सावंतवाडीत ८ व ९ मे रोजी १ ले जनवादी साहित्य-संस्कृती संमेलन संपन्न झाले. जेष्ठ पत्रकार व लेखिका संध्या नरे-पवार या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. संमेलनातील त्यांचे अध्यक्षीय भाषण विशेष गाजले. हे भाषण छापील स्वरुपात संमेलनात प्रकाशितही करण्यात आले. त्यांचे हे भाषण सत्यशोधक प्रतिशब्दच्या वाचकांसाठी दोन भागांत प्रसिद्ध करीत आहोत. भाषणाचा उत्तरार्ध संमेलन संयोजन समितीच्या सौजन्याने या अंकात प्रसिद्ध करीत आहोत. -संपादक

इतिहासाचे विकृतीकरण आणि पुनर्लेखन –

‘सेपिअन्स’ या ग्रंथात युवाल नोहा हरारीने दक्षिण आफ्रिकेतील झुलुंच्या संदर्भात माहिती दिली आहे. एकोणिसाव्या शतकात झुलु जमातीतील बहुसंख्य लोक झुलु सुवर्ण काळाच्या कथनाने प्रभावित होते. झुलु जमातीचा एक सुवर्ण काळ होता जेव्हा सगळ्या क्षेत्रात झुलुंनी प्रावीण्य मिळवलेले होते, त्यांचे सभोवतालच्या जगावर वर्चस्व होते, अशी त्यांची भावना होती. यातील विसंगती सांगताना हरारी सांगतात की, या झुलुंपैकी अनेकजण हे अशा जमातींचे वंशज होते ज्या प्रत्यक्षात इतिहासामध्ये झुलु साम्राज्याविरोधात लढलेल्या होत्या. झुलुंच्या वर्चस्वाविरोधात त्यांनी संघर्ष केला होता. पण झुलुंनी त्यांचा पराभव केला आणि पराभवानंतर हिंसाचाराच्या माध्यमातून या जमातींना अंकित करण्यात आले. आणि आता त्याच जमाती काही शतकांच्या प्रवासानंतर आपला भूतकाळ विसरुन झुलु जमातीचं वर्चस्वगान गात आहेत, सुवर्णकाळाच्या मिथकाचं स्वतः गौरवीकरण करत आहेत. याचाच अर्थ असा की झुलुंच्या विरोधात लढणाऱ्या जमातींची दैवतं, त्यांचे वीरयोद्धे हे सगळं सामीलीकरणाच्या प्रक्रियेत पुसून टाकण्यात आलं किंवा त्यांचं अशा पद्धतीने राक्षसीकरण करण्यात आलं, की तो आपला वारसा आहे, असं आज त्या झुलुंविरोधात लढणाऱ्या जमातींच्या वंशजांना सांगता येत नाही. त्यांचं ते स्मरण पुसलं गेलं आहे. आणि स्मरण नाही त्यामुळे अनुसरणही नाही.

इथल्या अवैदिकांपैकी काहींची अवस्था आज झुलु जमातीसारखी असली तरी किमान काहींना तरी आपली मुळं वेगळी आहेत, आपला इतिहास वेगळा आहे, याची जाणीव आहे. म्हणूनच आजही पुरुष सहचराविना असणाऱ्या मातृदेवतांची स्थानं देशभर पसरलेली आहेत. इथल्या वैदिक संस्कृतीने वामनरुपातल्या विष्णुला देवत्व दिले तरी इथल्या सर्वसामान्यांनी इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो, असे म्हणत वामनाने पराभूत केलेल्या बळीराजाची स्मृती जपली आहे.

वामन आणि बळी हे जे द्वैत आहे आणि या व्दैतामधील जे विविध संघर्ष आहेत तेच भारतीय इतिहासाच्या विकृतीकरणामध्ये आणि पुनर्लेखनाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला दिसून येतात. इतर कोणत्याही संस्कृतीत न आढळणारी अशी अभूतपूर्व सरमिसळ भारतीय संस्कृतीत आहे. परस्परविरोधी विचार मांडणारे नाना संप्रदाय आहेत, पंथ आहेत. प्रत्येकाचे स्वतःचे साहित्य आहे. रचना आहेत. अलिकडच्या काळातील वारकरी साहित्यानेच शूद्र, अतिशूद्र, मुस्लिम अशा सगळ्या प्रवाहांना सामावून घेत अभंगरचनांचं भांडार निर्माण केलं. पण वारकरी संतांनी जो समतावाद मांडला त्याच्या विरोधात ब्राह्मणी प्रभुत्वावर आधारित जातवर्णवर्चस्ववाद उभा आहे. आजही हा जातवर्णवर्चस्ववाद वेगवेगळ्या प्रकारे इतिहासाची मोडतोड करुन इथल्या बहुजनांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. मग ते राजमाता जिजाबाईंचं चारित्र्यहनन करणारं जेम्ल लेन प्रकरण असो किंवा अलिकडेच रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जिर्णोद्धार टिळकांनी केला, हा राज ठाकरे यांनी केलेला दावा असो. सातत्याने इतिहासाचे विकृतीकरण केले जाते. बळीला मारणाऱ्या वामनाची, पृथ्वी एकवीसवेळा निःक्षत्रिय करणाऱ्या परशुरामाची पूजा वेगवेगळ्या पौराणिक कथांच्या माध्यमातून इथल्या बहुजनांवर लादली जाते. या अशा वातावरणात कोणता इतिहास प्रमाण मानायचा? शोषितांचा कि शोषण करणाऱ्यांचा? हा प्रश्न उपस्थित होतो.

