१.हे विश्वच बुद्ध

मी म्हणालो 
आपण कायमच उभे असतो 
युद्धाच्या भूमीवर
तर कुठूनसा आवाज आला बुद्ध बुद्ध
तर मी म्हणालो,
आम्ही, आमची मागची पिढी 
त्याच्याही मागची पिढी
सारे पूर्वजच शस्त्रधारी
तर त्याच आवाजाचे स्वर 
पुन्हा घुमत राहिले बुद्ध बुद्ध
मग मी आमच्याही हिंसेची परंपरा तपासू लागलो
तर आम्ही जातीयवादी, धर्मवादी 
निघाल्याचे जाहीर झाले
तर तोच आवाज पुन्हा निनादला बुद्ध बुद्ध
पुन्हा पुन्हा आम्ही आम्हालाच तपासत राहण्याची
आधीपासून सवय लावून तर घेतली नव्हतीच
म्हणून तर युद्धखोर गणले गेलो
त्याची शिरगणती करताना 
त्याचाही झेंडा मिरवला अभिमानाने
तर तिथेही त्या आवाजाची 
पुनरावृत्ती होत राहिली बुद्ध बुद्ध
मग मी सारी मुळच 
खणून काढायची ठरवली
आणि स्वतःला गोठवल गाठला तळ
तर उलटा, इतिहास सापडत गेला
आमचा इतिहास कधीच नव्हता 
जातीयवादी, ना धर्मवादी
ही भूमीही नव्हती कधी एकट्याची
नव्हता गाव, नव्हता देशही 
कधी एकट्याचा
ही भूमी होती सगळ्यांची
त्यामुळे आम्ही युद्धखोर 
असण्याचा प्रश्नच नव्हता
तेव्हा मी म्हणालो 
मी बुद्ध, तू बुद्ध, हे विश्वच बुद्ध!


२. त्यांच्या दृष्टीने 

त्यांच्या दृष्टीने 
ईश्वर निंदा करणारे लोक 
वाईट असतात
त्यांच्या दृष्टीने
महामारीत पाण्याबरोबर 
वाहत जाणारे देहही
गंगेच्या पाण्या प्रमाणे
पवित्र असतात
ते म्हणतात
ईश्वर असो किंवा
लोकशाहीला बाधित 
हुकूमशाहा
कोणाचीही चिकित्सा 
करणारे नागरिकच 
सर्वाधिक देशद्रोही असतात
त्यांच्या दृष्टीने 
माते समान असते
इथली प्रत्येक
नापिक भूमी
आणि त्यांच्या दृष्टीने
श्रेष्ठही असते ती
त्यांना पक्क ठाऊक असत
त्याच भूमीत
अस्तित्वहीन माणसांचा
जन्मही होत असतो
त्यांना अधिक 
प्रिय असतात
डोळे असूनही 
दृष्टिहीन लोक
त्यांना अजून प्रिय असतात
बोलता येत असूनही
मुकेपणाचे सोंग घेऊन 
जगणारे सार्वत्रिक लोक
कारण त्यांना 
एकाच वेळी
युद्ध आणि शांतताही
हवी असते!


कवी अजय कांडर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून मराठीतील आघाडीचे कवी आहेत.