१.

कॉम्रेड …
परवा सहज टी व्ही सर्च करतांना
एका देशी वाहिनीवर तुम्ही 
दिसलात कॉम्रेड,
भरगच्च पुस्तकांच्या गर्दीत मुलाखत देताना,
कपाटातला मार्क्स,लेलीन,डांगे,
यांचा ऊर भरुन आला..
जसा आनंद व्हावा एखादी गिरणी चालू झालेवर..
चळवळीचा जमा खर्च मांडतांना 
तुम्ही बेभान झाला होतात कॉम्रेड.. 
हळूवार डोळ्यांत तुमच्या संप दिसायचा,
उध्वस्त संसार सांगतांना शब्दात कंप असायचा.. 
आणि बदलून गेलेल्या  सत्ताकारणात गळून गेलेले शिलेदार सांगतांना तुमचा आसूही ढळायचा कॉम्रेड,
तुम्ही माञ तसेच आहात पक्षातल्या जीर्ण झालेल्या झेंड्यासारखे,
विळा हातोड्यांनी घट्ट धरुन ठेवावं एकमेकास 
तसा तुमचा आत्मविश्वास तुमच्या तत्वांशी,
लढा कुणाशी दिलात कॉम्रेड
याची यादी फारच मोठी होती…
म्हणालात तुम्ही काहीतरी शेतकरी मजूर,कष्टकरी,
इत्यादी
पण!
जागतीकरणाच्या व्यवस्थेमध्ये हे शब्द केव्हाच हरवून गेलेत कॉम्रेड
कामगारांनी घेऊन दिलेली जीप आजूनही तुमच्या दारात उभी आहे 
मोडकळीस आली आहे ती,
उडालेत रंग तिचे,
रंगाचाच विषय निघाला म्हणून बोलतो कॉम्रेड
हल्ली दिसत नाही तो तुमच्या क्रांतीचा लाल रंग,
का तोही विभागला गेलाय,
वेगवेगळ्या पक्षांच्या झेंड्यामध्ये?
तुमच्या क्रांतीचा सुर्य मात्र मला 
तुमच्याच भोवती फिरतांना दिसतो 
आणि आम्ही तो पाहतो टी व्ही वर एक 
प्रायोजित कार्यक्रम म्हणून..

२.

बेडूक गिळून 
अजगर पडावा तशी इथली  भांडवलशाही पडून आहे 
शहरा शहरात 
मुंग्याची ताकदही राहिली नाही त्या भोवती जमा होण्याची 
इतके सारेच कसे चिडीचुप 
एकाच वाटेवरचे श्रमीक 
माकडाला राहिलीच नाहीत झाडं उड्या मारण्या,
इतके ओसाडपण 
मासे तडफडून मरताहेत  पाणी आटल्याने

इथल्या क्रांतीच्या तळ्यात 
काळवंडलेल्या आकाशात श्वास गुदमरतो इथल्या पक्षांचा 
या सा-यांची वाट
मी एक कामगार चालतो आहे  
तुम्हाला दिसतोय ?

३.

डोक्याखाली उशी ठेऊन 
झोपावे इतक्या 
नसतात जाती हलक्या 
त्याचं ओझं 
पेलणा-याला माहित.
तशी रोज कोणीच घेऊन फिरत नाही जात बरोबर 
तरीही सावली सारखी मागेच असते.
सूर्य दिशा बदलतो तशी ती फिरत रहाते आपल्याच भोवती.
कधी मागेमागे,कधी लपून छपून,कधी डोक्यावर बसते
तर कधी पुढे पुढे करत लाळघोटी होते जात…
मला माणूस म्हणून एकटं फिरू देत नाही चारचौघात 
तिला जाणवते प्रत्येक पुढच्या पावलागणित 
शोधायला हवा रस्ता गुपचूप 
अन्यथा करावा दंगा तिच्याच नावाने 
पाऊल पुढे टाकण्यासाठी
माझ्या माणूसपणाच्या पावलांपेक्षा तिचे हलके आहे पाऊल…


(कवी सांगली जिल्ह्यातील आघाडीचे कवी आहेत)