इतिहासकार इ.एच.कार सांगतात, इतिहासातून शोध घेणे ही एकतर्फी प्रक्रिया नसते. भूतकाळाच्या अनुषंगाने वर्तमान जाणून घेणे म्हणजेच वर्तमानाच्या अनुषंगाने भूतकाळ जाणून घेणे असते. इतिहासाचा अर्थ ‘असे असे घडले’ असा असला तरी भूतकाळात नेमके काय घडेल आणि कसे घडले हे सांगताना त्या सांगणाऱ्या व्यक्तीची विचारसरणी, तिचा धर्म, तिचा वर्ग, तिची जात, तिचं लिंग तसंच तत्कालिन राजवट आणि त्या राजवटीची ध्येयधोरणं या सगळ्याचा प्रभाव त्या कथनावर असतो. इतिहासाचा नव्याने अर्थ लावताना किथ जेकिन्स हा इतिहासतज्ञ सांगतो, ‘इतिहास आणि भूतकाळ या एकच गोष्टी नाहीत. इतिहासाचा नेहमी काही ना काही हेतू असतो. इतिहासाचा संबंध सत्तेशी असतो. इतिहास हा कधीही भोळा, निरागस, निष्पाप नसून तो विचारधारापोषक आणि पोषित असतो.’ या अशा स्थितीत इतिहास लेखन आणि पुनर्लेखन ही प्रक्रिया धर्मजातवर्गवंशलिंग यांच्या वर्चस्ववादी राजकारणाने प्रभावित होत असते. यात अनेक सोयीच्या गोष्टी प्रबळ ऐतिहासिक पुरावा नसतानाही रेटून सांगितल्या जातात. किंवा काही सोयीच्या नसलेल्या गोष्टी पुरावा असतानाही दुर्लक्षित ठेवल्या जातात. अभिजनांचं प्रभुत्व कायम ठेवण्यासाठी इतिहास कथनाचा वापर केला जातो. अशा वेळी शोषित समुहाची अस्मिता आपल्या दडपलेल्या इतिहासाचा शोध घेत इतिहासपुनर्लेखनाची मागणी करते. यातून पर्यायी इतिहासलेखन केले जाते.

भारतात ब्रिटिशांच्या आगमनानंतर त्यांच्या प्रशासकीय गरजांतून आणि त्यांच्या स्वतःच्या द्दष्टिकोनातून त्यांनी भारताचा इतिहास लिहायला घेतला. त्याला सामाज्र्यवादी इतिहासलेखन म्हटलं जातं. या साम्राज्यवादी इतिहासलेखनाला प्रत्युत्तर म्हणून इथल्या स्वसंस्कृतीप्रेमी अभिजनांनी राष्ट्रवादी प्रेरणेतून इतिहासलेखन केले. पण इथल्या राष्ट्रवादी इतिहासलेखनातून इथल्या शोषित जनांचा, शूद्रातिशूद्रांचा इतिहास अद्दश्य होता. म्हणून इथल्या शोषित जनांमधील धुरिणांनी पर्यायी इतिहासलेखनाला सुरुवात केली. याची ठळक सुरुवात म.जोतिराव फुले यांच्यापासून झाली. जोतिरावांनी लिहिलेला ‘शिवरायांचा पोवाडा’ खरं तर शालेय अभ्यासक्रमात लावायला हवा होता. पण हा पोवाडा, हे पर्यायी इतिहासलेखन आजही दुर्लक्षित आहे. फुलेंप्रमाणेच केळुस्कर, रामस्वामी पेरियार, बाबासाहेब आंबेडकर, दामोदर कोसंबी, देवीप्रसाद चट्टोपाध्याय, प्र.रा.देशमुख, शरद् पाटील, आ.ह.साळुंखे, उमा चक्रवर्ती, गेल आम्वेत यांनीही इथल्या दलितबहुजनांच्या बाजूने पर्यायी इतिहासलेखन केले आहे.

पर्यायी इतिहासलेखनाकडे येण्याआधी अभिजनवादी इतिहास कशा पद्धतीने लिहिला गेला, याचं एक उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. इतिहास दडपणे म्हणजे काय, हे त्यातून लक्षात येते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे नाव पुरोगामी विचारविश्वातही आदराने घेतले जाते. आपल्या ‘हिंदूधर्माची समीक्षा’ या ग्रंथात शास्त्रीजी ब्राह्मणवरिष्ठत्व व शूद्रदास्य हा आर्यांच्या समाजसंस्थेचा महत्त्वाचा भाग होता, अशी स्पष्ट मांडणी करतात. तेच शास्त्रीजी आपल्या ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ या ग्रंथात आपल्या लेखनामागचा उद्देश स्पष्ट करताना सांगतात, ‘येथे केवळ उच्च ध्येयभूत किंवा आदर्शरुप परंपरेचा, तत्त्वांचा आणि विचारांचा विकास दाखविणे एवढाच प्रतिपादनामागचा हेतू आहे. हीनोच्च परंपरांचा सर्वांगीण इतिहास सांगणे हा इथे मुख्य उद्देश नाही.’ थोडक्यात शास्त्रीजींना वैदिक संस्कृतीचा विकास मांडताना केवळ आदर्शरुप परंपरा आणि त्या परंपरांमधून विकास पावणारा विचार मांडायचा आहे, वैदिक धर्मातील हीन परंपरांचा विकास मांडायचा नाही. इथे एका गोष्टीसाठी शास्त्रीजींचे आभार मानले पाहिजेत. एक तर ते स्पष्टपणे सर्वांगीण इतिहास सांगणे, हा आपला उद्देश नाही, असे सांगतात आणि त्याचवेळी हीन परंपरा आणि त्यांचा इतिहास अस्तित्त्वात आहे, याचीही कबुली देतात.

