आणि मानवाची मैत्री तेव्हापासूनची. मात्र दीमकदेवीपासून उधार आणलेली माती परत द्यायची राहून गेली. पण ती परत करणे आवश्यक होते. ती माती आजही मृत्यूनंतर शवाच्या रुपाने आपण परत करतो, असा कोरकूंचा विश्वास आहे.

या कथेनुसार सगळ्याच मानवप्राण्यांची निर्मिती मातीपासून झाली आणि सगळेच समान आहे. स्त्री-पुरुषांच्या निर्मितीमध्येही कोणताच भेद नाही. विशेष म्हणजे कुत्र्याची निर्मिती आधीच झालेली आहे आणि कुत्र्याच्या संरक्षणातूनच मानवाची निर्मिती झाली आहे. त्यातूनच दोघांची मैत्री जमलेली आहे. या कथेतून आदिम साम्यवादाचे दर्शन घडते. जी माती द्यायची राहून गेली ती मृत्यूनंतर शवाच्या रुपाने परत द्यायची, या धारणेतून आदिम समूहाची नैतिकताही अभिव्यक्त होते. एक निरागसता आपल्याला या कथेत जाणवते, त्याचवेळी मानवी शरीर म्हणजे अंतिमतः फक्त माती हे तात्विक भानही आढळते. विषमतामूलक विचारांची कुठचीच बीजं आपल्याला इथे आढळत नाहीत. हे आदिवासी साहित्य कधीच मुख्य प्रवाही वाङ्मयाचा भाग बनलं नाही. कारण इथल्या चातुर्वर्ण्य आधारित व्यवस्थेत आदिवासीही कायम इतर, अन्य होते.

जन म्हणजे नेमके कोण, हे दलित-बहुजनवादी परिप्रेक्ष्यातून ठरवण्याचे आणखी एक कारण म्हणजे इथली वैदिक व्यवस्था जन म्हणजे शूद्र या स्वतःच्या व्याख्येबाबत कायम सजग असते. सध्या भोंग्यावरच्या अजानला प्रत्युत्तर म्हणून हनुमान चालिसा म्हणण्याचे राजकारण सुरु आहे. राज ठाकरे जे बोलताहेत ते सगळे योजनाबद्ध आहे. म्हणूनच अजानला प्रत्युत्तर म्हणून हनुमान चालिसा का? वेदमंत्र का नाही? हा प्रश्न इथे आपण उपस्थित करायला हवा. भोंग्याला प्रत्युत्तर म्हणून रस्त्यावर उतरण्याचे काम शूद्र जातींमधील तरुणच करणार आहेत. इथे उच्चजातीय तरुण रस्त्यावर उतरणार नाहीत. आणि शूद्रांना वेदमंत्र म्हणायचा अधिकार वैदिक संस्कृतीने दिलेला नाही. त्यामुळे इथे शूद्रांनी हनुमानचालिसा म्हणायची आहे. म्हणजे भोंग्यावरुन म्हटल्या जाणाऱ्या अजानला प्रत्युत्तर म्हणून कोणी नेमके काय म्हणायचे याबाबत वैदिक संस्कृती दक्ष आहे.

