1.शहर गावात घुसते तेव्हा……!

खरंच गावाचे शहर बनत असते काय ?
की शहर घुसते गावात ?
एक म्हातारे जोडपे
उभे आहे बांधावर
तेवढाच एक बांध शिल्लक ठेवत
सुसाट वेगाचा रस्ता घुसलाय गावात.
गावाचे शहर बनते म्हणजे काय होतं?
एक तरुण उभा आहे
पंचतारांकित रेस्तरॉंच्या दारात
तो वाजवतोय शिट्टी
थांबवू पाहतोय वा-याशी खेळणाया मोटारींना
जसे थांबायचेत गावकरी
त्याच्या टपरीवर
मारायचेत भूरका वाफाळत्या चहाचा
तो आठवत राहतो गप्पांचे फड
शोधत राहतो सवंगडी
या शहराने बनवलं आहे गावाला वेठबिगार
एक बाई भटकते आहे अनवाणी
तिला सापडत नाही शेताकडे जाणारी वाट
तिच्या सवयीचे रस्ते गिळून टाकलेत
गावात घुसलेल्या शहराने
एक गाय पाठलाग करते बाईचा
तिला विचारायचा आहे पत्ता
हिरव्यागार रानाचा
कावयाबावया चिमण्यांना करायचीय तक्रार
घर चोरीला गेल्याची
शहर घुसते गावात तेव्हा काय होत असतं ?
शहर मागू लागते दान
आधी शेत,मग घर
आदीम अस्तित्वाचा दाबला जातो गळा
गाव घेतं गाडून; बनतं खत
त्या खतावर उगवते एक मिजासखोर शहर
त्यात गाय हरवते रान
नि बाई हरवते शेत.

2. भूमीच्या शोधात निघालेय सत्य

फेड वस्त्र हो नागवा,
तपासून घे सर्व इंद्रीये
मनाला उबव नेणिवेत,
प्रसव संवेदना स्वत:साठी
नसेलच निर्णय करता येत,
तर लोंबकळत रहा अधांतरी
सत्य टाचेखाली घेवून,
उगवता येत नाही भूमीवर
तू खणू दिले स्वत:ला,
पिढीजात मुळांसकट
आधी सत्य मरते मग माणूस,
पण मरत नाही सत्य म्हणून माणूसही
सत्य घेत राहते शोध भूमीचा पुन्हा पुन्हा
जसे की, आज भूमीच्या शोधात निघालेय सत्य

(कवी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते आहेत)