पर्यायी इतिहासलेखन या हीन परंपरा कोणत्या हे समाजासमोर आणते. वेगवेगळे स्मृतिग्रंथ शूद्रांविषयी आणि शूद्र स्त्रियांविषयी काय बोलतात याची अगदी मोजकी उदहारणे पाहिली तरी शास्त्रीजी कोणत्या हीन परंपरा दडवतात, ते लक्षात येईल. स्मृतिग्रंथांमध्ये कोणते विवाह शास्त्रसंमत आहेत आणि कोणते विवाह शास्त्रसंमत नाहीत, हे सांगताना  ‘अनुलोम-प्रतिलोमा’ची पद्धत सांगितली आहे. अनुलोम विवाह हे शास्त्रसंमत आहेत. यात वरिष्ठ जातीच्या पुरुषाने कनिष्ठ जातीच्या स्त्रीशी विवाह केला असता तो मान्य होतो. अनुलोमाच्या निकषाने ब्राह्मण वर्णाच्या पुरुषाला ब्राह्मण वर्णाच्या स्त्रीसह क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा उर्वरित तिन्ही वर्णांच्या स्त्रियांशी संबंध ठेवता येत होता. त्याल मान्यता होती. क्षत्रियाला क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र वर्णातल्या स्त्रियांशी, तर वैश्याला वैश्य आणि शूद्र वर्णातल्या स्त्रियांशी संबंध ठेवता येत होता. शूद्राला मात्र त्याच्या वर्णाबाहेरच्या स्त्रीशी विवाह करता येत नव्हता. कारण तो शास्त्रानुसार प्रतिलोम विवाह ठरतो. वरच्या वर्णाच्या स्त्रीशी खालच्या वर्णातल्या पुरुषाने विवाह करणे म्हणजे प्रतिलोम विवाह. हा प्रतिलोम विवाह शास्त्रकारांनी पूर्णतः निषिद्ध मानला आहे. म्हणजेच प्रतिलोमात ब्राह्मण स्त्रीशी उर्वरित तीन वर्णातील पुरुष विवाह करु शकत नाहीत. तसेच क्षत्रिय स्त्रीशी वैश्य आणि शूद्र विवाह करु शकत नाहीत. अनुलोम-प्रतिलोमाच्या माध्यमातून उच्चवर्णिय स्त्रियां इतर वर्णाच्या पुरुषांसाठी अनुपलब्ध करत असतानाच ब्राह्मण पुरुषाला सगळ्या स्त्रिया उपलब्ध आणि शूद्र वर्णाच्या पुरुषाला शूद्र वर्णाची स्त्री वगळता सर्व स्त्रिया अनुपलब्ध त्याचवेळी शूद्र वर्णाची मात्र स्त्री सर्व वर्णाच्या पुरुषांना उपलब्ध अशी चलाखी करण्यात आलेली आहे. थोडक्यात अनुलोम-प्रतिलोमाची ही मांडणी ब्राह्मण पुरुषाला सर्वाधिकार देणारी तर शूद्र स्त्रियांचा अवमान करणारी आहे. अनुलोम-प्रतिलोमाच्या या मांडणीबरोबरच शूद्र वर्णाच्या स्त्रियांबाबत वेगवेगळ्या  स्मृतिग्रंथांमध्ये अतिशय हीन उद्गार काढण्यात आले आहेत.

  • कृष्णवर्णाची जी रमणी असते ती फक्त भोगण्यासाठी असते, धर्मासाठी नसते.

(वसिष्ठस्मृती, १८.१८)

  • स्त्रीला प्रथम सोम, गंधर्व व अग्न् हे तीन दैवी पती भोगतात आणि मग तिला मानवी पती प्राप्त होतो.

(वसिष्ठस्मृती, २८.५.६)

  • ब्राह्मण वर्ण म्हणजे अग्नी

(वसिष्ठस्मृती, ३०.२.३)

  • उच्चकुलीन पुरुषांची भोगसेवा करणं हीन जातीच्या स्त्रीसाठी अनुचित नाही

(मनुस्मती, ८.३६५)

  • अक्षमाला ही हीनजातीय स्त्री वसिष्ठाशी आणि शारंगी ही हीनजातीय स्त्री मंदपाल मुनींशी संयोग झाल्यामुळे पवित्र झाल्या. अनेक स्त्रियांनी हा मार्ग अनुसरला आहे.

(मनुस्मृती, ९.३३.२५)

अशी अनेक विधानं आहेत. हे उल्लेख इतके लाजिरवाणे आहेत की यावर अधिक काय बोलावे? पर्यायी इतिहासलेखन झाले नसते तर ती हीनवृत्ती आजच्या बहुजनांसमोर आली नसती. आजही मनुस्मृती आणि इतर स्मृतिग्रंथ पुजनीय मानणाऱ्यांनी या अशा उल्लेखांचे स्पष्टीकरण द्यावे, एवढी माफक अपेक्षा करायला हरकत नाही

अल्पसंख्यांक समुदाय आणि पुरोगामी कोंडी 

आज सगळ्याच धर्मांमधला कट्टरतावाद निधर्मीवादाला आपल्या सोयीने वापरत कधी त्याला बहुसांस्कृतिकतेच्या विरोधात उभं करतो तर कधी बहुसांस्कृतिकतेच्या नावाने धर्मवादाची रुजवात करत निधर्मीवादाला नाकारतो. निधर्मीवाद, बहुसांस्कृतिकता या आधुनिक संकल्पनांचे पेच नीट समजून घेतले नाहीत तर अंतिमतः ते धर्मवाद्यांच्या, कट्टरतावाद्यांच्या फायद्याचे आणि पुरोगाम्यांची कोंडी करणारे ठरतात.

कर्नाटक राज्यात मुस्लिम मुलींना हिजाब घातला म्हणून महाविद्यालयांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. हिजाब हा गणवेशाचा भाग नाही, शिक्षणसंस्थेत कोणतीही धार्मिक चिन्हे नकोत, असा युक्तिवाद यासाठी केला गेला. हिजाब घालणाऱ्या मुलीही हिजाब घालून प्रवेश मिळावा यासाठी आग्रही राहिल्या. प्रकरण कोर्टापर्यंत गेलं. या हिजाब प्रकरणातला धार्मिक कट्टरतावाद गुंतागुंतीचा आहे. तो दोन्ही बाजूने उभा आहे आणि यात पुरोगामी मंडळींना आपली भूमिका घ्यायची आहे. इथे मुस्लिमविरोधी राजकारण करणारे, जय श्रीरामची घोषणा देणारे जे कट्टरतावादी आहेत ते शिक्षणसंस्थांमध्ये कोणतीही धार्मिक चिन्हे नकोत, ही वरकरणी निधर्मीवादी वाटणारी भूमिका घेऊन हिजाबला विरोध करत आहेत. पण प्रत्यक्षात तो मुस्लिम विरोध आहे कारण अशीच विविध धार्मिक वैशिष्ट्ये, उदा. कुंकू, मंगळसूत्र वगैरे घालून हिंदू मुलीही शिक्षणसंस्थेत जात असतात. तसेच मुस्लिम मुलींना हिजाब घालून शिक्षणसंस्थेत जाण्याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे, अशी भूमिका मुस्लिम धर्मातील कट्टरतावादी घेत हिजाबसाठी कोर्टापर्यंत धाव घेतात. इथे कट्टरतावादी विचारसरणीची दोन्ही बाजूची मंडळी आपापल्या सोयीने निधर्मीवादाला आणि संविधानिक हक्काला वापरुन घेत आहेत.

अशावेळी सेक्युलर, पुरोगामी परिवर्तनवादाला कैचीत पकडले जाते. हिजाबला पाठिंबा दिलात तर तुम्ही स्युडो सेक्युलर ठरता, विरोध केलात तर हिंदुत्वाच्या नावाने धर्मांधतेचा खेळ करणाऱ्यांच्या बाजूने उभे आहात, असे चित्र निर्णाण होते. मात्र या अशा कोंडीच्या वेळी दोन्हीकडच्या कट्टरतावादाला नकार देत आपली भूमिका अधिकाधिक स्पष्ट करावी लागते.