पुरुषसुक्ताला, वेदप्रामाण्याला विरोध म्हणजे नास्तिक

अलिकडेच कोणाच्या तरी तक्रारीवरुन पुणे इथे होणाऱ्या नास्तिक मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या एका सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करताना ते नास्तिक आहेत, त्यांना कधी मंदिरात जाताना पाहिलं आहे का, असे विधान केले. याचाच अर्थ आता समाजातले नास्तिकही कट्टरतावादाचे लक्ष्य बनत आहेत. कट्टरतावाद अधिक तीव्र होत चालला आहे, याचंच हे लक्षण आहे. पण इथे ईश्वर न मानणाऱ्या नास्तिकांना लक्ष्य करणे एवढाच वैदिकांचा मर्यादित उद्देश नाही. सर्वसामान्यांच्या भाषेत जे देव मानतात ते आस्तिक तर जे देव नाकारतात ते नास्तिक. पण वैदिक विचारविश्वात जे वेदप्रामाण्य मानतात ते आस्तिक आणि जे वेदप्रामाण्य मानत नाहीत ते नास्तिक असतात. वैदिक संस्कृती वेद हे अपौरुषेय मानते, म्हणजेच ते मानवाने निर्माण केलेले नाहीत, ईश्वराकडून आलेले आहेत, असे मानते. त्यामुळे वेदात जे सांगितले आहे त्याला प्रश्न न विचारता ते जसे आहे तसे स्वीकारणे म्हणजे वेदप्रामाण्य मानणे. वैदिक संस्कृतीमध्ये जगाची उत्पत्ती, आत्म्याचं स्वरुप, जन्म-मृत्यू, मोक्ष, कर्म याविषयी काही मांडणी करण्यात आली आहे. यालाच रुढार्थाने वैदिक तत्त्वज्ञान म्हटले जाते. ही मांडणी करणारी तत्त्वज्ञानं, दर्शनं आहेत. यात सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अशी सहा वैदिक दर्शनं आहेत त्यांना आस्तिक दर्शनं मानलं जातं. तर चार्वाक, बौद्ध आणि जैन या अवैदिक दर्शनांना नास्तिक दर्शनं मानलं जातं. चार्वाक, जैन, बौद्ध ही तिन्ही दर्शनं वेदप्रामाण्य मानत नाहीत त्यामुळे ती नास्तिक ठरतात.

सांख्य आणि पूर्वमीमांसा ही दर्शनं ईश्वराचं अस्तित्त्व नाकारतात पण तरी त्यांचा समावेश आस्तिक मानलेल्या वैदिक षड्दर्शनात होतो. हा समावेश वैदिकांना नेमकं काय हवं आहे, हे स्पष्ट करतो. त्यांना ईश्वरापेक्षाही यज्ञयागाच्या रुपात असलेलं ब्राह्मणांचं वर्चस्व महत्त्वाचं वाटतं. त्यामुळेच यज्ञ निर्दोष पद्धतीने केला की त्याचं फळ मिळणार, असं मानणारं पूर्वमीमांसा हे दर्शन आस्तिक होतं. म्हणजे इथे तुम्ही ईश्वर मानता की नाही, हे महत्त्वाचं नाही तर यज्ञसंस्कृती मानता की नाही, वेदप्रामाण्य मानता की नाही, हे महत्त्वाचं आहे. वेदप्रामाण्य न मानणाऱ्यांची वैदिकांकडून व्यवहारात ईश्वर न मानणारे नास्तिक अशी ईश्वराच्या नावाने हेटाळणी केली जाते. सर्वसामान्य लोकांसमोर नास्तिक म्हणजे ईश्वर न मानणारा पापी, दुराचारी मनुष्य अशी प्रतिमा निर्माण केली जाते. वैदिक संस्कृतीत ईश्वराचं अस्तित्त्व नाममात्र आहे. ईश्वराने हे जग निर्माण केले असले तरी जगाच्या चलनवलनाचा कायदा हा कर्मसिद्धान्त आहे. या जन्मी तुम्ही जे कर्म करता त्यावर आधारित तुम्हाला पुढच्या जन्माची सुखदुःखं मिळणार हा या कर्मसिद्धान्ताचा मुळ गाभा आहे. या कर्मसिद्धान्ताला धरुनच पापपुण्य, प्राक्तन या संकल्पना येतात. मानवी जगण्यामध्ये आज या संकल्पनांचा पगडा मोठा आहे. कर्मसिद्धान्ताचं तत्त्वज्ञान जगातील शोषण, विषमता कायम ठेवायला मदत करते. एखाद्यावर गरीब म्हणून, स्त्री म्हणून, दलित म्हणून जे अत्याचार होतात त्यामागे मागच्या जन्मीचं पाप हे कारण आहे, असे एकदा मानले की त्याविरोधात प्रश्न विचारला जात नाही, आहे ती व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न केले जात नाहीत. जनसमुदायाची वृत्ती जैसे थे वादी बनते. शोषकांना, सत्ताधाऱ्यांना हीच जैसे थे वादी वृत्ती हवी असते. भारतात शतकानुशतकं जातव्यवस्था टिकून राहिली, स्त्रीशूद्रांचं शोषण होत राहिलं ते याच कर्मसिद्धान्तातून येणाऱ्या शैथिल्यामुळे.

वैदिकांनी ब्राह्मणांचं, यज्ञयागांचं महत्त्व वाढवून त्यालाच ईश्वरभक्तीचं, श्रद्धेचं आवरण देत आपल्याला कोणीही प्रश्न विचारणार नाही, अशी सोय केली आहे. त्यामुळेच ज्यांनी ज्यांनी कर्मसिद्धान्ताला, यज्ञयागांना आणि श्रद्धा-अंधश्रद्धांना आव्हान देत प्रश्न विचारले, मग ते चार्वाक असतील, तुकाराम असतील किंवा दाभोलकर-पानसरे असतील त्यांची हेटाळणी केली गेली. आज शरद पवारांवरही जो नास्तिक म्हणून आरोप केला जातो आहे तो ते ईश्वर मानतात की नाही यापेक्षा ते यज्ञयाग, कर्मसिद्धान्त हा वैदिक तत्त्वज्ञानाचा गाभा मानत नाहीत, यासाठी केला जात आहे. जो कोणी विवेकवादी असेल, बुद्धिवादी असेल त्याला नास्तिक म्हणून दुर्जनाच्या रुपात उभे केले जात आहे.

दास कोण होते? दासी कोण होत्या?

एखाद्या संस्कृतीचं स्मरणंही राहिलं नाही आणि तिचं अनुसरणंही उरलं नाही की ती संस्कृती नष्ट हेते, असा एक महत्त्वाचा सिद्धान्त इरावती कर्वे आपल्या ‘मराठी लोकांची संस्कृती’ या ग्रंथात मांडतात. यासाठी त्या टॅस्मिनिया आणि ईश्टर येथील संस्कृतींचं उदाहरण देतात. पॅसिफिक महासागरातील ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेस टॅस्मेनिया हे बेट आहे. त्याचा शोध लागल्यावर युरोपिअनांनी तिथल्या लोकांची शिकार करुन त्यांना नष्ट केले. अर्थातच ती संस्कृती शारीरिक व सामाजिकद्दष्ट्या पूर्णपणे खंडित झाली. पॅसिफिक महासागरालगतच्याच ईश्टर बेटावर मात्र वेगळे घडले. तिथली संस्कृती समृद्ध होती. दगडातून घडवलेले पुतळे तिथे होते. त्यावर त्यांची भाषाही लिहिलेली होती. तिथे पोहोचलेल्या युरोपिअनांनी सरसकट सगळ्या लोकांना मारले नाही. मात्र तिथल्या धर्मगुरुंना मारुन तिथल्या लोकांचा धर्म बदलला. आज बेटावर ती लोकं राहाताहेत पण त्यांना त्यांच्या जुन्या प्रथापरंपरांचं स्मरण नाही. बेटावरचे पुतळे कोणी व का बनवले ते कोणालाही सांगता येत नाहीत. कारण ज्यांना जुन्या प्रथा परंपरा माहीत होत्या, ज्यांनी लिपी जतन केली होती त्या धर्मगुरुंनाच मारुन टाकल्यामुळे आज पूर्वीचं स्मरणंही राहिलं नाही आणि त्यामुळे परंपरांचं अनुसरणंही राहिलं नाही.

स्त्रीप्रधान धर्माच्या बाबतीत, मातृसत्तेच्या बाबतीतही नेमकं हेच झालेलं आहे. ख्रिस्तपूर्व काळातील स्त्रीप्रधान धर्म नष्ट करण्यासाठी चर्चने देवतांच्या पुजारणींना विच ठरवून त्यांना ठार मारण्याची मोहीम उघडली होती, हा इतिहास फार जुना नाही. युरोपातील तेरा ते सोळा ही चार शतकं विच हन्टिंगसाठी प्रसिद्ध आहेत. याकाळात युरोपात अनेक मूर्तिपूजक पुजारीण स्त्रियांना, सुईणीचं, औषधोपचाराचं ज्ञान असलेल्या वैद्य स्त्रियांना चेटकिणीचा, डाकिणीचा आरोप ठेऊन ठार मारण्यात आलं. आजही जगभरातल्या आदिवासी समाजांमध्ये ही प्रथा आढळते. मातृसत्तेतल्या पुजारणींनाच नष्ट केलं की तो धर्म संपतो.