बुरखा, हिजाब यांना पुरोगामी विचारविश्वाचा पाठिंबा नाहीच पण विरोध आहे, हे स्पष्टपणे सांगावे लागते. मुलींच्या मनावर बुरखा, हिजाबचे संस्कार करणाऱ्या कट्टरतावादी मंडळींना हा धार्मिक, पुरुषसत्ताक वर्चस्ववाद आहे, ही भूमिका मांडावी लागते. आज मुस्लिम समुदायातल्या अनेक स्त्रिया बुरखा न घालता त्यासाठी स्वतःच्या कुटुंबियांच्या विरोधात संघर्ष करत आहेत. पुरोगामी विचारविश्व या अशा स्त्रियांच्या बाजूचे आहे. मात्र त्याचवेळी हिंदुत्वाच्या नावाने जी मंडळी हिजाब घालून शिक्षण घेऊ पाहाणाऱ्या मुलींना विरोध करत आहेत, त्यामागे निधर्मीवादाचं त्यांना अचानक आलेलं प्रेम नसून अल्पसंख्यांक समुदायाला लक्ष्य करण्यासाठीच ते हा हिजाब वाद ताणत आहेत, हेही स्पष्टपणे सांगावे लागते. मुस्लिम समुदायाचा अवमान करण्यासाठीच ही खेळी खेळली जात आहे.

या संदर्भात फ्रान्झ फेनन यांचा ‘अनव्हेल्ड अल्जेरिया’ हा लेख अतिशय महत्त्वाचा आहे. युरोपिअनांनी अल्जेरियावर कब्जा मिळवला तेव्हा बुरख्यातल्या अल्जेरियन स्त्रियांना बुरखाविहिन करण्याची मोहिम त्यांनी सुरु केली. त्यामागे सुधारणावादाचे कृतक कारण असले तरी प्रत्यक्षात साम्राज्यवादी प्रेरणेने अल्जेरियन पुरुषांच्या आत्मसन्मानाचे अवमूल्यन करण्यासाठीच, अल्जेरियन संस्कृतीला कमी लेखण्यासाठीच हा प्रकार केला जात होता. आज हिजाबचे निमित्त करुन हे असेच सांस्कृतिक राजकारण केले जात आहे. पण या राजकारणाला प्रत्युत्तर म्हणून हिजाबचा आग्रह धरला गेला, तर कट्टरतावादाचा गुणाकारच होणार आहे. दोन्हीकडच्या कट्टरतावादाला विरोध हेच याचे उत्तर आहे.

हिजाब वादात मुलींच्या निवडीच्या अधिकाराचा मुद्दाही पुढे केला जातो. मध्यंतरी ए.आर.रहेमान या प्रसिद्ध गायकाच्या मुलीने हिजाब घालायला सुरुवात केल्यावर त्यावर सोशल मिडिआतून टीका झाली. तेव्हा रहेमानने ही माझ्या मुलीची निवड आहे, अशी भूमिका घेतली होती. रहेमानवर टिका करणाऱ्यामध्ये धार्मिक कट्टरतावादी अधिक असल्याने त्यांचे म्हणणे बाजूला ठेवले तरी मुळात निवडीच्या अधिकाराच्या या  मुद्द्याला अनेक निसरड्या बाजू आहे. निवडीचा अधिकार हा आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. पण त्याचवेळी ती निवड जर व्यक्ती म्हणून असलेल्या आपल्या सन्मानाला धक्का लावत असेल तर त्याचा पुनर्विचार करायला हवा. बुरखा असेल किंवा घुंगट असेल या दोन्ही बाबी पुरुषसत्ताक धर्मव्यवस्थेच्या प्रतीक आहेत. ही दोन्ही प्रतीकं स्त्रियांचं दुय्यमत्व अधोरेखित करणारी आहेत. तुम्ही जी निवड करता त्याची मुळं कोणत्या मातीत रुजलेली आहेत,त्या गोष्टीची सामाजिक पार्श्वभूमी काय आहे, तुमची निवड ही व्यक्तिगत असली तरी ती कोणता सामाजिक, सांस्कृतिक संदेश उर्वरित समाजाला देत आहे, हे प्रश्न महत्त्वाचे ठरतात. जगभरच्या पुरुषसत्तेने स्त्रियांचे दुय्यमत्तव रुजवताना बुरख्यापासून ते खतनापर्यंत आणि सतीप्रथेपासून ते सौभांग्यलंकारांपर्यंत अनेक प्रथापरंपरांच्या बंधनात त्यांना बंदिस्त केले, त्यालाच संस्कृती असे नाव दिले. याविरोधात जगभरच्या स्त्रियांनी त्या त्या ठिकाणच्या पितृसत्तेशी आणि धर्मसत्तेशी संघर्ष करतच आपला एकेक अधिकार मिळवला आहे. मतदानाच्या हक्कापासून ते संपत्तीच्या हक्कापर्यंत प्रत्येक गोष्ट मिळवताना स्त्रियांना संघर्ष करावा लागला आहे. आजही स्त्रियांनी कोणते कपडे घालावेत, किती मुलांना जन्म द्यावा, कुटुंबनियोजनाची साधने वापरावीत का वापरु नयेत, या अत्यंत खासगी गोष्टीतही सनातनी मंडळी नाक खुपसत असतात. नऊवारीतून पाचवारीत, पाचवारीतून ड्रेसमध्ये आणि पंजाबी ड्रेससमधून जीन्समध्ये येताना या देशातल्या बहुसंख्यांक स्त्रियांनाही संघर्ष करावा लागला आहे. कुटुंबाच्या, समाजाच्या रोषाला तोंड द्यावे लागले आहे. हिजाब घालणं असेल किंवा घुंगट घेणं असेल, ती माझी निवड आहे, हे म्हणताना संबंधित व्यक्तीने आपल्या या निवडीची मुळं समतावादी मातीत रुजलेली आहेत का विषमतावादी मातीत रुजलेली आहेत हे तपासायला हवे. आपल्या या निवडीतून आपण स्त्रीच्या दुय्यमत्त्वाचेच साचे पुन्हा पुन्हा घडवतोय का, याचाही विचार करायला हवा.