भारतीय संदर्भात मातृसत्ता आणि पुरुषसत्ता यांच्यातील संघर्षाचा, स्त्रीदेवता आणि पुरुषदेवता यांच्यातील युद्धाचा काळ म्हणजे ऋग्वेदाच्या घडणीचा काळ. मातृसत्तेची निर्माती असलेल्या निर्ऋतिला ऋग्वेदात सातत्याने अघोर ठरवण्यात आले आहे, तिला मृत्यूची देवता मानण्यात आले आहे. उषा आणि इंद्र यांच्यातील संघर्षाचा स्पष्ट उल्लेख ऋग्वेदात आहे. दस्यू असलेल्या नमुचि राजाकडे स्त्रीसेना होती आणि इंद्र या स्त्रीसेनेविरुद्ध लढला, याचा ऋग्वेदात स्पष्ट उल्लेख आहे. ऋग्वेदात पानोपानी आर्य आणि दस्यू यांच्यातील संघर्षाचे उल्लेख आहेत. आपल्या ‘लोकायत’ या ग्रंथात देवीप्रसाद चट्टोपाध्याय मातृसत्ता आणि पुरुषसत्ता यामध्ये वैदिक काळी झालेल्या या संघर्षाला अधोरेखित करताना सांगतात, प्राचीन भौतिकवादी सर्व निर्मिती स्त्रीमुळे होते, असे मानतात. म्हणून ते धरित्रीला स्त्री मानतात. स्त्रीत्वाला प्राधान्य देत देवत्वाची संकल्पना स्त्रीमध्ये करतात. या प्राचीनांच्या भौतिकवादात शेतीला नुकताच आरंभ केलेल्या मातृसत्ताक समाजाचे मन प्रतिबिंबित झालेले दिसते. वैदिक आर्य हे गोपालन अवस्थेतील भटके जीवन जगणारे पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतिनिधी होते. आर्यांचे प्रमुख देव पुरुष आहेत. याउलट आर्यपूर्व भारतातील प्राचीन कृषी समाजात विकसित झालेल्या स्त्रीप्रधान संस्कृतीत देवीसंप्रदायाचा उगम झाला. स्त्री हे विश्वाचे निर्मितीकेंद्र आहे, अशी या समाजाची धारणा होती. मानवी मनाच्या विकासक्रमात धर्म-ईश्वर-भक्ती या कल्पना बऱ्याच नंतर येतात. प्रारंभीच्या काळात सर्व व्यवहार यातुकल्पनेवरच अधिष्ठित झालेला असतो. संस्कृतीच्या प्रारंभकाळात माणूस आपल्या कामनापूर्तीसाठी ईश्वर अगर तत्सम शक्तींना शरण जात नाही तर आपल्या यातुसामर्थ्यावर त्याची पूर्ण श्रद्धा असते. वैदिक विधींमध्ये पुरुषप्रधान टोळ्यांचं जीवन प्रतिबिंबित झालेले आहे तर विविध व्रतांमध्ये मातृप्रधान कृषिसंस्कृती दिसून येते. व्रतांचं उद्दिष्ट हे कृषिविषयक समृद्धी आहे तर वैदिक आर्यांचं सामगान हे पशुधनाच्या प्राप्तीसाठी आहे. ही मांडणी करत असतानाच पशुपालन अवस्थेतील समाजाचा पुरुषप्रधान चिंतनाशी आणि कृषिप्रधान अवस्थेतील समाजाचा स्त्रीप्रधान चिंतनाशी काही संबंध आहे का, असा प्रश्नही ते उपस्थित करतात.

रॉबर्ट ब्रिफॉ (Robert briffualt), एहरनफेल यासारख्या मानववंशशास्त्रज्ञांनी  स्त्री हेच प्राथमिक मानवाच्या समाजिक संघटनेचे केंद्र होते, हे दाखवून दिले आहे. शेतीचा शोध स्त्रीनेच लावला, यासंदर्भातील मांडणी करण्यात आली आहे. सिंधु नदीच्या खोऱ्यापासून ते नाईल नदीपर्यंत प्राचीन स्त्रीदेवतांचे अवशेष उत्खननात उपलब्ध झाले आहेत. भारतातील शक्ती संप्रदाय आणि मध्य आशियातील देवी संप्रदाय यांच्यात विलक्षण साम्य आहे. आपल्या ‘मदर्स राईट इन इंडिया’ या ग्रंथात एहरनफेल भारतातच मातृसत्ताकाची प्रथम निर्मिती झाली, असे म्हणतो. इथूनच ती संस्कृती मध्य आशिया, इजिप्त या देशांमध्ये गेली, असे त्याचे म्हणणे आहे. भारतातच मातृसत्तेचा उगम झाला, हे एहरनफेलचे म्हणणे विवाद्य असले तरी पुरुषसत्तेच्या अनेक प्रयत्नांनंतरही भारतात मातृसत्तेचे अवशेष शिल्लक राहिल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. भारतीय ग्रामीण जीवनात आजही मातृदेवतांचा, ग्रामदेवतांचा प्रभाव आहे.

अनार्य मातृसत्ताक पद्धती नाहीशी करण्यात आर्य पुरुषसत्तेला यश आले असले तरी त्याचे अवशेष शिल्लक आहेत. इरावती कर्वे यांच्या स्मरण-अनुसरण या मांडणीप्रमाणे भारतीयांच्या भावविश्वात मातृसत्ताकालीन प्रथांचं स्मरण राहिलेलं नसलं तरी त्याचं अनुसरण शिल्लक राहिलेलं आहे.

भारतातील हा दोन संस्कृतींमधला संघर्ष ऋग्वेदकाळी घडून आलेला आहे. तो वरकरणी आर्य आणि अनार्य असा असला तरी मुळात ते मातृसत्ताक अनार्य आणि पुरुषसत्ताक आर्य असा होता, हे आपल्याला देवाप्रसाद चट्टोपाध्याय, दामोदर कोसंबी, शरद् पाटील, आ.ह.साळुंखे यासारख्या प्राच्यविद्येच्या अभ्यासक विद्वानांनी दाखवून दिले आहे. विशेषतः शरद् पाटील यांनी मातृसत्ताक वेदपूर्वकाळ आणि पितृसत्ताक वेदकाळ यातील संघर्षाची मांडणी करत याकाळातील सांस्कृतिक संघर्षाचा इतिहास लिहिला आहे. मातृपूजा अवैदिकांपासून वैदिकांनी स्वीकारली होती, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आपल्या ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ या ग्रंथात सांगतात. अर्थात मातृसत्ता लोप पावल्यावर पुरुषप्रधान समाजात उरणारी मातृपूजा ही केवळ प्रातिनिधिक स्वरुपात शिल्लक राहाते.

वेदपूर्वकाळातील मातृसत्ता ही दस्यूंची होती. मातृसत्तेत गणमाता या गणांच्या अधिपती होत्या. गणांमध्ये जमिनीचं, अन्नधान्याचं समान वाटप करण्याचं काम त्या करत होत्या. आर्यांबरोबरच्या संघर्षात त्या प्रत्यक्ष इंद्राशीही लढायला उभ्या राहिल्या. ऋग्वेदात इंद्र आणि वृत्र यांच्यातील युद्धाचं वर्णन आहे. या युद्धात वृत्र खाली पडतो तेव्हा त्याला वाचवायला त्याची माता दनू पुढे येते, त्याच्यावर ओणवी उभी राहाते. त्यावेळी इंद्र तिच्यावरही वार करतो. दनूसंदर्भात वैदिक आणि पौराणिक साहित्याचे अभ्यासक आ.ह.साळुंखे आपल्या ‘बळीवंश’ या पुस्तकात दनूचे पुत्र ते दानव या वैदिक वाङ्मयातील कथनाची चिकित्सा करत त्यावर टीका करतात. वैदिक कथांनुसार दिती आणि अदिती या कश्यपाच्या पत्नी होत्या आणि त्यांना कश्यपापासून दैत्य आणि आदित्य हे पुत्र झाले. तसेच दनू, विनता आणि कद्रू याही कश्यपाच्या पत्नी होत्या आणि त्यांना कश्यपापासून दानव, गरुड आणि नाग हे पुत्र झाले. अनार्यांना, प्राचीन गणमातांना आर्य समुहात सामील करुन घेताना या अशा पुराणकथा रचण्यात आल्या. या अशा कथांमागचा उद्देश आ.ह.साळुंखे स्पष्ट करतात. ते सांगतात, अशारीतीने वेगवेगळ्या संप्रदायांनी प्रजापती, ब्रह्मदेव, कश्यप, विराट पुरुष इत्यादींना आदिपुरुष मानून विविध जनसमूह ही त्याचीच अपत्ये असल्याची वर्णने केली आहेत. या कथा कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या वातावरणात लिहिल्या गेल्या, त्या लिहिणाऱ्यांचे हितसंबंध आणि हेतू काय होते, ते लोकांना काय संदेश देऊ पाहात होते आणि त्यांना कोणत्या प्रकारची समाजरचना निर्माण करायची होती, हे सगळे नीट तपासून घेणे गरजेचे आहे. मातृसत्तेची प्रतिनिधी असणारी दनू वैदिक वाङ्मयात केवळ देवांशी भांडणाऱ्या दानवांची दुर्लक्षित माता म्हणून शिल्लक राहाते, यामागचे सांस्कृतिक राजकारण नीट लक्षात घ्यायला हवे.