स्त्रीविषयक सुधारणा करायला कोणताच क्षण योग्य नसतो. कारण प्रत्येकवेळी त्यापेक्षा अधिक महत्त्वाचा लढा समोर उभा आहे, असे समुदायाकडून सांगितले जाते. पण समोर जो काही लढा उभा आहे त्या लढ्यातच स्त्रीहक्कांचा लढा लढावा लागतो. म. जोतिराव फुले यांचं समग्र साहित्य आणि त्यांचं कृतीकार्य यासाठी साक्षी आहे. भटजी-शेटजींविरोधात सांस्कृतिक लढा देत असतानाच त्यांनी स्त्रीप्रश्नांची मांडणीही केली आणि त्यासाठी आवश्यक ती कृतीही केली. सावित्रीबाईंबरोबर फातिमा शेखही शाळेत मुलींना शिकवायला जात होत्या. हे पुन्हा पुन्हा सांगावे लागेल.

एकूण मुस्लिम समुदायाविरोधात पितृभू आणि पुण्यभू या सावरकरप्रणित संकल्पनांनुसार जे धार्मिक कट्टरतावादाचं राजकारण सुरु आहे, त्यात बुरख्यासारख्या गोष्टींच्या निमित्ताने मुस्लिम समाज आजही धर्मांध आहे, हे संभाषित वारंवार पुढे आणले जाते. हे संभाषित ज्याप्रमाणे हिंदुत्वाचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनी रुजवलं त्याचप्रमाणे नरहर कुरुंदकरांसारख्या पुरोगामी विचारवंतानेही रुजवलं. संपूर्ण मुस्लिम समाज धर्मांध आहे असे म्हणणे एखाद्या संपूर्ण समुदायाचे राक्षसीकरण करणे असतेच पण त्याचवेळी परिवर्तनाच्या सगळ्या शक्यता नाकारणे असते. कुरुंदकरांच्या मांडणीचा प्रभाव काही प्रमाणात तरी पुरोगामी विचारवर्तुळात राहिला. त्यामुळेच आज काही पुरोगामी वर्तुळातील मंडळीही वाईट मुस्लिम दहशतवादी असतात आणि चांगले मुस्लिम त्याला पाठिंबा देतात, अशी विधानं समाजमाध्यमांवर करत असतात. एखाद दुसरा अपवाद वगळता त्याला फारसा प्रतिकार होत नाही. वसंत पळशीकर, किशोर बेडकिहाळ यांनी नरहर कुरुंदकरांची मांडणी खोडणारं लिखाण केले आहे. अलिकडच्या काळात सरफराज अहमद कुरुंदकरांच्या लेखनाची चिकित्सा करुन त्यात इस्लाम संदर्भात चुकीची माहिती आली असून कुरुंदकरांनी इस्लाम धर्मातील वेगवेगळ्या संकल्पनांचा त्यांनी चुकीचा अर्थ लावला आहे, हे स्पष्ट करत आहेत. हे आवश्यक आहे. पुरोगामी विचारांमध्ये ज्या उणीवा असतील त्या अधिक तातडीने दूर करायला हव्यात. कारण इतिहासात वारकरी संतांनी किंवा सुफी संतांनी एकोप्याविषयी काय सांगितले जे जितके महत्त्वाचे आहे तितकेच आज वर्तमानात हा एकोपा टिकवण्यासाठी आम्ही काय भूमिका घेणार, निषेधाचे कोणते शब्द उच्चारणार, त्यात आमच्या श्रद्धास्थानांची नावं घेणार का नाही, हेही महत्त्वाचे आहे.

सर्व मुस्लिम धर्मांध असतात, हे कथन एकदा समाजात रुजले की कोणत्याही दंगलसद्दश परिस्थितीत मुस्लिम तरुणांना पकडले जाते, तुरुंगात डांबले जाते. यातले काही घरी परतून येत नाहीत. या वास्तवाचा शोध घेत समर खडस हा कथाकार  ‘बकऱ्याची बॉडी’ हा कथासंग्रह लिहितो तेव्हा तो केवळ प्रतिगामीच नाही तर पुरोगामी विचारविश्वासमोरही प्रश्न उपस्थित करत असतो.

माझा किसन मारला, माझा हसन मारला

त्यांनी माणूस मारला, त्यांनी माणूस मारला..

ही गीतं पुरोगामी चळवळीत कायम गायिली जातात. पण प्रत्यक्षात किसन आणि हसन मारले जाण्याच्या आधी काय प्रकारचे आयुष्य जगत असतात, कुठच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहात असतात, त्यांचा भाकरीचा आणि संस्कृतीचा संघर्ष काय स्वरुपाचा असतो, हे पुढे येत नाही. म्हणूनच बकऱ्याची बाडी (body) या कथासंग्रहातील हा संघर्ष पुढे आणणारे लेखन नवीन परिद्दष्टी देते. नवीन कथन तयार करण्यासाठी मदत करते. मुस्लिम समुदायाच्या संदर्भात आज हे असे नवे संभाषित तयार होण्याची निकड आहे. अन्यथा एकोप्याची वचनं ही समाजसंस्कृतीवर ठिगळं लावल्यासारखी राहतात.