वसाहतकाळात काही ब्रिटिश इतिहासकारांनी ऋग्वेदातील वर्णनांच्या आधारे आर्य आक्रमणाचा सिद्धान्त मांडला. भारतातल्या वैदिक राष्ट्रवादी अभ्यासकांनीही युरोपिअनांशी स्वतःची नाळ जोडत तो स्वीकारला. लोकमान्य टिळकांनी तर ‘आर्क्टिक होम इन द वेदाज्’ या आपल्या ग्रंथात आर्य मुळचे उत्तर ध्रुव या प्रदेशातले असून ते तिथून इथे आले, अशी मांडणी केली आहे. इतरही अनेक अभ्यासकांनी वेगवेगळी मांडणी करत, मोहंजोदरो-हरप्पा येथील उत्खननात सापडलेल्या गोष्टींच्या आधारे आर्यांनी सिंधुभूमीवर आक्रमण केले, हा सिद्धान्त मांडला. सुरुवातीला ज्या सिद्धान्ताचं वैदिक अभ्यासकांनी आनंदाने स्वागत केले तोच सिद्धान्त त्यांच्या नंतरच्या सांस्कृतिक राजकारणाला अडचणीचा वाटू लागला. कारण या सिद्धान्ताच्या आधारे आर्य हे या देशात बाहेरचे, उपरे ठरतात. त्यामुळे आता एकेकाळी आपणच स्वीकारलेल्या या सिद्धान्ताला विरोध करुन आर्य हे इथलेच कसे होते, हे सिद्ध करण्याचा एक उलटा प्रयत्न सध्या सुरु आहे. त्यासाठी इतिहासापासून ते पुरातत्त्वशास्त्रापर्यंत आणि नवीन सुरु असलेल्या उत्खननांपर्यंत सगळ्याच बाबींचा हेतुपूर्वक उपयोग केला जात आहे. रोमिला थापर यांच्यासारखे काही डावे इतिहासकारही आर्य आक्रमण न म्हणता आर्य स्थलांतर असे म्हणत आहेत.

आर्यांचे आगमन झाले असेल किंवा त्यांनी स्थलांतर केले असेल. इथल्या जनांच्या द्दष्टीने ते फारसे महत्त्वाचे नाही. आर्य कोण होते, या प्रश्नापेक्षा आर्यांनी ज्यांचा पराभव केला ते दास कोण होते, त्या दासी कोण होत्या, हा प्रश्न इथल्या जनांसाठी महत्त्वाचा आहे. ऋग्वेदात जी युद्धांची वर्णने आहेत, इंद्राने ज्या दास्यूंच्या हत्या केलेल्या आहेत, दस्यूंची नगरं फोडलेली आहेत, ते दस्यू कोण होते? आज त्यांचे वंशज कोण आहेत? ऋग्वेदापासून ते महाकाव्यांपर्यंत अनेक दासींचे उल्लेख येतात. या दासी एकमेकांना भेट म्हणून दान दिल्या आहेत. या दासी कोण होत्या? इथेल जन ज्यांना वैदिकांनी कायम शूद्र लेखलं आणि दूर लोटलं, ज्यांना वेदाध्ययनाचा, वेदमंत्रांचा अधिकार दिला नाही, ते कोणाचे वंशज आहेत? हे सगळे प्रश्न विचारण्याची गरज आहे. आम्हाला आर्यांशी खरोखरंच काही देणंघेणं नाही, पण या भूमीवरचा आमचा इतिहास काय, हा आमच्या चिंतनाचा विषय आहे. कश्यपाची पुराणकथा आम्ही मान्य करणार नाही, आम्हाला आमचा इतिहास शोधायचा आहे, हे आता इथल्या जनांनी सांगणे गरजेचे आहे.