असहमतीचे जैविक आवाज

नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या सिनेमात भीमजयंतीचं द्द्श्य दाखवताना तरुण-तरुणी नाचताहेत, असं दाखवलं गेलं. इथे वस्त्यावस्त्यांमधून जे घडतं ते सिनेमात आलं आहे. आंबेडकर जयंती ही नेहमी वाजतगाजतनाचत साजरी होते. शतकानुशतकं दबल्यापिचलेल्यांचा तो आनंदोत्सव आहे. मात्र समाजमाध्यमातून काहींनी आपली उच्चभ्रू मानसिकता दर्शवत या  द्दश्यांना आक्षेप घेतला. नाचतानाच द्दश्य न दाखवता मुलं मुली वाचताहेत, असं दृश्य दाखवायला हवं होतं, असा हा आक्षेप होता. यातून आंबेडकर जयंती कशी साजरी करायला हवी, याचं एक नवं प्रारुप उभं करत वस्त्यावस्त्यांमधून नाचतवाचतगाजत होत असलेल्या आंबेडकर जयंतीच्या गेल्या अर्धशतकाच्या प्रारुपावर प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं आणि त्या प्रारुपाला कुठेतरी कमअस्सल, कमी दर्जाचं ठरवण्यात आलं. आता ही इथली नेहमीचीच जातवर्णवर्गवर्चस्ववादी मानसिकता आहे. यात नवीन काही नाही. आमचं जे जे काही आहे ते श्रेष्ठ आहे आणि तुमचं जे जे काही आहे ते निकृष्ट आहे. अगदी आहारापासून भाषेपर्यंत सगळं. आमचं नाचणं हे शास्त्रीय नृत्य असतं तर तुमचं नाचणं हे अंगविक्षेप असतात आणि हे असे अंगविक्षेप न करता तुम्ही या दिवशी वाचन करुन तुमच्या महामानवाला, आदर्शला आदरांजली वाहायला हवी, असे हे आवाज सांगत होते. हे सगळं झुंड सिनेमाच्या निमित्ताने नागराज मंजुळेंना जरी सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात ते सर्व आंबेडकरी जनसमुदायाला सांगितलं जात होतं. शहाणपण शिकवलं जात होतं. नागराज मंजुळेंनी या आरोपाला बहुधा काही उत्तर दिलं नसावं. कारण त्यांना जे हवं ते त्यांनी सिनेमाच्या माध्यमातून दाखवलं होतं. पण आंबेडकरी जनसमुदायाने विशेषतः तरुणींनी या शहाजोग सल्ल्याला जे उत्तर दिलं ते बघण्यासारखं आहे. म्हणजे शब्दशः बघण्यासारखं आहे. या आंबेडकर जयंतीला तरुणी बेभानपणे नाचल्या आहेत आणि त्यांनी त्यांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर अपलोड केले आहेत. मी स्वतः ते व्हिडिओ दोनदा-तीनदा पाहिले. केवळ तरुणीच नाचल्या आहेत असे नाही तर मुली नाचत असताना आजूबाजूला उभ्या असलेल्या आई-काकी-मावशी अशा प्रौढ स्त्रियांना तरुण मुलगे हाताला धरुन नाचणाऱ्या मुलींच्या घोळक्यात आणून सोडत होते आणि मग त्या प्रौढ स्त्रियाही आपल्या लेकीबाळींबरोबर नाचत होत्या. मला हे व्हिडिओ बघताना तरुणांच्या भाषेत सांगायचं तर जाम भारी वाटलं. कारण हा आमचा असहमतीचा आवाज होता. व्हाईस (voice) ऑफ डिसेंट. तुमचं म्हणणं आम्हाला मान्य नाही, तुमचं विचारविश्व आम्हाला मान्य नाही आणि त्या विचारविश्वाच्या आधारे उभी राहिलेली तुमची जातवर्णश्रेष्ठत्वाची विचारसंस्कृती आम्हाला मान्य नाही, हे सांगणारा हा आवाज होता. आणि हा आवाज आमच्या लेकीबाळींच्या रस्त्यावर नाचणाऱ्या पावलांमधून आला होता. ज्या रस्त्यांवरुन अस्पृश्यांना चालण्यासाठी गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू बांधण्याची सक्ती इथल्या ब्राह्मणी परंपरेने केली होती त्याच रस्त्यांवरुन  आंबेडकर जयंतीच्या दिवशी तरुणतरुणींनी बेभान होत नाचणं हा सामाजिक न्याय आहे. राहिला मुद्दा वाचनाचा. तर त्याला या आंबेडकरी तरुणाईनेच चांगलं उत्तर दिलं आहे. जे वाचतात ते नाचत नाहीत आणि जे नाचतात ते वाचत नाहीत, असा माझा अनुभव आहे, असे एका महिलेने समाजमाध्यमांवर म्हटले, त्याला बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या तरुणींनी योग्य उत्तर दिलं आहे. त्या सांगतात, आम्ही पीएचडीच्या विद्यार्थिनी आहोत, आम्ही वर्षभर वाचन करत असतो आणि आंबेडकर जयंतीच्या दिवशी नाचत असतो. चैत्यभूमी असो किंवा दिक्षाभूमी इथल्या पुस्तकांच्या स्टॉलवर कायम भरघोस पुस्तक विक्री होत असते. दलितबहुजन समाजातली पदवीधरांची पहिली-दुसरी पिढी असलेल्या समाजात ज्ञानाची ओढ प्रचंड आहे. ती फुले-आंबेडकरी विचारांनीच लावलेली आहे. पुस्तकं विकत घेऊन वाचणारा हा समाज आहे, लायब्ररीचा सभासद समाज नाही. वर्षभर वाचणाऱ्यांचा आंबेडकर जयंतीचा नाच म्हणजे शतकानुशतकांच्या शोषणाविरोधातला असहमतीचा नाद आहे. विद्रोही पदन्यास आहे.

इथल्या प्रत्येक शोषणाला आणि शोषकांच्या भिन्न भिन्न रुपातल्या विभाजनवादी विचारधारांना, त्यांच्या कट्टरतावादाला, त्यांच्या फॅसिझमला आमचा विरोध आहे, आमची असहमती आहे, हे सांगण्यासाठीच हे दलितबहुजनभटकेविमुक्तआदिवासी जनांचं, समतावादी मूल्य मानणाऱ्या जनांचं संमेलन आहे, असे मला वाटते. हे संमेलन म्हणजे उजव्या विचारधारेच्या कट्टरतावादी राजकारणाला दिलेला नकार आहे. हे संमेलन म्हणजे इथल्या दलितबहुजनांचा असहमतीचा आवाज आहे.

दलित-बहुजनांच्या असहमतीच्या, विद्रोहाच्या या आवाजाला निर्ऋतिपासून ते शंबुकापर्यंत, एकलव्यापासून ते बुद्धांपर्यंत, स्वामी चक्रधरांपासून ते कबीर-रोहिदास-नामदेव-चोखोबा-तुकारामांपर्यंत, संत सोयराबाईंपासून ते तुकारामशिष्या बहिणाबाईंपर्यंत, छत्रपती शिवरायांपासून ते जोतिबा फुले-बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतची परंपरा आहे. जातवर्णवर्चस्ववादी वैदिक, ब्राह्मणी परंपरा शतकानुशतकं कायम असली तरी हा असहमतीचा, विद्रोहाचा आवाजही त्याला शतकानुशतकं विरोध करत आलेला आहे. आजचं संमेलन हे या नकाराच्या, असहमतीच्या आवाजाशी आपलं नातं सांगत आहे. असहमती नोंदवणाऱ्या विद्रोहाचा अलिकडचा आविष्कार म्हणजे दलित पॅंथर.

सांस्कृतिक संघर्षात असहमतीचे आवाज महत्त्वाचे असतात. ते जर उच्चारले गेले नाहीत तर अंतिमतः गुलामी वाट्याला येते. दलितबहुजनांच्या नाचासारख्या सहज, उत्स्फूर्त अभिव्यक्तीला नाकारत, किंवा तिला कमी दर्जाची, हीन ठरवत, ते खात असलेल्या अन्नाला हीन ठरवत, ते बोलत असलेल्या बोलीभाषेला हीन ठरवत त्यांचं सांस्कृतिक खच्चीकरण केलं जातं, मानसिक खच्चीकरण केलं जातं. असं सांस्कृतिक-मानसिक खच्चीकरण झालेला समूह उच्चजातीय अभिजनांचं श्रेष्ठत्व किंवा ग्रामश्ची ज्याला हेगीमनी म्हणतो ते प्रभुत्व सहज मान्य करतो. या मानसिक खच्चीकरणातून, त्यातून निर्माण होणाऱ्या न्यूनगंडातून सांस्कृतिकीकरणाची, संस्कृतायझेशनची म्हणजे अभिजनांचं, उच्चजातीयांचं अनुकरण करण्याची किंवा या अभिजनांचे प्रतिनिधी असलेले गावचे भटभिक्षुक जे सांगत असतील ते ऐकण्याची पद्धत बहुजनांमध्ये अस्तित्त्वात येते. बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर दलित समाज या अनुकरणाच्या प्रक्रियेतून बाहेर होत त्याने सांस्कृतिक आणि सासंकृतिक द्दष्ट्या स्वतःचा स्वतंत्र मार्ग चोखाळला. पण मधल्या जातींचा बहुजन समाज मात्र सांस्कृतिक आणि मानसिक द्दष्ट्या ब्राह्मणशाहीच्याच पगड्याखाली राहिला. त्यामुळेच बैठकांचं, बुवामहाराजांचं स्तोम पसरवता आलं. १९९० नंतर हे स्तोम अधिक वाढलं. जागितकीकरणानंतर अनेकांचे रोजगार हिरावले गेले. आर्थिकद्दष्ट्या अनिश्चितता आली. अशा सैरभैर समुहांना धर्माच्या नावे राजकारण करणाऱ्या यंत्रणेने विविध सत्संगांच्या बैठकींच्या जाळ्यात ओढले, वेगवेगळ्या बापूमहाराजांच्या शिबिरांपर्यंत नेले. इथे संतांनी दिलेली समतेची शिकवण बाजूला राहिली आणि मला शरण ये, मी तुझा उद्धार करतो, असे सांगणारे महंत वाढले. यातनं आधी बहुजन समाजाचं बधिरीकरण आणि नंतर जहालीकरण करण्याची प्रक्रिया सुरु झाली. आज बहुजन समाज मोठ्या संख्येने हिंदुत्वाच्या नावे वैदिकांनी सुरु केलेल्या धर्मवादी राजकारणाला बळी पडत असेल तर त्यामागचे नेपथ्य हे अशा बैठका-शिबिरांचे आहे. म्हणूनच असहमतीचा उच्चार हा कायम थेटपणे करायला हवा.

समतावादी साहित्य आणि बेगमपुराचा शोध –

‘अब हम खूब वतन घऱ पाया

उंचा खैर सदा मन भाया,

बेगमपुरा सहर को नावॅं, दुख – अंदोह नही तेहिं ठावॅं

ना तसवीस खिराज न माल, खौफ न खता न तरस जुवाल…’

‘मला आता माझ्या वतनामध्ये माझं घर लाभलं आहे. तिथे कायम खुशाली असते, जी माझ्या मनाला स्वस्थता देते. हे बेगमपुरा नावाचे शहर सर्व शोषणांपासून, दुःखांपासून मुक्त आहे. इथे कोणतंही दुःखं नाही, चिंता नाही. देवाचे नाव घेण्यासाठी इथे कोणताही कर भरावा लागत नाही. इथे कोणाचंही भय नाही, किंवा गुन्हा नाही. कोणत्याही गोष्टीसाठी झुरावं लागत नाही…’

संत रविदास यांची ही रचना एका स्वप्ननगरीचे, युटोपियाचे दर्शन घडवते. वेगवेगळ्या संतांच्या रचनांमधून, समाजक्रांतिकारकांच्या मांडणीतून समोर येणाऱ्या या शोषणविरहित स्वप्ननगरीविषयीचे कथन दिवंगत विदुषी गेल आम्वेत यांनी आपल्या ‘सिकिंग बेगमपुरा’ या ग्रंथात उलगडत नेले आहे. संत नामदेव, संत कबीर, संत रविदास, संत तुकाराम यांच्या अभंगांमधून आपल्याला स्वप्ननगरीचं दर्शन होतं. त्याचवेळी म. फुले बळीराज्याचं तर बाबासाहेब आंबेडकर प्रबुद्ध भारताचं स्वप्न दाखवतात. गेल आम्वेत या स्वप्ननगरींच्या कथनांकडे इथल्या दलितबहुजनांचा सांस्कृतिक पर्याय म्हणून  पाहातात. जहाल हिंदुत्व, मवाळ हिंदुत्व एकीकडे आणि दुसरीकडे धर्मापासून पूर्ण फारकत घेतलेले पुरोगामी या पेचात दलितबहुजनांच्या समतावादी सांस्कृतिक प्रवाहांचा मार्गच पुढची दिशा दाखवेल, अशी मांडणी त्या करतात.

धर्मांधतेला, जातीयतेला आणि सर्वप्रकारच्या वर्चस्ववादाला नकार देणाऱ्या जनवादी साहित्य आणि संस्कृती चळवळीचे उद्दिष्ट काय, हे ठरवताना या महामानवांनी कल्पिलेली ही स्वप्ननगरी दिशादर्शक आहे. शोषण नसलेली, दुःखं नसलेली ही स्वप्ननगरी म्हणजे मानवी समतेची, न्यायाची पहाट आहे. राज्यसंस्था हळूहळू विरत जाईल आणि त्यावेळी मनुष्याला विविध कलांच्या, कृतींच्या माध्यमातून आपला विकास साधता येईल, अशी एका स्वप्ननगरीची मांडणी कार्ल मार्क्स यांनीही केली आहे. म. फुले जेव्हा एकमय भारताची मांडणी करतात तेव्हा ते या स्वप्ननगरीची वास्तवातील पायाभरणी कशी करायची हेच सांगत असतात. एकाच कुटुंबातील चार व्यक्ती आपल्या आवडीप्रमाणे चार वेगळ्या धर्मांचं आचरण करु शकतात, असं म. फुले सांगतात. ही आजच्या काळातही एक स्वप्नवत कल्पना वाटते पण तीच प्रत्यक्षात आणणे, हे ध्येय आज असायला हवे.

स्वप्ननगरीच्या या कथनांना समांतर जाणारं एक विलक्षण दीर्घकाव्य अरुण कोलटकर यांनी लिहिले आहे. द्रोण नावाचे. अलिकडेच २००२ मध्ये (सुरुवातीला खासगी वितरणासाठी) प्रसिद्ध झालेल्या या दीर्घ काव्याची थोडक्यात रुपरेषा अशी आहे – रामाने वानरसैन्याच्या मदतीने रावणाला मारलेले आहे. रामाचा विजय झाल्यावर आता लंकेत विजयोत्सव सुरु आहे. सुग्रास पंचपक्वानांच्या पंगती मांडण्यात येत आहेत. या पंगतींमध्ये वानरांनाही मनुष्यांप्रमाणे पक्वांनांचा आनंद घेता यावा, यासाठी दोन तळ्यांची योजना करण्यात आली आहे. प्रवेशद्वाराच्या तळ्यात बुडकी मारली की वानराचे रुपांतर माणसात होणार. आणि उत्सव संपल्यावर मागच्या द्वारातील तळ्यात बुडकी मारली की माणूस झालेल्या वानरांचे पुन्हा वानरांमध्ये रुपांतर होणार. अशारीतीने मनुष्यदेह धारण केलेल्या वानरांनी विजयोत्सवाचा मनमुराद आनंद उपभोगला. त्यावेळी त्यांच्यातल्या तरुण वानरांना आपण पुन्हा वानर होऊ नये, मनुष्यच रहावे, असे वाटते. त्यांचा हा बेत ऐकून वडिलधारी वानरे वैतागतात. माणसांच्यात नुसतं मनुष्य होऊन चालत नाही, ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य-शूद्र व्हावे लागते, असे काहीजण सांगतात. काहीजण शेपटी हेच आपले वैभव असल्याचे सांगतात. काहीजण रामलक्ष्मणाला हे मान्य होणार नाही, असे सांगतात. हा शेवटचा मुद्दा तरुण वानरांना पटतो. आता यातून मार्ग कसा काढायचा, याचा विचार ते करत असतात. त्यावेळी त्यांच्यातल्याच एकाच्या मुखात येते, सीतामाई. सीतामाईच यातून मार्ग दाखवेल. मग वानरांचे एक शिष्टमंडळ सीतामाईला भेटायला जाते. सीतामाई वृक्षाखाली बसून पानांचे द्रोण करत असते. पंगतींमध्ये कमी पडायला नको म्हणून. ती मनुष्यरुपी वानरांच्या शिष्टमंडळाचं म्हणणे ऐकून घेते. आणि तुम्हाला पुन्हा वानर व्हायचे नसेल तर नका होऊ, असे सांगते. त्यावर वानरांचे शिष्टमंडळ खाली मान घालून गप्प बसते. तुम्हाला कुणाचे भय आहे, असे सीतामाई विचारते. शिष्टमंडळ सांगते, धाकट्या साहेबांचे. सीतामाई हसते. तिला कळते की लक्ष्मण या वानरांना शिक्षा केल्याशिवाय राहाणार नाही. शिवाय रामही. राम वर्णव्यवस्थेचा कडवा पुरस्कर्ता आहे, प्रत्येक समाजघटकानं आपापली पायरी ओळखून राहावं, हा या व्यवस्थेचा प्राण आहे आणि ही माकडं एकदम वरच्या पायरीवर झेप घेऊ पाहात आहेत. राम यांना क्षमा करणार नाही, हे सीतेला उमगतं. पण त्याचवेळी या वानरांसाठी आपण काही केले पाहिजे, असे तिला वाटते आणि ती तिच्या हातात असेलेले तेरा द्रोण एकमेकात खोवून शिष्टमंडळाच्या हातात देते. या द्रोणांचं काय करायचं ते वेळ आली की तुम्हाला आपोआप कळेल, तुमच्या मनासारखे होईल, असे सांगते. शिष्टमंडळ आणि बाहेरची मनुष्यरुपातील वानरंही द्रोण पाहून वैतागतात. ही चिडाचिडी सुरु असतानाच एक द्रोण हवेत उडत मोठा होत जातो आणि एका गलबताच्या रुपात समुद्रात जाऊन विसावतो. मनुष्यरुपी वानरं नाचत ओरडत त्या गलबतात जाऊन बसतात. असे आणखी बारा द्रोण त्यांच्याकडे असतात. ते गलबतात बसून निघायचं ठरवतात पण कुठे जायचं म्हणून पुन्हा घाबरतात. तेव्हा समुद्रकाठचा शंख त्यांना सांगतो, सीतामाईचे आशिर्वाद असल्यावर दुसरं काय पाहिजे तुम्हाला. पृथ्वीच्या पाठीवर जिथं म्हणून जाल, ज्या भूमीला थडकाल, ते आजोळच असेल तुमचं. तुम्हाला काही म्हणजे काहीच कमी पडू द्यायची नाही सीतेची आई. अशारीतीने मनुष्यरुपी वानर एकेका भूभागावर जाऊन थडकले. त्यांचीच वंशवेल विस्तारुन पुढं त्यांच्या शाखा अमेरिकन, इंग्रज, फ्रेंच, जर्मन, इटालियन, रशियन, हबशी, अरब, तुर्की, चिनी, जपानी वगैरे नावांनी प्रसिद्ध होणार होत्या.

थोडक्यात भूमिकन्या असलेल्या सीतामाईने धरतीच्या वेगवेगळ्या भागांवर मानवांची वसाहत केली, चातुर्वर्ण्यव्यवस्थेतून त्यांची मुक्तता केली, असा आशय मांडणारे हे दीर्घकाव्य अतिशय क्रांतीकारी आशय व्यक्त करते. कवी सांगतो त्याप्रमाणे ही वानरांच्यात शतकानुशतके प्रचलित असणारी रामकथा आहे. आणि या रामकथेचा शेवटचा अध्याय सीतामाईने लिहिला आहे. चातुर्वर्ण्यव्यवस्थेविरोधातलं वानरांचं बंड सीतामाईच्या द्रोणांच्या मदतीने यशस्वी होते. वानरांचं मनुष्य होण्याचं स्वप्न सीतामाई पूर्ण करते.

या धरतीवरच्या प्रत्येकाचे मनुष्य होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, मानवांना आपला बेगमपुरा सापडावा, ही इच्छा, अपेक्षा व्यक्त करुन मी माझे मनोगत पूर्ण करते.